खंबायत आखात : अरबी समुद्राचा गुजरात राज्यामध्ये शिरलेला फाटा. सौराष्ट्राच्या दक्षिण टोकावरील दीवपासून सुरतच्या दक्षिणेकडील दमणपर्यंत याची हद्द समजण्यात येते. सु. २०० किमी. लांब, २४–२०० किमी. रुंद व सरासरी ८–१२ मी. खोल असलेल्या या आखातास पूर्वेकडून तापी, नर्मदा उत्तरेकडून मही, साबरमती आणि तिन्ही बाजूंनी अनेक लहान नद्या मिळतात. नद्यांनी आणलेल्या गाळामुळे खंबायत, भडोच, सुरत या एकेकाळच्या भरभराटलेल्या बंदरांचे महत्त्व आता कमी झाले. तसेच किनाऱ्याजवळ अनेक बेटे व दलदलीचा प्रदेश निर्माण झाला. वादळी व विषम हवामानासाठी आखात प्रसिद्ध असले, तरी येथे सापडलेल्या तेलाच्या साठ्यामुळे खंबायत आखाताला ऊर्जितावस्था येईल असे दिसते.

शाह, र. रू.