खंबायत : गुजरात राज्याच्या खेडा जिल्ह्यातील तालुक्याचे शहर. लोकसंख्या ६२,०९७ (१९७१). मही नदीच्या मुखाजवळ हे वसलेले असून रेल्वेने खेडाच्या ४९ किमी. दक्षिणेस व आणंदच्या ५३ किमी. नैर्ऋत्येस आहे. प्राचीन काळी हे भरभराटलेले बंदर असून परदेशांशी येथून मोठा व्यापार चाले. टॉलेमी, अल् मसूदी आदी अनेकांनी खंबायतचा प्रसिद्ध बंदर म्हणून उल्लेख केला आहे. तेराव्या शतकाच्या शेवटी अनहिलवाड राजांकडून ते मोगलांकडे आले. मोगलांच्या कारकीर्दीत खंबायतचे वैभव आणखी वाढले. धान्य, कापड, कलाकुसरीच्या वस्तू, मौल्यवान खड्यांचे दागिने इत्यादींच्या व्यापाराबरोबरच इस्लाम, जैन व हिंदू संस्कृतींचे हे मोठे केंद्र बनले. आजही येथे अनेक उत्तम जुन्या मशिदी व जैनांचे हस्तलिखित साहित्य पहावयास मिळते. मोगलांनंतर मराठे, इंग्रज यांचा अंमल सोडला, तर खंबायत १९४८ पर्यंत संस्थान म्हणून राहिले. तथापि सतराव्या शतकापासूनच गाळ साचू लागल्याने खंबायतचे बंदर म्हणून महत्त्व कमी झाले. गेल्या दशकात खंबायतजवळ तेलविहिरी मिळाल्याने खंबायतचे महत्त्व वाढले.

शाह, र. रू.