खंडोबाचा किडा : (पुजारी टोळ). डिक्टिऑप्टेरा गणातील माँटिडी कुलातील हा कीटक होय. तो दिसायला सर्वसाधारणपणे नाकतोड्या टोळासारखा असतो. त्याचे शास्त्रीय नाव स्टॅग्मोमँटिस कॅरोलिना होय. तो झाडाझुडपावर शरीराचा पुढचा भाग आणि पाय अशा रीतीने धरून बसतो की, त्यामुळे तो ध्यानस्थ पुजाऱ्यासारखा दिसतो. परंतु हे ध्यान दुसरे किडे पकडून खाण्यासाठी असते. पुढील पायाचा पहिला भाग लांब व पोटरीवर काटे असतात. तो पोटरी व मांडी यांच्यामध्ये किडे पकडून फस्त करतो. तोंडाची रचना चावून खाता येण्यासारखी असते. छातीचा भाग लांब असतो. पंख चार असतात पण बहुधा मिटलेले असतात. यांचा रंग बहुतेक हिरवा म्हणजे दिसावयास एखाद्या झाडाच्या भागाप्रमाणे असतो. त्यामुळे इतर भक्ष्य किड्यांना जवळ येईपर्यंत याचे अस्तित्व समजत नाही.
हा कीटक लहान मोठ्या माश्या, गवती टोळ, अळ्या इ. पिकांना उपद्रव देणारे किडे खातो. तो गांधील माश्या, मधमाश्यादेखील पकडतो व त्यांनी डंख मारताच तेवढ्यापुरते सोडून देतो पण परत पकडून खाऊन टाकतो. हा एक उपयुक्त कीटक आहे. त्यामुळे त्याच्या नियंत्रणाचा प्रश्नच येत नाही.
“