खंडे नवमी : नवरात्रातील नवव्या दिवसाला (आश्विन शुद्ध नवमीस) खंडे नवमी म्हणतात. या दिवशी लढाऊ जाती विधिपूर्वक शस्त्रपूजन करतात, तसेच विविध शिल्पकार व कारागीर आपापल्या उपकरणांचेही पूजन करतात. शस्त्रास व उपकरणास या दिवशी देव मानून पूजा करण्याची प्रथा महाराष्ट्रात व राजस्थानात विशेषत्वे आढळते. ह्या दोन्हीही प्रांतांत खड्गपूजेस विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात या दिवशी शस्त्रपूजा केल्यावर दुसऱ्या दिवशी (विजया दशमीस) सीमोल्लंघन करून मोहिमेवर निघत. निर्णयसिंधूत निरनिराळ्या शस्त्रपूजेचे मंत्र दिलेले आहेत.