क्विलर-कूच, आर्थर टॉमस : (२१ नोव्हेंबर १८६३–१२ मे १९४४ ). इंग्रज समीक्षक, कादंबरीकार आणि कवी. ‘क्यू’ ह्या टोपण नावाने बरेचसे लेखन. जन्म इंग्लंडमधील बॉडमिन (काउंटी कॉर्नवॉल) येथे. शिक्षण ऑक्सफर्ड. आक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांत प्राध्यापक म्हणून काम केले. द स्पीकर  ह्या नियतकालिकात साहाय्यक संपादक म्हणूनही तो काही वर्षे होता.

मुख्यत: संकलक व समीक्षक म्हणून प्रसिद्धी. द ऑक्सफर्ड बुक ऑफ इंग्लिश व्हर्स १२५०–१९०० (१९००) ह्या विशेष महत्त्वाच्या संकलनात कालौघात बदलत गेलेले इंग्रजी कवितेचे रूप परिणामककारकपणे प्रत्ययास येते. द ऑक्सफर्ड बुक ऑफ बॅलड्स  (१९१०) आणि द ऑक्सफर्ड बुक ऑफ व्हिक्टोरिअन व्हर्स (१९१२) ही अन्य उल्लेखनीय संकलने. त्याची वाङ्‍मयविषयक व्याख्याने पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली असून त्यांत ऑन द आर्ट ऑफ रायटिंग (१९१६), स्टडीज इन लिटरेचर (१९१८) आणि ऑन द आर्ट ऑफ रीडींग (१९२०) ही प्रमुख होत. मार्मिक पण सहृदय दृष्टिकोण आणि सहजसुंदर व प्रसन्न भाषाशैली ही त्याच्या समीक्षालेखनाची वैशिष्ट्ये.

डेड मॅन्स रॉक (१८८७) आणि ट्रॉय टाउन (१८८८) ह्या त्याच्या उल्लेखनीय कादंबऱ्या. पोएम्स (१९३०) आणि ग्रीन बेज (१९३०) हे काव्यसंग्रह. नॉट्स अँड क्रॉसेस (१८९१) हा यशस्वी कथासंग्रह. १९१० मध्ये त्याला नाइट करण्यात आले. फॉई (काउंटी कॉर्नवाल) येथे तो निवर्तला.

 बापट, गं. वि.