कीर्थर : पाकिस्तानमधील पर्वतरांग. लांबी सु. ३५० किमी. रुंदी ३२–९६ किमी. सिंध व बलुचिस्तान यांच्या सरहद्दीवरील हा चुनखडीयुक्त, उघडाबोडका पर्वत कलातच्या आग्नेयीकडे वाहणाऱ्या मूला नदीपासून सरळ दक्षिणकडे गेला आहे. याची एक शाखा आग्नेयीकडे कराची बाजूस गेली असून, सिंधच्या दादु जिल्ह्यात पसरलेली लखी रांग कीर्थरचाच फाटा होय. समुद्रसपाटीपासुन २,२६५ मी. उंचीचे झदर्क हे कीर्थरमधील सर्वोच्च शिखर असून दुसरे कुत्ता-जोकबर हे २,०९६ मी. उंच आहे. कोलाची अथवा गाज ही कीर्थरमधील महत्त्वाची नदी असून तिने अनेक नयनरम्य घळी बनविल्या आहेत. हरबाब, फुसी, रोहल व गारे या कीर्थरमधील महत्त्वाच्या खिंडी होत. कीर्थरमध्ये वनस्पती व प्रा.णिजीवन अतिशय विरळ असले, तरी औषधी पाण्याच्या अनेक गरम झऱ्यांकरिता कीर्थर प्रसिध्द आहे.
शाह, र. रू.