कीटोग्नॅथा : हा प्राण्यांचा एक स्वतंत्र संघ आहे. यामध्ये आठ वंश व चाळीसपेक्षा अधिक जाती आहेत. जगातील जवळजवळ सर्व समुद्रांत हे प्राणी आढळतात. (पाण्यावर तरंगत असणाऱ्या प्राण्यांत व वनस्पतींत) हे विपुल असतात. ज्यावेळी उजेड जास्त असेल त्यावेळी हे खोल पाण्यात जातात व ज्यावेळी उजेड कमी असेल त्यावेळी वर येतात. एककोशिक (ज्यांचे शरीर एकाच पेशीचे बनले आहे असे) प्राणी, क्रस्टेशियन (कवचधारी) प्राण्यांचे डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे जगणारी आणि प्रौढाशी साम्य नसणारी प्राण्याची क्रियाशील पूर्व अवस्था) हे यांचे मुख्य अन्न होय. यांचा सॅजिट्टा हा वंश बहुतेक सर्व समुद्रांत प्रामुख्याने आढळतो. यांची हालचाल बाणासारखी असते. सामान्य जातीचे शास्त्रीय नाव सॅजिट्टा बायपंक्टेटा असे आहे.
यांचा भ्रूणीय विकास ॲनेलिडांप्रमाणे किंवा काही कॉर्डेटांसारखा (पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांसारखा) होतो. काही कॉर्डेट प्राण्यांप्रमाणे पुच्छ गुदद्वाराच्या मागे असते. वरवर पाहिले असता यांचे सूत्रकृमींशी (नेमॅटोडांशी) साम्य आहे असे वाटते, पण खोल अभ्यास केला असता यांची कितीतरी लक्षणे सूत्रकृमींपेक्षा वेगळी असल्याचे आढळून येते. यामुळे कीटोग्नॅथाचा समावेश वरीलपैकी कोणत्याही एका संघात करता येत नाही व यांचे जातिवृत्त (एखाद्या जातीच्या अथवा प्रजातीच्या विकासाचा इतिहास) ठरविणे अतिशय अवघड झाले आहे.
शरीर दंडगोलाकार व नाजूक असते. द्विपार्श्व सममिती (शरीराचे दोन सारखे भाग होणे) आढळून येते. शरीराचे खंडीभवन झालेले नसते. जननस्तर (सुरुवातीच्या भ्रूण ज्या पेशींचा बनलेला असतो अशा पेशींचे थर) तीन असतात. दंडगोलाकार शरीराचे शीर्ष, धड व पुच्छ असे तीन भाग पडतात. एक पुच्छीय पक्ष (तोल सांभाळण्यास वा हालचाल करण्यास उपयुक्त असणारी त्वचेची स्नायुमय घडी, पर) आणि पार्श्वपक्षांच्या दोन जोड्या असतात. मुख अधर (खालच्या) भागात असून त्यांच्या दोन्ही बाजूंना पाली (खंड) असतात. या पालींवर कोयत्यासारखे अनेक कायटिनी शूक (लहान राठ केसांसारख्या रचना) असतात. त्यांचा भक्ष्य पकडण्यासाठी उपयोग होतो. देहगुहेचा (शरीराच्या पोकळीचा) चांगला विकास झाला असून दोन आंत्रयोजनींनी (प्राण्याच्या देहभित्तीपासून निवून आतड्याला चिकटलेल्या उभ्या स्नायुमय पडद्यांनी) तिचे तीन युग्मित (जोडी जोडीचे) भाग झालेले असतात. ग्रसनीच्या (घशापासून जठरापर्यंतच्या अन्ननलिकेच्या भागाच्या) पृष्ठीय भागावर प्रमस्तिष्क (मेंदूचा पुढचा भाग) गुच्छिकांची (मेंदूचे कार्य करणाऱ्या मज्जापेशींच्या समूहाची) असलेली एक जोडी, ग्रसनीच्या भोवती असलेली संयोजकांची (दोन गुच्छिका जोडणाऱ्या संरचनांची ) एक जोडी, धडाच्या मध्यावर असलेली अधर गुच्छिका व यांपासून निघणाऱ्या तंत्रिका (मज्जातंतू) यांचे तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) झालेले असते. शीर्षाच्या पृष्ठीय भागावर दोन डोळे असतात व दोन डोळ्यांच्या मध्ये घ्राणेंद्रिय असते.
हे प्राणी उभयलिंगी (नर व मादी यांची जननेंद्रिये एकाच प्राण्यात असलेले) असतात. वृषण (पुं-जनन ग्रंथी) आणि अंडाशय यांची एकेक जोडी असते. प्रत्येक पुच्छिय देहगुहेत एक वृषण असते. शुक्रवाहिनी पुच्छाच्या पार्श्व बाजूवर उघडते. धडातील प्रत्येक देहगुहेत एक अंडाशय असतो. प्रत्येक अंडाशयापासून एक अंडवाहिनी निघून धडावर पार्श्व बाजूस उघडते. निषेचन (शुक्राणू व अंडाणू यांचा संयोग) आंतरिक (शरीरामध्ये) असते. विकासात डिंभावस्था नसते.
परिवहन (रुधिराभिसरण), उत्सर्जन आणि श्वसन तंत्रे नसतात. समुद्राच्या पाण्याचे ओघ कसेकसे जातात हे जाणण्यासाठी यांचा उपयोग होतो.
जोशी, मीनाक्षी
“