कीटकनाशके : मानव व प्राणी यांना होणाऱ्या काही रोगांच्या जंतूंचा प्रसार करणाऱ्या तसेच शेतातील पिके, साठविलेले अन्नधान्य, कपडे, लाकूड इ. जीवनावश्यक साहित्याचा नाश करणाऱ्या कीटकांचा नाश करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांना कीटकनाशके असे म्हणतात. उपद्रवी कीटकांचा नाश करण्याच्या पद्धती फार प्राचीन काळापासून माहीत आहेत, पण मोठ्या प्रमाणावर रसायनांचा वापर करून कीटकांचा नाश करण्याचे प्रयत्न हे अलीकडच्या काळातील आहेत. आर्सेनिकाचा कीटकनाशक म्हणून उपयोग करीत असत, असा उल्लेख प्लिनी (इ.स.७०) यांनी आपल्या लिखाणात केलेला आहे. गंधक जाळून त्याच्या धुराने कीटक नाहीसे होतात असा उल्लेख होमर यांच्या ग्रंथात सापडतो. रोमन लोक कीटकनाशासाठी हेलेबोअर (व्हेराट्रम, वंश हेलेबोरस) या वनस्पतीच्या मूलक्षोडाचे (हळदीच्या गड्ड्यासारख्या खोडाचे) चूर्ण वापरत. सोळाव्या शतकाच्या अखेरीस चिनी लोकांनी आर्सेनिक सल्फाइडाचा उपयोग कीटकनाशक म्हणून केला. त्याच सुमारास अमेरिकेत स्पॅनिश लोक सबदिल्ला या रसायनाचा उपयोग उवानाशक म्हणून करीत असत, असा उल्लेख आढळतो.
भारतात. प्राचीन काळी प्राणी व कीटक यांच्या नाशासाठी विषाचा उपयोग करीत असत असे उल्लेख मनुस्मृति, कौटिलीय अर्थशास्त्र, सुश्रुतसंहिता इ. प्राचीन ग्रंथांत मिळतात. ऊद, धूप इत्यादींच्या धुरामुळे कीटकांचा त्रास कमी होतो असे आढळून आल्याने धार्मिक बाबींइतकाच कीटकनाशासाठीही त्यांचा उपयोग करीत असत.
वर्गीकरण : नाश करण्याच्या प्रकारानुसार कीटकनाशकांचे वर्गीकरण केले जाते. या वर्गीकरणावरून एखाद्या कीटकनाशकाचा उपयोग कसा करावा हेही समजते. कीटकांच्या त्वचेशी संबंध येऊन, त्यांच्या पोटात भिनून, श्वासमार्गाने शरीरात जाऊन, शारीरिक वा रासायनिक जीवनावश्यक क्रिया बंद होऊन, प्रजोत्पादनक्षमता नष्ट करून इ. प्रकारांपैकी एका वा अधिक प्रकारे ती कीटकनाशाचे कार्य करतात. या प्रकारांनुसार त्यांचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते : (१) पोटात भिनून नाश करणारी, (२) स्पर्शजन्य, (३) दैहिक, (४) धूम्रकारी, (५) प्रलोभक (ॲट्रॅक्टंट), (६) प्रतिवारक (दूर घालविणारी, रिपेलंट).
(१) पोटात भिनून नाश करणाऱ्या कीटकनाशकांचा प्रामुख्याने मुखांगाने (तोंडाने) चघळून अन्न ग्रहण करणाऱ्या कीटकांच्या नाशासाठी उपयोग केला जातो. काही विशिष्ट परिस्थितीत ह्या कीटकनाशकांचा उपयोग मुखांगाने शोषून, चाटून, स्पंजाप्रमाणे शोषून किंवा फुलपाखरांसारख्या वक्रनलिका क्रियेने (असमान भुजा असलेल्या वक्रनलिकेद्वारे वातावरणीय दाबाने द्रव पदार्थ खेचला जाण्याच्या क्रियेने, सायफन क्रियेने) अन्न ग्रहण करणाऱ्या कीटकांचाही नाश करण्यासाठी वापरतात. आर्सेनिकले, फ्ल्युओराइडे, गंधक व त्याची संयुगे इ. कीटकनाशके या प्रकाराची आहेत. या कीटकनाशकांचा वापर पुढीलप्रमाणे करतात : (अ) कीटकांच्या अन्नाभोवती ती संपूर्णपणे आच्छादतात. असे अन्न ग्रहण करीत आसताना कीटकनाशकांचेही कीटकांकडून ग्रहण केले जाते. (आ) कीटकांना आकर्षित करून घेणाऱ्या पदार्थात कीटकनाशके मिसळतात व असे पदार्थ कीटकांना खावयास देतात. (इ) कीटकांच्या सानिध्यात कीटकनाशके फवारतात. कीटकांचे पाय व शृंगिका (डोक्यावरील लांब सांधेयुक्त स्पशेंद्रिये) यांना ती चिकटतात. मुखांगाने हे अवयव स्वच्छ करताना कीटकनाशके त्यांच्या पोटात जातात.
(२) स्पर्शजन्य कीटकनाशके ही सामान्यात: पोटात भिनून कार्य करणाऱ्या कीटकनाशकांनी नष्ट नहोणाऱ्या व वनस्पतींच्या पृष्ठाखालील आणि प्राण्यांच्या त्वचेखालील अन्न शोषून ग्रहण करणाऱ्या कीटकांच्या नाशासाठी वापरतात. कीटकांच्या उपत्वचेमार्फत ती रक्तात भिनतात किंवा श्वसनछिद्रांवाटे श्वासनालात जाऊन श्वासोच्छवास बंद करून विनाशक कार्य करतात. ती कीटकांवर सरळ फवारून किंवा कीटक ज्या वनस्पतींच्या व प्राण्यांच्या पृष्ठांवर असतील त्यांवर किंवात्यांच्या वसतिस्थानावर किंवा कीटकांचा संचार असणाऱ्या इतर ठिकाणांवर फवारतात. रोटेनॉइडे, निकोटिनॉइडे, पायरेथ्रॉइडे इ. वनस्पतिजन्य कार्बनी (सेंद्रिय) कीटकनाशके तसेच डीडीटी व तत्सम अनुजात (एका संयुगापासून बनविलेली दुसरी संयुगे), आल्ड्रिन, एंड्रीन, थायोडान, ॲलोडान, पॅराथिऑन, बायटेक्स, रोनेल, डायाझिनॉन, मॅलॅथिआन, कार्बामेटे, क्लोरीनयुक्त टर्पिने इ. संश्लेषित (कृत्रिम रीतीने तयार केलेली ) कार्बनी कीटकनाशके यासाठी वापरतात.
कोष्टक क्र. १ सामान्य कीटकनाशके, त्यांचे गुणधर्म व उपयोग |
||
कीटकनाशकाचे नाव |
गुणधर्म |
उपयोग |
(अ)अकार्बनी कीटकनाशके: |
||
(१)आर्सेनिकले : पॅरिस ग्रीन, लेड आर्सेनेट, कॉपर आर्सेनेट, सोडियम आर्सेनेट, कँल्शियम आर्सेनेट, आर्सेनिक ट्राय-ऑक्साइड. |
पोटात भिनून कार्य करणारी जलविद्राव्य काही कमी स्थिरतेची तर काही जास्त स्थिरतेची प्रलोभकांतून वापरल्यास विषारी काही वनस्पतींना अपायकारक संयुगांतील विषारीपणा आर्सेनिकाच्या प्रमाणानुसार, पण शिसे, तांबे आदी धातूंमुळे तो वाढतो. |
कोवळ्या नाजूक पानांसाठी तणनाशके डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी व बियांवरील प्रक्रियेसाठी उपयुक्त. सामान्य कीटकनाशके व विषारी प्रलोभके म्हणून. |
२. फ्ल्युओराइडे :क्रायोलाइट, सोडियम फ्ल्युओराइड, सोडियम फ्ल्युओरोसिलिकेट, बेरियम फ्ल्युओरोसिलिकेट. |
संयुगांतील फ्ल्युओरिनाच्या प्रमाणानुसार विषारीपणा कीटकांच्या पचनरसात विद्राव्य जलविद्राव्य, वनस्पतींना अपायकारक पोटात भिनून कार्य करणारी. |
झुरळे, चघळणाऱ्या उवा, पतंग आणि वनस्पतींवरील चघळणाऱ्या कीटकांच्या नाशासाठी, सामान्य कीटकनाशके व प्रलोभके म्हणून. |
३.संकीर्ण : टाकणखार, गंधक, फॉस्फरस, झिंक फॉस्फॉइड, सोडियम टेट्राबोरेट, क्युप्रस सायनाइड इत्यादी. |
पोटात भिनून कार्य करणारी. |
झुरळे, उवा, वाळवी, मुंग्या, डासांच्या अळ्या, मावा, सोंडकिडे, टाकाऊ पदार्थांतील व हिरवळीच्या खतातील माश्यांच्या अळ्या, प्राण्यांच्या जखमेतील अळ्या, वनस्पतींवरील अळ्या इ. नष्ट करण्यासाठी आणि प्रलोभके म्हणून. |
(आ) वनस्पतिजन्य कार्बनी कीटकनाशके: |
||
१.निकोटिनॉइडे: ॲनाबासीन, निकोटीन, नॉरनिकोटीन (सर्व अल्कलॉइडे). |
स्पर्शजन्य उच्च उकळबिंदू असलेली द्रवरूप, रंगहीन, श्यान अल्कलॉइडे जलविद्राव्य कार्बनी विद्रावकांत विद्राव्य बाष्पनशील धुराच्या स्वरूपात परिणामकारक भुकटी, फवारा, वातविलेप पद्धतीने वापरतात. |
मावा, देवी कीड, माइट वा मृदुकाय किडींवर. |
२.पायरेथ्रॉइडे:क्रिसँथेम्म वंशातील वनस्पतींच्या फुलांपासून मिळणारी रसायने. |
स्पर्शजन्य विषारीपणा पायरेथ्रीन – १ व -२ आणि सिनेरीन-१ व -२ या घटकांमुळे हवा प्रकाश, आर्द्रता यांना अस्थिर संश्लेषित प्रकार उष्णता व प्रकाश यांना स्थिर भुकटी, फवारा व वातविलेप पद्धतींनी वापरतात तात्पुरती बधिरता येऊन नंतर कीटकांचा नाश होतो. |
कार्बामेटे व इतर कीटकनाशकांबरोबर वापरतात जनावरांवर, घरात, विमानात व खाद्य पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यांत फवारतात साठवणीतील धान्यासाठी संरक्षक म्हणून माश्या व पिसवा यांवर उपयुक्त. |
३.रोटेनॉइडे: लेग्युमिनोजी कुलातील वनस्पतींपासून मिळणारी रसायने. |
स्पर्शजन्य विषारीपणा रोटेनॉनमुळे खनिज तेल व वनस्पतिजन्य तेलांतून वापरल्यास परिणामकारक भुकटी, निलंबित चूर्ण आणि पायस स्वरूपात वापरतात. |
मत्स्यविष. कापणीपूर्वी पिकांवर फवारतात गोठ्यातील व जनावरांवरील उवांवर तसेच प्राण्यांवरील बाह्य जीवोपजीवींवर उपयुक्त. |
४.रायनोडाइन :रायनिया स्पेसिओजा या वनस्पतींच्या मुळांपासून व देठांपासून मिळणारे रसायन. |
स्पर्शजन्य व पोटात भिनून कार्य करणारे अल्कलॉइड जलविद्राव्य व कार्बनी विद्रावकांत विद्राव्य खनिज तेलात अविद्राव्य प्रकाश व हवेला स्थिर जलविद्राव्य चूर्ण व भुकटी पद्धतींनी वापरतात तसेच मिथेनॉलयुक्त अर्क स्वरूपातही वापरतात. |
उसाच्या खोडकिड्यावर, पिकांवरील बऱ्याच किडींसाठी. |
(३) दैहिक कीटकनाशके कीटक ज्या वनस्पतींवर किंवा प्राण्यावर असतील त्यांवर फवारून, अंत: क्षेपण करून (अंगात टोचून), रंगवून किंवा मुळांवाटे अन्न म्हणून वनस्पती व प्राणी यांच्यात भिनवितात. मूलतः ही कीटकनाशके विषारी नसतात. पण ती वनस्पतींमध्ये किंवा प्राण्यांमध्ये भिनल्यानंतर अतिविषारी बनतात. वनस्पतींमध्ये हे रूपांतर कसे व कोठे होते हे अद्यापि समजलेले नाही. प्राण्यांमध्ये ते यकृतात होते, तर कीटकांत ते आंत्र-ऊतकांत (आतड्यातील समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांत) होते. अशा वनस्पतींवर किंवा प्राण्यांवर जगणाऱ्या कीटकांचा नाश या मार्गाने करतात. या प्रकारच्या कीटकनाशकात बिया काही वेळ बुडवून मग लावल्या तर बराच फायदा होतो. स्क्रॅडॉन, सिस्टॉक्स, डिमेफॉक्स, फॉस्ड्रीन, फॉस्फोमिंडॉन इ. कीटकनाशके वनस्पतींसाठी थायमेट, डायसिस्टॉन, एकॅटिन इ. बियांसाठी व रोनेल, सिओड्रीन प्राण्यांसाठी वापरतात.
(४) धूम्रकारी पदार्थांचा वापर मर्यादित आहे. जेथून धूर बाहेर जाऊ शकणार नाही तेथेच त्यांचा वापर करणे योग्य असते. पादपगृहात (नियंत्रित परिस्थितीत वनस्पतींची वाढ करावयाच्या बंदिस्त जागेत) त्यांचा वापर करतात. बहुतेक सर्व कीटकांच्या श्वसन छिद्रांवाटे धूर आत शिरून त्यांचा नाश होतो. अक्रिलोनाय ट्राइल, कार्बन डाय सल्फाइड, क्लोरोपिक्रिन, हायड्रोजन सायनाइड, मिथील ब्रोमाइड इ. धूम्रकारी कीटकनाशके यासाठी वापरतात.
(५) कीटकांच्या घ्राणेंद्रियांना उत्तेजित करून, त्यांना मोह पाडणाऱ्या पदार्थांत कीटकनाशके मिसळून त्यांचा नाश करणाऱ्या कीटकनाशकांना प्रलोभके म्हणतात. सामान्यतः अन्न आमिष, लिंग आमिष किंवा अंडनिधान (फलन न होणारी अंडी निर्माण करणारे) आमिष यांपैकी कोणतेतरी आमिष दाखविले जाते. या अमिषात कीटकनाशके मिसळून त्याकडे कीटकांस आकर्षित केले जाते. उदा., नाकतोड्यासाठी कोंडा, मुंग्यासाठी पाक, माश्यासाठी साखर, भुंग्यासाठी लिंग आमिष इत्यादी.
कोष्टक क्र. १ सामान्य कीटकनाशके, त्यांचे गुणधर्म व उपयोग (पुढे चालू) |
||
कीटकनाशकाचे नाव |
गुणधर्म |
उपयोग |
५. सबदिल्ला : (व्हेराट्रीन अल्कलॉइडे) लिलिएसी कुलातील सबदिल्ला इ. वनस्पतींच्या बियांपासून मिळणारे अल्कलॉइड. |
स्पर्शजन्य व पोटात भिनून कार्य करणारी विषारीपणा स्पेव्हाडीन, व्हेराट्रिडिन, सेव्हाडिलिन, सबटाइन, सबडाइन या व्हेराट्रीन अल्कलॉइडांमुळे प्रकाशाच्या सान्निध्यात विषारीपणा नष्ट होतो. सस्तन प्राण्यांना अपायकारक त्यामुळे डोळे चुरचुरतात, श्वसनमार्गांचा शोथ होतो व नाकातून व डोळ्यातून पाणी येते भुकटी व जलविद्राव्य चूर्ण वापरतात. |
कापणीपूर्वी पिकांवर मारतात हेमिप्टेरा गणातील कीटकांच्या नाशासाठी व फुलकिड्यांना प्रलोभक म्हणून. |
६. संकीर्ण : रामफळ, सीताफळ, विलायती जिरे, धने, जमालगोटा, काशीफळ, सब्जा, बकाणा निंब, एरंड, करंज इ. वनस्पतीपासून मिळणारी रसायने, अर्क,तेले,पेंडी, भुकटी इत्यादी |
— |
झुरळे, माश्या, डास, नाकतोडे, पिसवा, मावा इत्यादींसाठी व मत्स्यविष म्हणून. |
(इ) संश्लेषित कार्बनी कीटकनाशके : |
||
१. डायनायट्रेफिनॉले : डीएनओसी, डीएनओसीएचपी, डीएसओएसबीपी, डिनोकॅप. |
स्पर्शजन्य व दैहिक पहिली दोन पिवळी गंधहीन घन दुसरी दोन करड्या रंगाचे द्रव कार्बनी विद्रावकांत विद्राव्य तेलयुक्त फवारा आणि भुकटी पद्धतींनी वापरतात. |
नाकतोडे नष्ट करण्यासाठी. पानांवर फवारण्यासाठी अँकॅरिना वंशातील किडींच्या नाशासाठी कवकनाशक व तृणनाशक म्हणूनही उपयोग. |
२. ऑरगॅनोथायोसायनेटे : लेथेने,थानाइट. |
स्पर्शजन्य व दैहिक कीटकांना बधिर व पंगू करून नाश करते फवारा स्वरूपात वापरतात. |
माश्या, मावा, पांढरी पिसू, फूलकिडे इत्यादींसाठी, तसेच पाळीव प्राण्यांवरील किडींसाठीही वापरतात. |
३. डीडीटी व अनुजात : डीडीटी, डीडीडी, मिथॉक्सिक्लोर, पेरथेन, प्रोलॉन, बुलॉन, डिलॉन, डीएफडीटी. |
स्पर्शजन्य व दैहिक शेवटचे द्रवरूप व बाकीची चूर्णरूपी क्षारकीय विद्रावात अपघटन होते पाण्यात अविद्राव्य जास्त स्थिरतेची व जास्त काळ क्रिया करणारी प्रकाशामुळे व ऑक्सिडीकरणाने अपघटन होत नाही भुकटी, जलविद्राव्य फवारे, निलंबने व पायस पद्धतींनी वापरतात जास्त स्थिरतेमुळे बऱ्याच कीटकांच्या नियंत्रणात सुधारणा परंतु पिके, फळे इत्यादींवरील त्यांचे अवशेष नष्ट करणे अवघड तसेच जमीन दूषित होण्याची शक्यता नियततापी प्राणी व माश्या यांना विषारी. |
जंगले, बागा व मळे येथील वनस्पतींवरील किडींवर टायफस जंतू प्रसार करणाऱ्या उवांविरुद्ध व डासांविरुद्ध मोठ्या प्रमाणात वापरतात. झुरळे व माश्यांसाठी उपयुक्त. |
४. बीएचसी व गॅमेक्झिन (लिंडेन) |
स्पर्शजन्य व दैहिक लिंडेन हा परिणामकारक घटक खाद्य पिकांवर किंवा ज्या जमिनीत ती घेतली जातात त्यांत बीएचसी वापरणे धोक्याचे लिंडेन वापरल्यास हा धोका टळतो चूर्णरूपी व गंधयुक्त बरेच समघटक कार्बनी विद्रावकांत विद्राव्य वातविलेप भुकटी, फवारा, बाष्प इ. पद्धतींनी वापरतात. |
कापसावरील किडी, जमिनीतील किडी व नाकतोडे यांच्या नाशासाठी घरगुती कीटकनाशासाठी व सार्वजनिक आरोग्यात उपयुक्त. |
कोष्टक क्र. १ सामान्य कीटकनाशके, त्यांचे गुणधर्म व उपयोग (पुढे चालू) |
||
कीटकनाशकाचे नाव |
गुणधर्म |
उपयोग |
५. क्लोरिनयुक्त टर्पिने : टोक्साफेन स्ट्रोबेन. |
स्पर्शजन्य व दैहिक पहिले पिवळसर अर्धस्फटिकीय क्षारक सूर्यप्रकाश (जास्त काळ) व ११५० से. वर अस्थिर कार्बनी विद्रावकांत विद्राव्य, पाण्यात अविद्राव्य स्ट्रोबेन हे फिकट पिवळ्या रंगाचे, द्रवरूप. |
कापूस व धान्यावरील किडींसाठी तसेच प्राण्यांवरील कीटकांसाठी व इतर बऱ्याच कीटकांच्या नाशासाठी उपयुक्त. |
६. सायक्लोडायने : क्लोरडान, हेप्टाक्लोर, टेलोट्रिन, आल्ड्रिन, डिल्ड्रीन, एंड्रीन, थायोडान, ॲलोडान, मिरेक्स, केपोन इत्यादी. |
स्पर्शजन्य केपोन व ॲलोडान पोटात भिनून कार्य करणारी बहुतेक पाण्यात अविद्राव्य व कार्बनी विद्रावकांत विद्राव्य. बहुतेक घनरूप, कमीअधिक स्थिरतेची ॲलोडान व केप्रोन सस्तन प्राण्यांस कमी विषारी प्रलोभक, भुकटी व फवारा पद्धतींनी वापरतात. |
झुरळे, मुंग्या, वाळवी, पतंग यांच्यावर उपयुक्त. भाजीपाला, पिके, शोभिवंत वनस्पतींवरील किडींसाठी मावा, तुडतुडे इत्यादींवरही उपयुक्त. |
७. ऑरगॅनोफॉस्फरस संयुगे :ब्लाडान, पॅराथिऑन, गुथिऑन, डिप्टेरेक्स, डायझिनॉन, मॅलॅथिऑन, थायमेट, डायसल्फोन, सल्फोटेप TEPP, मिथिल पॅराथिऑन, बायटेक्स, रोनेल, फॉस्ड्रिन, फॉस्फोमिडॉन, एकॅटीन, सुमिथिऑन, डेलनाव, ईमिडॉन, ट्रिथिऑन, स्क्रॅडॉन, डेमेफॉक्स, सिस्टॉक्स इत्यादी. |
बहुतेक दैहिक काही पोटात भिनून कार्य करणारी काही घनरूप तर काही द्रवरूप काही गंधयुक्त जलविद्राव्य कार्बनी विद्रावकांत विद्राव्य खनिज तेलात अविद्राव्य, जलशोषक वातविलेप, फवारा इ. पद्धतींनी वापरतात सस्तन प्राण्यांना कमीअधिक विषारी वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे. |
मावा, डास इ. बऱ्याच कीटकांवर उपयुक्त शोभिवंत झाडे, पिके यांवरील घरातील कीटक इत्यादींवर उपयुक्त जमिनीतील किडींवरही उपयुक्त बियांवरील प्रक्रियेतही उपयुक्त बाह्य व अंत:परजीवींवर उपयुक्त. |
८. कार्बोमेटे : आयसोलॉन, सेव्हिन, झेक्ट्रॉन, मेटासिल, बायगॉन, मेसुरॉल, टेमिक, बॅनोल इत्यादी. |
दैहिक प्रलोभके म्हणूनही वापरतात घन कार्बनी विद्रावकांत विद्राव्य. |
बऱ्याच कीटकांवर उपयुक्त सार्वजनिक आरोग्यासाठी उपयुक्त गोगलगाई व इतर परजीवी यांवर उपयुक्त घरातील कीटक, पिकांच्या किडी, जमिनीतील कीटक यांवर तसेच बियांवरील प्रक्रियेसाठी उपयुक्त. |
९. ॲकॅरिसाइडे :केलथान, गेनाइट, ॲरॅमाइट, फोर्सटॉन इत्यादी. |
घन, पाण्यात अविद्राव्य, कार्बनी विद्रावकांत विद्राव्य काही द्रवरूप. |
गोचीड इ. ॲकॅरिना वर्गातील किडींच्या नाशासाठी. |
[श्यान म्हणजे दाट वातविलेप (एरोसॉल) म्हणजे वायूतील घन वा द्रव पदार्थांचे अतिसूक्ष्म लोंबकळते कण जीवोपजीवी म्हणजे दुसऱ्या जीवांवर उपजीविका करणारा शोथ म्हणजे दाहयुक्त सूज क्षारकीय म्हणजे अम्लाबरोबर विक्रिया झाल्यास लवण देणाऱ्या अपघटन म्हणजे लहान रेणूंच्या रूपात तुकडे होणे ऑक्सिडीकरणाने म्हणजे ऑक्सिजनाशी संयोग झाल्याने समघटक म्हणजे तेच व तितकेच अणू रेणूमध्ये असूनही त्यांच्या संरचना भिन्न असल्याने वेगळे गुणधर्म असलेले पदार्थ नियतपापी प्राणी म्हणजे सभोवतालच्या तापमानापेक्षा सतत जास्त तापमान टिकवून धरणारा प्राणी.] |
(६) प्रतिवारक कीटकनाशके ही कमी विषारी असतात. त्यांच्यामुळे कीटकांना अन्न किंवा सभोवतालची परिस्थिती नकोशी होते व ते दुसरीकडे निघून जातात. ही बऱ्याच प्रकारांनी वापरली जातात. डासांना वासाने हाकलून देणारी रसायने, कपड्यांना कसर लागू नये म्हणून वापरल्या जाणाऱ्या नॅप्था गोळ्या ही या प्रकारची कीटकनाशके होत. कापूर, निलगिरी तेल, क्रिओसोट, पाइन टार तेल, बोर्डो मिश्रण इ. यासाठी वापरतात.
कीटकनाशकंच्या उद्गमानुसार आणि त्यांच्या रासायनिक अवस्थेवरूनही त्यांचे वर्गीकरण केले जाते. बहुतेक सर्व कीटकनाशके (१) अकार्बनी संयुगे, (२) वनस्पतिजन्य कार्बनी संयुगे, व (३) संश्लेषित कार्बनी संयुगे या वर्गांत विभागता येतात. यानुसार नित्य परिचयाच्या कीटकनाशकांचे गुणधर्म व उपयोग कोष्टक क्र. १ मध्ये दिलेले आहेत.
तयार करावयाच्या रीती : कीटकांच्या नाशासाठी कीटकनाशके वापरताना किंवा वापरल्यानंतरही वनस्पती, प्राणी किंवा वापरणारा (हाताळणारा) यांना कोणताही अपाय किंवा त्रास होणार नाही अशा रीतीने ती वापरण्यासाठी तयार करणे आवश्यक असते. सामान्यतः ती भुकटी, जल विद्राव्य (पाण्यात विरघळणारी), पायस (एकमेकांत न मिसळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण) व विद्राव्य या स्वरूपांत वापरली जातात. अशा स्वरूपात तयार करण्यासाठी काही वेळा त्यामध्ये भुकटी, वाहके (वाहून नेणारे पदार्थ), विद्रावके (विरघळणारे पदार्थ), पायसी कारके, चिकट पदार्थ, गंधनाशक पदार्थ इ. साहाय्यक कारकांचा उपयोग केला जातो.
भुकटी : कीटकनाशके तयार करण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे. हिच्यामध्ये विषारी पदार्थांची संहती ०·१-२०% असते. वनस्पतींपासून तयार केलेली कीटकनाशके सामान्यतः याच स्वरूपात वापरली जातात. भुकटीची प्रत ठरविण्यासाठी तीत मिसळण्यात येणाऱ्या वाहकांच्या गुणवत्तेचा उपयोग केला जातो. धान्ये व त्यांची पिठे, गंधक, सिलीकॉन ऑक्साइड, चुना, जिप्सम, संगजिरे, चिनी माती इ. वाहके वापरतात. वाहकाची निवड, त्याचे pH मूल्य (विद्रवाची अम्लता वा क्षारता दाखविणारे मूल्य), आर्द्रता प्रमाण, स्थिरता, कणांचा आकार, शोषकता, ओलसरपणा, घनता, किंमत इ. गुणांवरून व कीटकनाशकांबरोबर संलग्न होणाऱ्या गुणावरून केली जाते. कीटकनाशके व वाहके ही दळून, विद्रावकाच्या साहाय्याने, संगलन (वितळून एकत्रतकणे) इ. प्रक्रियांनी मिसळतात.
ओलसर चूर्णे: ओलसर होणाऱ्या व पाण्यात व्यवस्थित निलंबित होणाऱ्या (लोंबकळत राहणाऱ्या) भुकटी वाहकात, विषाची संहती १५–९५ % असणारी किटकनाशके मिसळून हा प्रकार तयार करतात. योग्य निलंबन आणि ओलसरपणा यांसाठी त्यामध्ये १-२% पृष्ठक्रियाकारक (द्रवाच्या पृष्ठताणावर परिणाम करणारे पदार्थ) मिसळतात. यांच्या फवारण्याने वनस्पतींना अपाय कमी होतात म्हणून ही शेतीमध्ये वापरली जातात.
दाणेदार : ३०–६० क्रमांकाचे (मेश-आकाराचे ) कण असणारी, बेंटोनाइट, शोषक मातीची भुकटी इ. वाहके व विषाची संहती २·५-५ % असणारी कीटकनाशके यांचे दाण्याच्या स्वरूपातील मिश्रण. कीटकनाशकांच्या विद्रावात वाहक भिजवून ही तयार करतात. जमिनीतील कीटकांसाठी व डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी याचा उपयोग करतात.
पायसे : विषाची संहती १५–५० % असलेल्या कीटकनाशकांचा पाण्यात मिसळू न शकणाऱ्या कार्बनी विद्रावकातील विद्राव. पायसीकरण, ओलसरपणा व प्रसारण यासाठी त्यात काही टक्के पृष्ठक्रियाकारक मिसळतात. विद्राव्यता, बाष्पनशीलता, वास, ज्वलनक्षमता, वनस्पती व प्राणी यांना सुरक्षितता, गोळा होण्याची क्षमता, किंमत यांनुसार विद्रावकाची निवड केली जाते. घासलेट, झायलिने व तत्सम खनिज तेले, ॲमिल ॲसिटेट, मिथिल आयसोब्युटिल कीटोन इ. विद्रावक ह्यासाठी वापरतात. वनस्पती संरक्षणासाठी व घरातील कीटकांचा नाश करण्यासाठी यांचा उपयोग मोठ्या प्रमाणात करतात.
प्रलोभके: विषाची संहती १-५% असलेली कीटकनाशके कीटकांना आकर्षित करू शकतील अशा वाहकात मिसळून प्रलोभके तयार करतात. यासाठी साखर, कोंडा, मध, चॉकोलेट इ. पदार्थ वाहक म्हणून वापरतात.
वरील रीतींनी तयार केलेली कीटकनाशक मिश्रणे पाणी किंवा तेल या वाहकात मिसळतात व ती फवारून, भुकटी फिसकारून किंवा धुराच्या स्वरूपात वापरली जातात.
फवारण्याची साधने : कीटकनाशके एकसारखी व समान फवारली जाण्यासाठी निरनिराळ्या साधनांचा वापर करण्यात येतो. कीटक नियंत्रणाचे यश हे कीटकनाशकांच्या प्रभावीपणाबरोबर ते कसे मारले जाते यावरही बऱ्याच अंशी अवलंबून असते. कीटकनाशक ज्या स्वरूपात असेल त्याप्रमाणे ते फवारण्यासाठी साधन वापरावे लागते. भुकटी व द्रवरूप कीटकनाशके यांसाठी वेगवेगळी साधने वापरतात.
(१)भुकटी फवारण्याची साधने : ही साधने हाताने वा यंत्राच्या साहाय्याने चालणारी असतात. हाताने चालवावयाच्या साधनांचे खांद्यावर अडकवून किंवा गळ्यात अडकवून छातीवर धरण्याची साधने असे प्रकार असतात. तसेच भात्याच्या साहाय्याने चालणारीही साधने असतात. अर्थात ही साधने लहान प्रमाणावर भुकटी फवारण्यासाठीच उपयोगी पडतात.
(२) द्रवरूप कीटकनाशक फवारण्याची साधने : या साधनांतही हाताने, तसेच यंत्रांच्या साहाय्याने चालणाऱ्या साधनांचा समावेश होतो. हाताने चालवावयाच्या साधनांमध्ये खंडित फवारा सोडणारी व अखंडित फवारा सोडणारी असे प्रकार आसतात. दुसऱ्या प्रकारची साधने हवेच्या दाबावर चालणारी असतात.
अलीकडे भुकटी व द्रव्य मोठ्या प्रमाणावर मारण्याची यंत्रेही मिळू लागली आहेत. मोठ्या क्षेत्रावर व लवकर कीटकनाशक फवारण्यासाठी पायपर, ऑइस्टर, बीव्हर अशा प्रकारची लहान विमाने व हेलिकॉप्टर यांचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. डोंगराळ भागात तसेच फार झाडी असलेल्या व अडचणीच्या भागांत हेलिकॉप्टर उपयुक्त ठरते, परंतु ते खर्चिक असते.
यांशिवाय दाणेदार कीटकनाशके फवारण्याची साधने, सायनोगॅस पायपंप, बियाण्यास औषध चोळण्यासाठी वापरण्यात येणारे गोल डबे वगैरे साधनांचाही कीटक नियंत्रणासाठी उपयोग होतो.
कीटकनाशकांना कीटकांची प्रतिकारशक्ती : कीटकनाशकांच्या कार्यक्षमतेला प्रतिकार करू शकतील अशा पिढ्या निर्माण झालेल्या काही कीटकांच्या बाबतीत आढळून आल्याने कीटकांच्या नियंत्रण पद्धतीत तसेच कीटकनाशके वापरण्याच्या पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे असे आढळून आले, एकाच कीटकनाशकाच्या मोठ्या प्रमाणातील व सतत वापरामुळे त्याचा परिणाम होऊ शकणार नाही अशा पिढ्या तयार झाल्या, ही गोष्ट प्रथमत: १९०८ मध्ये आढळून आली. लिंबावरील कीड हायड्रोजन सायनाइडाच्या धुराने नष्ट होते असे आढळून आल्याने त्याचा यासाठी मोठ्या प्रमाणात वापर झाला. परिणामत: १९१६ च्या सुमारास या धुरामुळे त्या किडी नष्ट होऊ शकल्या नाही. १९४६ मध्ये प्रथमच डीडीटीचा उपयोग माश्या व डास मारण्यासाठी करण्यात आला. त्यानंतर दोन – तीन वर्षाच्या आतच डीडीटीचा प्रभाव होऊ शकणार नाही अशी त्यांची नवीन पिढी निर्माण झाली. यानंतर माश्या मारण्यासाठी क्लोरडान, लिंडेन, डिल्ड्रीन इ. कीटकनाशकांचा उपयोग करण्यात आला. पण माश्यांनी त्यांनाही दाद .दिली नाही. कीटकनाशकांना प्रतिकार करण्याची शक्ती कीटकांमध्ये मंद गतीने निर्माण करणाऱ्या ऑरगॅनाफॉस्फरससारख्या कीटकनाशकांचा उपयोग अशा कीटकांच्या नाशासाठी केला जातो. डीडीटी- डीहायड्रोक्लोरिनेज ह्या माश्यांमधील निर्विषीकरण एंझाइमामुळे (जीवरासायनिक विक्रियांना मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थामुळे) डीडीटीच्या डीडीई या अविषारी अनुजातात रूपांतर होते असे आढळून आले आहे. डासांमध्येही अशीच स्थिती आढळली. अशा एंझाइमांची क्रिया घडू देऊ न शकणाऱ्या इतर कीटकनाशकांचा वापर डीडीडीबरोबर केल्यास त्याचा कीटकनाशासाठी उपयोग होतो.
वापरामुळे होणारे परिणाम: (अ) वनस्पतीवरील परिणाम : वनस्पतींवरील कीटकांचा नाश करण्यासाठी जास्त संहतीची (जास्त प्रमाण असलेली) कीटकनाशके वापरली गेली, तर त्यांपासून वनस्पतींना अपाय होण्याची शक्यता असते. काही वेळा सुरक्षिततेची मर्यादा फारच कमी असते. कीटकनाशकांमुळे वनस्पतींचा नाश पूर्णपणे होत नसला, तरी त्यांमुळे होणाऱ्या इजांमुळे त्या दिसतील इतपत वनस्पती कमीअधिक प्रमाणात दुखावलेल्या आढळतात. अशा दुखापती भरून येण्यास बराच कालावधी लागतो. वनस्पतींची वाढ खुंटणे, आलेल्या पिकात कमतरता येणे, पाने झडणे, आलेल्या फळांचे आकार बेढब होणे, रंगात बदल होणे इ. प्रकारच्या दुखापती आढळून आल्या आहेत. तथापि काही वेळा संपूर्ण पीक नष्ट होऊ देण्यापेक्षा दुखापती झालेल्या परवडतात. एकाच प्रकारच्या कीटकनाशकाचे निरनिराळ्या वनस्पती वर्गांवर वेगवेगळे परिणाम होतात. आर्सेनियुक्त कीटकनाशके मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणच्या पिकाला सतत दिल्यास त्यांचा परिणाम लवकर दिसून येतो. डीडीटी व इतर असंख्य संश्लेषित क्लोरीनयुक्त कार्बनी कीटकनाशकांच्या अती वापरामुळे वनस्पतींना इजा जलद होतात. तसेच कीटकनाशके एका पिकावर फवारल्यानंतर, ती वाऱ्याच्या झोताने शेजारच्या पिकांवर जाऊन पडतात व त्यांना मारक होऊ शकतात.
(आ) मानव व प्राणी यांच्यावरील परिणाम : मानव व प्राणी यांच्या जीवांना धोका होऊ नये किंवा जीवितहानी होऊ नये म्हणून कीटकनाशके व्यवस्थित हाताळणे आवश्यक असते. तसेच त्यांच्याशी वारंवार संपर्क येऊ देणेही धोक्याचे असते. बऱ्याच वेळी ती मारक व अपायकारक ठरतात. खनिज तेलातील तसेच कार्बनी विद्रावकांतील कीटकनाशके वापरल्यास त्या विद्रावकांमुळे आगी लागण्याचा तसेच स्फोट होण्याचाही धोका असतो. अशा कीटकनाशकांत पाणी मिसळून किंवा अज्वालाग्राही पदार्थ मिसळून हे धोके कमी करता येतात. भुकटीची कीटकनाशके सामान्यत: ज्वालाग्राही नसतात, पण गंधकयुक्त भुकट्या याला अपवाद आहेत.
प्राणी व मानव यांच्या शरीरात कीटकनाशकांमधील विषे तीन मार्गानी भिनतात : (१) तोंडावाटे, (२) श्वासावाटे व (३) त्वचेवाटे. अशा विषांचे होणारे परिणाम शरीरावर तीव्र व चिरकालीन अशा दोन प्रकारांचे असतात. कीटकनाशकांच्या जास्त प्रमाणामुळे किंवा त्यांच्या वांरवार दिलेल्या कमी प्रमाणामुळे एकदम आजारी पडणे हा तीव्र परिणाम होय. कीटकनाशकांचे अल्प प्रमाण बराच काळ वापरल्यास व त्यांचा शरीराशी संपर्क आल्यास त्यांचा शरीरक्रियांवर हळूहळू परिणाम होतो, यास चिरकालीन परिणाम म्हणतात. ही कीटकनाशके जरी शरीराबाहेर काढली तरी नंतर त्यांचे परिणाम दिसतात.
कीटकनाशके काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक असते. निर्मितीपासून वापरापर्यंतच्या स्थितीत त्यांच्या हाताळणीमुळे अपाय होणार नाहीत अशी काळजी घेणे आवश्यक असते. फुटलेली पुडकी, बाटल्या इ. हाताळण्यासाठी संरक्षक हातमोजे वापरावेत. कपड्यांवर पडल्यास ते टाकून द्यावेत. शरीराशी संपर्क आल्यास साबण लावून गरम पाण्याने स्नान करावे व प्रसंगी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कीटकनाशके तयार करताना ढवळण्यासाठी लाकडी दांडकी वापरावीत.
बाष्पनशील कीटकनाशके नेहमी हवेशीर खोलीत ठेवावीत. तेथे अन्नपदार्थ ठेवू नयेत तसेच वस्ती करू नये. काहींच्या वाफा गंधहीन असतात. त्यासाठी योग्य ते प्रतिबंधक मुखवटे वापरावेत. काहींचा परिणाम ह्या मुखवट्यांतूनही होतो.
कीटकनाशके फवारताना फवारणाऱ्या व्यक्तींचा त्यांच्याशी संपर्क आल्यास ती त्वचेवाटे किंवा श्वासावाटे शरीरात भिनतात. यासाठी असा त्रास होऊ नये म्हणून रबरी अस्तराचे कपडे, विशिष्ट प्रकारचे संरक्षक चष्मे, धूळ-वायू प्रतिबंधक मुखवटे इ. संरक्षक उपकरणे वापरणे जरूर असते. तसेच या काळात काही खाऊ नये अगर धूम्रपानही करू नये. पॅराथिऑनासारख्या कीटकनाशकांमुळे दृष्टीवर परिणाम होतो. विमानातून फवारे मारताना प्रतिबंधक उपाय योजले नसल्यास, वैमानिकांनाही त्रास होतो. कीटकनाशके फवारल्यानंतर त्यासाठी वापरलेली साधने ओढ्यात, नदीत किंवा विहिरीवर स्वच्छ करू नयेत. कीटकनाशके असलेले डबे, बाटल्या इ. नष्ट करावीत. कीटकनाशके फवारलेला भाजीपाला, फळे इ. पदार्थ लगेच वापरू नयेत. ती काही दिवसांनंतर व स्वच्छ धुवून वापरावीत.
पिकांवर, धान्याच्या साठ्यांवर, प्रक्रिया करण्याच्या अवस्थेतील धान्यावर, धान्याजवळ किंवा त्याच्यावर फवारलेल्या कीटकनाशकांमुळे धान्याच्या चवीवर व वासावर परिणाम होतो. कापणीपूर्वी फवारलेल्या शेजारील पिकांवर फवारलेल्यांपैकी वाऱ्याने उडून आलेल्या तसेच दुग्धव्यवसाय व खाद्य पदार्थावरील प्रक्रिया स्थळी वापरलेल्या कीटकनाशकांपैकी काही भाग मूळ स्वरूपात तसाच राहतो व त्यापासून धोका असतो. म्हणून अशी धान्ये व भाजीपाला वापरण्यापूर्वी ती धुवून घेणे आवश्यक असते.
मांजरासारख्या चाटणाऱ्या प्राण्यांकडून ही विषे फवारल्यानंतर चाटली जाण्याचा संभव असतो व त्यामुळे ती लवकर आजारी पडतात. खनिज तेलातून फवारलेल्या डीडीटीचे त्वचेवाटे जलद शोषण होते. कीटकनाशकांची प्रक्रिया केलेल्या चाऱ्यामुळे जनावरांना अपाय होतो. इतकेच नाही तर त्यांच्यापासून मिळणाऱ्या दूध, तूप, लोणी, अंडी, मांस इ. पदार्थांवरही कीटकनाशकांचा परिणाम होतो. रानटी प्राण्यांतही अशीच स्थिती आढळते.
कीटकनाशकांच्या सतत वापरामुळे बरेच कीटक व किडी मरतात. पण अशा कीटकांवर उपजीविका करणारे प्राणी, पक्षी यांची यामुळे उपासमार झाली व परिणामतः काही जाती नष्ट होत आहेत, असे आढळले आहे. तसेच कीटकनाशंकयुक्त मृत कीटकांचे भक्षण केल्यावर त्यांच्या शरीरात कीटकनाशकांचे अपचन वा उत्सर्जन न झाल्याने त्यांचे थर सापडले आहेत. यामुळे त्यांच्या शरीरक्रियांवर विपरीत परिणाम झाल्याचे आढळते. तसेच रोगप्रसारक कीटकांच्या नाशामुळे मानवातील व प्राण्यातील त्या रोगांना असणारी प्रतिकारशक्ती पूर्णपणे नष्ट झालेली व परत रोग झाल्यास ते त्या रोगांनी पछाडलेले आढळून आले आहेत.
परिक्षण : कार्यक्षमता, सुरक्षितता आणि दर्जा यांसाठी कीटकनाशकांच्या चाचण्या घेतल्या जातात. रासायनिक विश्लेषण ही त्यांच्या स्वरूपाची निर्णायक चाचणी असली, तरी जैव वस्तूंवर होणाऱ्या त्यांच्या परिणामांच्या चाचण्या विशेष महत्त्वाच्या असतात. त्यांचे उपयोग व प्रत्यक्षात वापरण्याचे प्रमाण ठरविणे, विषारीपणाचे प्रमाण (मारकतेचे प्रमाण) ठरविणे व त्याचा परिणाम पाहणे, विक्रीच्या मालाचा दर्जा ठरविणे, रासायनिक विश्लेषण आणि जैव आमापन (शरीरक्रियेवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करून त्याची परीणामकारक मात्रा ठरविण्याची पद्धती), सरकारी बंधने पाळणे इ. महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्याबाबत पाहणे जरूर असते तसेच त्यांच्या निर्मिती, उपयोग, साठवण, वाहतूक, विक्री इत्यादींवर कायद्याने काही बंधने घातली गेली आहेत. यामुळे त्यांच्यातील भेसळीवरही नियत्रंण ठेवण्यात येते. विमानातून पिकांवर कीटकनाशके फवारण्यापूर्वी किंवा लोकवस्तीच्या जवळपास वापर करण्यापूर्वी त्यांच्या वापरासाठी आगाऊ परवानगी घेणे तसेच सूचना देणे आवश्यक असते.
कीटक नियंत्रणाचे आर्थिक फायदे : कीटकांच्या एकून जातींपैकी सु. १% (सु १०,००० जाती) जातीच मानवाला, पाळीव प्राण्यांना, पक्ष्यांना, वनस्पतींना पीडक आणि रोगकारक आहेत. ह्या कीटकांकडून होणाऱ्या नुकसानीची मोजदाद करणे अवघड आहे. तथापि जागतिक नुकसान अंदाजे १६०—२४० हजार कोटी रूपये (सु. २०–३० हजार कोटी डॉलर) एवढे होते. कीटकांचे नियंत्रण केल्यावर हा आकडा बराच कमी होतो असे आढळून आले. शेतकऱ्याने शेतीसाठी कीटकनाशकांवर सु. ८ रु. खर्च केल्यास त्याला सु. ४० रु. एवढा फायदा होतो. असे आढळून आले आहे. मक्यावरील किडींमुळे काही ठिकाणी जवळजवळ ९९-१०० % नुकसान होते. डीडीटी वापरल्यास हे नुकसान कमी झाल्याचे आढळले, बाजारात येणारी बहुतेक सर्व फळे कीटकनाशकांच्या संस्कारानंतरच हल्ली आणली जातात. चाळीस वर्षांपूर्वी अमेरिकेतील ज्या भागात कापसावरील किडींमुळे पीक अजिबात घेता येत नव्हते, तेथे कीटकनाशकांच्या वापरानंतर आलेले पीक, हे सर्व अमेरिकेतील सरासरी उत्पन्नाच्या चौपट होते. १९३६–४५ या काळात अमेरिकेत जेवढे बटाट्याचे पीक येत होते. त्याच्या सु. ५६ % नी डीडीटीच्या वापरानंतर १९४६ मध्ये वाढले. न्यूझीलंडमधील गव्हाच्या पिकाचे उत्पन्न नवीन व दैहिक कीटकनाशकांचा वापर केल्यानंतर २४–५४ % वाढलेले आढळले, तर अमेरिकेतील साखरेच्या बिटाचे उत्पादन १ % नी वाढलेले आढळले.
मलेरिया, प्लेग इ. भयंकर विनाशी साथींचा फैलाव करणाऱ्या कीटकांच्या नाशासाठी कीटकनाशके वापरल्यानंतर ह्या साथींपासून होणारे मृत्यूचे प्रमाण बरेच कमी झाले. जागतिक मलेरिया निर्मुलनासाठी संयुक्त राष्ट्रातर्फे डीडीटीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. नवीन कीटकनाशकांच्या निर्मितीमुळे व कीटकांमध्ये कीटकनाशकांना प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण झाल्यामुळे, तसेच काही कीटकनाशकांच्या दुष्परिणामांमुळे बऱ्याच कीटकनाशकांच्या वापरावर व उत्पादनावर परिणाम झालेला दिसतो.
निर्मिती : दुसऱ्या महायुद्धानंतर संश्लेषित कीटकनाशकांच्या मोठ्या प्रमाणावरील निर्मितीस सुरुवात झाली. इंग्लंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, स्वित्झर्लंड व प. जर्मनी या देशांमध्ये या धंद्याची प्रगती झपाट्याने झाली. कीटकनाशकांसंबंधीचे मूलभूत संशोधन, निर्मिती वापर व निर्यात यांबाबतीत हे देश अग्रगण्य समजले जातात. जपान व इतर यूरोपीय राष्ट्रे यांनी कीटकनाशकांच्या वापरात आणि निर्मितीत १९६० नंतर बरीच प्रगती केली आहे.
भारतात १९५२ मध्ये कीटकनाशकांचे उत्पादन करणारे कारखाने सुरू झाले. त्यानंतर जवळजवळ १२ वर्षांनी कीटकनाशकांचा उपयोग शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ लागला. हा वापर जसाजसा वाढत गेला तसातसा त्यांच्या निर्मितीच्या नवीन योजना आखल्या गेल्या. आजतागायत भारतात १९-२० कारखाने विविध कीटकनाशकांची निर्मिती करतात. त्यांतील बहुतेक कारखाने परदेशी सहकार्यावर चालतात. काही कारखाने कीटकनाशकांबाबत स्वतंत्र रीत्या संशोधन करीत आहेत.
भारतात पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस अंदाजे १·३ कोटी रुपयांची (९,५०० टन) आणि तिसऱ्या योजनेच्या अखेरिस अंदाजे १६ कोटी रुपयांची (६५,००० टन) कीटकनाशके वापरली गेली. चौथ्या योजनेत अंदाजे ७५ कोटी रुपयांची (२,७०,००० टन) कीटकनाशके वापरली जातील असे गृहीत धरले आहे. कोष्टक क्र. २ वरून १९७०-७१ मध्ये भारतातील काही कीटकनाशकांची गरज, उत्पादनक्षमता, उत्पादनवाढीच्या नवीन योजना व तूट किंवा आयातीची गरज ही माहिती समजेल.
कोष्टक क्र. २. भारतातील कीटकनाशके व त्यांची १९७०-७१ सालची गरज (आकडे टनांत) |
||||
कीटकनाशकाचे |
गरज |
उत्पादनक्षमता |
उत्पादनवाढीच्या नवीन योजना |
तूट |
बीएचसी |
४७,००० |
७,२०० |
३९,६०० |
– |
लिंडेन |
२,५०० |
– |
३०० |
२,२०० |
डीडीटी |
७,००० |
२,६४० |
३,००० |
१,३६० |
मॅलॅथिऑन |
३,६०० |
४२० |
१,१०० |
२,०८० |
दैहिक कीटकनाशके |
६३० |
२२० |
२३० |
१८० |
एंड्रीन |
२,५०० |
– |
१,००० |
१,५०० |
पॅराथिऑन |
२,३०० |
७०० |
– |
१,६०० |
कार्बारिल |
६,००० |
– |
– |
६,००० |
कीटकनाशकांसंबंधीचा १९६८ चा कायदा : कीटकनाशकांचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ लागल्याने १९६० सालानंतर पाश्चिमात्य देशांप्रमाणे भारतातही काही सार्वजनिक आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. गॅमेक्झिन, पॅराथिऑन, इ. कीटकनाशके मिसळली गेलेल्या अन्नधान्यांच्या खाण्यामुळे भारताच्या काही भागांत असंख्य लोकांना विषबाधा होण्याचे प्रकार घडले व काही प्रसंगी अनेक व्यक्तींचा मृत्यूही घडून आला. त्यामुळे कीटकनाशकांचे उत्पादन व विक्री यांवर काही निर्बंध असावेत, ही जाणीव सर्वत्र होऊ लागली. या पार्श्वभूमीवरच १९६८ च्या कीटकनाशकविषयक कायद्याची योजना केली गेली आहे.
माणसे, पाळीव जनावरे व काही वन्य प्राणी यांच्या जीविताला होणारा अपाय टाळण्यासाठी कीटकनाशकांचे उत्पादन, वाहतूक, वितरण व विक्री यांचे नियत्रंण करणे हे या कायद्याचे उद्दिष्ट आहे. या कायद्यात खालील प्रमुख तरतुदींचा अंतर्भाव केला गेला आहे.
(१) कोणत्याही कीटकनाशकाचे उत्पादन, वाहतूक, वितरण व विक्री यांसाठी केंद्र शासनाने नेमलेल्या नोंदणी समितीकडून नोंदणी करून घेणे व त्यासाठी विशिष्ट परवाना मिळविणे आवश्यक आहे. (२) उत्पादन-बंदी असलेल्या तसेच बनावट कीटकनाशकांचे उत्पादन, वाहतूक, वितरण व विक्री करता येणार नाही. (३) एखाद्या परवाना धारकाने कायद्यातील तरतुदींचा भंग केल्यास त्याला बचावाची संधी दिल्यानंतर त्याचा परवाना तात्पुरता अथवा कायमचा रद्द केला जाईल अथवा त्यात फेरबदल केले जातील. (४) बेकायदेशीर व्यवहारांशी संबंधित व्यापारी संस्था व त्यांतील व्यक्ती यांना अपराधी समजले जाऊन प्रथम श्रेणी दंडाधिकाऱ्यापुढे न्यायालयीन कारवाई केली जाईल व विविध प्रकारच्या अपराधांसाठी सहा महिन्यांपासून तीन वर्षांपर्यंत कारावास व कधीकधी अतिरिक्त दंडाची शिक्षा होऊ शकेल.
या कायद्याची कार्यवाही ४ ऑगस्ट १९७१ पासून सुरू झाली असून त्यासाठी मध्यवर्ती सल्लागार समिती व नोंदणी समिती यांची नियुक्ती झाली आहे. त्याच प्रमाणे या कायद्याच्या अनुषंगाने एक नियमावलीही तयार केली गेली आहे. यांशिवाय एक मध्यवर्ती कीटकनाशक प्रयोगशाळा सुरू करण्याची व केंद्र किंवा राज्य शासनातर्फे परवाने देणारे अधिकारी, कीटकनाशक निरीक्षक व कीटकनाशक विश्लेषक यांच्या नेमणुका करण्याचीही कायद्यात तरतूद केलेली आहे. आवश्यक असेल तेव्हा कीटकनाशक विश्लेषकांच्या वैज्ञानिक विश्लेषणाच्या अहवालांचा पुरावा म्हणून उपयोग केला जाईल. या पुराव्याविरूद्ध व्यापारी संस्था किंवा व्यक्ती न्यायालयात अन्य पुरावा आणू शकतील. अशा वेळी संबंधित पदार्थाचे मध्यवर्ती कीटकनाशक प्रयोगशाळेत अवश्य वाटल्यास पुन्हा विश्लेषण केले जाऊन नवीन अहवाल मागविला जाईल व तो मात्र निर्णायक पुरावा मानला जाईल.
कीटकनाशकांचा घरगुती किंवा शेतीसाठी असा व्यक्तिगत उपयोग किंवा कीटकांना मारण्याशिवाय इतर हेतूसाठी केलेला वापर या कायद्याच्या कक्षेखाली येणार नाही. यांशिवाय शैक्षणिक, वैज्ञानिक किंवा संशोधनात्मक कार्य करणाऱ्या संस्थात जेव्हा प्रायोगिक कामासाठी कीटकनाशकांचा वापर केला जात असेल, तेव्हा केंद्र शासन अशा संस्थांना या कायद्याच्या निर्बंधापासून मोकळीक देईल.
या कायद्याला एक परिशिष्ट जोडलेले असून त्यात ११० पदार्थांचा कीटकनाशके म्हणून समावेश केलेला आहे. व वेळोवेळी आवश्यकतेप्रमाणे मध्यवर्ती सल्लागार समितीच्या संमतीनुसार या यादीत फेरबदल केले जाण्याचीही तरतूद करून ठेवलेली आहे.
पहा : कीटक नियंत्रण.
संदर्भ: 1. Gunther, F. A. Jeppson. L. R. Modern Insecticides and World Food Production, London, 1960.
2. Hassali, K.A. World Crop Protection, 2 Vols., London, 1969.
3. Metcalf, R. L., Ed. Advances in Pest Control Research, 6 Vols. New York, 1957 – 65 .
4. Mukundan, T. K. Plant Protection – Principles and Practice, Bombay, 1964.
माडीवाले, मा. शं. दोरगे, सं. कृ. मिठारी, भू. चिं.
“