ग्वीत्‌चार्दीनी, फ्रांचेस्को : (६ मार्च १४८३–२२ मे १५४०). प्रबोधनकालीन इटालियन मुत्सद्दी व श्रेष्ठ इतिहासकार. जन्म फ्लॉरेन्स येथे एका खानदानी कुटुंबात. त्याने फ्लॉरेन्स, फेरारा व पॅड्युआ येथे कायद्याचे शिक्षण घेतले. काही काळ वकिली केली. त्यानंतर प्रजासत्ताक फ्लॉरेन्सचा राजदूत म्हणून तो स्पेनमध्ये होता (१५१२–१४). १५१६ ते १५३४ या काळात जवळजवळ अखंडपणे तो पोपच्या सेवेत होता. मोदीना, रेद्‌जो, पार्मा, रॉमान्या येथे पोपनियुक्त गव्हर्नर म्हणून त्याने काम केले. उत्तम प्रशासक म्हणून त्याचा लौकिक होता. पोपच्या सैन्याचा कमिशनर ‘जनरल’ म्हणूनही त्याने काम पाहिले. फ्लॉरेन्सचा ड्यूक आलेस्सांद्रो मेदीची (कार. १५३१–३७) ह्याच्या आणि त्याच्यानंतर सत्तेवर आलेल्या पहिल्या कॉझिमोच्या (कार. १५३७–७४) नोकरीतही तो होता. तथापि कॉझिमोच्या मर्जीतून उतरल्यामुळे १५३७ पासून पूर्णतः सेवानिवृत्त होऊन ताे सेंत मार्गेरिता (मोंतीची) येथे राहावयास गेला आणि Storia d’ Italia (१५६१–६४, इं. शी. हिस्टरी ऑफ इटली) ह्या वीस खंडांच्या इतिहासग्रंथलेखनास त्याने स्वतःला वाहून घेतले.  

१४९२ ते १५३४ पर्यंतचा इटलीचा इतिहास Storia d’ Italia मध्ये आलेला आहे. ह्या कालखंडात इटलीत घडून आलेल्या विविध राजकीय स्थित्यंतरांचा आलेख त्यात सापडतो. ऐतिहासिक व्यक्तींच्या कर्तृत्वाचे मूल्यमापन करीत असताना त्यांच्या कृतींपेक्षा त्या कृतींमागील त्याला जाणवलेल्या प्रेरणांना त्याने अधिक महत्त्व दिलेले दिसते. पोप दुसरा जूलियस, पोप दहावा लीओ व पोप सातवा क्लेमेंट ह्यांची वेधक व्यक्तिचित्र त्याने रेखाटली आहेत. इतिहासकथन करीत असताना आवश्यक तेथे निर्भीड कठोर टीकाही त्याने केलेली आहे. ग्वीत्‌चार्दीनीच्या पूर्वी इटलीतील विविध राज्यांचे इतिहास स्वतंत्रपणे लिहिले गेले परंतु ग्वीत्‌चार्दीनीने आपल्या इतिहासात संपूर्ण इटलीचा विचार केला, हा त्याचा विशेष होय. त्याची शैली भारदस्त असून प्रत्येक मुद्याशी संबंधित असलेले सर्व तपशील एकाच वाक्यात आणण्याच्या प्रयत्नामुळे लांबलांब वाक्ये तो वैपुल्याने वापरतो. इटलीच्या इतिहासग्रंथांत आजही हा ग्रंथ मोलाचा मानला जातो.

ह्याखेरीज Ricordipoliticie e civili (प्रकाशनकाळ १५७६–१५८५ च्या दरम्यान) आणि Del reggimento di Firenze  हे दोन ग्रंथही त्याने लिहिले. सूक्ष्म निरीक्षण व स्वच्छपणे केलेले मानवी जीवनाविषयीचे चिंतन Recordi… मधील सु. २०० सूत्रांतून आढळते. राजकीय विचारही त्यात आहेतच. Del reggimento… मध्ये फ्लॉरेन्सची शासनव्यवस्था कशी असावी, ह्यासंबंधी विचार आहेत. सेंत मार्गेरिता येथेच तो निधन पावला.

संदर्भ : Ridolfi, Roberto, Life of Francesco Guicciardini, Chicago, 1967.

कुलकर्णीं, अ. र.