ग्विन-व्हॉन, डेव्हिड टॉमस : (१२ मार्च १८७१–४ सप्टेंबर १९१५). ब्रिटिश वनस्पतिशास्त्रज्ञ. वनस्पतिशारीरासंबंधी त्यांनी बरेच संशोधन केले आहे. यांचा जन्म लँडोव्हरी येथे झाला व शिक्षण केंब्रिज येथील क्राइस्ट महाविद्यालयात झाले. ग्लासगो विद्यापीठात (१८९७–१९०७) व लंडनमधील बर्कबेक महाविद्यालयात (१९०७–०९) अध्यापन केल्यानंतर बेलफास्ट (१९०९–१४) आणि रेडिंग (१९१४-१५) येथे त्यांनी वनस्पतिविज्ञानाच्या प्राध्यापकाचे काम केले. त्यांनी ⇨ निफिएसीतील (कमल कुलातील) वनस्पतींच्या जातींचे आकारविज्ञान व शारीर (शरीररचनाशास्त्र) यांसंबंधी संशोधन केले आहे तसेच प्रिम्युला [⟶ प्रिम्युलेलीझ] आणि वाहिनीवंत अबीजी वनस्पती विभाग (टेरिडोफायटा) यांसंबंधी तशाच प्रकारचे संशोधन केले. शिवाय विशेष उल्लेख करण्यासारखे त्यांचे कार्य म्हणजे त्यांनी ऑस्मुंडेसी या ⇨नेच्यांच्या जातींत आढळणाऱ्या पानांच्या देठांच्या संरचनांची माहिती (पुरावनस्पतिवैज्ञानिक) रॉबर्ट किड्स्टन यांच्या सहकार्याने उपलब्ध केली. ही माहिती एडिंबरोच्या रॉयल सोसायटीने १९०७–१४ या काळात पाच निबंधांच्या स्वरूपात प्रसिद्ध केली आणि तिच्याबद्दल ग्विन-व्हॉन यांना सोसायटीने मॅक्‌डूगल ब्रिझ्बेन पदकाचा १९१० मध्ये बहुमान दिला. त्यांच्या पत्नीने (मूळ नाव हेलन फ्रेझर) कोशिकाविज्ञानात (पेशींच्या संरचना, कार्ये आणि जनन यांसंबंधीच्या शास्त्रात) व कवकविज्ञानात (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीसंबंधीच्या शास्त्रात) संशोधन केले आहे. डेव्हिड ग्विन-व्हॉन रेडिंग येथे मृत्यू पावले त्यानंतर काही वर्षे बर्कबेक महाविद्यालयात त्यांच्या पत्नी वनस्पतिविज्ञानाच्या प्राध्यापिका होत्या (१९२१–३९ व १९४१–४४).      

                                

जमदाडे, ज. वि.