ग्वाल्हेर घराणे : ख्यालगायनाचे एक मान्यवर घराणे. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ग्वाल्हेरमध्ये होऊन गेलेल्या नथ्थन पीरबक्षांपासून या घराण्याची सुरुवात मानतात. या घराण्यातील हद्दूखाँ व हस्सूखाँ हे बंधू नथ्थन पीरबक्षांचे नातू होत. हद्दूखाँ व हस्सूखां यांनी जनकोजी शिंदे महाराजांच्या कृपेने ‘कव्वाल-बच्चे’ शैलीच्या बडे महम्मदखाँचे गायन पडद्याआडून ऐकून आपली गायकी बनविली व याच गायकीचा वारसा पुढे ग्वाल्हेर घराण्यात चालत राहिला, असे मानले जाते.
गायकीच्या स्वरूपाच्या दृष्टीने पाहता या घराण्याच्या दोन शाखा मानल्या जातात. ग्वाल्हेर व आसपासच्या भागात रुजलेली ती पहिली आणि बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांनी, महाराष्ट्रात भरभराटीस आणली ती, दुसरी शाखा होय. पहिल्या शाखेत टप्पा या गायनप्रकाराचे शिक्षण व गायन विपुल असल्याने त्याची ख्यालगायकीही अधिक गुंतागुंतीची असते. उलटपक्षी ग्वाल्हेरची महाराष्ट्र शाखा मुख्यतः ख्याल गाणारी व तिची गायकी तुलनेने पाहता साधी असते. दोन्ही शाखांच्या गायकीमध्ये आढळणारे सर्वसामान्य गुण म्हणून पुढील वैशिष्ट्यांचा उल्लेख करता येईल : खुल्या ‘आ’काराने गायन. मध्य व द्रुत लयींचा वापर. अष्टपदी, तराणे, टपख्याल इ. विविध गायनप्रकारांनी समृद्ध झालेला संच. बोलतान व तान पल्लेदार, गमकयुक्त व सरळ. एकंदर गायनात जोमदारपणा भरपूर. प्रचलित रागांवर भर.
गायकीच्या अनेक स्वतंत्र प्रणालींना जन्म देण्याचे कार्य याच घराण्याने केले आहे. नथ्थन पीरबक्षांची तालीम घेऊनच घग्गे खुदाबक्ष यांनी आग्रा घराण्याची सुरुवात केली. त्याचप्रमाणे बडे महम्मदखाँचे अनौरस पुत्र मुबारक अली यांचा प्रभाव पडल्याने अल्लादियाखाँनी आपली जयपूर गायकी निर्माण केली.
अनेक मातब्बर गायक या घराण्याने संगीतकलेला बहाल केले आहेत. बाबा दीक्षित, बाळागुरुजी, शंकर आणि एकनाथ पंडित, वझेबुवा आणि त्यांचे गुरुजी निसार हुसेनखाँ, भूगंधर्व रहिमतखाँ, राजाभैय्या पूछवाले, वासुदेवबुवा जोशी, अनंत मनोहर, पं. मिराशीबुवा, पं. विष्णू दिगंबर पलुस्कर आणि त्यांचे चिरंजीव द. वि. पलुस्कर, शिष्य ओंकारनाथ ठाकून वगैरे. या घराण्याच्या विद्यमान नामवंत कलाकारांमध्ये पं शरच्चंद्र आरोळकर, कृष्णराव पंडित, पं. गजाननराव जोशी, पं. विनायकबुवा पटवर्धन, नारायणराव व्यास, प्रा. बा. र. देवधर इत्यादींचा अंतर्भाव होतो.
संदर्भ : १. देशपांडे, वा. ह. घरंदाज गायकी, मुंबई, १९६१.
२. मारुलकर, ना. र. संगीतांतील घराणी, पुणे, १९६२.
देशपांडे, वामनराव