ग्वाल्हेर : मध्य प्रदेश राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे व विभागाचे मुख्य ठिकाण आणि पूर्वीच्या ग्वाल्हेर संस्थानाची राजधानी. लोकसंख्या उपनगरांसह ४,०६,१४० (१९७१). हे आग्र्याच्या दक्षिणेस सु. १०० किमी. असून मध्य लोहमार्गावरील प्रमुख प्रस्थानक आहे. यातून राष्ट्रीय महामार्ग जात असून हवाई मार्गांनी ते इतर प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. मूळच्या ग्वाल्हेर शहरापासून ६ किमी. अंतरावरील नवीन शहराला लष्कर (कँप) म्हणतात. मूळचे ग्वाल्हेर शहर लष्कराच्या उत्तरेला ग्वाल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. ग्वाल्हेरचे रेल्वे स्थानक लष्करपासून सु. ५ किमी. व ग्वाल्हेरपासून सु. ३ किमी. आहे.

ग्वाल्हेर किल्ला

येथे जिवाजी विद्यापीठ असून शहरात अनेकविध शिक्षणाच्या सोयी आहेत. ग्वाल्हेर हे एक औद्योगिक केंद्र असून तेथे कापड, मातीची भांडी, चामड्याच्या वस्तू, कृत्रिम धागे व त्यांचे कापड, पिठाच्या व जवसाच्या तेलाच्या गिरण्या आणि बर्फ व आगपेट्यांचे कारखाने आहेत. दगडांवरील कोरीवकाम, हातमाग, काच, पादत्राणे, मिठाई, बिस्किटे, रेशमी कापड इत्यादींचे लहानमोठे उद्योगधंदेही येथे चालतात.

हे हर्षाच्या साम्राज्यातील एक मोठे सांस्कृतिक केंद्र व चंदेल्ल राज्यातील आणि पंधराव्या शतकातील तोमर राजवटीतील साहित्य, संगीत, काव्य, शिल्प इत्यादींविषयी प्रसिद्ध ठिकाण होते. अकबराच्या दरबारातील तानसेन या प्रख्यात गायकामुळेही ग्वाल्हेरच्या कीर्तीत भर पडली आहे. त्याचे स्मारक गावाजवळच आहे.

तेली का मंदिर (विष्णुमंदिर – सु. नववे शतक)

जुन्या शहरात मोगलकालीन शिल्पसुंदर वास्तू आहेत. येथील प्रसिद्ध किल्ला ९० मी. उंचीच्या टेकडीवर असून तो कोणी बांधला हे निश्चित नाही पण सहाव्या शतकापासून इतिहासात त्याचा उल्लेख बराच येतो. शिलालेखादी साहित्यातून याचा उल्लेख गोपाद्री, गोपगिरी, गोपाचल असा आहे. त्यावरून ग्वाल्हेर हे नाव पडले असावे. या किल्ल्यावरील सहा राजवाड्यांपैकी मानसिंहाचा प्रासाद सर्वांत सुंदर आहे. तसेच ग्वालिया मंदिर, चतुर्भुज मंदिर, गुजरी महल, सासबहूंची मंदिरे, मातादेवीचे मंदिर, जैनशिल्पे व तेली का मंदिर ही विशेष प्रेक्षणीय असून आठ तलाव व एक मशीदही आहे.

पहिल्या बाजीराव पेशव्याचा सरदार राणोजी शिंदे याने ग्वाल्हेर संस्थानाचा पाया घातला आणि त्याचा मुलगा सुप्रसिद्ध महादजी शिंदे याने ग्वाल्हेर हे आपले मुख्य ठाणे केले. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत ग्वाल्हेरचा किल्ला अनेक वेळा आलटून पालटून ब्रिटिशांच्या व शिंद्यांच्या हाती राहिला व अखेर १८८६ मध्ये झांशीच्या बदल्यात कायम शिंद्यांकडे आला. भारतातील संस्थानांच्या विलीनीकरणानंतर ग्वाल्हेर जिल्ह्याचे ठाणे बनले.

कांबळे य. रा.