ग्वायाकील : एक्वादोरचे प्रमुख बंदर व सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या ७,९४,३०१ (१९७०). ग्वायास प्रांताची ही राजधानी पॅसिफिकपासून ७२ किमी., ग्वायास नदीसाठी असून देशाचे प्रमुख औद्योगिक केंद्र आहे. कातडी, मद्यार्क, साबण, मेणबत्त्या, कापड, साखर, सिमेंट इत्यादींचे कारखाने लाकूड कापण्याच्या गिरण्या, लोखंडाच्या भट्ट्या इ. येथे आहेत. केळी व कोको यांच्या निर्यातीमुळे दुसऱ्या महायुद्धानंतर ते विशेष भरभराटले. येथून कॉफी, कापूस, रबर, कवचीफळे, लोकर, कातडी, पनामाहॅट यांचीही निर्यात होते. येथून २,९५० मी. उंचीवरील राजधानी कीटोपर्यंत ४६० किमी. अरुंदमापी लोहमार्ग निसर्गसुंदर पर्वतप्रदेशातून जातो. महामार्गांनी व वायुमार्गांनीही ते अंतर्भागाशी जोडलेले आहे. ग्वायास खोऱ्यातील उत्पादने जलमार्गाने येथे येतात. बंदर फार खोल नसल्यामुळे मोठ्या आगबोटी मुखाजवळील पूना बेटाजवळ थांबतात. १९६२ मध्ये बंदराचे आधुनिकीकरण झाले आहे. एक्वादोरच्या दोन प्रमुख विद्यापीठांपैकी एक ग्वायाकीलला आहे. १५३५ मध्ये वसलेले हे शहर चाच्यांचे हल्ले, आग, भूकंप, रोगराई यांच्या तडाख्यांत अनेकदा सापडले. १८२१ मध्ये एक्वादोरच्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ येथे रोविली गेली. दक्षिण अमेरिका देशांचे स्वातंत्र्यसंग्रामाग्रणी बोलीव्हार व सॅन मार्टिन यांची भेट १८२२ मध्ये येथे झाली होती.
शहाणे, मो. ज्ञा.