ग्वानो : ज्यांचे जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) रुक्ष वाळवंटी आहे अशा महासागरी बेटांत किंवा समुद्रकिनाऱ्यांलगतच्या प्रदेशांत, मुख्यतः पक्ष्यांच्या मलोत्सर्गापासून (मलमूत्रापासून) तयार झालेल्या फॉस्फेटी व नायट्रोजनयुक्त पदार्थास ग्वानो म्हणतात. खत म्हणून त्याचा उपयोग होतो. रुक्ष जलवायुमान असल्यामुळे पक्ष्यांचा मलोत्सर्ग जमिनीवर साचत राहतो. क्वचित पडणाऱ्या पावसाबरोबर किंवा त्यानंतर जमिनीत मुरणाऱ्या पाण्याबरोबर त्याचा थोडा अंश वाहून जात असतो. अशा जलवायुमानाचे प्रदेश जवळजवळ ओसाड असतात, त्यांच्यात माणसांची किंवा जनावरांची वर्दळ नसते. तेथे केवळ समुद्रातील मासे खाऊन राहणाऱ्या पक्ष्यांना निवाऱ्याची उत्कृष्ट जागा मिळते व तेथे त्यांचे मोठाले थवे राहतात, उदा., पाणकावळा (कॉरमोरंट), पाणकोळी (पेलिकन) व गॅनेट या पक्ष्यांची दाट वस्ती पेरू, दक्षिण कॅलिफोर्निया आणि आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यालगतच्या काही बेटांवर आहे. या बेटांवर काही ठिकाणी प्रत्येक चौरस किलोमीटरात जवळजवळ बावीस लाख पक्षी राहतात व ते दररोज सु. चारशे टन मासे खातात. ग्वानो हे मुख्यतः त्यांच्या विष्ठेचे बनलेले असते. पण त्याच्यात मृत पक्ष्यांच्या शरीराचे भाग, पिसे, सागरी शेवाळी, माशांचे तुकडे, वाळू व खडेही मिसळलेली असतात. ग्वानोचे रासायनिक संघटन जटिल (गुंतागुतीचे) असून निरनिराळ्या ठिकाणाच्या ग्वानोत घटकांचे प्रमाण कमीअधिक असते. त्यातील मुख्य घटक नायट्रोजनयुक्त यूरिक अम्ल व कॅल्शियम फॉस्फेट हे होत. पोटॅशियम व अमोनियम यांची लवणेही अल्प प्रमाणात त्यात असतात. ग्वानोचा बहुतेक सर्व पुरवठा पेरू देशाच्या किनाऱ्याजवळील बेटांतून होतो. तेथील उच्च प्रतीच्या ग्वानोत ११ ते १८% नायट्रोजनाची संयुगे, ८ ते १५% फॉस्फोरिक अम्ल (P2O5), २ ते ३% पोटॅश (K2O) असते. सेशेल्स बेटात पाऊस थोडा जास्त पडतो. तेथील ग्वानोत १-२% नायट्रोजन असते परंतु २५% पेक्षा जास्त फॉस्फोरिक अम्ल असते.
पेरूतील ग्वानोचे निक्षेप (साठे) सरकारी मालकीचे आहेत.तेथील ग्वानोची निर्यात सु. १८१० साली सुरू झाली, १८५६ मध्ये ती पन्नास हजार टनांवर पोहोचली, १९५६ साली उच्चांकाचे उत्पादन सु. तीन लाख तीस हजार टन झाले. पेरूमधील ग्वानो विकण्यापूर्वी कुटून व चाळून त्याचे चूर्ण करतात. या कोरड्या चूर्णाचा रंग फिकट तपकिरी ते पिवळा असतो. एक टन ग्वानो सु. तीस टन शेणखताइतकी पोषक द्रव्ये देते. फॉस्फेटी ग्वानोचे मोठे निक्षेप गिल्बर्ट व ईलिस या महासागरी बेटांत आहेत. तेथील रहिवाशांचा चरितार्थ ग्वानोच्या उत्पादनावरच चालतो. वटवाघुळांच्या व सील प्राण्यांच्या मलोत्सर्गापासून आणि शरीराच्या भागांपासून काही ठिकाणी तयार झालेल्या निक्षेपांनाही ग्वानो म्हणतात. खत या दृष्टीने ते वर वर्णन केलेल्या ग्वानोपेक्षा कमी दर्जाचे असतात. वटवाघुळांच्या मलोत्सर्गाचे ग्वानो थायलंड, मोरोक्को, न्यू मेक्सिको व सौदी अरेबियाच्या आजूबाजूंचे देश यांतील चुनखडकातील गुहांत आढळतात. त्यात ७-८% नायट्रोजन, ५% फॉस्फोरिक अम्ल व एक ते दीड टक्का पोटॅश असते. वटवाघुळी ग्वानोचे मोठे साठे मिसूरी व ग्रँड कॅन्यन (कोलोरॅडो) मध्ये आहेत. दक्षिण अमेरिकेच्या नजीकच्या लोबोस बेटावर सु. ७५ मी. जाडीचे सील प्राण्याच्या ग्वानोचे थर आहेत.
आगस्ते, र. पां.