ग्लाउबर, योहान रूडोल्फ : ( ? १६०४–१० मार्च १६६८ ?). जर्मन रसायनशास्त्रज्ञ व वैद्य. रसायनशास्त्राच्या त्यांच्या सखोल अभ्यासामुळे व सतत प्रयोगशीलतेमुळे त्यांना ‘रसायनशास्त्राचे जनक’ म्हटले जात असे. बव्हेरियातील कार्लश्टाट येथे त्यांचा जन्म झाला. त्यांना महाविद्यालयीन शिक्षण मिळाले नाही. त्यामुळे त्यांचे बहुतेक सर्व ज्ञान अनुभवसिद्ध होते. प्रथम त्यांनी व्हिएन्ना, सॉल्झबर्ग, फ्रँकफर्ट इ. ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय केला. नंतर काही राजकीय कारणांमुळे त्यांना ॲम्स्टरडॅम येथे स्थायिक व्हावे लागले. तेथे काही विशिष्ट रसायनांची व औषधिद्रव्यांची विक्री करण्याचा त्यांचा व्यवसाय होता.

शिक्षण विशेष नसल्यामुळे त्यांचा प्रत्यक्ष प्रयोगांवर जास्त भर होता. त्यासाठी त्यांनी स्वतःची एक सुसज्ज प्रयोगशाळा अँम्स्टरडॅम येथे तयार केली होती. या प्रयोगशाळेत निरनिराळे प्रयोग करून त्यांनी अनेक रासायनिक व औषधी पदार्थाच्या निश्चित कृती शोधून काढल्या व त्या नोंदून ठेवल्या. त्यांचे लिखाण मुख्यत्वे किमयागारी व ज्ञात विद्रावक (विरघळणारे पदार्थ) यांच्याबद्दल असले, तरी त्यांनी रसायनशास्त्राच्या ज्ञानात बहुमोल भर घातली. वनस्पतींच्या वाढीसाठी रसायनांचा वापर करण्याच्या दृष्टीनेही त्यांनी प्रयोग केले होते.

मिठावर सल्फ्यूरिक अम्लाची विक्रिया करून हायड्रोक्लोरिक अम्ल तयार करण्याच्या कृतीचे वर्णन प्रथम त्यांनीच केले. या विक्रियेतील सोडियम सल्फेट ऊर्फ साल मिराबिल या अवशिष्टाचे (उरलेल्या पदार्थाचे) सर्व गुणधर्म त्यांनी स्पष्ट केले. यालाच त्यांच्या नावावरून ‘ग्लाउबर सॉल्ट’ म्हटले जाऊ लागले. याच विक्रियेत मिठाऐवजी पोटॅशियम नायट्रेट वापरल्यास नायट्रिक अम्ल तयार होते, असे त्यांनी दाखवून दिले. कार्ल्सबात व झेड्‌लित्झ या ठिकाणी असलेल्या झऱ्यांच्या पाण्यांत साल मिराबिल हे लवण आहे व त्यामुळे या पाण्याला औषधी गुणधर्म प्राप्त झाले आहेत, असा शोध त्यांनी लावला. लाकडाचे सल्फ्यूरिक अम्लात ऊर्ध्वपातन करून (वाफ करून व मग ती थंड करून) ॲसिटिक अम्ल तयार होते, असे त्यांनी सिद्ध केले. हायड्रोक्लोरिक अम्लाच्या साहाय्याने कोळशाचे ऊर्ध्वपातन करून बेंझीन आणि फिनॉल प्रथम त्यांनी मिळविले. प्रथम वसाम्लात भिजवून जाळलेले चिकणमातीचे गोळे ऊर्ध्वपातित करून त्यांनी ॲक्रोलीइन मिळविले. वनस्पतीमधील सुवासिक तेले वेगळी करण्याची प्रक्रिया त्यांनी शोधून काढली.

याखेरीज ॲसिटोनासारख्या अनेक कार्बनी पदार्थांच्या निर्मितीच्या कृती त्यांनी प्रथम शोधून काढल्या. अनेक ⇨अल्कलॉइडे  त्यांनी प्रथमच निरनिराळ्या प्रयोगांमधून मिळविली. शिसे, जस्त, लोह, कथिल, तांबे इ. धातू व अँटिमनी, आर्सेनिक इ. अधातूंची सल्फेटे, नायट्रेटे व क्लोरेटे त्यांनी प्रथम तयार केली. रंजनक्रियेवर देखील त्यांनी अनेक टिपणे लिहिली. अँटिमनी पोटॅशियम टार्टारेट (टार्टार एमेटिक) याच्या कृतीचे वर्णन त्यांनी लिहिले होते.

नैसर्गिक शक्तीचा आणि खनिजांचा वापर राष्ट्राच्या उद्धाराकरिता करून घेता येईल, असे त्यांनी निश्चित पुराव्यांनिशी Dess Teutschlands Wohlfahrt (१६५६–६१) या त्यांच्या सुप्रसिद्ध ग्रंथात प्रतिपादन केले. याखेरीज त्यांचे महत्त्वाचे लेखनकार्य म्हणजे स्वतःच्या प्रयोगकार्यासंबंधीच्या माहितीविषयक Furni novi philosophici (१६४६–४९) हा ग्रंथ, Pharmacopoea spagyrica (१६५४–६८) हा औषधिद्रव्यांसंबंधीचा ग्रंथ, जाइंटर या संयुगाच्या महत्त्वासंबंधीचा Miraculum mundi (१६५३–६०) हा ग्रंथ वगैरे प्रसिद्ध ग्रंथ होत. त्यांचे काही महत्त्वाचे निबंध व प्रबंध Glauberus concentratus या शीर्षकाखाली पुनर्प्रकाशित झाले. ते ॲम्स्टरडॅम येथे मृत्यू पावले.

जोशी, लीना