ग्रेनेड : लहान नारळाच्या आकाराचे आणि बिडाच्या कवचामध्ये स्फोटक द्रव्य भरून केलेले, हाताने फेकण्याचे क्षेप्यास्त्र. खंदक, बुरूज, तटबंदी, सैनिकी जमाव, लष्करी वाहन, लष्करी सामग्रीची कोठारे वगैरेंवर करण्यात येणाऱ्या विध्वंसक हल्ल्यासाठी ग्रेनेडचा उपयोग होतो. हाताने फेकण्याचे, बंदुकीतून उडविण्याचे, ⇨रणगाडाविरोधी व रासायनिक असे विविध प्रकारचे ग्रेनेड आढळतात.
दहाव्या किंवा अकराव्या शतकात चीनच्या सुंग राजवटीत गनपावडरचा उपयोग ग्रेनेडसारख्या शस्त्रात करण्यात आला. १२२१ मध्ये एका चिनी गावावर हल्ला करताना मोगलांनी बिडाचे ग्रेनेड वापरले होते. यूरोपात ग्रेनेडची निर्मिती पंधराव्या शतकात सुरू झाली. त्या वेळी खंदकातील सैनिक ठार करणे किंवा तटबंदीचा दुरून विध्वंस करणे यांसाठी ग्रेनेडचा वापर परिणामकारक ठरला. सतराव्या शतकात पहिल्यांदा स्वीडनचा राजा ⇨आडॉल्फस गस्टाव्हस याने ग्रेनेडचा असा परिणामकारक वापर केला. सतराव्या शतकाच्या शेवटी व्होबान् या फ्रेंच लष्करी अभियंत्याने ग्रेनेडिअर्स या नावाच्या ग्रेनेडफेकी पायदळ पलटणी खड्या केल्या. या पलटणींनी बेल्जियममधील नामूर दुर्गाचा भेद करण्यासाठी वीस हजार ग्रेनेड फेकून मोठा पराक्रम गाजविला. अठराव्या शतकात मार्लबरो (इंग्लंड) याच्या मध्य यूरोपातील मोहिमांत ब्रिटिश ग्रेनेडियर पलटणींनी लक्षणीय कामगिरी केली होती परंतु लांब अंतरावरून अचूक नेमबाजी करणाऱ्या नव्या नव्या शस्त्रास्त्रांची निर्मिती होऊ लागल्याने १७५० नंतर ग्रेनेडचा युद्धातील वापर जवळजवळ संपुष्टात आला. १९०४-०५ मधील रूसो-जपानी युद्धातील पोर्ट आर्थरच्या वेढ्यापासून मात्र ग्रेनेडचा वापर पुन्हा सुरू झाला आणि विसाव्या शतकातील अतिदूर अंतरावरून अचूक नेमबाजी करता येणारी गुंतागुंतीची क्षेप्यास्त्रे निर्माण करण्याच्या अद्ययावत शस्त्रास्त्रांच्या चढाओढीतसुद्धा छोट्या युद्धक्षेत्रातील आपले महत्त्वाचे स्थान ग्रेनेडने टिकवून ठेवले आहे. पहिल्या महायुद्धातील ‘जॅमपॉट’ आणि दुसऱ्या जागतिक युद्धातील ‘मोलोटोव्ह कॉकलेट’ हे खास स्वरूपाचे हात-ग्रेनेड अस्तित्वात असले, तरी ‘मिल्सग्रेनेड’ हा हाताने किंवा बंदुकीच्या साह्याने फेकता येणारा ग्रेनेडच सुटसुटीत म्हणून सर्वसाधारणपणे सर्वत्र प्रचारात आहे.
ग्रेनेड हा हाताच्या पंज्यात मावू शकेल अशा आकाराचा असतो. त्याची लांबी १० सेंमी. ते १३ सेंमी. व जाडी ६ ते ६१/२ सेंमी. असते. ज्या प्रमाणात स्फोटक द्रव्यात सुधारणा होईल त्या प्रमाणात ग्रेनेडचे आकारमान कमी होण्याचा संभव असतो. सध्याच्या ग्रेनेडचे वजन अर्धा किग्रॅ. ते एक किग्रॅ.पर्यत असते. तसेच त्याचा आकार छोट्या लाकडी पिपासारखा असतो आणि कवच बिडाचे वा प्लॅस्टिकचे असते. ते गुळगुळीत अथवा खवले असलेले बनवितात. या कवचाच्या आत टी.एन्.टी. सारखे स्फोटक रसायन वगैरे भरलेले असते. चंडस्फोट रसायने ही नरघातक व रणगाडाविरोधी असून ती इमारतींचा किंवा वाहनांचा विध्वंस करण्यासाठी तसेच खड्डे करण्यासाठी वापरतात. धूर निर्माण करण्यासाठी ग्रेनेडमध्ये पांढरा फॉस्फरस व इतर रसायने वापरतात. नर घातकी ग्रेनेड अर्धा किग्रॅ. ते पाऊण किग्रॅ. वजनाचा असतो. त्याचा उपयोग सुरुंगासारखा करून रणगाड्याचे पट्टे तोडले जातात. धूमग्रेनेडचे वजन अर्धा किग्रॅ. असते. बंदुकीच्या नळीच्या तोंडावर एका खास रचनेचा कपासारखा योजक (ॲडॅप्टर) लावून त्यात हा ग्रेनेड बसवितात व तो मग गोळीने उडवितात. ग्रेनेड हाताने ३०–३२ मी. पर्यत फेकता येतो, तर बंदुकीने जवळजवळ २०० मी.पर्यत उडविण्यात येणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या रणगाडाविरोधी ग्रेनेडची बांधणी व आकार वेगळ्या प्रकारचा असतो. तो सुवाही (स्ट्रीम लाइन्ड) म्हणजे वरून खाली निमुळता होत गेलेला असतो. हा ग्रेनेड लांबट असून त्याच्या खालच्या टोकाला पंख (फिन्स) लावलेले असतात. त्यामुळे क्षेपपथात ग्रेनेडला स्थिरता प्राप्त होते. या ग्रेनेडमध्ये चिलखतभेदी असे विशिष्ट रसायन भरलेले असते. बझुका रॉकेटच्या निर्मितीमधून या ग्रेनेडच्या निर्मितीची कल्पना पुढे आली आहे.
ग्रेनेड हा एका हाताच्या पंजात पकडून, दुसऱ्या हाताने सुरक्षा पिन पूर्णतः ओढून टाकतात. पिन ओढण्यापूर्वी आघात-तरफेला पंजात खाली दाबून ठेवतात. पिन ओढल्यानंतर ग्रेनेडला लक्ष्यावर फेकून देतात. आघात-तरफेच्या टोकाला काडवात असते. पिन काढल्याबरोबर तरफेचे टोक काडवातीवर आदळून वात पेटते व चार सेकंदांनंतर ती स्फोटकाला पेटविते व मग स्फोट होतो. कवच फुटून त्याचे तुकडे आसपास तीव्र वेगाने उडून जवळपासच्या व्यक्तींच्या अंगात घुसतात. त्याचप्रमाणे स्फोटाच्या दाबामुळे वस्तूंचा विध्वंस होतो. निष्णात सैनिक अंगावर आलेला ग्रेनेड पकडून परत फेकू शकतो. ग्रेनेडमधील मुख्य दोष म्हणजे काडवात व आघाततरफ-यंत्रणा. यामुळे ते फेकणे कठीण जाते. प्लॅस्टिक ग्रेनेडमुळे स्वतःची हानी अधिक प्रमाणात होत असल्यामुळे ते वापरातून गेले. धूमग्रेनेडच्या डोक्यात असलेल्या भोकांतून धूर बाहेर पडतो. ग्रेनेडला बंदुकीतून उडविल्यावर आतले धूमरसायन जळू लागते व भोकावर असलेल्या पडद्यांना फोडून धूर पसरू लागतो. धुराचा रंग हिरवा, तांबडा, जांभळा, पिवळा वा पांढरा असतो. हालचाल लपविण्यासाठी किंवा संदेशासाठी धुराचा उपयोग होतो. हल्ली स्फोटक व ज्वालाग्राही रसायने बाजारात उपलब्ध असल्यामुळे ग्रेनेड घरात बनवून ⇨घातापाताकरिता त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो.
दीक्षित, हे. वि.
“