ग्रेट सॉल्ट लेक : अमेरिकेच्या उटा राज्याच्या वायव्य भागातील खाऱ्या पाण्याचे मोठे सरोवर. क्षेत्रफळ सु. ५,१८० चौ. किमी. हे सु. १३३ किमी. लांब, ८२ किमी. रुंद व जास्तीत जास्त १०·७ मी. खोल आहे. हे बॉनव्हिल या प्राचीन हिमानी सरोवराचा अवशेष असून त्याची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची १,२८० मी. आहे. याला मिळणाऱ्या जॉर्डन, वेबर व बेअर या नद्यांच्या वरच्या बाजूस धरणे, सिंचाई वगैरेंसाठी अधिक उपयोग होऊ लागल्यामुळे याचे क्षेत्रफळ कमी झाले आहे. या सरोवरापासून मिठाचे मोठे उत्पन्न मिळत आले आहे. आता इतरही क्षार मिळविण्याचे प्रयत्न चालू आहेत. याच्या २५ ‰ क्षारतेच्या पाण्यात कोलंबी, माशा, शेवाळे यांसारखे काही सजीव राहू शकतात. यात स्टॅन्सबरी, अँटिलोप, फ्रीमाँट व इतर अनेक लहान बेटे आहेत. काहींवर चराऊ गवत आहे काहींवर अनेक पक्षी हंगामात येऊन राहतात. जेम्स ब्रिजर याने हे सरोवर प्रथम १८२५ मध्ये पाहिले मग त्याचे संपूर्ण समन्वेषण झाले. सॉल्ट लेक सिटी येथून ८ किमी.वर आहे.

लिमये, दि. ह.