ग्रे, ॲसा : (१९ नोव्हेंबर १८१o–३o जानेवारी १८८८). अमेरिकन वनस्पतिवैज्ञानिक. पादपजाती (वनस्पतींच्या जाती) आणि वर्गीकरणात्मक वनस्पतिविज्ञान यांबाबतच्या संशोधनाबद्दल प्रसिद्ध. त्यांचा जन्म न्यूयॉर्कमधील ओनीदा परगण्यातील सकवॉइट येथे झाला. १८२५ मध्ये फेअरफील्ड ॲकॅडेमीत त्यांनी प्रवेश केला आणि एक वर्षानंतर फेअरफील्ड महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेण्यास सुरुवात केली. येथेच जेम्स हॅडली यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रसायनशास्त्र, खनिजविज्ञान ब वनस्पतिविज्ञान या विषयांच्या अभ्यासास प्रारंभ केला. १८३१ मध्ये त्यांनी वैद्यकीय पदवी मिळविली. १८३२ पासून त्यांनी वनस्पति-संकलनाचे आणि वनस्पति-अभिज्ञानाचे (वनस्पतींचा संग्रह करण्याचे व त्या ओळखण्याचे) कार्य सुरू केले. वनस्पतिविज्ञानाच्या आवडीमुळे १८३२ मध्ये त्यांनी वैद्यकव्यवसाय सोडला व १८४२ मध्ये ते हार्व्हर्ड येथे निसर्गविज्ञानाचे प्राध्यापक झाले १८७४ पासून ते आगास्सिझ यांच्यानंतर स्मिथसोनिअन संस्थेचे व्यवस्थापक झाले. हार्व्हर्ड विद्यापीठातील ग्रे हर्बेरियन (वनस्पतिसंग्रह) त्यांनी आयोजित केला व अमेरिकेतील वर्गीकरणात्मक वनस्पतिवैज्ञानिकांत ते अनेक वर्षे प्रमुख गणले जात. १८३६–७९ या काळात त्यांचे वनस्पतिविज्ञानावरचे सु. दहा–बारा ग्रंथ प्रसिद्ध झाले. उत्तर अमेरिकेतील पादपजातीसंबंधीची माहिती फ्लोरा ऑफ नॉर्थ अमेरिका या शीर्षकखाली ग्रे आणि जॉन टोरे ह्यांनी मिळून दोन भागांत प्रसिद्ध (१८३८–४३) केली. यूरोप, अमेरिकेची संयुक्त संस्थाने व इतरत्र त्यांनी केलेल्या प्रवासामुळे त्यांना १८७८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या सायनॉप्टिकल फ्लोरा ऑफ नॉर्थ अमेरिका हा ग्रंथ लिहिण्यास मदत झाली. १८५५–७५ या काळात ग्रे आणि चार्लस डार्विन यांचा बराच विचारविनिमय झाला व त्यांनी डार्विन यांच्या उत्क्रांतितत्त्वाला उघडपणे पाठिंबा दिला त्यांच्या ग्रंथांतून नैसर्गिक वर्गीकरणाचा पाठपुरावा केलेला आढळतो. ते केंब्रिज (मॅसॅचूसेट्स) येथे मृत्यू पावले.
जमदाडे, ज. वि.