ग्रीक साहित्य : ग्रीक साहित्याचा प्रवास जवळजवळ तीन हजार वर्षांचा आणि सलग आहे. त्याच्या इतिहासाचे तीन ठळक कालखंड पाडले जातात. पहिला, प्राचीन ग्रीक साहित्याचा कालखंड इ.स.पू. १ooo वर्षांपासून इ.स. चौथ्या शतकापर्यंतचा मानला जातो. तथापि ह्या दीर्घ कालखंडाचे दोन उपभाग करता येतील. एक इ.स.पू.१ooo पासून सम्राट अलेक्झांडरच्या मृत्यूपर्यंतचा (इ.स.पू. ३२३) व दुसरा इ.स.पू. ३२३ ते इ.स.च्या चौथ्या शतकापर्यंतचा, म्हणजे बायझंटिन कालखंडाच्या आरंभापर्यंतचा. दुसरा कालखंड इ.स. चौथ्या शतकापासून इ.स. १४५३ मधील कॉन्स्टँटिनोपलच्या पाडावापर्यंतचा मध्ययुगीन -बायझंटिन वाङ्मयाचा धरला जातो, तर तिसरा अर्वाचीन ग्रीक साहित्याचा कालखंड इ.स. १४५३ ते अगदी आजतागायतचा.
प्राचीन कालखंड – १ (इ.स.पू. १ooo ते इ.स.पू. ३२३) : तीन हजार वर्षांचा अखंड इतिहास असला, तरी ग्रीक साहित्याने या प्राचीन कालखंडात जी उंची गाठली, ती परत कधीच गाठली नाही. या प्राचीन ग्रीक साहित्यात बुद्धी आणि प्रतिभा, विचार आणि भावना यांचा समतोल मिलाफ आढळतो. त्याची अंतःप्रवृत्तीच अभिजात आहे. आशय आणि आकृती या दोहोंचेही भान या साहित्याने सतत राखलेले दिसते. मानवतावाद हा त्याच्या कर्तृत्वाचा गाभा आहे. प्रतिभा प्रज्ञा, मानवी जीवनाची जाण, उच्चतम मूल्यांबद्दल आस्था, मानवाच्या प्रतिष्ठेविषयी निष्ठा, प्रमाणबद्धतेमुळे निर्माण झालेले सौंदर्य, ही प्राचीन ग्रीक साहित्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळेच त्याला स्वयंभू मोल आलेले आहे. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंतचे बरेचसे पश्चिमी साहित्य अभिजात ग्रीक साहित्याची जाणकारी आणि प्रभाव असलेल्या साहित्यिकांनी निर्माण केले आहे. केवळ प्राचीन साहित्य म्हणून अर्वाचीन यूरोपीय साहित्यांशी याचा संबंध नाही, किंवा फक्त काळाच्या ओघात प्रभावी ठरलेले साहित्य म्हणून त्याच्याकडे पहावे, असेही नाही तर अंगभूत गुणांमुळे आणि त्यातील काही श्रेष्ठ साहित्यकृतींमुळे ते आजही अभ्यसनीय व आवाहक ठरलेले आहे. पश्चिमी साहित्यसमीक्षेच्या संपन्न परंपरेला पायाभूत ठरलेला पोएटिक्स हा ॲरिस्टॉटलचा ग्रंथ ह्याच काळातला [→ ॲरिस्टॉटल].
अशा प्राचीन व श्रेष्ठ साहित्याचा, दुर्दैवाने, फारच थोडा भाग उपलब्ध आहे. एक्सिलसच्या सु. ९o नाटकांतील फक्त सातच काळाने शिल्लक ठेवली आहेत सॉफोक्लीझच्या सु. १२३ नाट्यकृतींपैकी ७, तर युरिपिडीझच्या सु. ९o पैकी फक्त १८ उपलब्ध आहेत. हा थोर साहित्यिकांविषयीच घडलेला प्रकार, झालेले नुकसान किती विलक्षण असू शकेल, याची कल्पना देण्यास पुरेसा आहे. अलीकडे सापडलेली सॅफो, ॲल्सीअस व बकिलिडीझ यांची पपायरीवरील कविता फार तर या दुःखावर डागणीच देते, असे म्हणता येईल. आता ह्या साहित्याचा साहित्यप्रकारांनुसार आढावा घ्यावयाचा आहे.
महाकाव्य : ऑर्फिअस व म्यूझिअस ह्या आख्यायिकाभूत कवींची गीते हा ग्रीक साहित्याचा मूलस्रोत होय, असे परंपरा मानीत असली, तरी प्राचीन ग्रीक साहित्याचे पहिले अर्घ्य ⇨होमरच्या नाववाने सोडले जाते. इ.स.पू. आठव्या शतकात रचिल्या गेलेल्या त्याच्या ⇨इलिअड आणि ⇨ ओडिसी या महाकाव्यांच्या मागे कालौघात नष्ट झालेली चारणांची काव्यपरंपरा आहेच, असे त्यांच्या उपलब्ध संहितांवरून वाटते. श्रवणासाठी रचिली गेलेली ही महाकाव्ये वीरमहाकाव्ये किंवा ‘हिरोइक एपिक्स’ म्हणून ओळखली जातात कारण काही पिढ्यांच्या पराक्रमाची व त्यांच्या धीरोदात्त नायकांची वर्णने या शौर्यगाथांतून येतात. इलिअडचा विषय ट्रोजनांचे ग्रीकांबरोबर झालेले युद्ध, हा आहे. परंतु होमरने ही युद्धकथा निमित्तमात्र करून आकिलीझ ह्या महायोद्ध्याची क्रोधकहाणी यात प्राधान्याने मांडलेली आहे. आकिलीझ हा ट्रोजनांशी लढण्यासाठी गेलेला एक ग्रीक महायोद्धा. ग्रीकांचा सरसेनापती ॲगमेम्नॉन ह्याच्याकडून अपमानित झाल्यामुळे तो संतापाने युद्धातून अंग काढून घेतो. त्यामुळे युद्धात ट्रोजन वरचढ ठरू लागतात. सूडाच्या भावनेने पेटलेला आकिलीझ ह्यामुळे आनंदित होतो परंतु त्याचा मित्र पट्रोक्लस हा ट्रॉयचा राजपुत्र हेक्टर ह्याच्याकडून मारला गेल्यानंतर मित्रवधाचा सूड घेण्यासाठी आकिलीझ युद्धात भाग घेतो आणि हेक्टरला ठार मारतो. ट्रॉयचा राजा प्रायम ह्याने बऱ्याच विनवण्या केल्यानंतर त्याला हेक्टरचे शव देण्यात येते आणि अत्यंत गंभीर वातावरणात हेक्टरचे दफन होते. मूलभूत मानवी भावभावनांना सहृदयपणे स्पर्श करणारे आणि जलद, पण परिणामकारक कथाकथन ही त्याची लक्षणीय वैशिष्ट्ये. मानवाच्या प्रतिष्ठेचे गान गाणाऱ्या होमरच्या ओळींतील उदात्तता कधीच मंदतेज होत नाही. ओडिसीचा थाट मुळातच वेगळा आहे. ट्रोजन युद्धावरून माघारी निघालेला इथाकाचा राजा ओडिस्यूस (त्याचेच रोमन नाव यूलिसीझ) ह्याच्यावर घरी परतताना कोसळणारी संकटे, त्याचे इथाका येथे पुनरागमन आणि त्याची पत्नी पनेलपी हिच्याशी त्याचे घडून येणारे पुनर्मीलन हा ओडिसीचा कथाविषय. चतुर, साहसी ओडिस्यूस, त्याच्या इथाका येथील दीर्घकालीन अनुपस्थितीचा फायदा घेऊन पनेलपीशी विवाह करू इच्छिणाऱ्या अनेकजणांचा उपसर्ग सहन करणारी पनेलपी व ह्या प्रकारामुळे प्रथम भांबावलेला परंतु नंतर वस्तुस्थितीला धीराने तोंड देणारा ओडिस्यूसचा पुत्र टेलेमॅकस ह्या प्रमुख पात्रांभोवती गुंफलेल्या ह्या महाकाव्यात अनेक लोककथांचा कलात्मक उपयोग होमरने करून घेतलेला आहे. ही साहित्यकृती जिवंत, चैतन्यमय करण्यात ह्या लोककथांचा वाटा मोठा आहे. इलिअड व ओडिसी ही दोन्ही महाकाव्ये होमरचीच असली, तरी त्यांच्या स्वरूपांत लक्षणीय असे फरक आढळतात. इलिअड शोकात्म, तर ओडिसी बरेचसे सुखात्म आहे. इलिअडच्या मानाने ह्या महाकाव्याची रचनाही अधिक बांधेसूद आहे. गांभीर्यापेक्षा सहजात, खेळकरपणा ह्यांकडे होमरने ओडिससीमध्ये अधिक लक्ष पुरवलेले दिसते. मात्र भिन्न धाटण्यांच्या या महाकाव्यांतून होमरचे जीवनाकलन, सत्य, शिव व सुंदर यांबद्दलची आस्था, युद्धकला, खाणेपिणे, संपत्ती, आदरातिथ्य, निसर्ग यांबद्दलची आसक्ती सारख्याच उत्कटतेने प्रकट होतात. ही दोन्ही महाकाव्ये प्रत्येकी २४ सर्गांची असून ती हेक्झॅमीटरमध्ये रचिलेली आहेत. ग्रीक वाङ्मयाचा पाया ही महाकाव्ये आहेतच पण ग्रीकांची राष्ट्रीय महाकाव्ये लिहिणारा होमर फक्त ग्रीसचा राष्ट्रकवी नाही, तर पहिला थोर यूरोपीय साहित्यिकही आहे.
महाकाव्ये लिहिणारे कवी आणखीही असतील पण त्यांची व त्यांच्या कृतींची नावनिशाणी आज उपलब्ध नाही. होमरनंतरचा महत्त्वाचा कवी ⇨ हीसिअड (इ.स.पू. आठवे शतक) हा वीरपुरुषांच्या पराक्रमांची वर्णने करणारा नाही त्याच्या वर्क्स अँड डेजमध्ये शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाचे एक वर्ष त्याने वर्णिले आहे शुभाशुभ दिवस सांगितले आहेत, तसेच त्याच्या भावाला – पर्सेसला विविध प्रकारचा नीतिबोध केलेला आहे. हीसिअडचे महत्त्व यूरोपचा पहिला निसर्गकवी म्हणून आहे. पशुपक्ष्यांची, झाडाझुडपांची आणि माणसाच्या सुखदुःखांची म्हणून बारकाईने वर्णन करताना पँडोरा, मानवेतिहासातील पाच युगे (सुवर्ण, रौप्य, ब्राँझ, वीर आणि लोह) यांसारख्या उद्बोधक कथाही तो सांगतो. थिऑगनी हे देवदेवतांसंबंधीचे काव्यही हीसिअडच्या नावावर मोडते. हीसिअडच्या कोणा एका अज्ञात शिष्याने द शील्ड ऑफ हीरॅक्लीझ नावाचे काव्य केले आहे. हीरॅक्लीझ ह्या ग्रीक वीराचे गुणगान करणे, हा ह्या काव्याचा हेतू.
होमरिक स्तोत्रे म्हणून सु. ३o कविता उपलब्ध आहेत. ह्या एककालिक आणि एककर्तृक नाहीत. देवदेवतांविषयीच्या ह्या स्तोत्रांत शब्दकळेचा ताजेपणा, तसेच उत्साह आणि खेळकरपणा दृष्टीस पडतात. अपोलोला फसवून त्याच्या गायी चोरणारा हर्मीझ, सिंहाचे रूप घेऊन चाच्यांच्या तावडीतून निसटणारा डायोनायसस, अँकायसीझला स्वतःच्या प्रेमपाशात अडकविणारी ॲफ्रोडाइटी यांच्या कथा ह्या स्तोत्रांतून आलेल्या आहेत. या स्तोत्रांतील डिमीटरचे स्तोत्र विशेष उल्लेखनीय मानले जाते. एकूण होमरच्या थाटाची स्तोत्रे रचणारे कवी देवदेवतांच्या गमतीजमतीत मनापासून रंगून गेलेले दिसतात.
कुलकणी, अनिरुद्ध
भावकविता : ग्रीक ‘लिरिक’ किंवा भावकविता इ.स.पू. सातवे शतक ते इ.स.पू. पाचच्या शतकाचा मध्य ह्या कालखंडात बहरली. लिरिक ह्या शब्दाचा मूळ अर्थ ‘लायर’ ह्या वाद्याच्या साथीवर गायिले जाणारे गीत, असा घेतला जातो तथापि लायरवर महाकाव्येही गायिली जात असत. प्रथम लायर हे चार तारांचे वाद्य होते पुढे टरपँडर (इ.स.पू. सातवे शतक) ह्या भावकवीने व संगीतकाराने सात तारांचे लायर वापरात आणले, असे म्हटले जाते. पारंपरिक गीतरचनेची पूर्वपीठिका ग्रीक भावकवितेच्या परिपक्व रूपामागे आहेच. होमरच्या महाकाव्यांतूनही भावगेय किंवा ‘लिरिकल’ भाग आढळतो.
ग्रीक महाकाव्याच्या ऱ्हासानंतर ग्रीक भावकवितेचे युग सुरू झाले. महाकाव्यांच्या मागे वीरयुगाची प्रेरणा होती. इ.स.पू. तेरावे-बारावे शतक हे ग्रीकांचे वीरयुग म्हणता येईल. ह्या काळात संघटित ग्रीक जमाती आशिया मायनरमध्ये आणि ईजिप्तमध्ये आपली राज्ये स्थापण्याचा प्रयत्न करीत होत्या. ह्या निमित्ताने त्यांना संघर्ष करावे लागत होते, पराक्रम गाजवावा लागत होता. ह्या शौर्यपूर्ण इतिहासातून महाकाव्ये उदयाला आली आणि ग्रीक जगतातील राजांचा त्यांना आश्रयही लाभला. तथापि इ.स.पू.सु. सातव्या शतकापासून ग्रीक जगातील राजेशाहीचाच ऱ्हास होऊ लागला. राजांची जागा हळूहळू उमराववर्गाने घेतली आणि राजाधिकार ह्या मंडळींत विभागले गेले. त्यांनी भूतकाळापेक्षा वर्तमानाला अधिक महत्त्व दिले. व्यक्तिनिष्ठा जोपासली. कवितेने आपली व्यक्तिगत चरित्रे गावी, असा त्यांचा हेतू होता. ह्या वस्तुस्थितीचा संदर्भ ग्रीक भावकवितेच्या उदयाच्या बाबतीत मोलाचा आहे. होमरोत्तर कवितेत अवतरलेल्या ह्या ‘स्व’मधून कवीच्या आत्मपरतेला वाव मिळाला. एलिजी, वृंदगीते, आयँबिक कविता व कवीची अत्यंत आत्मपर अशी गीते (पर्सनल साँग वा पर्सनल लिरिक), असे ग्रीक भावकवितेचे प्रकार स्थूलमानाने पाडता येतील.
‘एलिजी’ ह्या शब्दाचा अर्थ ‘विलापिका’ असा आज घेतला जातो. तथापि उपलब्ध ग्रीक एलिजीचे स्वरूप वेगळे आहे. कवीच्या व्यक्तिगत भावनांचा आविष्कार, विविध विषयांवरील त्याचे विचार मांडणे, हे एलिजीचे प्रयोजन होते. मुख्यतः युद्ध आणि प्रेम हे विषय ग्रीक एलिजीत आलेले दिसतात. कलायनस (इ.स.पू. सातवे शतक) हा एलिजी रचनाकारांपैकी पहिला, असे म्हटले जाते. अत्यंत त्रुटित स्वरूपात त्याची कविता उपलब्ध आहे. हा कवी एफेससचा. आपल्या एफेशियन बांधवांना शत्रुविरुद्ध लढण्याचे आवाहन त्याने केले आहे. तथापि ⇨टर्टीअस आणि ⇨मिमनर्मस हे श्रेष्ठ एलिजी रचनाकार. दोघेही इ.स.पू. सातव्या शतकातले. स्पार्टनांना युद्धासाठी उत्तेजित करण्यासाठी टर्टीअसने आपल्या एलिजी लिहिल्या. मिमनर्मसच्या एलिजी प्रेम ह्या विषयाभोवती गुंफिलेल्या आहेत. त्याची प्रेयसी ‘नान्नो’ हिच्या नावाने संगृहीत केल्या गेलेल्या त्याच्या कवितांत जीवन क्षणभंगुर असून सुखोपभोगांत ते खर्च केले पाहिजे, असे विचार आले आहेत.
सोलॉन (सु. ६४o–सु. ५५८ इ.स.पू) आणि थिऑग्निस (इ.स.पू. सहाव्या शतकाचा उत्तरार्ध) हे आणखी काही एलिजी रचनाकार. सोलॉन हा अथेन्सचा राज्यघटनाकार. स्वतःच्या नैतिक, सामाजिक आणि राजकीय विचारांच्या मांडणीसाठी त्याने एलिजीचा आश्रय घेतला. थिऑग्निसच्या नावावर मोडणारी कविता सु. १,४oo ओळी भरेल. थिऑग्निस हा मेगाराचा एक उमराव. जुन्या उमरावशाहीबद्दलचे प्रेम व मेगारा येथील नव्या सत्ताधारी सर्वसामान्यांबद्दलची तुच्छता त्याच्या कवितेत प्रत्ययास येते. त्याच्या अनेक कवितांतून किर्नॉस नावाच्या त्याच्या एका तरुण मित्राला केलेला उपदेश आहे. अनेक सुंदर सुभाषिते थिऑग्निसच्या कवितेत आढळतात. तथापि त्याच्या आज उपलब्ध असलेल्या कवितांपैकी बराचसा भाग अपभ्रष्ट वाटतो. त्यांत अनेक प्रक्षिप्तेही आहेत.
वृंदगीते किंवा ‘कोरल लिरिक’ हा ग्रीक भावकवितेचा आणखी एक उल्लेखनीय प्रकार. समूहाने गाण्यासाठी रचिलेली ही गीते. ह्या गीतांना नृत्याची साथ असे. ग्रीक जीवनातील विविध सार्वजनिक आणि खाजगी कार्यक्रमांच्या प्रसंगी ही वृंदगीते गायिली जात असत. सुगीचे दिवस, जन्म, मृत्यू, लग्न हे असे काही प्रसंग. अगदी आरंभीच्या वृंदगीतांमागील प्रेरणा धार्मिक होती तथापि पुढे एखादा खाजगी विशेष प्रसंग साजरा करण्यासाठी वृंदगीते रचणाऱ्या कवींना मुद्दाम पाचारण करण्यात येऊ लागले. अशा प्रकारच्या काव्यरचनेला मुख्यतः स्पार्टा येथे आश्रय मिळाला.
ॲल्कमन (इ.स.पू. सातवे शतक) ह्या कवीने रचिलेली वृंदगीते उपलब्ध वृंदगीतांत आरंभीची मानली जातात. ‘पार्थेनिऑन’ हा वृंदगीतांचा एक विवक्षित प्रकार त्याने सफाईने हाताळला. कुमारिकांनी मिरवणुकीने गात जावयाची ही स्तोत्रे. ॲल्कमनने छंदांच्या संदर्भात एक वेगळी दृष्टी अवलंबिली. हेक्झॅमीटरऐवजी विविध प्रकारचे हलकेफुलके छंद वापरले. हा कवी सारडीझ येथे जन्मला आणि पुढे स्पार्टा येथे आला.
त्यानंतरचे वृंदगीतकार सिसिली, आयोनिया व बिओशिया येथले. ⇨ स्टिसिकोरस (सु. ६४o–सु. ५५५ इ.स.पू.), तसेच इबिकस (इ.स.पू. सहाव्या शतकाचा उत्तरार्ध), ⇨कीऑसचा सायमॉनिडीझ (सु. ५५६–सु. ४६८ इ.स.पू.), ⇨बकिलिडीझ (सु. ५o५–सु. ४५o इ.स.पू.) आणि ⇨ पिंडर (सु. ५२२–सु. ४४२ इ.स.पू.) ही त्यांतील विशेष उल्लेखनीय नावे.
स्टिसिकोरस हा सिसिलीमधील हिमर येथील कवी. ‘हिरोइक हिम’ किंवा वीरस्तोत्र ह्या वृंदगीतप्रकाराचा तो प्रवर्तक. वीरस्तोत्रात महाकाव्यांतील विविध वीरांचे गुणवर्णन असे. स्टिसिकोरसने आपल्या वीरस्तोत्रांतून ट्रोजन युद्धातील काही प्रसंग, ॲगमेम्नॉन ह्या ग्रीक महायोद्ध्याचा वध, ॲगमेम्नॉनचा पुत्र ओरेस्टीझ ह्याने त्या वधाचा घेतलेला सूड असे विषय हाताळलेले आहेत. भावकवितेला त्याने महाकाव्याची भव्यता प्राप्त करून दिली, असे म्हटले जाते. ग्रीक भावकवितेत स्ट्रॉफी, अँटिस्ट्रॉफी आणि एपोड ह्या तीन भागांची आवर्तने त्याने आणली. स्ट्रॉफी आणि अँटिस्ट्रॉफी हे दोन भाग रचनादृष्ट्या सारखे असतात. एपोडची रचना त्याहून भिन्न प्रकारची असते. स्टिसिकोरसच्या प्रभावातून पिंडरने आपल्या ओडरचनेत ह्या तीन भागांचा उपयोग केला. स्टिसिकोरसची कविता अत्यंत त्रुटित स्वरूपात उपलब्ध आहे.
इबिकस हा सेमॉसच्या पोलिक्राटीझच्या दरबारी काही काळ होता. त्याची कविताही त्रुटित स्वरूपातच मिळते. पोलिक्राटीझला उद्देशून लिहिलेल्या एका दीर्घ कवितेचा काही भाग अलीकडेच मिळालेल्या एका पपायरसावर आढळला असून ही दीर्घ कविता इबिकसची असावी, असा तर्क केला जातो. वृंदगीतरचनेचे प्रगत आणि परिपक्व रूप तीतून प्रत्ययास येते.
कीऑसचा सायमॉनिडीझ हाही एक श्रेष्ठ ग्रीक भावकवी. हिपार्कसच्या दरबारी हा काही काळ होता. ‘एपिनायसिऑन’ किंवा क्रीडाविजयगीत आणि ‘एंकोमिअम’ किंवा स्तुतिगीत हे वृंदगीतप्रकार त्याने हाताळले. ग्रीक क्रीडाविजयगीत हा वृंद-उद्देशिकेचा किंवा कोरल ओडचा एक प्रकार. एखाद्या क्रीडास्पर्धेत विजयी ठरलेल्या क्रीडापटूचा त्यात गौरव असतो. अशा गीतांतून नैतिक उपदेशही असतो. एंकोमिअम हाही एक स्तुतिपर गीतरचनेचा प्रकार. मात्र त्यात देवस्तुती नसते मनुष्याची, उदा., आश्रयदात्याची, स्तुती असते. कीऑसचा सायमॉनिडीझ हा अर्थार्जनासाठी अशी स्तुतिगीते लिहिणारा पहिला कवी होय, असे म्हटले जाते. कीऑसच्या सायमॉनिडीझने इतर प्रकारची वृंदगीतेही लिहिली. ग्रीकांच्या पर्शियनांबरोबर झालेल्या युद्धावर त्याने काही एलिजी लिहिल्या आहेत. थर्मॉपिली येथे झालेल्या ग्रीक-पर्शियन युद्धात मारल्या गेलेल्या योद्ध्यांविषयी त्याने लिहिलेल्या ‘हे अनोळखी प्रवाशा! स्पार्टनांना निरोप दे, की त्यांच्या आज्ञा पाळणारे आम्ही येथे चिरविश्रांती घेत आहोत’ ह्या आशयाच्या ओळी विख्यात आहेत. चिंतनशील प्रवृत्तीच्या ह्या कवीची नीतिवचने अनेकदा उद्धृत केली जातात.
बकिलिडीझ हा कीऑसच्या सायमॉनिडीझचा पुतण्या. त्यानेही अनेक प्रकारची वृंदगीते लिहिली. पपायरीवर लिहिलेल्या त्याच्या १९ कविता आज उपलब्ध झालेल्या आहेत. त्यांत १४ क्रीडाविजयगीते आहेत आणि ५ डिथिरॅम गीते आहेत. ‘डिथिरॅम’ गीत हा वृंदगीताचाच एक प्रकार होय. मुळात ही डायोनायससच्या पूजाविधीशी संबंधित अशी गीते. वर्तुळाकार वृंदाने ती गावयाची. बकिलिडीझच्या ह्या पाच डिथिरॅम गीतांपैकी दोन उघडउघड अपोलोला उद्देशून लिहिली आहेत. ‘थीस्यूस’ (ग्रीक पुराणकथांतील एक व्यक्तिरेखा) हे ह्या डिथिरॅम गीतांपैकी एक संपूर्णपणे संवादात्मक असल्यामुळे, विशेष उल्लेखनीय. थीस्यूसचा पिता ईजीअस आणि वृंद ह्यांच्यामधील हा एक संवाद आहे. ग्रीक नाट्येतिहासाशी ह्या संवादाचा काही संबंध लावता येईल किंवा काय, हा प्रश्न मात्र आजही समाधानकारकपणे सुटलेला नाही. तल्लख कल्पनाशक्ती आणि उत्कृष्ट निवेदनशैली ही बकिलिडीझच्या कवितेची काही लक्षणीय वैशिष्ट्ये. मात्र पिंडरची उंची तो गाठू शकला नाही.
पिंडरने वृंदगीतांचे जवळजवळ सारेच प्रमुख प्रकार हाताळले आहेत. त्याच्या एकूण रचनेपैकी सु. एक चतुर्थांशच आज आपणास उपलब्ध आहे. त्याच्या सर्वच कवितेवर त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रतिभेचा ठसा उमटलेला आहे. विविध छंदांचा समर्थपणे केलेला वापर, भारदस्त विचार आणि उत्कृष्ट रूपकांनी नटलेली चित्रमय शैली ही त्याच्या रचनेची काही उल्लेखनीय वैशिष्ट्ये. ग्रीसमधील ऑलिंपिया, इस्थमीअ, नीमीअ आणि पीथीऑन येथील क्रीडामहोत्सवांतील वीरांवर पिंडरने लिहिलेल्या उद्देशकांनी (ओड) ओडरचनेचा एक आदर्शच निर्माण केला. त्यास अनुसरून पुढे अनेकांनी ‘पिंडरिक ओड्स’ रचिली. पिंडर हा आज मुख्यतः त्याच्या ओडरचनेसाठी ओळखला जातो. मिथ्यकथांची चातुर्यपूर्ण गुंफण त्याने आपल्या उद्देशिकांतून केली. मिथ्यकथांचा वापर त्याने स्वतंत्र दृष्टी ठेवून केला. कधी त्यांना वेगळे रूप दिले, तर क्वचित नव्या मिथ्यकथा निर्माण केल्या.
⇨कोरिना (इ.स.पू. सहावे शतक ?) ही कवयित्री पिंडरची गुरू होती, असे परंपरा मानते. बिओशियन बोलभाषेत लिहिलेली तिची कविता त्रुटित स्वरूपात उपलब्ध आहे. साध्या, सोप्या भाषेत बिओशियातील मिथ्यकथा आणि आख्यायिका तिने काव्यबद्ध केल्या आहेत.
ग्रीक भावकवितेच्या संदर्भात आयँबिक कवितेचा उल्लेख आवश्यक आहे. आयँबिक छंदातील ही कविता डायोनायसस हा मद्यदेव किंवा डिमीटर ही कृषिदेवता ह्यांच्या प्रीत्यर्थ रचिली जाई, असे दिसते. ह्या दोन्ही देवता सर्वसामान्यांना जास्त जवळच्या. झ्यूस किंवा अपोलो ह्यांसारख्या देवतांसाठी डेक्टिलिक हेक्झॅमीटरसारखे ‘शाही’ समजले जाणारे छंद वापरले जात. सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील भाषेला आयँबिक छंद जवळचा. ह्या छंदाच्या संदर्भातील एक आख्यायिका उद्बोधक आहे. झ्यूस आणि डिमीटरची मुलगी पर्सेफनी हिला मृतांच्या जगाचा राजा हेडीझ ह्याने पळवून नेल्यानंतर डिमीटर अत्यंत दुःखी झाली. ती कोणाशी बोलेना, हसेना. अशा परिस्थितीत आयँबी नावाच्या दासीने आपल्या हळुवार, खेळकर आणि विनोदी बोलण्याने तिला हसविले. आरंभीची आयँबिक कविता उपरोध-विडंबनाचे वाहन बनली. परंतु पुढे ग्रीक नाट्यरचनेसाठी ह्या छंदाचा समर्थपणे वापर करण्यात आला.
आयँबिक कवितेच्या परंपरेत आर्किलोकस (इ.स.पू. सातवे शतक), आमॉर्गॉसचा सायमॉनिडीझ (इ.स.पू. सातवे शतक) आणि हिपोनॅक्स (इ.स.पू.सु. ५४o) ही तीन नावे पुढे येतात. आर्किलोकस हा प्रेमभंगाने मन कडवट झालेला माणूस होता. आयँबिक वृत्तात त्याने रचिलेल्या उपरोधिकांना ह्या दुःखाची धार आहे. त्याच्या कवितेतील डंख लक्षात घेऊन पुढे त्यास ‘वृश्चिक’ हे नाव प्राप्त झाले. त्याचा गर्व आणि औद्धत्य त्याच्या कवितांतून प्रत्ययाला येते.
आमॉर्गॉसच्या सायमॉनिडीझच्या दोन कविता त्रुटित स्वरूपात मिळतात. त्यांतील एक स्त्रियांना उद्देशून लिहिलेली उपरोधिका असून दुसरीत मानवी जीवनातील दुःखांवर चिंतन आहे. हिपोनॅक्सनेही आयँबिक उपरोधिका लिहिल्या. त्यांत निंदानालस्तीचे प्रमाण भरपूर आहे.
ह्यानंतर अत्यंत आत्मपर अशा ग्रीक भावकवितेचा विचार. ह्या संदर्भात तीन नावे ठळकपणे नजरेत भरतात. कवी ⇨ॲल्सीअस (इ.स.पू. सातवे शतक), कवयित्री ⇨सॅफो (इ.स.पू. सातवे शतक) आणि कवी ⇨आनाक्रेऑन (इ.स.पू. सहावे शतक).
ॲल्सीअस आणि सॅफो ही दोघे लेझ्बॉस बेटावरील आणि एकमेकांचे समकालीन. प्रेम, मदिरा आणि राजकारण हे ॲल्सीअसच्या कवितेचे विषय. उत्स्फूर्त, नादमधुर आणि थेट अंतःकरणापासून येणारी अभिव्यक्ती ही त्याच्या काव्यलेखनाची वैशिष्ट्ये. ‘आल्केइक’ नावाचा एक छंद त्याने शोधून काढला असावा अथवा त्याचा त्याने मुक्तपणे वापर केला असावा. ह्या छंदाशी त्याचे नाव मात्र कायमचे निगडित झालेले आहे.
सॅफोभोवती वाङ्मयप्रेमी मैत्रिणींचे एक वर्तुळच तयार झाले होते. त्यात तिच्या कविता म्हटल्या जात. पराकोटीच्या आत्मपर अशा ह्या कवितांतून प्रेमभावनेचा कोमल आणि प्रासादिक आविष्कार झालेला आहे. विविध छंद तिने वापरले. आज आपणास उपलब्ध असलेल्या तिच्या कवितेतच सु. ५o वेगवेगळे छंद दिसून येतात. ‘सॅफिक’ हा छंद तिच्या नावाशी निगडित आहे. स्त्री आणि पुरुष ह्यांच्या अभिव्यक्तींमधील स्वाभाविक फरक सॅफो आणि ॲल्सीअस ह्यांच्या कवितांतून दिसून येतो. मद्य, युद्ध, साहसे आणि राजकारण हे ॲल्सीअसच्या आस्थेचे विषय आहेत, तर सॅफो स्वतःच्या अत्यंत व्यक्तिगत विश्वात स्त्रीसुलभ हळुवारपणे सदैव वावरत आहे. अल्सीअसने आणि सॅफोने ईऑलिक बोलीत आपल्या कविता लिहिल्या.
आनाक्रेऑन हा टीऑसचा. त्याची गीते हलकीफुलकी, खेळकर स्वरूपाची आहेत. प्रेम आणि मदिरा हे त्यांचे विषय. त्याच्या कवितांत भावनेची सखोलता फारशी आढळत नसली, तरी पारदर्शक अभिव्यक्ती अवश्य आहे. त्यानेही बरेच छंद वापरले. आनाक्रेऑनचे फार मोठ्या प्रमाणावर अनुकरण झाले. असे अनुकरण करून रचिलेल्या सु. ६o कवितांचा संग्रह आनाक्रेआँटिआ ह्या नावाने ओळखला जातो. ⇨एरिना ह्या कवयित्रीचा उल्लेख आवश्यक आहे. इ. स. पू. चौथ्या शतकात ती होऊन गेली असावी. बॉसिस ह्या तिच्या मित्रावर तिने Elakate (इं. शी. द डिस्टाफ) हे काव्य लिहिले. त्यातील सरळ, साधी पण उत्कट अभिव्यक्ती सॅफोचे स्मरण करून देते.
कुलकर्णी, अ. र.
नाटक : नाटक आणि रंगभूमी ही ग्रीसने यूरोपला बहाल केलेली एक महत्तम देणगी. शोकात्मिका आणि सुखात्मिका अशा दोन्ही प्रकारांत ग्रीकांनी नाट्यरचना केली आणि नाटक ह्या साहित्यप्रकाराच्या मूलभूत संकल्पना निर्माण करून पुढे अनेक अंगांनी विकास पावलेल्या यूरोपीय नाट्यपरंपरेला समर्थ मूलस्रोत उपलब्ध करून दिला. तथापि ग्रीक नाटकाच्या विकासाचा समग्र, तपशीलवार आणि स्पष्ट असा इतिहास आज आपणास ज्ञात नाही. हाती असलेल्या ऐतिहासिक-पारंपरिक दुव्यांच्या आधारे त्याचा शोध घ्यावा लागतो.
शोकात्मिका : ’ट्रॅजेडी’ हा शोकात्मिकेसाठी वापरला जाणारा इंग्रजी प्रतिशब्द Tragoidia ह्या ग्रीक शब्दावरून आलेला आहे. ‘गोटसाँग’ किंवा ‘अजगीत’ असा त्याचा अर्थ. डायोनायसस ह्या मद्यदेवाच्या वेदीवर बळी दिलेल्या बोकडाभोवती म्हणावयाचे गाणे, असे अजगीत ह्या शब्दार्थाचे एक स्पष्टीकरण. एका विशिष्ट गीतस्पर्धेत सर्वोत्कृष्ट गीताला एक बोकड पारितोषिक म्हणून दिला जात असावा आणि ह्या गीतस्पर्धेसाठी गायिले जाणारे गीत, हे अजगीत असाही त्याचा अर्थ लावला जातो. अथेन्समध्ये प्रतिवर्षी होणाऱ्या डायोनायससच्या उत्सवप्रसंगी शोकात्मिका सादर केल्या जात.
ॲरिस्टाटलच्या पोएटिक्समध्ये ग्रीक शोकात्मिकतेच्या उत्पत्तीविषयी आलेल्या विवेचनानुसार असे दिसते, की डायोनायससच्या पूजाविधीप्रसंगी डिथिरॅम ह्या नावाने ओळखली जाणारी जी वृंदगीते गायिली जात, त्यांतून अधूनमधून उत्स्फूर्तपणे काही वक्तव्ये केली जाऊ लागली आणि ह्या वक्तव्यांतूनच शोकात्मिका हळूहळू विकसित होत गेली. ॲरिस्टॉटलने पुढे म्हटले आहे, की शोकात्मिकेचे पूर्वरूप विरूपिकेसारखे (सॅटर प्ले) होते, तसेच तीत नृत्याला बराच वाव होता. शोकात्मिकेच्या ह्या रूपाला अनुरूप अशा ट्रोकेइक वृत्तात ती रचिली जाई. पुढे तिला भारदस्त स्वरूप प्राप्त झाल्यानंतर आयँबिक वृत्त वापरण्यात येऊ लागले. तथापि काही अभ्यासकांच्या मते डिथिरॅम, विरूपिका आणि शोकात्मिका ह्या तीन स्वतंत्र रचनाप्रकारांचा विकास स्वतंत्रपणेच झाला आणि ॲटिकामधील खेड्यांतून अगदी प्राथमिक स्वरूपाचे, नाट्यसदृश असे जे कार्यक्रम होत, त्यांतूनच ग्रीक शोकात्मिका उदयाला आली.
ॲटिकामधील ईकारीआ ह्या गावात राहणारा थेस्पिस (इ.स.पू. सहावे शतक) ह्या कवीने पहिली ग्रीक शोकात्मिका सादर केली (इ.स.पू. ५३४), असे आशिया मायनरमधील पेरॉस बेटावर सापडलेल्या एका संगमरवरी शिलालेखावरून दिसते. थेस्पिसच्या शोकात्मिकेत एकच नट होता, असे म्हणतात. ॲरिस्टॉटल मात्र थेस्पिसचा उल्लेख करीत नाही.
शोकात्मिका लिहिणाऱ्या ग्रीक नाटककारांपैकी ⇨एस्किलस (५२५–४५६ इ.स.पू.), ⇨सॉफोक्लीझ (४९६–४o६ इ.स.पू.) आणि ⇨युरिपिडीझ (सु. ४८o–४o६ इ.स.पू.) ह्या तीनच नाटककारांची नाटके आज आपणास उपलब्ध आहेत.
सुप्लिसेस (इ.स.पू.सु. ४९o, इं. शी. सप्लायंट विमेन), प्रोमेथेउस बाउंड (इ.स.पू. ४७९ ?), पेर्से (इ.स.पू. ४७२ इं. शी. द पर्शियन्स), सेप्टेम (इ.स.पू. ४६७, इं. शी. सेव्हन अगेन्स्ट थीब्झ), आणि ओरेस्टेइआ (इ.स.पू. ४५८) हे त्रिनाट्य (ट्रिलॉजी) ही एस्किलसची आज उपलब्ध असलेली सात नाटके. प्रोमेथेउस बाउंड ही नाट्यकृती म्हणजे एका त्रिनाट्याचाच भाग होय. त्यातील अन्य नाटके आज उपलब्ध नाहीत. ओरेस्टेइआमध्ये ॲगमेम्नॉन, केरोफे (इं. शी. लिबेशन बेअरर्स) आणि युमेनिडीझ ह्या नाट्यकृतींचा समावेश होतो.
मॅराथॉनच्या युद्धानंतर सु. ३o वर्षांच्या कालखंडात एस्किलसचे नाट्यलेखन झालेले आहे. अथेन्समधील लोकशाहीचा हा चैतन्यमय काळ होता. संपूर्ण ग्रीक जगताचे नेतृत्व करण्याचा आत्मविश्वास ही लोकशाही बाळगून होती. लोकशाहीशी सुसंगत अशी न्यायमूल्ये निर्माण करण्याची जबाबदारी अथेन्सच्या नागरिकांवर अपरिहार्यपणे येऊन पडली होती. न्याय म्हणजे काय? न्याय आणि बदला ह्यांचे परस्परसंबंध नेमके कसे असले पाहिजेत? धर्म, उत्कट मानवी भावना आणि दैव ह्यांच्याशी न्यायाची कल्पना कशी जुळवून घेता येईल? ह्यांसारखे प्रश्न निर्माण झाले होते. ह्या वस्तुस्थितीचे प्रतिबिंब एस्किलसच्या ओरेस्टेइआ ह्या त्रिनाट्यात परिणामकारकपणे प्रत्ययास येते. ह्या त्रिनाट्यातील ॲगमेम्नॉन ह्या पहिल्या नाटकात ॲगमेम्नॉनचा वध क्लायटम्नेस्ट्रा ह्या त्याच्या व्यभिचारी पत्नीकडून होतो, असे दाखविलेले आहे. ओरेस्टीझ हा ॲगमेम्नॉनचा पुत्र पित्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी आपल्या आईला ठार मारतो, हा कथाभाग केरोफेमध्ये आलेला आहे. युमेनिडीझ ह्या अखेरच्या नाटकात आईच्या वधाबद्दल ओरेस्टीझला ॲरिऑपागसच्या न्यायासनासमोर खेचले जाते. युमेनिडीझ किंवा प्यूरीज ह्या सूडाच्या देवता ओरेस्टीझला शिक्षा मिळावी, असा प्रयत्न करतात. शिक्षा द्यावी की देऊ नये, ह्या प्रश्नावर ज्यूरींची मते समसमान पडतात परंतु अथीना देवतेचे निर्णायक मत ओरेस्टीझला सोडून द्यावे, ह्या बाजूने पडल्यामुळे ओरेस्टीझ मुक्त होतो.
एस्किलस हा सामान्यतः ग्रीक शोकात्मिकेचा जनक म्हणून ओळखला जातो. एस्किलसने ग्रीक शोकात्मिकेला नेटके आणि कलात्मक स्वरूप प्राप्त करून दिले. शोकात्मिकेतील अभिनेत्यांची संख्या त्याने एकावरून दोनावर नेली आणि खऱ्याखुऱ्या अर्थाने संवाद आणि नाट्यपूर्ण घटना रंगभूमीवर आणल्या. नेपथ्य आणि रंगभूषा ह्यांतही त्याने विकास घडवून आणला. गायकवृंदातील गायकांची संख्या त्याने बरीच कमी केली आणि गाण्यापेक्षा संवादांना अधिक महत्त्व दिले.
सॉफोक्लीझच्या सात शोकात्मिका आज उपलब्ध आहेत. त्या अशा : अँटिगॉन (इ.स.पू. ४४१), ईडिपस टिरॅनस, इलेक्ट्रा, अजॅक्स, ट्रेचायनिआइ (निश्चित निर्मितिवर्षे अज्ञात), फिलॉक्टीटीझ (इ.स.पू. ४o९) आणि ईडिपस ॲट कलोनस (इ.स.पू. ४o१).
उपर्युक्त नाट्यकृतींपैकी ईडिपस टिरॅनस ही सॉफोक्लीझची सर्वश्रेष्ठ कृती मानली जाते. केवळ अज्ञानामुळे आपल्या पित्याचा वध करणारा, त्यानंतर स्वतःच्या आईशी विवाहबद्ध होणारा आणि हे भयंकर सत्य समजल्यावर अखेरीस स्वतःचे डोळे फोडून घेणारा दुर्दैवी ईडिपस सॉफोक्लीझने ह्या शोकात्मिकेत प्रभावीपणे दाखविलेला आहे. ईडिपस रेक्स, किंग ईडिपस ह्या नावांनीही ही शोकात्मिका ओळखली जाते. सदानंद रेगे ह्यांनी मराठीत जयकेतु ह्या नावाने तिचे रूपांतर केले आहे (१९५९). दैवापुढे हतबल होणारा माणूस ह्या शोकात्मिकेत परिणामकारकपणे दिसतो. ईडिपस ॲट कलोनसमध्ये ईडिपस टिरॅनसचा पुढील कथाभाग आलेला आहे.
ग्रीक शोकात्मिकेतील अभिनेत्यांची संख्या एस्किलसने एकावरून दोनावर आणली होती. सॉफोक्लीझने तिसरा अभिनेता आणला. वृंदातील लोकांची संख्या बारावरून पंधरावर नेली. सॉफोक्लीझने रंगभूमीवरील नेपथ्याचा बराच विकास घडवून आणलेला दिसतो. ॲरिस्टॉटल तर रंगभूमीवर नेपथ्य आणण्याचे श्रेय सॉफोक्लीझलाच देतो. सॉफोक्लीझपूर्वी ग्रीक रंगभूमीवर त्रिनाट्य लिहिण्याची पद्धत रूढ होती. त्रिनाट्यात एक कथानक तीन नाटकांतून क्रमाक्रमाने मांडावयाचे, ही कल्पना होती. (एस्किलसचे ओरेस्टेइआ हे त्रिनाट्याचेच एक उदाहरण होय). सॉफोक्लीझने ही रूढी सोडून देऊन एका शोकात्मिकेत एक स्वयंपूर्ण कथानक मांडण्याची पद्धती अवलंबिली.
सुशील परभृत ह्यांनी केलेले सॉफोक्लीझच्या अँटिगॉन, ईडिपस टिरॅनस आणि ईडिपस ॲट कलोनस ह्या तीन शोकात्मिकांचे मराठी अनुवाद सोफोक्लिस् ह्या नावाने संगृहीत करण्यात आलेले आहेत (१९६८).
युरिपिडीझ हा सॉफोक्लीझनंतरचा श्रेष्ठ ग्रीक शोकात्मिकाकार. त्याची एकणू १८ नाटके आज उपलबध होतात. ॲल्सेस्टिस (इ.स.पू. ४३८), मीडीअ (इ.स.पू. ४३१), हिपॉलिटस (इ.स.पू. ४२८), ट्रोजन विमेन (इ.स.पू. ४१५), हेलन (इ.स.पू. ४१२), ओरेस्टीझ (इ.स.पू. ४o८), इफिजिनिआ ॲट औलिस (इ.स.पू. ४o५), बॅकी (इ.स.पू. ४o५), अँड्रॉमकी, चिल्ड्रन ऑफ हीरॅक्लीझ, हेक्युबा, सप्लायंट्स, इलेक्ट्रा, मॅडनेस ऑफ हिरॅक्लीझ, इफिजिनिआ इन टोरिस, आयन, द फिनिशियन मेडन्स व सायक्लोप्स (निश्चित निर्मितिवर्षे अज्ञात) ही ती होत. ह्यांपैकी सायक्लोप्स ही एक विरूपिका आहे. ऱ्हीसस नावाची एक शोकात्मिका युरिपिडीझच्या नावावर मोडत असली, तरी ती त्याचीच आहे किंवा काय, ह्याविषयी शंका आहे.
एस्किलस आणि सॉफोक्लीझ ह्या आपल्या पूर्वसूरींपेक्षा भिन्न दृष्टिकोण बाळगून युरिपिडीझने आपल्या शोकात्मिका लिहिल्या. उदा., ग्रीकांच्या पारंपरिक मिथ्यकथा आणि धर्म ह्या दोन्ही संदर्भांत त्याची भूमिका प्रामाणिक संशयवाद्याची आणि प्रश्नकर्त्याची होती. स्वतंत्र विचारांचे त्याला अगत्य होते. आपल्या नाट्यकृतींतून मिथ्यकथांचा त्याने वापर केला परंतु त्यांच्या हाताळणीत सांकेतिकता येऊ दिली नाही.
मीडीअ, हिपॉलिटस ह्यांसारख्या त्याच्या नाट्यकृतींतून मानवी मनातील संघर्ष प्रभावीपणे मांडण्याचे त्याचे सामर्थ्य प्रत्ययास येते. स्त्रियांच्या व्यक्तिरेखनात युरिपिडीझची प्रतिभा विशेष रंगून जाते. मीडीअसारख्या अनेक स्त्रियांची प्रत्ययकारी चित्रे त्याने आपल्या नाट्यकृतींतून रंगविलेली आहेत. आपल्या नाटकांतून त्याने प्रवेशकांचा वापर बराच केला.
सुखात्मिका : ग्रीक सुखात्मिकेचा संबंध प्रजनन आणि सुफलता ह्यांसंबंधीच्या विधींशी लावला जातो. कॉरिंथ आणि स्पार्टा येथे सापडलेल्या काही भांड्यांवर, चित्रविचित्र पोषाख केलेली – कधीकधी पशुरूप घेतलेली – माणसे नृत्य करीत असल्याची चित्रे आढळतात. काही चित्रांत ह्या माणसांच्या हातांत पुरुषलिंगाकृती दाखविलेल्या आहेत. अशी नृत्ये उपर्युक्त विधींच्या निमित्ताने प्रत्यक्षात होत असली पाहिजेत, हे उघड आहे. ह्या नृत्यांनाच हळूहळू अभिनयाचे काहीएक अंग प्राप्त झाले आणि ह्या नृत्यांतूनच काही विनोदी पात्रे उभी केली जाऊ लागली, असे मानायला वाव आहे. इ.स.पू. सहाव्या-पाचव्या शतकांत होऊन गेलेल्या एपिकार्मस ह्या ग्रीक कवीने लिहिलेल्या काही लघुनाट्यांत ग्रीक सुखात्मिकेचे पूर्वरूप शोधता येईल. एपिकार्मस हा सिसिलीतील मेगारा येथील. डोरियन बोलभाषेत लिहिलेल्या त्याच्या प्रहसनवजा नाट्यकृती अत्यंत त्रुटित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यांतून त्याने देव आणि वीरपुरुष यांची थट्टा केली. होप अँड वेल्थ, मेल अँड फीमेल रीझन, पर्शियन्स ही त्याची नाटके पुढे आकाराला आलेल्या ग्रीक सुखात्मिकांतील काही विषय आणि वैशिष्ट्ये ह्यांचे पूर्वसूचन करतात. उदा., होप अँड वेल्थमध्ये ‘पैसा’ हा विषय हाताळलेला आहे. मेल अँड फीमेल रीझनमध्ये वादविवाद आणण्याची त्याची कल्पना असावी, असे वाटते. पर्शियन्स हे एस्किलसचे विडंबन असावे. एपिकार्मसला काही अभ्यासक ग्रीक सुखात्मिकेचा जनक मानतात. सुखात्मिकेच्या विकासात ‘माइम’ रचनेचाही काही भाग असावा. सिराक्यूसचा सोफ्रॉन याने असे काही माइम लिहिले होते. ग्रीक सुखत्मिकेच्या इतिहासाच्या संदर्भात आणखीही एका वस्तुस्थितीचा निर्देश केला पाहिजे. एका दिवशी, एकाच नाटककाराच्या तीन शोकात्मिका सादर केल्यानंतर एक विरूपिका सादर करण्याचा संकेत होता. शोकात्मिकांनी निर्माण केलेले भावनात्मक ताणतणाव नष्ट करून एक हलकेफुलके वातावरण निर्माण करण्याचा त्यात प्रयत्न असे. स्वतः यूरिपिडीझने लिहिलेली सायक्लोप्स ह्या नावाची एक विरूपिका आज उपलब्ध आहे. सॉफोक्लीझने लिहिलेली ट्रॅकर्स ही विरूपिकाही त्रुटित स्वरूपात मिळते. तथापि ह्या विरूपिकांनाही एक प्रकारचा भारदस्तपणा होता, हे नमूद करणे आवश्यक आहे.
उपर्युक्त तपशील ग्रीक सुखात्मिकेच्या पूर्वपीठिकेचा शोध घेण्याच्या दृष्टीने एक दिशा उपलब्ध करून देतात. ज्या प्रभावांतून ग्रीक सुखात्मिकेने तिचे परिपक्व रूप धारण केले, त्यांचे स्वरूप अधिक वैविध्यपूर्ण व संकुल असावे. डायोनायससच्या उत्सवप्रसंगी ग्रीक सुखात्मिकांचे प्रयोग करण्यास अथेन्समध्ये इ.स.पू. ४८६ मध्ये परवानगी देण्यात आली व ग्रीक सुखात्मिकेचा विकास मुख्यतः अथेन्समध्येच घडून आला.
ग्रीक सुखात्मिकेच्या इतिहासात जुनी सुखात्मिका आणि नवसुखात्मिका असे दोन मुख्य टप्पे दाखवून देता येतात. ह्यांखेरीज मध्य सुखात्मिका असाही एक टप्पा दाखवतात. तथापि स्वरूपभेदाच्या दृष्टीने मध्य सुखात्मिका आणि नवसुखात्मिका ह्यांत निश्चित सीमारेषा आखणे अवघड आहे, असे गिल्बर्ट नॉरवूडसारख्या विद्वानांनी दाखवून दिले आहे.
जुन्या ग्रीक सुखात्मिकेच्या संरचनेचे स्वरूप सामान्यतः असे : (१) प्रवेशक. (२) वृंदप्रवेश. (३) दोन व्यक्तींमध्ये कोणत्या तरी विषयावरील वाद आणि हाच सुखात्मिकेचा विषय. (४) वृंदाचे प्रेक्षकांना उद्देशून भाषण. ह्या भाषणातून नाटककार आपली विविध विषयांवरील मते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवीत असे. (५) दोन व्यक्तींमध्ये आधी झालेल्या वादाचा निष्कर्ष विविध प्रसंगांतून दाखविणे. (६) अखेर बहुधा मेजवानीने वा लग्नप्रसंगाने होत असे. उपरोधाला आणि एखाद्या प्रचलित प्रश्नावरील मोकळ्या मतप्रदर्शनाला वाव देईल अशी एखादी कथा सुखात्मिकेसाठी निवडली जाई. सुखात्मिकेतील पात्रे अनेकदा सरळसरळ तत्कालीन सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तींमधूनच घेतली जात असत. क्रटायनस (सु. ५२o–सु. ४२३ इ.स.पू.), ⇨ ॲरिस्टोफेनीस (सु. ४४८–३८o इ.स.पू.) आणि यूपोलिस (सु. ४४६–सु. ४११ इ.स.पू.) हे जुन्या ग्रीक सुखात्मिकेचे काही उल्लेखनीय प्रतिनिधी होत. तथापि ॲरिस्टोफेनीसचा अपवाद वगळता, राहिलेल्या दोन नाटककारांसंबंधी फारशी माहिती उपलब्ध होत नाही. क्रटायनसने २१ सुखात्मिका लिहिल्या आणि त्यांतील बऱ्याचशा सुखात्मिकांत पेरिक्लीझवर टीका होती. वाइन फ्लास्क ह्या त्याच्या एका सुखात्मिकेला, नाट्यलेखनस्पर्धेत, ॲरिस्टोफेनीससारखा स्पर्धक समोर असताना पारितोषिक मिळाले होते. यूपोलिस हा ॲरिस्टोफेनीसचा प्रथम मित्र आणि नंतर प्रतिस्पर्धी. ज्याची काही नाटके पूर्णतः उपलब्ध होतात, असा ॲरिस्टोफेनीस ह एकच ग्रीक सुखात्मिकाकार आहे.
द नाइट्स (इ.स.पू. ४२४), द क्लाउड्स (इ.स.पू. ४२३), द वॉस्प्स (इ.स.पू. ४२२), द पीस (इ.स.पू. ४२१), द बर्ड्स (इ.स.पू. ४१४), लिसिस्ट्राटा (इ.स.पू. ४११), थेस्मोफोरियात्सुझे (इ.स.पू. ४११), फ्रॉग्ज (इ.स.पू. ४o५), एक्लेत्सियात्सुझे (इ.स.पू. ३९२) व प्लूटूस (इ.स.पू. ३८८) ह्या ॲरिस्टोफेनीसच्या काही सुखात्मिका.
पेलोपनीशियन युद्धाच्या कालखंडातच (४३१–४o४ इ.स.पू.) ॲरिस्टोफेनीसचे बरेचशे नाट्यलेखन झाले. युद्धाची अनर्थकारकता प्रत्यक्ष पाहिल्यामुळेच बहुधा तो युद्धाचा कट्टर विरोधक झाला असावा. द पीस आणि लिसिस्ट्राटा ह्या नाटकांतून त्याने आपली युद्धविरोधी भूमिका परिणामकारकपणे मांडली आहे. क्लीऑनसारख्या लोकनेत्यांवरही त्याने टीका केली आहे (द नाइट्स). थेस्मोफोरियात्सुझे आणि फ्रॉग्जमधून त्याने युरिपिडीझचा उपहास केला. द क्लाउड्समध्ये सॉफिस्ट आणि सॉक्रेटीस ह्यांच्यावर टीका आहे. स्त्री-पुरुषांची समानता, सामायिक मालमत्ता ह्यांसारख्या तत्त्वांवर आधारलेल्या आदर्श राज्यकल्पनांची त्याने एक्लेत्सियात्सुझेमध्ये थट्टा केली. वॉस्प्समध्ये न्यायालयातील ज्यूरी-पद्धतीवर टीका आहे. द बर्ड्स ही ॲरिस्टोफेनीसची एक कल्पनारम्य सुखात्मिका. संपत्तीच्या समान विभागणीची कल्पना प्रत्यक्षात आणल्यास त्याचे काय परिणाम होतील, हे प्लूटूसमध्ये दाखविले आहे.
ॲरिस्टोफेनीसच्या सुखात्मिका म्हणजे अथेन्समधील तत्कालीन जीवनावरील त्याची भाष्येच होत. त्या जीवनात त्याला जाणवलेले दोष व विसंगती ह्यांविरुद्ध त्याने आपल्या उपरोधाचे शस्त्र उपसले. ॲरिस्टोफेनीसच्या सुखात्मिका रचनेच्या दृष्टीने काहीशा विस्कळितच आहेत. त्याचा विनोद अनेकदा असभ्यतेच्या पातळीवर उतरतो. तथापि जुन्या ग्रीक सुखात्मिकेच्या सर्व वैशिष्ट्यांचे परिपक्व रूप आपणास ॲरिस्टोफेनीसच्या नाटकांतूनच प्रत्ययास येते.
ॲरिस्टोफेनीसनंतर ग्रीक सुखात्मिकेचे एक पर्व संपले. त्याच्या निधनोत्तर काही वर्षांच्या कालावधीतच ग्रीक नवसुखात्मिका अवतरली (इ.स.पू.सु. ३३६). खुद्द ॲरिस्टोफेनीसच्या एक्लेत्सियात्सुझे आणि प्लूटूस ह्या सुखात्मिका जुन्या आणि नव्या ग्रीक सुखात्मिकेमधील संक्रमणकाळातल्या. त्यांत जुन्या धर्तीचा वृंद आढळत नाही. इ.स.पू. ४o४ मध्ये अथेन्सचा स्पार्टाकडून पराभव झाला आणि इ.स.पू. ३३८ मध्ये संपूर्ण ग्रीस मॅसिडोनियाच्या अधिपत्याखाली आला. ह्या घटना ग्रीक नवसुखात्मिकेच्या संदर्भात महत्त्वाच्या आहेत. ग्रीक सुखात्मिका मुख्यतः अथेन्समध्ये विकसित झाली होती. तेथील स्वतंत्र वातावरणात क्लीऑनसारख्या लोकनेत्यांवरही ॲरिस्टोफेनीससारखा नाटककार टीका करू शकत होता. पारतंत्र्यात ही धिटाई दाखवणे शक्य नव्हते त्यामुळे सुखात्मिकांतून अशा प्रकारची टीका नाहीशी झाली. कल्पनानिर्मित व्यक्तिरेखांच्या द्वारे तत्कालीन जीवनाचे चित्रण सुखात्मिकांतून होऊ लागले. तथापि राजकीय विषयांपेक्षा लोकांच्या विविध वर्तनतऱ्हा हे उपरोधाचे लक्ष्य बनले. त्या दृष्टीने नवी ग्रीक सुधात्मिका आचारविनोदिनीला (कॉमेडी ऑफ मॅनर्स) जवळची आहे. नवसुखात्मिकांचे अन्य काही विशेष असे : नाटकात वृंदाला महत्त्वाचे स्थान राहिले नाही. अधूनमधून गीते गाणे आणि नृत्य करणे, एवढेच वृंदाचे कार्य उरले. जुन्या सुखात्मिकेतला विनोद पुष्कळदा असभ्य, रांगडा असे. नव्या सुखात्मिकेतील विनोदात हे फारसे आढळत नाही. संविधानक आणि व्यक्तिरेखन ह्यांकडे नवसुखात्मिकेत विशेष लक्ष पुरवलेले आढळते. सर्वसाधारणांच्या जीवनातून तिची संविधानके घेतलेली असत. प्रेमी युगलांची साहसे हा नव्या ग्रीक सुखात्मिकेचा एक नेहमीचा विषय.
फिलीमन (सु. ३६१–२६३ इ.स.पू.) आणि ⇨मिनँडर (सु. ३४२–२९२ इ.स.पू.) ही नावे नव्या सुखात्मिकेच्या संदर्भात पुढे येतात. फिलीमन हा मिनँडरचा प्रतिस्पर्धी होता आणि नाट्यलेखनस्पर्धेत त्याने मिनँडरला काही वेळा पराभूतही केले होते. मिनँडरने सु. शंभर सुखात्मिका लिहिल्या होत्या, असे म्हटले जाते. त्यांपैकी चार ईजिप्तमधील एका पपायरसावर त्रुटित स्वरूपात उपलब्ध झाल्या (१९o५). Epitrepontes (इं. शी. आर्बिट्रेशन) Samia (इं. शी द गर्ल फ्रॉम सेमॉस), Perikeiromene (इं. शी. द शॉर्न गर्ल) आणि Heros ही त्यांची नावे. प्रेमसंबंधांतील गुंतागुंत, एखाद्या मुलीला फशी पाडून तिच्या संबंधात झालेल्या मुलाचा त्याग करणे, पुढे त्या मुलाची ओळख पटणे आणि त्याच्या आईवडिलांचे पुनर्मीलन होणे, अशा प्रकारच्या कथा मिनँडरच्या नाट्यकृतींतून येतात. १९५८ मध्ये सापडलेल्या एका ईजिप्शियन पपायरसावर त्याची द मिसँथ्रोप ही सुखात्मिका पूर्ण स्वरूपात उपलब्ध झाली आहे. ⇨प्लॉटस व ⇨टेरेन्स ह्या रोमन नाटककारांच्या नाट्यकृतींतून मिनँडरचा प्रभाव जाणवतो. ह्या दोघांनीही मिनँडरच्या काही नाटकांची रूपांतरे केली आहेत.
कुलकर्णी, अ. र.
इ.स.पू. सातव्या शतकाच्या अखेरीस ग्रीक गद्याच्या विकासाला चालना मिळालेली दिसते. साक्षरतेच्या वाढत्या प्रसारामुळे स्मरणसौकर्यासाठी पद्याचा आधार घेण्यापेक्षा, कोणताही आशय लेखनबद्ध करून ठेवणे आता अधिक सोयीचे ठरले. वैचारिक किंवा ज्ञानपर लेखन, काटेकोर शब्दयोजनेची विशेष आवश्यकता असलेले विधिविषयक लेखन आणि विधिसंहिता आदींसाठी पद्याऐवजी गद्याचा वापर होणे स्वाभाविकच होते. साइरॉसचा फेरेसायडीझ (इ.स.पू.सु. ५५o) आणि मायलीटसचा हेकाटीअस (इ.स.पू.सु. ५oo) हे दोन अगदी प्राचीन ग्रीक गद्यलेखकांपैकी होत. फेरेसायडीझचा Theologia हा ग्रीकमधील पहिला गद्यग्रंथ म्हणून ओळखला जातो. विश्वोत्पत्ती आणि देवतोत्पत्ती हे विषय त्यात हाताळण्यात आले होते. आयोनियनांनी पर्शियनांविरुद्ध केलेल्या बंडात आयोनियनांचा सल्लागार म्हणून हेकाटीअसने मोलाची कामगिरी बजावली होती. त्याच्या Genealogia मध्ये ग्रीकांच्या मिथ्यकथांतील कुलांची माहिती देण्याचा प्रयत्न दिसतो. हा ग्रंथ त्रुटित स्वरूपात उपलब्ध आहे. Periodos Ges किंवा Periegesis (इं. शी. सर्किट ऑफ द अर्थ) ह्या त्याच्या ग्रंथात त्याने विविध प्रदेशांतील रहिवासी, त्यांच्या चालीरीती, तेथील प्राणिजीवन इत्यादींची माहिती दिलेली आहे. हा ग्रंथ अंशतः त्याने स्वतः केलेल्या जलपर्यटनांवर आधारित आहे आणि त्याच्यासोबत एक नकाशाही जोडण्यात आला होता. ⇨इसापच्या नावावर मोडणाऱ्या नीतिकथाही गद्यातच आहेत. हीरॉडोटसच्या मतानुसार इसाप हा इ.स.पू. सहाव्या शतकाच्या मध्यास होऊन गेला असावा. सॉक्रेटीसने तुरुंगात असताना इसापच्या काही नीतिकथांना पद्यरूप दिल्याचे सांगतात.
इतिहासलेखन : प्राचीन ग्रीक साहित्यात इतिहासलेखन हा देखील महत्त्वाचा भाग ठरतो. दंतकथांची जमवाजमव व कुटुंबांच्या वंशावळ्या यांतून इतिहासाचे धागे दिसत असले, तरी आधुनिक अर्थाने इतिहासलेखनाचे जनकत्व ⇨हिरॉडोटसकडे (सु. ४८४–सु. ४२४ इ.स.पू.) जाते. त्याचा Historie म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोणातून केलेले एक शोधन आहे ग्रीस आणि आशिया ह्यांतील संघर्ष हा त्याचा विषय आहे. इतिहास म्हणजे घटनांची शृंखला आणि त्याची मांडणी चिकित्सकपणे व्हावयास पाहिजे याची जाणीव त्याला होती. मात्र त्याच्या चिकित्सेला त्याच्या काळातील परिस्थितीच्या मर्यादा आहेतच. ⇨थ्यूसिडिडीझ (सु. ४६o–सु. ४oo इ.स.पू.) हा हिरॉडोटसनंतरचा महत्त्वाचा ग्रीक इतिहासकार. पेलोपनीशियन युद्धाचा इतिहास त्याने आठ खंडांत लिहिला आहे. जगातील श्रेष्ठ इतिहासग्रंथांत त्याची गणना होते. शास्त्रशुद्ध दृष्टी, इतिहासातील विविध घटनांमधील कार्यकारणाचे भान आणि वेधक शैली हे गुण ह्या ग्रंथातून प्रत्ययास येतात. मात्र त्यातील काही भाग दुर्बोध वाटतात. युद्धात प्रथम मारल्या गेलेल्या अथेनियनांना पेरिक्लीझने वाहिलेली श्रद्धांजली आणि अथेन्समधील प्लेगचे वर्णन हे ह्या ग्रंथातील काही उत्कृष्ट भाग. ⇨झेनोफनने (सु. ४३o–सु. ३५५ इ.स.पू.) थ्यूसिडिडीझकडून पूर्ण होऊ न शकलेल्या भागापासून –इ.स.पू. ४११ पासून – इ.स.पू. ३६२ पर्यंतचा ग्रीसचा इतिहास लिहिला आहे. Hellenica हे त्याचे नाव. स्पार्टन लष्करी सत्तेचा तो चाहता आहे. त्यामुळे त्याचा निःपक्षपातीपणा काही प्रमाणात ढळला आहेच. थ्यूसिडिडीझच्या शैलीचे जाणीवपूर्वक अनुकरण करण्याचा प्रयत्न ह्या ग्रंथात दिसतो परंतु त्यात थ्यूसिडिडीझची मर्मदृष्टी मात्र नाही, त्यामुळे ह्या ग्रंथात फारशी सखोलता आढळत नाही परंतु त्याचा ⇨आनाबासिस हा ग्रंथ मात्र मनोरंजक आहे. दुसऱ्या डरायसच्या मृत्यूनंतर सायरस वा किरॉस द यंगर ह्या त्याच्या मुलाने आपल्या भावाला पदच्युत करण्यासाठी जी मोहीम आरंभली तिचा इतिहास ह्या ग्रंथात आहे. ह्या मोहिमेसाठी त्याने दहा हजार ग्रीकांची भाडोत्री फौज उभी केली. ह्या फौजेबरोबर झेनोफनही गेला होता. ह्या युद्धात सायरस द यंगर मारला गेला आणि काही ग्रीक सेनाधिकाऱ्यांना कपटाने मारण्यात आले. झेनोफनने ग्रीक फौज यशस्वीपणे माघारी आणण्यात पुढाकार घेतला. जिवंत निवेदनशैली हे ह्या ग्रंथाचे एक लक्षणीय वैशिष्ट्य. ह्या दोन ग्रंथांखेरीज त्याने शिकार, स्पार्टाची राज्यघटना ह्यांसारख्या, विषयांवरही ग्रंथरचना केली आहे. त्याच्या सायरोपीडिआमध्ये पर्शियन साम्राज्याचा संस्थापक सायरस द ग्रेट ह्याचे जीवनचरित्र सांगण्याच्या निमित्ताने आदर्श सत्ताधीश आणि सरकार यांची चर्चा आहे. त्यात उद्बोधनाचा हेतू प्रमुख असून सत्याला दुय्यम स्थान दिलेले आहे. झेनोफनला सॉक्रेटीसविषयी खूपच आदर दिसतो. त्याचे समर्थन करणारे लिखाणही त्याने केले आहे. (मेमराबिलिआ, अपॉलजी आणि सिपॉझिअम ह्या ग्रंथांतून).
तत्त्वज्ञान : पहा ग्रीक तत्त्वज्ञान.
वक्तृत्वकला : ग्रीकांना वक्तृत्वकलेची विशेष आवड होती. होमरच्या महाकाव्यांतूनही उत्कृष्ट भाषणे आलेली आहेत. प्राचीन साहित्याचा अभ्यास उपलब्ध ग्रीक व्याख्यानांच्या अभ्यासाखेरीज होत नाही, असे मानले जाते. या कलेचा विकास सॉफिस्टांच्या चळवळीशीही निगडित आहे. कोरॅक्स, टिसियास आणि जॉर्जिअस हे तीन सिसिलीयन आरंभीचे वक्तृत्वकलाशिक्षक. शब्दांची कसरत, चमत्कृतिपूर्ण विरोधाभास, अनुप्रासप्रचुर शब्दरचना हे जॉर्जिअसच्या वक्तृत्वाचे विशेष असत पण त्याचे एकच लिखित व्याख्यान त्रुटित स्वरूपात उपलब्ध आहे.
अथेन्समध्ये कायदा आणि न्यायालय यांच्या आधारानेही वक्तृत्वकला विकसित झाली. न्यायालयीन भाषणाचे प्रास्ताविक, निवेदन, आधार किंवा पुरावा आणि उपसंहार असे चार भाग असत. राजकीय व्याख्यानात ह्या चार भागांखेरीज प्रतिपक्षाची निंदाकुचेष्टाही असे. सर्व भागांची संतुलित रचना हा वक्त्याच्या कौशल्याचा भाग असे. प्रसंगानुसार वक्तृत्वशैली बदलती असे. उपलब्ध अथेनियन भाषणे मोठ्या काळजीपूर्वक लिहिली आहेत. अँटिफोन (सु. ४८o–सु. ४११ इ.स.पू.) ह्या लोकशाही विरोधकाची भाषणे फार महत्त्वाची आहेत. मनुष्यवधाच्या संदर्भांत त्याने दिलेली तीन व्याख्याने आज उपलब्ध आहेत. मनुष्यवधाचे खटले लढविण्यात तो निष्णात होता. ॲनडॉसिडीझच्या (सु. ४४o–सु. ३९o इ.स.पू.) भाषणांत भरपूर माहिती साध्या परंतु मनोवेधक शैलीत दिलेली दिसते. त्याच्या समकालीन लिसिअस. त्याची भाषणे शुद्ध ॲटिक भाषेतील असून एखादी कैफियत कशी मांडावी, याचा नमुना होत. तो फक्त भाषणे लिहून देई करत नसे. इ.स.पू. ४o४ मध्ये अथेन्सवर स्पार्टाने लादलेल्या तीस सत्ताधीशांपैकी एराटॉस्थीनीझनामक एका सत्ताधीशाच्या विरुद्ध त्याने लिहिलेल्या भाषणात जुलुमी शासनाचे परिणामकारक चित्र आढळते. आय्सीअस् (सु. ४२o–सु. ३५o इ.स.पू.) ह्याच्या भाषणांतून कायद्याची सखोल चिकित्सा आढळते. ⇨आयसॉक्राटीझच्या (४३६–३३८ इ.स.पू.) भाषणांत उदात्त विचारांची पखरण दिसते. वक्तृत्वशास्त्राला प्राचीन ग्रीसव्या शिक्षणपद्धतीत विशेष महत्त्वाचे स्थान प्राप्त करून देण्यात त्याचा वाटा आहे. वक्ता म्हणून तो अयशस्वी ठरला परंतु त्याने वक्तृत्वशास्त्राचा एक यशस्वी अध्यापक म्हणून मात्र लौकिक मिळविला. समकालीनांवर त्याचा अतिशय प्रभाव होता. अगेन्स्ट द सॉफिस्ट्स व ऑन द अँटिडोसिस ही त्याने लिहिलेली उल्लेखनीय व्याख्याने. सॉफिस्टांनी त्यांच्या शिक्षणपद्धतीबद्दल केलेल्या दाव्यांचा फोलपणा पहिल्या व्याख्यानात दाखवून दिला असून दुसऱ्यात स्वतःच्या शिक्षणपद्धतीचे समर्थन आहे. लायकरगस (सु. ३८९–सु. ३२४ इ.स.पू.) आणि हायपरायडीझ (सु. ३८९–३२२ इ.स.पू.) यांनी आपल्या भाषणांतून मॅसिडोनियन सत्तेला विरोध केला. ⇨डिमॉस्थिनीझ (सु. ३८४–सु. ३२२ इ.स.पू.) आणि एस्किनीझ (सु. ३९o–सु. ३१४ इ.स.पू.) हे श्रेष्ठ ग्रीक वक्ते परस्परांचे प्रतिस्पर्धी होते. तथापि एस्किनीझच्या भाषणांतून तो आपल्या प्रतिस्पर्ध्यांइतका श्रेष्ठ नव्हता, हे स्पष्ट होते. मात्र डिमॉस्थिनीझपेक्षा त्याची भाषणशैली अधिक जिवंत होती. वक्तृत्वशास्त्राचे खास शिक्षण त्याने घेतलेले नव्हते. तथापि ग्रीक रंगभूमीवर नट म्हणून तो वावरलेला असल्यामुळे भाषणे प्रभावी करण्याचे तंत्र त्याला अवगत होते. त्याचा उपरोध बोचरा असे. डिमॉस्थिनीझची व्याख्याने तपश्चर्येतून जन्माला येत. न्यायालयातील खासगी तंट्यांबाबत, सार्वजनिक समस्यांबाबत व असेंब्लीतील राजकीय भाषणे, असे त्याच्या भाषणांचे वर्ग पडतात. त्याची शैली साधी पण परिणामकारक रूपके आणि समर्पक उदाहरणे ह्यांनी संपन्न होती. मॅसिडोनियन सत्तेविरुद्धही त्याने अथेन्समध्ये जागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्याची देशभक्ती आणि तळमळ त्याच्या भाषणांतून दिसून येते. अगेन्स्ट ॲनड्रोशिऑन, अगेन्स्ट टिमोक्राटीझ, अगेन्स्ट ॲरिस्टोक्राटीझ ही त्याची काही उत्कृष्ट भाषणे. डिमॉस्थिनीझचा त्याच्या काळात खूपच प्रभाव पडला. रोमन कालखंडात तर त्याची व्याख्याने अभ्यासक्रमाचा अटळ भागच ठरली.
प्राचीन कालखंड -२ (इ.स.पू. ३२३ ते इ.स.चे चौथे शतक) : अलेक्झांडरच्या उदयानंतर त्याने केलेल्या विजयी स्वाऱ्यांमुळे ग्रीक संस्कृतीचे प्रभावक्षेत्र व्यापक झाले. आशियात ग्रीक धर्तीची शहरे वसविण्यात आली. ग्रीस आणि आशिया मायनर येथील शहरांचे महत्त्व मात्र कमी झाले. एक स्वतंत्र आणि वर्जक घटक ग्रीक नगरराज्याची कल्पना मागे पडून समान संस्कृतीच्या छायेखालील प्रदेशांत वास्तव्य करणाऱ्यांमधील निकट नात्याचा विचार प्रभावी झाला. आत कवींचा रसिकवर्ग संपूर्ण ग्रीक जगतातील अभिजनांतून निर्माण होऊ लागला आणि त्यांच्या वाङ्मयीन अभिरुचीशी सुसंगत असे काव्यनिकष निर्माण झाले. तंत्रकौशल्याच्या तीव्र जाणिवेतून घडविलेली आणि पांडित्यपूर्ण संदर्भांनी सजविलेली कविता ह्या अभिजनांनी पुरस्कारिली. ईजिप्तमध्ये अलेक्झांडरने उभारलेल्या ॲलेक्झांड्रिया ह्या शहराला एक विद्याकेंद्र म्हणून फार मोठे महत्त्व प्राप्त झाले. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर झालेल्या यादवी युद्धांत त्याच्या साम्राज्याचे जे विभाजन झाले, त्यात अलेक्झांडरचा सेनापती पहिला टॉलेमी ह्याच्या हाती ईजिप्तची सत्ता आली. विद्येचा तो चाहता आणि आश्रयदाता होता. ॲलेक्झांड्रिया येथे त्याने ‘म्यूझिअम’ ही एक वाङ्मयीन अकादमी स्थापन केली तसेच एक भव्य ग्रंथालयही उभे केले. त्यामुळे विद्वानांना विद्याव्यासंगाचे एक मोठे केंद्र उपलब्ध झाले. इ.स.पू. पहिल्या शतकात टॉलेमींची सत्ता रोमनांकडून संपुष्टात आली. येथवरचा कालखंड ‘हेलेनिस्टिक’ (ग्रीकांश) व कधीकधी ‘ॲलेक्झांड्रियन’ ह्या संज्ञेने निर्दिष्ट केला जातो. त्यानंतरचा काळ ग्रीक रोमन संस्कृतींच्या संमिश्र प्रभावाचा.
काव्य : इ.स.पू. तिसऱ्या शतकात ॲलेक्झांड्रिया येथे ⇨थिऑक्रिटस (सु. ३१६–सु. २६o इ.स.पू.), ⇨कॅलिमाकस (सु. ३१५– २४o इ.स.पू.) आणि ⇨ ॲपॉलोनियस रोडियस (सु. २९५–सु. २१५ इ.स.पू.) हे तीन कवी उदयास आले.
थिऑक्रिटस हा गोपगीतांचा (पास्टोरल पोएम्स) जनक समजला जातो. आपल्या गोपगीतांतून सिसिलीतील प्राचीन गोपजीवनाची चित्रे त्याने रेखाटली आहेत. डोरिक बोलभाषेतील त्याची काव्यरचना जिवंत आणि रसरशीत आहे. सिराक्यूसच्या सोफ्रॉनने जे माइम लिहिले त्यांत त्याने तत्कालीन दैनंदिन जीवनाची चित्रे रंगविली होती. थिऑक्रिटसवर त्याचा प्रभाव पडलेला आहे. कॅलिमाकस हो केवळ कवी नसून विद्वानही होता. महाकाव्यासारखी दीर्घकाव्य लिहिण्याचा काळ संपुष्टात आला असून काटेकोर तंत्रशुद्धता सांभाळून लिहिलेल्या प्रगल्भ लघुकाव्यांची निर्मिती ही आपल्या काळाची वाङ्मयीन गरज आहे, अशी त्याची धारणा होती. त्याने स्वतः स्तोत्रे, लघुकाव्ये, Hecale सारखे लघुमहाकाव्य अशाच रचना केल्या आहेत. Aetia (इं. शी. कॉझेस) हा त्याचा सर्वांत महत्त्वाचा ग्रंथ चार खंडांचा असला, तरी त्यात धार्मिक परंपरा आणि विधी ह्यांच्याशी संबंद्ध असलेल्या आख्यायिकांवरील लघुकाव्येच संगृहीत केलेली आहेत. कॅलिमाकसचा शिष्य ॲपोलोनियस रोडियस ह्याने आर्गोनाउटिका हे महाकाव्य लिहिले. महाकाव्यासंबंधीच्या कॅलिमाकसच्या विशिष्ट भूमिकेमुळे गुरुशिष्यांत वाद घडून आल्याचे दिसते. आर्गोनाउटिका यासॉन आणि मीडीअ ह्यांच्या प्रेमकथेवर आधारलेले आहे.
विद्वत्ताप्रचुर काव्य लिहिणाऱ्या प्रवृत्तीतून ज्ञानपर काव्ये निर्माण झाली. ⇨आरेटसचे (सु. ३१५–सु. २४५ इ.स.पू.) फैनोमेना हे काव्य त्या दृष्टीने उल्लेखनीय ठरते. त्यात त्याने ताऱ्यांची आणि नक्षत्रांची माहिती दिली आहे.
मॉस्कस (इ.स.पू.सु. १५o) ह्या सिराक्यूसच्या कवीने थिऑक्रिटसचे अनुकरण करून काही गोपगीते लिहिली आहेत. ॲस्किलपायडीझ (इ.स.पू.सु. २९o) आणि टॅरँटोचा लिऑनिडस (इ.स.पू. तिसरे शतक) ह्यांनी लघुकाव्ये लिहिली. मेलिएजर (इ.स.पू.सु. ६o) ह्या सिरिअन कवीने Stephanos (इं. शी. द गार्लँड) हे ग्रीक लघुकाव्यांचे एक संकलन तयार केले. त्यात एरिना ह्या ग्रीक कवयित्रीच्या तीन कविता अंतर्भूत आहेत. मेलिएजर हा स्वतः एक कवी होता. उपर्युक्त संकलनात त्याच्या स्वतःचाही अने लघुकाव्यांचा समावेश आहे.
इ.स.च्या सु. चौथ्या शतकात होऊन गेलेल्या स्मर्नाच्या क्विंटसने इलिअड आणि ओडिसी ह्या दोन महाकाव्यांमधील कथाभाग भरून काढण्याच्या दृष्टीने १४ खंडांचे एक महाकाव्य – Posthomerica – लिहिले. हा प्रयत्न फारसा यशस्वी झालेला दिसत नाही. नॉनस (सु. ४oo) ह्याच्या Dionysiaca ह्या ४८ खंडाच्या महाकाव्यात डायोनायसस ह्या ग्रीक देवाची अनेक साहसे रंगविली आहेत. अनेक ग्रीक मिथ्यकथा त्यात आल्या आहे.
चौथ्या किंवा पाचव्या शतकात होऊन गेलेल्या म्यूझीअसने हीरो आणि लीअँडर ह्यांच्या प्रेमकथेवर लिहिलेले एक लघुमहाकाव्य उपलब्ध आहे. छंदांचा वापर व भाषा ह्या दोन संदर्भात म्यूझीअसने नॉनसचे अनुकरण केलेले दिसते.
गद्य : इतिहास, साहित्यविचार, चरित्रे, रोमान्स, उपरोधपर इ. विविध प्रकारचे गद्यलेखन ह्या कालखंडात झाले.
पोलिबिअस (सु. १९८–सु. ११७ इ.स.पू.) हा ह्या कालखंडातील महत्त्वाचा इतिहासकार. ४o खंडात लिहिलेल्या त्याच्या इतिहासग्रंथाचा विषय रोमन सत्तेचा उदय आणि विकास हा आहे. पहिल्या प्यूनिक युद्धापासून (इ.स.पू. २६४) कार्थेज शहराच्या विध्वंसापर्यंतचा (इ.स.पू. १४६) इतिहास ह्या ग्रंथात आहे. ऐतिहासिक सत्यान्वेषणाची तळमळ त्यातून दिसते. अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांचा काळजीपूर्वक अभ्यास त्याने केला होता. भूमध्य सामुद्रिक जगतात रोमने जे स्थान मिळविले होते, त्याची स्पष्ट आणि वास्तववादी जाणीव त्याला होती. घटनांमधील कार्यकारणभाव तो कसोशीने तपासतो. स्वतः ग्रीक असून ग्रीसच्या ऱ्हासाची कारणे तो प्रांजळपणे उघड करतो. पोलिबिअसची शैली साधी, अनलंकृत आहे. ह्या ग्रंथाचे पहिले ५ खंडच पूर्णतः उपलब्ध आहेत उरलेल्या खंडांतील फक्त उद्धृते–अवतरणे मिळतात. ⇨आरिआनॉसच्या (सु. ९५ – सु. १७५) आनाबासिस ह्या सप्तखंडात्मक इतिहासग्रंथातून अलेक्झांडरच्या मोहीमांचा इतिहास सांगितलेला आहे. ह्या ग्रंथाला परिशिष्टवजा असा आठवा खंडही जोडलेला असून त्यात भारताचे वर्णन आहे. अलेक्झांडरच्या जीवनाविषयीचे महत्त्वाचे तपशील ह्या ग्रंथातून उपलब्ध होतात.
साहित्यविचाराच्या संदर्भात ऑन स्टाइल आणि ऑन द सब्लाइम हे दोन ग्रंथ उल्लेखनीय आहेत. डीमीट्रिअस फालीअरिअस ह्या अथेनिअन मुत्सद्द्यानेऑन स्टाइलची रचना केली असावी, असे मानले जात असे तथापि आज ते मत ग्राह्य मानले जात नाही. प्लूटार्कचा मित्र म्हणून प्रसिद्ध असलेला टार्टूसचा डीमीट्रिअस त्याचा कर्ता असावा, असा तर्क आज केला जातो. आलंकारिक गद्यशैली हा ह्या ग्रंथाचा विषय असून तो ‘पेरिपटेटिक’ किंवा पारिक्रमिकी परंपरेतला वाटतो. ऑन द सब्लाइम हा ग्रंथ म्हणजे आधुनिक आस्वादक समीक्षेचा आरंभ होय, असे काही अभ्यासक मानतात. ह्याचा कर्ता ‘लाँजायनस’ म्हणून सांगितला जातो. तथापि विख्यात ग्रीक तत्त्वज्ञ कॅशिअस लाँजायनस हाच तो आहे किंवा काय, हा प्रश्न विवाद्य आहे. वाङ्मयीन प्रगल्भता किंवा महात्मता कोणत्या लेखनगुणांवर अवलंबून असते, हे ह्या ग्रंथात सांगितले आहे भव्य कल्पना, उत्कट भावना, कलात्मक रचना आणि उदात्त अभिव्यक्ती हे ते होत. अनेक उद्धृते आणि अवतरणे त्यात उदाहरणार्थ दिली आहेत. सॅफोने लिहिलेले एक दुर्मीळ ओड त्यात आहे. प्रगल्भता म्हणजे उदात्त मनाचा प्रतिध्वनी होय, असा विचार त्यात आला आहे, उपर्युक्त दोन्ही ग्रंथ इ. स.च्या पहिल्या शतकातील असावेत, असे दिसते.
हेलेनिस्टिक कालखंडातील थोर लेखक ⇨प्लूटार्क (सु. ४६–सु. १२o) हा होय. त्याचे विपुल लिखाण मॉरल्स आणि पॅरलल लाइव्ह्ज अशा दोन भागांत विभागले आहे. त्याचे वाचन बरेच विस्तृत दिसते. नीतिशास्त्रात प्लूटार्कला रस होता. मॉरल्स किंवा मोरालियामधील विषयवैविध्य लक्षणीय आहे. विवाहितांना उपदेश, स्तुतिपाठक आणि मित्र ह्यांतील फरक, क्रोधावर ताबा कसा मिळवावा इ. विषयांवरील लेखनाबरोबरच लोकभ्रम, ईश्वरी न्यायातील विलंब, डेल्फाय येथील अपोलो मंदिरावर कोरलेल्या एका विशिष्ट अक्षराचा अर्थ ह्यांसारखे विषयही त्याने हाताळले आहेत. ‘टेबलाभोवतीची संभाषणे’ ह्या सदराखाली त्याने काही लेखन केलेले आहे. विविध विषयांवर प्रज्ञावंतांनी केलेली ही संभाषणे.
पॅरलल लाइव्ह्ज ह्या भागात एकूमण ५o व्यक्तींची चरित्र आलेली आहेत. त्यांतील ४६ चरित्रांचे लेखन ज्यांच्या जीवनात काही साम्यस्थळे आढळतात अशा ग्रीक -रोमन व्यक्तींची एक एक जोडी घेऊन (२३ ग्रीक आणि २३ रोमन) त्याने केले आहे. संबंधित व्यक्तींच्या नैतिक चारित्र्यावर प्रकाश टाकण्याकडे प्लूटार्कचा विशेष भर आहे. प्राचीन ग्रीक गद्यलेखकांतील तो सर्वांत अधिक लोकप्रिय लेखक. नेपोलियन, फ्रीड्रिख द ग्रेट, रूसो, शिलर, माँतेन यांसारख्यांवर त्याच्या लेखनाचा परिणाम झालेला दिसून येतो. इ.स.च्या दुसऱ्या शतकातील सम्राट मार्कस ऑरीलियसची (१२१–१८o) चिंतने आणि ⇨ल्यूशनचे (सु. १२o–सु. २oo) ग्रंथ हे महत्त्वाचे लेखन आहे. आपल्या चिंतनांतून ईश्वर, निसर्ग आणि मानव यांची एकात्मता सांगताना ऑरीलियस आपली स्टोइक विचारसरणी मांडतो. ल्यूशन हा एक प्रभावी उपरोधकार. तत्कालीन इतिहासलेखनातील दोष, प्रवासलेखनातील अतिरंजितता तसेच ज्योतिषी, वैदू इत्यादींवर त्याने आपल्या उपरोधाचे शस्त्र चालविले. ग्रीक देवताविश्वाची त्याने थट्टा केली. तात्त्विक विचार आणि प्रत्यक्ष आचार ह्यांतील विसंगतींवर बोट ठेवले. ल्यूशनने आपल्या अनेक उपरोधिकांसाठी प्लेटोचे संवादतंत्र वापरले.
द वे टू राइट हिस्टरी, द ट्रू हिस्टरी, डायलॉग्ज ऑफ द गॉड्स, डायलॉग्ज ऑफ द सी गॉड्स, द सेल ऑफ लाइव्ह्ज – ऑक्शन ऑफ फिलॉसॉफर्स हे त्याचे दुसरे नाव – इ. त्याचे ग्रंथ ह्या दृष्टीने वाचण्यासारखे आहेत.
इ.स.च्या दुसऱ्या-तिसऱ्या शतकांच्या कालावधीत एका कुटुंबातील फिलॉस्ट्राटसनामक एकूण चार व्यक्तींनी काही लेखन केल्याचे दिसते. ह्या लेखनापैकी कोणते कोणाचे हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे. तथापि विशेष प्रसिद्ध असलेले टाइनच्या ॲपोलोनियसचे चरित्र दुसरा फिलॉस्ट्राटस (सु. १७o–सु. २५o) ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या फिलॉस्ट्राटसने लिहिले, असे काही अभ्यासक मानतात. उपर्युक्त ॲपोलोनियस हा पायथॅगोरसचा अनुयायी. अनेक चमत्कार घडवून आणण्याची शक्ती त्याच्या ठायी होती, अशी समजूत. ह्या ॲपोलोनियसच्या चरित्रातही अद्भुताला बराच वाव देण्यात आला आहे. ह्याशिवाय लाइव्ह्ज ऑफ द सॉफिस्ट्स हा एक ग्रंथ दुसऱ्या फिलॉस्ट्रासच्या नावावर मोडतो. त्यात प्रोटॅगोरसपासून दुसऱ्या फिलॉस्ट्राटसच्या स्वतःच्या काळापर्यंतचा सॉफिस्टांचा इतिहास आलेला आहे.
ग्रीक गद्य रोमान्सलेखनाने इ. स. च्या दुसऱ्या-तिसऱ्या शतकांत आकार घेतला. प्रेमीजनांची ताटातूट, त्यांच्यावर कोसळणारी संकटे, त्यांतून निभावून त्यांचे होणारे गोड मीलन अशी ठराविक पद्धतीची कथानके त्यांत आढळतात. लाँगस (इ.स.चे तिसरे शतक) ह्याने लिहिलेला डॅफ्निस अँड चोल हा रोमान्स विशेष उल्लेखनीय आहे. काव्यात्मक शैली, चित्रमय वर्णने आणि व्यक्तिरेखनाच्या मानसिक बाजूची जाणीव ही ह्या रोमान्सची विलोभनीय वैशिष्ट्ये होत.
ॲलेक्झांड्रियामध्ये अनेक ज्यू येऊन राहिले होते आणि तेथील जीवनाशी समरस झाले होते. त्यांतील अनेकांना हिब्रू भाषा येत नव्हती. ग्रीक हीच त्यांची भाषा झाली होती. त्यांच्यासाठी बायबल च्या मुळात हिब्रू भाषेत असलेल्या ‘जुन्या करारा’चा ग्रीक अनुवाद तयार करण्यात आला. सेप्ट्यूअजिंट ह्या नावाने तो ओळखला जातो. टॉलेमी फिलाडेल्फसच्या (दुसरा टॉलेमी) सांगण्यावरून जेरूसलेमच्या ७२ ज्यू विद्वानांनी हे काम स्वीकारले आणि ७२ दिवसांत ते पूर्ण केले, असे परंपरा मानते. तथापि वेगवेगळ्या काळांत होऊन गेलेल्या ईजिप्शियन ज्यूंनी हा अनुवाद पूर्ण करीत नेला, हे मत आज ग्राह्य मानले जाते.
इझीक्येल ह्या ज्यू नाटककाराने ज्यूंच्या ईजिप्तमधून झालेल्या निर्गमनावर (एक्झोडस) Exagoge हे नाटक लिहिले. त्रुटित स्वरूपात ते उपलब्ध आहे. ते लिहिताना इझीक्येलच्या समोर युरिपिडीझचा आदर्श असावा, असे जाणवते.
ॲलेक्झांड्रिया येथील फायलो (इ.स. ३९) ह्या तत्त्वज्ञाने बायबलच्या ‘जुन्या करारा’वर भाष्ये लिहिली. ‘जुन्या करारा’चा अर्थ त्याने रूपकात्मक पद्धतीने लावलेला आहे. ग्रीक तत्त्वज्ञानाचा त्याच्यावर खोल परिणाम झालेला होता. ‘जुन्या करारा’त त्याला प्लेटो, ॲरिस्टॉटल आदींच्या तत्त्वज्ञानाचा मूलस्रोत जाणवला. जोसीफसने (सु. ३७–सु. १oo) ज्यूंच्या इतिहासावर महत्त्वाचे ग्रंथ लिहिले.
बायझंटिन कालखंड (इ.स.चे चौथे शतक ते १४५३) : रोमन सम्राट पहिला कॉन्स्टंटीन (सु. २७४–३३७) ह्याने ३३o मध्ये बिझँटिअम येथे आपल्या साम्राज्याची राजधानी नेली. त्याच्या नावावरून ह्या शहराला कॉन्स्टँटिनोपल असे नाव देण्यात आले. ह्या शहराचे महत्त्व साहजिकच वाढत गेले. ते ‘नवे रोम’ ठरले. सम्राट कॉन्स्टंटीन हा ख्रिस्ती धर्माचा पुरस्कर्ता होता. त्याच्या आश्रयामुळे बायझंटिन संस्कृती म्हणजे ग्रीक-रोमन संस्कृतीचाच ख्रिस्ती धर्मप्रधान स्रोत ठरला. बायझंटिन किंवा पूर्व रोमन साम्राज्याच्या कालखंडात निर्माण झालेल्या ग्रीक साहित्यावर ख्रिस्ती धर्मप्रेरणांचा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटलेला आहे. ह्या कालखंडातील विद्वानांना आणि साहित्यिकांना प्राचीन ग्रीक साहित्याच्या वैभवशाली वारशाचा अभिमान होता. बायबलचा ‘नवा करार’ आणि ॲटिक ग्रीकमध्ये रचिलेल्या प्राचीन साहित्यकृती ह्यांचा आदर्श साहित्यभाषेने समोर ठेवला पाहिजे. अशी त्यांची धारणा होती. तिला चिकटून राहिल्यामुळे बायझंटिन ग्रीक साहित्याची भाषा अपरिहार्यपणे गोठत गेली. प्राचीन वाङ्मयाच्या आदर्शांच्या आग्रहातून रूपवादाचे प्रस्थ माजले आणि तंत्रनियमांपुढे आशयाला गौण स्थान प्राप्त झाले. विद्याव्यासंगाच्या वारशाची जाणीव आणखी एक प्रकारे व्यक्त झाली. बहुश्रुतपणाला वाङ्मयात आत्यंतिक महत्त्व आले. पढिकता आणि बोधवाद ह्यांना तेथे मुक्तद्वार लाभले. ह्या साहित्यात उत्कट प्रेमकविता फारशा आढळत नाहीत धर्मपर भावकविता मात्र आहेत.
ह्या कालखंडात इतिहासलेखनाच्या रोमन परंपरा कटाक्षाने जपल्या गेल्या आणि दर्जेदार इतिहासग्रंथ लिहिले गेले. प्राचीन ग्रीक साहित्याचा वारसा जोपासण्याच्या उद्देशातून त्यातील वेचक साहित्यकृतींचे काळजीपूर्वक जतन केले गेले. तसेच तत्संबंधी स्पष्टीकरणात्मक टिपण्या लिहिल्या गेल्या. ह्या टिपण्यांच्या अभावी प्राचीन ग्रीक साहत्यातील काही भाग आज दुर्बोध वाटला असता. पाठशुद्धतेचेही बरेच भान बायझंटिन विद्धानांनी ठेवले आहे.
ह्याच कालखंडात सेंट बेसिल द ग्रेट, नॅझिअँझसचा ग्रेगोरी, निसचा ग्रेगोरी (सर्व चौथ्या शतकातील) ह्यांसारख्या धर्मचिंतकांनी आरंभीच्या ख्रिस्ती ईश्वरशास्त्राची जडणघडण केली. पराविद्यावाद (नॉस्टिसिझम), नव-प्लेटोमत ह्यांसारख्या विचारसरणींशी झुंज घेणाऱ्या ख्रिस्ती धर्माला त्यांचे लेखन साहाय्यभूत झाले.
संतचरित्रांना ह्या काळात विशेष लोकप्रियता लाभली. सेंट अँटनी, सेंट साबा, ॲलेक्झांड्रियाचा बिशप जॉन द मर्सिफुल इत्यादींची चरित्रे लिहिली गेली. धार्मिक कादंबरीचे पूर्वरूप अशा प्रकारच्या संतचरित्रांत शोधता येते.
ह्या वातावरणात लोककाव्याचा एक स्रोत मात्र वाहत होता. सर्वसामान्यांच्या दैनंदिन भाषेत रचिलेल्या ह्या काव्यांची बायझंटिन उच्चभ्रूंकडून उपेक्षा झाली. बहुधा ह्या उपेक्षेचा परिणाम म्हणूनच ह्या कवितांची आज उपलब्ध होणारी हस्तलिखिते पंधराव्या–सतराव्या शतकांच्या दरम्यानची आहेत. Digenes Akritas हे एक उल्लेखनीय लोकमहाकाव्य. दहाव्या किंवा अकराव्या शतकात त्याची रचना झाली असावी. बायझंटिन आई आणि अरब पिता ह्यांच्या पोटी जन्मलेल्या एका मुलाची साहसमय कथा त्यात वर्णिली आहे. Digenes ह्या शब्दाने ‘दोन वंशाचा’ हा अर्थ निर्दिष्ट होतो. काव्यमाध्यमातून सांगितलेल्या परीकथा, पशुकथा इत्यादीही ह्या लोकसाहित्यात आहेत.
बायझंटिन कालखंडातील ग्रीक साहित्य तत्कालीन पश्चिमी साहित्यापेक्षा श्रेष्ठ समजले जात होते. पश्चिमी व बायझंटिन साहित्यसंस्कृतींचा एकमेकींवर फारसा परिणाम मात्र झाला नाही. बायझंटिनांनी पश्चिमी साहित्यप्रकारांना आपल्या साहित्यात शिरू दिले नाही आणि जर्मानिकांच्या विजयी स्वाऱ्यांमुळे पश्चिमेकडील सांस्कृतिक परंपराच खंडित होऊन ग्रीकचे ज्ञान लुप्त होत गेले. पूर्व यूरोपीयांवर – विशेषतः स्लाव्ह लोकांवर – बायझंटिन साहित्याचा लक्षणीय प्रभाव दिसून येतो.
कविता : बायझंटिन कालखंड धार्मिक कवितेस पोषक होता. नॅझिअँझसच्या ग्रेगोरीने काही धार्मिक कविता लिहिल्या आहेत. पाखंड्यांनी आपल्या धार्मिक कवितांना लोकसंगीतातील चाली देऊन त्यांचा प्रचारासाठी उपयोग केल्यामुळे प्रभावी समूहस्तोत्रे रचून घेण्याची आवश्यकता चर्चला भासू लागली आणि ती रचिली गेली. सातव्या शतकात धार्मिक कवितेत एक नवा गीतप्रकार अंतर्भूत झाला. वेगवेगळ्या प्रकारे रचिलेल्या आठ-नऊ भावकवितांतून एक वैशिष्ट्यपूर्ण कविता निर्माण केली जाऊ लागली. अशा कवितेस ‘कानॉन’ म्हणत. क्रीटचा अँड्रू हा ह्या प्रकाराचा जनक मानला जातो.
वैराग्योन्मुख विचारांच्या प्रभावामुळे लौकिक कवितेचा विकास फारसा झाला नाही परंतु लहानलहान कवितांतून व्यक्तिगत भावनांचा आविष्कार झालेला आढळतो. जॉर्ज द पिसिडिअनने अशा लघुकाव्यांतून विविध विषय हाताळले. थीओडोर स्टुडीटीझने लघुकाव्यातून मठजीवनाचे चित्रण केले आहे. नवव्या शतकातील कासिया ह्या एकमेव कवयित्रीने लघुकाव्य व चर्चस्तोत्रे लिहिली. दहाव्या-अकराव्या शतकांत लघुकाव्य ह्या प्रकाराचा विशेष विकास झाल्याचे दिसते. Anthologia Palatina (सु. दहावे शतक) ह्या स्तबकात (अँथॉलजी) अनेक प्राचीन व बायझंटिन लघुकाव्ये संगृहीत केलेली आहेत.
इतिहास : बायझंटिन कालखंडात लिहिल्या गेलेल्या इतिहासग्रंथांचे मुख्यतः दोन प्रकार आहेत : (१) इतिहासकाराच्या स्वतःच्या काळातील अथवा स्वतःपूर्वीच्या नजीकच्या भूतकाळातील घटना नमूद करणारे इतिहासग्रंथ. (२) एकूण जागतिक इतिहासातील घटना सांगणारी इतिवृत्ते. यूनेपिअस (चौथे शतक), ऑलिंपिओडोरस (पाचवे शतक), माल्कस (पाचवे शतक), प्रिस्कस (पाचवे शतक) आणि झोसिमस (सु. ५oo) ह्यांनी बायझंटिन साम्राज्याचा इतिहास लिहिला.
प्रथम युसीबिअसने (२६५–३४o) इ.स. ३१४ पर्यंतचा चर्चचा इतिहास लिहिला. पुढे पाचव्या शतकात ख्रिस्ती चर्चवर जे इतिहासग्रंथ लिहिले गेले, त्यांत सॉक्रेटीस (स्कॉलेस्टिकस हे ह्याचे उपनाव) ह्या वकिलाने लिहिलेला चर्चचा इतिहास (३o५ ते ४३९ ह्या कालखंडाचा) विशेष महत्त्वाचा आहे. चर्चच्या संदर्भातील अनेक अस्सल कागदपत्र त्याने जसेच्या तसे दिले असल्यामुळे ह्या इतिहासग्रंथाचे मोल वाढले आहे.
प्रोकोपिअस आणि आगेथिअस हे सहाव्या शतकात होऊन गेलेले उल्लेखनीय बायझंटिक ग्रीक इतिहासकार. ह्या दोघांनीही पहिल्या जस्टिनियनचा कालखंड आपल्या इतिहासग्रंथांतून वर्णिला आहे. पहिल्या जस्टिनियनच्या काळात पर्शियन, व्हँडल व ऑस्ट्रोगॉथ ह्यांच्याबरोबर झालेल्या युद्धांची वर्णने प्रोकोपिअसने आपल्या अष्टखंडात्मक इतिहासग्रंथात जिवंतपणे केलेली आहेत. प्रोकोपिअस हा जस्टिनियनचा समकालीन असल्यामुळे त्याने दिलेल्या माहितीला अधिकृतपणा आलेला आहे. इव्हॅग्रिअस स्कोलेस्टिकस (सहावे शतक) ह्याने चर्चचा ४३१–५९३ ह्या काळातील इतिहास लिहिला.
पॉर्फिरोजेनिटस ह्या नावाने ओळखला जाणारा सम्राट सातवा कॉन्स्टंटीन (९o५–९५९) हा विद्या-कलांचा आश्रयदाता होता. त्याने आपल्या पदरी असलेल्या विद्वानांकडून काही इतिहासग्रंथ लिहून घेतले. जोसेफस बायझंटायनस (जोसेफस जिनीशिअस ह्या नावानेही हा ओळखला जातो) ह्याने सम्राटाच्या इच्छेवरून पॉर्फिरोजेनिटस हा पूर्व रोमन साम्राज्याचा ८१३ ते ८८६ ह्या कालखंडाचा इतिहास लिहिला. लीओ डायाकोनस ह्याने ९५९ ते ९७५ ह्या कालखंडात बायझंटियांची अरबांशी आणि बल्गेरियनांशी जी युद्धे झाली त्यांचा इतिहास लिहिला. बायझंटिन तत्त्वज्ञ मायकेल सेलस (अकरावे शतक) ह्याने ९७६ ते १o७७ पर्यंतचा इतिहास लिहिला. त्यानंतरही अनेक इतिहासग्रंथ लिहिले गेले. बायझंटिन साम्राज्य आणि ऑटोमन तुर्क ह्यांच्यातील संघर्षाचा इतिहास लेओनायकस कॅल्कोकाँडिलस, ड्यूकस आणि जॉर्ज स्फ्रांटझीस ह्यांनी लिहिलेला आहे.
बायझंटिन इतिवृत्ते मुख्यतः ख्रिस्ती मठवासी संन्याशांनी लिहिलेली आहेत. जॉन मालेलस (सहावे शतक) ह्याचे इतिवृत्त उपलब्ध इतिवृत्तांपैकी सर्वांत जुने. सातव्या शतकातील Chronicon Paschale (इं.शी. पॅस्कल क्रॉनिकल), आठव्या शतकाच्या अखेरीस किंवा नवव्या शतकाच्या आरंभी जॉर्ज द सिन्सेलस ह्याने संकलित केलेले एक इतिवृत्त (जगदुप्तत्तीपासून – क्रिएशन – इ.स. २८४ पर्यंतचे) ही बायझंटिन इतिवृत्तांपैकी काही होत. अशा इतिवृत्तांत चिकित्सक दृष्टी फारशी प्रत्ययास येत नाही. त्यांचे वाङ्मयीन मोलही फारसे मोठे नाही. तथापि ह्या इतिवृत्तांनी पश्चिमी देशांत इतिहासलेखनासंबंधीची आस्था उत्पन्न केली.
सम्राट सातवा कॉन्स्टंटीन ह्याने ८१३–८८६ ह्याने कालखंडात होऊन गेलेल्या पाच बायझंटिन सम्राटांची चरित्रे लिहून घेतली होती. त्यांतील आपल्या आजाचे – पहिल्या बेसिलचे – चरित्र त्याने स्वतः लिहिले होते. बाराव्या शतकापर्यंत बायझंटिन इतिवृत्ते लिहिली जात असल्याचे दिसून येते.
संकीर्ण : भूगोलविषयक पुस्तकांत दोन ग्रंथांचा उल्लेख अत्यावश्यक आहे. कॉझ्मस इंडिकोप्ल्यूस्टीझच्या टोपोग्राफिआ क्रिस्तिआना (सहावे शतक) मध्ये बायझंटिन व्यापाराविषयी महत्त्वाची माहिती ग्रथित केलेली आढळते, तर पॅट्रिआ (दहावे शतक) या ग्रंथात कॉन्स्टँटिनोपलची माहिती आणि इतिहास दिला आहे. फोशिअस (नववे शतक) ह्या कॉन्स्टँटिनोपलच्या पॅट्रिआर्कच्या बिब्लिऑथिका (ह्याचेच दुसरे नाव Myriobiblon) ह्या ग्रंथात २८o निबंधांतून, आता कालौघात लुप्तप्राय झालेल्या अनेक जुन्या ग्रंथांचा गोषवारा आढळतो. Suda Lexicon नामक विश्वकोशात अनेक अभिजात आणि बायझंटिन साहित्यिकांची चरित्रविषयक माहिती आलेली आहे. युस्टेथिअसने (बारावे शतक) होमर, पिंडर आणि इतर लेखकांच्या साहित्यकृतींवर आपली भाष्ये लिहिली आहेत.
युद्धशास्त्रावरील ग्रंथांत Strategikon हा विषय उल्लेखनीय आहे. पूर्व रोमन साम्राज्याचा सम्राट मॉरिस (कार. ५८२–६o२) ह्याच्या नावावर हा मोडतो. आक्रमकांविरुद्ध बायझंटिनांनी वापरलेल्या अनेक लष्करी डावपेचांची ह्यात माहिती आहे. ह्या ग्रंथात वेळोवेळी अनेकांनी भर घालून तो अद्ययावत ठेवला आहे.
कुलकर्णी, अ. र. कुलकर्णी, अनिरुद्ध
अर्वाचीन कालखंड (१४५३ नंतर) : १४५३ मध्ये तुर्कांकडून कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव झाला आणि ग्रीकांचे स्वतंत्र राष्ट्रीय जीवन संपुष्टातच आल्यासारखे झाले. पंरतु या आक्रमणामुळेच ग्रीस आणि इतरत्र पसरलेले ग्रीक खडबडून जागेही झाले व त्यांनी कळतनकळत साहित्यनिर्मितीसाठी लागणाऱ्या मनोभूमिकेची जोपासना सुरू केली. दहाव्या व अकराव्या शतकातील Digenes Akritas हे महाकाव्य आणि तेराव्या-चौदाव्या शतकांतील पद्य रोमान्स ह्यांच्या पार्श्वभूमीवरच अस्मिता जागी करण्याचे हे प्रयत्न होत राहिले.
आपल्या पूर्वकालीन वाङ्मयीन संचितातून ग्रीक साहित्याला दोन विवक्षित साहित्यशैलींचा वारसा प्राप्त झालेला आहे. एक अभिजात शैली आणि दुसरी लोकवाङ्मयातून आलेली व सर्वसामान्यांना विशेष जवळची अशी ‘डिमॉटिक’ किंवा लोकजात शैली. तथापि हे दोन्ही शैलीप्रकार बेटासारखे राहिले नाहीत, तर त्यांवर इटालियन व फ्रेंच साहित्यांचे पोषक संस्कार झालेले आहेत. १८८o नंतरच्या ग्रीक वाङ्मयीन चळवळीत ह्या दोन शैलींच्या पुरस्कर्त्यांमधील वादसंघर्ष ठळकपणे नजरेत भरतात. ⇨कोस्टिस पालामास (१८५९–१९४३) ह्या श्रेष्ठ ग्रीक साहित्यिकाने स्थापिलेल्या ‘अथेन्सच्या नव-संप्रदाया’ने कालजीर्ण अभिजात साहित्यशैलीला विरोध केला. ⇨यॉआन्यिस सायकारीस (१८५४–१९२९) ह्याची To taxidi mou (इं. शी. माय जर्नी) ह्या नावाने प्रसिद्ध झालेली (१८८८) प्रवासचित्रे ह्या संदर्भात विशेष उल्लेखनीय. ह्या लेखनाचा वरवरचा हेतू प्रवासवर्णनाचा असला, तरी प्रत्यक्षात ग्रीकांच्यात लोकजात भाषाविषयक जागृती घडवून आणण्याचा त्याचा हेतू आणि धडपड होती. त्याचा आदर्श अनेक ग्रीक साहित्यिकांनी आपापल्या परीने अनुसरला. निकोलाओस पॉल्यीटिस (१८५२–१९४२) याच्या ग्रीक लोकवाङ्मयाच्या संशोधनामुळे व कॉन्स्टांटिनोस पापाऱ्हिगोपाउलॉस याच्या मध्ययुगीन व आधुनिक ग्रीक इतिहासाच्या संशोधनामुळे या धडपडीला खतपाणीच मिळाले. शेवटी ही चळवळ लोकजात शैलीचा विजय होऊन सफळ झाली.
डिमेट्रीओस व्हेरनारडाकीस (१८३४–१९o७) आणि स्पिरिडॉन व्हासीलीआडीस (१८४४–७४) ह्यांसारख्या काही नाटककारांनी अभिजात शैलीचा उपयोग करून आपले नाट्यलेखन केले. तथापि ग्रेगॉरियॉस झेनोपाउलॉस ह्याने लोकजात शैलीचा आणि समकालीन जीवनावरील संविधानकांचा उपयोग करून ग्रीक नाटक एका नव्या टप्प्याप्रत नेले.
काव्य : सोळाव्या-सतराव्या शतकांत क्रीटमध्ये दर्जेदार कविता लिहिली गेली. बहुधा सतराव्या शतकाच्या मध्यास रचिल्या गेलेल्या Erotokritos हे व्हिकेंतिऑस कोर्नारॉसचे प्रेमकाव्य त्या दृष्टीने उल्लेखनीय आहे. काही शोकात्मिका आणि सुखात्मिका लिहिल्या गेल्या. जॉर्जिअस कोर्तात्झीसची Erophili ही शोकात्मिका (सु.१६oo) प्रसिद्ध आहे. Stathis व Fortounatos ह्या सतराव्या शतकातील उल्लेखनीय सुखात्मिका. Gyparis (सु. १६oo) हे गोपनाटक (पास्टोरल प्ले) आणि Thysia tou Abraam (‘मिस्टरी प्ले’–१५३५ किंवा १६२५) म्हणजे क्रीटन साहित्यातील सर्वोत्कृष्ट नाट्यकृती. त्यांचे कर्ते मात्र अज्ञात आहेत.
क्रीटमध्ये सुंदर गोपगीतेही रचिली गेली. Iorai voskopoula हे त्या दृष्टीने उल्लेखनीय आहे. १२o४ ते १६६९ पर्यंत क्रीटवर व्हेनिसची सत्ता होती. परिणामत: क्रीटमध्ये निर्माण झालेल्या ग्रीक साहित्यात व्हेनिशियन बोलीतील काही शब्द मुक्तपणे वापरले गेले आहेत.
ग्रीसच्या तुर्कव्याप्त प्रदेशांत मुख्यतः लोकगीते व ‘क्लेफ्टिक बॅलड्स’ ह्या नावाने ओळखली जाणारी वीरगीते रचिली गेली. ‘क्लेफ्ट’ म्हणजे हद्दपार करण्यात आलेला ग्रीक वीर. कॉन्स्टँटिनोपलच्या पाडावाबद्दल शोक व्यक्त करणारी गीतेही आहेत. ग्रीक भाषेतील सुंदर आणि दर्जेदार कवितेत ह्यांतील बऱ्याच लोकगीतांचा समावेश करावा लागेल. क्लेफ्टिक वीरगीतांनी आधुनिक ग्रीक कवींनाही स्फूर्ती दिली आहे.
अठराव्या शतकात कॉन्स्टँटिनोपलच्या फनॅरीअटांनी केलेली काव्यरचनाही लक्षणीय आहे. फनॅरीअट म्हणजे विशषाधिकार प्राप्त झालेली कॉन्स्टँटिनोपलमधील काही ग्रीक कुटुंबे. ग्रीक ऑर्थडॉक्स चर्चचा ‘हाय क्लर्जी’ सामान्यतः फनॅरीअटांमधून निवडला जात असे. बायझंटिन कालखंडातील अभिजात ग्रीक साहित्यपरंपरा जपण्याचा प्रयत्न तीत दिसतो. कायसारिऑस डॅपाँटीस (१७१४–७४) आणि ऱ्हिगास (१७५७–९८) ही फनॅरीअट कवींपैकी काही उल्लेखनीय नावे. Kathreptis ton gynaikon (इं. शी. मिरर ऑफ लेडीज) आणि Kipos Chariton (इं. शी. द गार्डन ऑफ ग्रेसिस) ह्या डॅपाँटीसच्या काव्यग्रंथांत धर्म -नीतिपर बोध आढळतो. ऱ्हिगासची उत्कट देशभक्तिपर कविताही लोकप्रिय ठरली.
तुर्कांच्या जोखडाखालून ग्रीस मुक्त झाल्यानंतर (१८२८) अथेन्समध्ये आणि त्याच्या परिसरात नवे चैतन्य सळसळू लागले. ह्या वातावरणात अलेक्झांड्रॉस साउटसॉस (१८o३–६३) ह्या कवीने फ्रेंच स्वच्छंदतावाद्यांचा आदर्श समोर ठेवून आपली काव्यरचना केली आणि ग्रीक स्वच्छंदतावादाचा पाया घातला. तथापि आपल्यापुढील आदर्शांचा आत्मा त्याला गवसल्याचे त्याच्या काव्यातून जाणवत नाही. साउटसॉसला अनेक अनुयायी लाभले. उत्कट देशभक्ती हा ह्या साऱ्याच स्वच्छंदतावाद्यांच्या कवितेचा प्रमुख विषय. त्यांच्यापैकी अलेक्झांड्रॉस रिझॉस रांगाव्हीस (१८o९–९२) हा विशेष महत्त्वाचा. कथाकाव्ये, वीरगीते, स्तोत्रे, नाटके इ. विविध साहित्यप्रकार त्याने हाताळले. आकिलीझ पॅरास्कॉस (१८३८–९५) हा ग्रीक स्वच्छंदतावादी चळवळीतील अखेरचा महत्त्वाचा कवी. म्यूसे, व्हिक्टर ह्यूगो व बायरन ह्यांसारख्या त्याच्या फ्रेंच-इंग्रज आदर्शांची उंची मात्र तो गाठू शकला नाही.
आयोनियन बेटांवर १८६४ पर्यंत ब्रिटिशांची सत्ता होती. अथेन्समध्ये घडून आलेल्या ग्रीक स्वच्छंदतावादी चळवळीला समांतर असा काव्यसंप्रदाय ह्या बेटांवर उदयाला आला. डायोनायसिअस सॉलॉमॉस (१७९८–१८५७) हा त्याचा संस्थापक. कला आणि जीवन ह्यांकडे सखोल तात्त्विक भूमिकेतन पाहणाऱ्या सॉलॉमॉसच्या कवितेतील अलवार शब्दकळा आणि संयम आधुनिक ग्रीक साहित्यात अतुलनीय मानली जातात. त्याने रचिलेल्या स्वातंत्र्यस्तोत्राची पहिली काही कडवी ग्रीसचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आली. सॉलॉमॉसने लोकजात भाषाशैलीचा स्वीकार केला आणि ह्या शैलीच्या पुरस्कारासाठी पुढे कोस्टिस पालामासने उभ्या केलेल्या अथेन्सच्या नवसंप्रदायाची पूर्वपीठिका निर्माण करून ठेवली. अनेक पश्चिमी वृत्ते त्याने ग्रीक कवितेत आणली आणि ठराविक वृत्तांच्या चाकोरीतून ग्रीक कवितेला मुक्त केले.
अथेन्सच्या नवसंप्रदायाचा संस्थापक कोस्टिस पालामास ह्याचे Dodecalogos tou Gyft ou हे तात्त्विक दीर्घकाव्य उल्लेखनीय आहे. कला व स्वातंत्र्य ह्यांचे प्रतीक म्हणून एक जिप्सी ह्या कवितेत येतो. त्याची जीवनविषयक जाणीव हळूहळू सखोल होते तो एक श्रेष्ठ देशभक्त होतो. I flogera tou Vasilia हे त्याचे आणखी एक उल्लेखनीय काव्य. नंतरच्या ग्रीक साहित्यावर पालामासचा प्रभाव मोठा आहे. त्याच्या संप्रदायातून पुढे आलेल्या कवींनी लोकजात भाषेची अभिव्यक्तिक्षमता वाढवली, ग्रीक कवितेत प्रतीकवाद आणि मुक्तच्छंद आणला.
आंजेलोस सीकेलीआनोस आणि कॉस्टांटिनोस कावाफी हे पालामासनंतरचे दोन महत्त्वाचे कवी. सीकेली आनोसच्या कवितेतून ग्रीक इतिहास आणि निसर्ग ह्यांच्याकडे पाहण्याचा एक गूढवादी दृष्टिकोण दिसतो. पालामासच्या प्रभावापासून मुक्त अशी कविता कावाफीने लिहिली. हेलेनिस्टिक ग्रीसचे वैभव आणि त्याचा ऱ्हास हा त्याच्या कवितांतून येणारा प्रमुख विषय. पालामासप्रमाणे ह्या दोघांनाही पश्चिमी साहित्यविश्वात मान्यता मिळाली.
पहिल्या महायुद्धोत्तर ग्रीक कवितेच्या संदर्भात कोस्टास कारिओटाकीस (१८९७–१९२८), ओडिस्यूस एलीटीस (१९१२– ), ⇨निकोस काझांटझाकीस (१८८५–१९५७) आणि ⇨येऑर्यिऑस सेफेरीस (१९oo–७१) हे विशष उल्लेखनीय होत. कारिओटाकीसच्या कविता निराशावादी आणि उपरोधपूर्ण आहेत. एलीटीस हाही एक श्रेष्ठ कवी. काझांटझाकीसचे ओडिसी (१९३८, इं. भा. द. ओडिसी : अ मॉडर्न सीक्वेल ) हे ३३,३३३ ओळींचे महाकाव्य म्हणजे महाकवी होमरने लिहिलेल्या ओडिसीचा आधुनिक उपसंहार होय. ह्या महाकाव्यातील आधुनिक ओडिस्यूस शून्यवादाने ग्रासलेला आहे.
येऑर्यिऑस सेफेरीस हा अलीकडच्या काळातील एक श्रेष्ठ ग्रीक कवी. प्रतीकवादाचा प्रभाव, अनलंकृत शैली व काटेकोर प्रतिमासृष्टी ही त्याच्या कवितेची वैशिष्ट्ये. सेफेरीसला १९६३ चे नोबेल पारितोषिक मिळाले. हा बहुमान मिळविणारा तो पहिला ग्रीक साहित्यिक होय.
गद्य : कॉन्स्टँटिनोपलच्या पाडावानंतर ग्रीक विद्वानांनी आपल्या ज्ञानपरंपरेचा – विशेषतः ग्रीक तत्त्वज्ञानाचा – प्रसार पश्चिमी जगात करण्याचे प्रयत्न केले. ठिकठिकाणी विद्यालये स्थापन करणे, शैक्षणिक महत्त्वाचे ग्रीक ग्रंथ मुद्रित करणे इ. कार्ये कॉन्स्टँटिनोपलचा पॅट्रिआर्क (बिशप), तेथील फनॅरीअट कुटुंबे, वालेकिया येथील हॉस्पडार किंवा गव्हर्नर ह्यांनी हाती घेतली. ग्रीकांपैकी काही धनाढ्य व्यापाऱ्यांनी ह्या कार्यांना आर्थिक पाठबळ दिले. तुर्की सत्तेपासून मुक्त होण्याकरिता आवश्यक असलेली मनोभूमिका ह्या कार्याने तयार केली. १४५३ पासून १८२८ पर्यंतच्या ग्रीक गद्यग्रंथांत धार्मिक साहित्य वैपुल्याने आढळते. नीकेफोरोस थीओटोकीस (१७३६–१८oo) आणि युजेनीओस व्हलगारीस (१७१६–१८o६) ह्यांसारख्या विद्वानांनी धर्ममंडनात्मक साहित्याबरोबरच भौतिकी, गणित, भूगोल, पुरातत्त्वविद्या आदी विषयांवरही ग्रंथरचना केली. परंतु ह्या एक प्रकारच्या पुनरुज्जीवनाचा समर्थ पूर्वसूरी होता आदामांत्यॉस कॉराई (१७४८–१८३३). पॅरिसमध्ये राहून त्याने अभिजात ग्रीक साहित्यकृतींच्या आवृत्त्या काढल्या. ह्या आवृत्त्यांसाठी त्याने लिहिलेल्या प्रस्तावनांतून त्याची उत्कट देशभक्ती प्रत्ययास येते. ग्रीक भाषेच्या विकासासाठीही त्याने प्रयत्न केले.
स्वातंत्र्योत्तर काळात ग्रीसमध्ये ऐतिहासिक कादंबरीला लोकप्रियता प्राप्त झाली. आलेक्सांद्र द्यूमा, वॉल्टर स्कॉट ह्यांसारखे फ्रेंच – इंग्रजी साहित्यिक ग्रीक कादंबरीकारांचे आदर्श होते. रांगाव्हीस, ऱ्हॉइडिस, स्पिरिडॉन झांबेलिऑस आणि डिमिट्रिऑस व्हिकेलास हे काही – ऐतिहासिक कादंबरीकार मात्र ह्यांनी आपले कादंबरीलेखन अभिजात शैलीत केले.
अभिजात शैलीत केलेल्या लेखनाच्या संदर्भात दोन महत्त्वपूर्ण इतिहासग्रंथांचा उल्लेख आवश्यक आहे : स्पिरिडॉन ट्रिकाउपीस (१७८८–१८७३) ह्याने लिहिलेला ग्रीकांच्या क्रांतीचा इतिहास आणि कॉन्स्टांटिनोस पापाऱ्हिगोपाउलॉस (१८१५–९१) ह्याचा ग्रीसचा इतिहास. स्वतंत्र संशोधन, माहितीचा अधिकृतपणा आणि ओघवती शैली ही त्यांची वैशिष्ट्ये.
ग्रीक लोकजात भाषेच्या पुरस्कारार्थ आणि तत्संबंधीची आस्था जागृत करण्यासाठी यॉआन्यिस सायकारीस ह्याच्या To taxidi mou ह्या प्रवासचित्रांचा उल्लेख ह्यापूर्वी आलेला आहेच. ग्रीक गद्याचा तोंडवळाच त्यांनी पालटला. अभिजात आणि लोकजात वाङ्मयीन शैलींच्या पुरस्कर्त्यांमध्ये झालेला वाद व त्यात लोकजात शैलीचा झालेला विजय ही घटना ग्रीक कवितेप्रमाणेच ग्रीक गद्याच्या संदर्भातही महत्त्वाची. ग्रीक लोकसाहित्याचा आस्थेवाईक अभ्यास होऊ लागला, त्यातून ग्रीक ग्रामीण जीवनाविषयी आपुलकी निर्माण झाली आणि तिचे प्रतिबिंब नव्या ग्रीक साहित्यात प्रकर्षाने पडू लागले.
अलेक्झांड्रॉस पापाडिॲमँटिस (१८५१–१९११) आणि अँड्रीआस कार्काव्हिट्सास (१८६६–१९२३) ही नावे ग्रीक ग्रामीण कथेच्या बाबतीत उल्लेखनीय आहेत. त्यांतही पापाडिॲमँटिसची कथा विशेष श्रेष्ठ समजली जाते. ह्या दोघांनी कादंबरीलेखनही केले. Zitianos (इं. शी. द बेगर) ही कार्काव्हिट्सासची आणि Fonissa ही पापाडिॲमँटिसची कांदबरी. विसाव्या शतकाच्या आरंभी लिहिल्या गेलेल्या ग्रीक कादंबऱ्यांपैकी ह्या दोन विशेष उल्लेखनीय होत.
ग्रेगॉरियॉस झेनोपाउलॉस (१८६७–१९५१) ह्याच्या Foteinl Sandri आणि Stella Violanti ह्या गाजलेल्या कादंबऱ्या. त्या शहरी जीवनाच्या पार्श्वभूमीवर आहेत. यॉआन्यिस सायकारीस ह्यानेही शहरी जीवनाचे चित्रण आपल्या कादंबऱ्यांतून केले.
पहिल्या महायुद्धानंतरच्या कादंबरीकारांत स्ट्राटीस मिरीव्हिलीस हा महत्त्वाचा. Zo’i en tapho ही मॅसिडोनियन युद्धआघाडीवरून लिहिलेल्या पत्रांतून त्याने उभी केलेली कादंबरी उल्लेखनीय आहे. एलिआस व्हेनेझिस (१९o४– ) ह्याची Noumero 31328 ही कादंबरी तुर्कांच्या कैदेतील त्याचे स्वतःचे अनुभव सांगते. त्याच्या Aiolia ह्या प्रदीर्घ कादंबरीत बालपणाच्या स्मृती टिपल्या आहेत. कॉस्मॉस पॉल्यीटिस हाही एक श्रेष्ठ कादंबरीकार. Eroica (१९३८) ह्या आपल्या कादंबरीत लहान मुलांच्या एका टोळीचे चित्रण त्याने केले आहे. उत्कृष्ट निसर्गचित्रण आणि मनोविश्लेषण ही त्याची वैशिष्ट्ये.
पहिल्या महायुद्धानंतर निर्माण झालेले लेखनादर्श दुसऱ्या महायुद्धानंतरही कायम राहिलेले दिसतात. आयुष्याच्या उत्तरार्धात कादंबरीलेखनाकडे वळलेल्या निकोस काझांटझाकीस ह्याने आपल्या कादंबऱ्यांनी आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त केली. सर्जनशीलतेचा एक श्रेष्ठ आविष्कार म्हणून आणि लोकजात शैलीच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून त्याच्या Alexis Zorbas (१९४६, इं. भा. झोर्बा द ग्रीक ) सारख्या कादंबऱ्यांकडे पाहिले जाते.
कुलकर्णी, अनिरुद्ध
संदर्भ : 1. Bowra, C. M. Greek Lyric Poetry from Alcman to Simonides, 1936.
2. Bowra, C. M. Landmarks in Greek Literature, London, 1966.
3. Bowra, C. M. The Early Greek Elegists, 1939.
4. Hadas, Moses, A history of Greek Literature, New York, 1962.
5. Haigh, A. E. Tragic Drama of the Greeks, 1896.
6. Harvey, Paul, Ed. The Oxford Companion to Classical Literature, Oxford, 1959.
7. Hathorn, R. Y. Tragedy, Myth and Mystery, Bloomington, Ind., 1966.
8. Keely, E. Sherrard, P. Six Poets of Modern Greece, 1960.
9. Lesky, Albin Trans. Heer, C. de Willis, J. A. A History of Greek Literature, London,
1966.
10. Murray, Gilbert, A History of Ancient Greek Literature, New York, 1966.
11. Murray, Gilbert, The Rise of the Greek Epic, London, 1961.
12. Norwood, Gilbert, Greek Comedy, London, 1931.
13. Rose, H. J. A Handbook of Greek Literature, London, 1951.
14. Sherrard, P. The Marble Threshing Floor, London, 1956.
15. Trypanis, C. A. Ed. Medieval and Modern Greek Poetry, New York, 1951.
16. Wright, F. A. A History of Later Greek Literature, London, 1951.
“