ग्रॅनाइट : सर्वस्वी स्फटिकमय, कणीदार व मुख्यतः फेल्स्पार व क्वार्ट्‍‌झ खनिजांनी बनलेल्या खडकाचे नाव. याचे कण नुसत्या डोळ्यांनी ओळखता येण्याइतके भरड असतात. कृष्णाभ्रक किंवा हॉर्नब्लेंड यासारखी काळी खनिजे गौण प्रमाणात असतात व खडकांचा रंग फिकट (गुलाबी, पांढुरका इ.) असतो. ग्रॅनाइट कवचाच्या खोल भागात तयार झालेले असतात व अनावरणाने वरचे खडक झिजून निघून गेल्यावरच ते उघड्यावर येतात. ग्रॅनाइटांचा समावेश सामान्यतः अग्निज म्हणजे शिलारसापासून तयार झालेल्या खडकांत करतात, पण ते रूपांतरणानेही (मुख्यत्वे तापमान व दाब यांच्यामुळे बदल होऊनही) तयार होणे शक्य असते. खनिजांच्या दृष्टीने ग्रॅनाइटांचा अर्ध्याहून अधिक भाग फेल्स्पारांचा व सु. पाव भाग क्वार्ट्‍‌झाचा असतो. त्यांचे अनेक प्रकार आढळतात. त्यांपैकी मुख्य म्हणजे पुढील होत : (१) सामान्य ग्रॅनाइट : याच्यातील मुख्य फेल्स्पार ऑर्थोक्लेज असते व प्लॅजिओक्लेज (ऑलिगोक्लेज) ऑर्थोक्लेजाच्या निम्म्याहून कमी असते.

क्वार्ट्‍‌झाचे प्रमाण बरेच व थोडे कृष्णाभ्रक व क्वचित त्याच्याशिवाय शुभ्र अभ्रकही असते. (२) ॲडॅमेलाइट : यात ऑर्थोक्लेज व प्लॅजिओक्लेज जवळजवळ सारख्या प्रमाणात असतात. क्वार्ट्‍‌झ बरेच व कृष्णाभ्रक अल्प असते. (३) ग्रॅनोडायोराइट : मुख्य फेल्स्पार प्लॅजिओक्लेज (ऑलिगोक्लेज ते अँडेसाइन) असून ऑर्थोक्लेज हे त्याच्या निम्म्याहून कमी असते. क्वार्ट्‍‌झ बरेच असते. कृष्णाभ्रक व हॉर्नब्लेंड यांपैकी एक किंवा दोन्ही व क्वचित डायोप्साइड ही खनिजे गौण प्रमाणात आढळतात [→ ग्रॅनोडायोराइट].

संरचना : ग्रॅनाइटाचे घटक कण जवळजवळ सारख्याच आकारमानाचे व अनियमित आकाराचे (निराकार) असतात, पण फेल्स्पारांचे काही कण अंशतः आकार असलेले असणे शक्य असते. कणांची जुळणी अनियमित, यदृच्छ्या झाल्याप्रमाणे व दिशाहीन असते. अशा संरचनेला ग्रॅनाइटी संरचना म्हणतात.

पृषयुक्त ग्रॅनाइट : हा फेल्स्पारांचे काही मोठे व चांगला आकार असलेले स्फटिक व फेल्स्पार क्वार्ट्‍‌झ व गौण खनिजे यांचे बारीक व अनाकार स्फटिक मिळून बनलेला असतो. बारीक कणांच्या आधारकात फेल्स्पारांचे बृहत्स्फट (मोठाले स्फटिक) यदृच्छ्या विखुरलेले असतात.

पटिवत संरचना : खडकात अभ्रकाच्या चकत्या व हॉर्नब्लेंडाच्या काड्या तसेच त्यात बृहत्स्फट असले तर त्यांचे लांब अक्ष हे जवळजवळ समांतर असतात. अंशतः स्फटिकीभूत झालेला शिलारस धन होत असताना वाहत असला म्हणजे अशी संरचना (प्रवाही पट्टन) निर्माण होणे शक्य असते. ग्रॅनाइटावर पृथ्वीच्या कवचाच्या हालचालींचा दाब पडूनही पट्टित संरचना निर्माण होणे शक्य असते.

राशी : खंडांत आढळणाऱ्या अंतर्वेशी (घुसलेल्या) अग्निज खडकांपैकी सर्वांत विपुल म्हणजे ग्रॅनाइट होत. पृथ्वीच्या सियालाचे (सिलिका व ॲल्युमिना विपुल असणाऱ्या खडकाचे) रासायनिक संघटनही ग्रॅनाइटांसारखेच आहे. काही मिमी. जाडी व काही सेंमी. लांबी असणाऱ्या बारीक राशींपासून तो कित्येक सहस्र घ. किमी. आकारमान असणाऱ्या ⇨बॅथोलिथांसारख्या प्रचंड राशीपर्यंतच्या ग्रॅनाइटांच्या सर्व प्रकारच्या राशी आढळतात. स्थूलमानाने त्यांचे पुढील तीन गट करता येतात.

(१) गौण अंतर्वेशी राशी म्हणजे ⇨शिलापट्ट ⇨लॅकोलिथभित्ती, शिरा इत्यादी.

(२) घड्या पडून तयार झालेल्या पर्वतरांगांच्या गाभ्याशी असणारी बॅथोलिथे.

ग्रॅनाइटांच्या गौण अंतर्वेशी राशी कवचाच्या खडकात घुसलेल्या शिलारसापासून झालेल्या असतात, याविषयी पुरावे मिळतात पण बॅथोलिथांसारख्या प्रचंड राशींच्या तळाचा ठाव लागत नाही व त्या कशा निर्माण झाल्या हे कळलेले नाही. शिलारसांचे अंतर्वेशन होऊन (शिलारस घुसून) त्या तयार न होता त्यांच्या जागी पूर्वी असलेल्या खडकांचे रूपांतरण (रासायनिक प्रतिष्ठापन) होऊन त्या तयार झाल्या असाव्यात, असे सुचविण्यात आलेले आहे.

(३) खंडांच्या ढालक्षेत्रात आढळणाऱ्या प्रचंड राशी. यांच्या मूळच्या ग्रॅनाइटांचे रूपांतरण होऊन ते ग्रॅनाइट पट्टिताश्म झालेले असतात.

कित्येक ग्रॅनाइटात तीन नियमित दिशांनी जाणारे सांधे किंवा भित्तिसंधी (भेगा) असतात. त्यांपैकी दोन उभे व एकमेकांस काटकोन करून व तिसरे आडवे असतात. हे सांधे (अगदी जवळजवळ नसले) म्हणजे बांधकामासाठी या खडकाचे चौरस ठोकळे सुलभपणे खणून काढता येतात. काही ग्रॅनाइटांत चारीसारखी संरचना असते व त्यांच्या पातळ किंवा जाड फरशा खणून काढता येतात. इमारतीच्या बांधकामासाठी, विशेषतः शोभिवंत व दर्शनी कामासाठी ग्रॅनाइटांचा पुष्कळ वापर होतो.

भित्तिसंधीस अनुसरून खणून काढलेले दगडी ठोकळे मोठे असतात. कित्येक बांधकामांसाठी त्यांचे लहान ठोकळे करावे लागतात. मोठा ठोकळा फोडताना असा अनुभव येतो की, एका विशिष्ट उभ्या व एका आडव्या पातळीस अनुसरून तो सहज फुटतो व फुटून तयार झालेली पृष्ठे जवळजवळ सपाट असतात. या दोहोंपैकी एका दिशेने दगड अधिक सुलभपणे फुटतो व त्याचे भग्न पृष्ठ अधिक सपाट असते. या दिशेला अनुपाट (रिफ्ट) व उरलेल्या दिशेला उत्पाट (ग्रेन) म्हणतात. अनुपाट व उत्पाट यांच्याशी लंब असलेल्या दिशेने दगड फोडला, तर त्या दिशेस अनुसरून फुटलेली पृष्ठे खडबडीत असतात. अशा खडकांतल्या क्वॉर्ट्‍‌झाच्या कणांत द्रवाने भरलेल्या ज्या वायुपोकळ्या असतात त्या इतस्ततः विखुरलेल्या नसून काही समांतर अशा पातळ्यांत त्यांची दाटी झालेली असते. क्वॉर्ट्‍‌झातील त्याच पातळ्यांत काही अतिसूक्ष्म चिराही असतात व त्या शेजारच्या फेल्स्पारांच्या कणांत किंचित शिरलेल्या असतात. वायुपोकळ्यांची दाटी व चिरा असणाऱ्या पातळ्या दुर्बल असतात व त्यांना अनुसरून खडक सहज भंग पावतात. वायुपोकळ्यांची अधिक दाटी असलेल्या पातळ्यांत अनुपाट व कमी दाटी असलेल्या पोकळ्यांत उत्पाट असतो.

शिलारस घन होण्याच्या अखेरच्या अवस्थेत क्वॉर्ट्‍‌झाचे स्फटिक तयार होत असल्यामुळे त्यांच्यात द्रवाने भरलेल्या पोकळ्या तयार होतात. या अवस्थेत शिलारसावर भूकवचीय दाब पडत असला म्हणजे द्रवाने भरलेल्या पोकळ्यांची वर वर्णन केल्यासारखी नियमित व्यवस्था होते व खडकात अभ्रकाच्या चकत्या असल्या, तर अनुपाटात समांतर अशी मांडणी होते. खडक घन झाल्यावर भूकवचीय दाब चालू राहिला म्हणजे क्वॉर्ट्‍‌झाच्या कणात चिरा तयार होतात. अनुपाट व उत्पाट हे चादरी किंवा प्रवाही संरचनांहून भिन्न असतात पण अनुपाटाची तले ही खडकातील अभ्रकाच्या चकत्यांना व फेल्स्पारांच्या बृहत्स्फटांच्या अधिक लांब अक्षांना समांतर असतात.

भारताच्या द्वीपकल्पाचे जवळजवळ पाऊण क्षेत्र ⇨आर्कीयन  कालीन खडकांनी व्यापलेले आहे. तसेच भारताच्या पुष्कळ भागांत उदा., राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू इत्यादींत कमीअधिक रूपांतरण झालेले ग्रॅनाइट म्हणजे ग्रॅनाइट पट्टिताश्म आहेत व प्राचीन काळापासून ते बांधकामासाठी वापरले जात आहेत. मध्य हिमालयातही ग्रॅनाइट व ग्रॅनाइट पट्टिताश्मांच्या प्रचंड राशी आहेत, पण त्या वर उल्लेख केलेल्या खडकांपेक्षा वेगळ्या काळातील आहेत. महाराष्ट्रातील थोड्याच क्षेत्रात, रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेकडील कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ले इ. भागांत व गोव्यात ग्रॅनाइट पट्टिताश्म आहेत.

पहा : अग्निज खडक बॅथोलिथ.

संदर्भ : Turner, F. J. Verhogen, J. Igneous and Metamorphic Petrology, New York, 1960.

केळकर, क. वा.