ग्राउझ : ग्राउझ पक्षी टेट्राओनिडी पक्षिकुलातील आहेत. सामान्यतः या पक्षिकुलातील सगळ्याच पक्ष्यांना ग्राउझ हे नाव दिले जाते. उत्तर गोलार्धाच्या उत्तर भागातील अरण्ये, गवताळ प्रदेश, टंड्रा (शेवाळ व शैवाके म्हणजे दगडफुले यांची दाट वाढ झालेला) प्रदेश इ. ठिकाणी ग्राउझ राहतात. यांचे सहा वंश उत्तर अमेरिकेत, चार यूरोप, आशिया व आफ्रिका यांत आणि एक परिध्रुवीय (ध्रुवाभोवतालच्या) प्रदेशात आढळतो.
हे मध्यम ते मोठ्या आकारमानाचे पक्षी असून गुबगुबीत असतात. लांबी ३o—८९ सेंमी. व वजन o·५ —७ किग्रॅ. असते. पाय मजबूत आणि पिसांनी झाकलेले असतात घोट्यांवरदेखील पिसे असतात. हिवाळ्यात पायांच्या बोटांवरील खवले बाजूने वाढून मोठे होतात यामुळे याला बर्फावरून चालताना त्रास होत नाही. पंख आखूड व गोलसर असतात हे पक्षी वेगाने उडतात पण ते फार वेळ उडू शकत नाहीत. चोच आखूड आणि मजबूत असते. नाकपुड्या पिसांनी झाकलेल्या असतात. पिसारा निरनिराळ्या रंगांचे ठिपके असलेला पण चकचकीत नसतो. काही ग्राउझांच्या पिसाऱ्याच्या रंगात ऋतुमानाप्रमाणे बदल होतो.
ग्राउझ ज्या निवासस्थानात राहणारा असेल त्याच्याशी जुळणारा त्याच्या शरीराचा रंग असतो. त्यामुळे तो चटकन दिसून येत नाही व त्याचे शत्रूपासून संरक्षण होते. गवताळ प्रदेशात राहणाऱ्या जातीचा रंग तपकिरी, पिवळा किंवा करडा असतो अरण्यात राहणारे ग्राउझ गडद तपकिरी, करडे वा काळे असतात टंड्रामध्ये राहणारे हिवाळ्यात पांढरे आणि उन्हाळ्यात तपकिरी व करडे असतात. ⇨मायावरणाचे हे एक चांगले उदाहरण आहे.
ग्राउझ मुख्यतः जमिनीवर वावरणारा पक्षी असला, तरी अरण्यात राहणारे ग्राउझ वृक्षवासीही असतात. बी, पाने मृदू फळे व रोपांचे धुमारे हे यांचे उन्हाळ्यातले भक्ष्य होय हिवाळ्यात ते कळ्या आणि लोंबते फुलोरे खातात.
काही जातींत नर आणि मादी यांत स्पष्टपणे रंगांचे फरक दिसून येतात. बहुतेक जातींच्या नरांच्या डोळ्यांच्या वर तांबड्या, पिवळ्या, हिरव्या अथवा नारिंगी रंगाच्या गलुली (मांसल भाग) असतात. निळ्या ग्राउझासारख्या काही ग्राउझांच्या नरांच्या मानेवर चकचकीत रंगाचे आणि फुगवून खूप मोठे करता येणारे वायुकोश (वायूच्या पिशव्या) उत्पन्न होतात.
ग्राउझाचे घरटे म्हणजे जमिनीवर एक लहानसा खळगा असतो. त्याला पालापाचोळ्याचे अस्तरही बेताचेच असते. मादी व घरट्यात ४—१२ अंडी घालते अंडी उबविण्याचे व पिलांना भरविण्याचे काम मादीच करते. या पक्ष्यांची शिकार करतात.
कर्वे, ज. नी.
“