ग्रॅन्युलाइट : उच्च तापमानाच्या तसेच उच्च व सर्वत्र समान दाबाच्या (द्रवस्थितिक) परिस्थितीत तयार झालेला रूपांतरित खडक. याचे निरनिराळे खनिज संघटन असणारे अनेक प्रकार आढळतात, पण सर्वसामान्य प्रकार मुख्यतः क्वार्ट्झ व फेल्स्पार या खनिजांच्या कणांचे बनलेले असतात. काही ग्रॅन्युलाइटांत पायरोक्सीन किंवा गार्नेट ही खनिजे विपुल प्रमाणात असतात. काही ग्रॅन्युलाइटांत सिलिमनाइट, कायनाइट, हिरवे स्पिनेल यांसारखी खनिजे अल्प प्रमाणात असतात.
यातील खनिजांचे कण जवळजवळ सारख्याच आकारमानाचे असून ते एकमेकांत गुरफटलेले असतात. कित्येक ग्रॅन्युलाइटांची संरचना पट्टेदार असते. अशांपैकी काहींत भिन्नभिन्न खनिज संघटन असलेले पट्टे आलटून पालटून असतात, तर इतर कित्येक ग्रॅन्युलाइटांतील क्वॉर्ट्झाचे कण चापट भिंगासारखे किंवा ओघळांसारखे झालेले असतात. भिंगांची चापट पृष्ठे किंवा ओघळांच्या लांबट दिशा ही एकमेकांस जवळजवळ समांतर असतील अशी कॉर्ट्झाच्या कणांची वाढ झालेली असते. त्यामुळे ते पट्टेदार झालेले असतात.
कॅनडा, स्कँडिनेव्हिया, पश्चिम आफ्रिका, अंटार्क्टिका या व इतर प्रदेशांतील ज्या क्षेत्रात आर्कीयन खडक उघडे पडलेले आहेत अशा क्षेत्रातील कित्येक भागांत, उदा., भारताच्या द्वीपकल्पातील तमिळनाडू व बंगाल यांच्या काही भागांत, ग्रॅन्युलाइट आढळतात. सॅक्सनीतील ग्रॅन्युलाइट प्रसिद्ध आहेत.
ठाकूर, अ. ना.