ग्रसनी : (घसा, फॅरिंक्स). अन्नमार्गाचा जो भाग नासागुहा (नाकातील पोकळी). मुख व स्वरयंत्र (कंठ) यांच्या मागच्या भागी असतो त्याला ग्रसनी म्हणतात. अन्नाशिवाय श्वसनक्रियेच्या वेळी हवा आत बाहेर पडण्याचा मार्गही ग्रसनीच्या मुख–ग्रसनी व नासा–ग्रसनी या भागांतून जातो. ग्रसनीचा आकार शंकूसारखा असून निमुळता भाग खालच्या बाजूस असतो. तिची लांबी १२ ते १४ सेंमी. असून वरचा भाग ३·५ सेंमी. रूंद व खालचा भाग १·५ सेंमी. रुंद असतो. करोटीच्या (मेंदू असलेल्या कवटीच्या भागाच्या) तळापासून मानेतील सहाव्या कशेरुकापर्यंत (मणक्यापर्यंत) ग्रसनी असते. तिचा वरचा भाग नेहमी उघडा असतो, तर खालचा भाग फक्त घास गिळावयाच्या वेळीच उघडतो. ग्रसनीची अग्रभित्ती अपूर्ण असून तिच्यात वरून खाली अनुक्रमे पश्च नासाछिद्रे (नाकाची पाठीमागची भोके), मुखगुहा (तोंडाची पोकळी) आणि स्वरयंत्र ही असतात. ग्रसनीची पश्चभित्ती स्नायूंची बनलेली असते. मानेतील कशेरुका, त्यापुढील स्नायू आणि ग्रसनीची पश्चभित्ती यांमध्ये अवकाशी (पेशींची सैलसर रचना असलेल्या आधार देणाऱ्या) ऊतकाचा (समान रचना आणि कार्य असलेल्या पेशींच्या समूहाचा) थर असतो. ग्रसनीच्या पार्श्व (बाजूच्या) भित्तीत प्रत्येक बाजूस कर्ण–ग्रसनी नलिकेचे (तोंड, नाक, घसा व मध्यकर्ण जोडणाऱ्या नलिकेचे) छिद्र असते. या नलिकेमधून हवा मध्यकर्णापर्यंत जाऊ शकते. काहीसे त्रिकोणाकृती असलेले हे छिद्र खालच्या नासाशुक्तिकास्थीच्या (नाकाच्या पोकळीतील तीन पातळ हाडांच्या पट्ट्यांपैकी खालच्या) टोकांपासून १ ते १·५ सेंमी. अंतरावर असून थोडे खालच्या पातळीवर असते. या छिद्राच्या वर आणि मागे जो उंचवटा असतो. तो कर्ण–ग्रसनी नलिकेच्या उपास्थीपासून (मजबूत व लवचिक ऊतकापासून, कूर्चेपासून) बनलेला असतो व त्यामुळे थोडासा कठीणही असतो. नासाछिद्रातून, नासागुहेच्या तळावरून या त्रिकोणी छिद्रातून तपासणीसाठी लवचिक नळी सरकवता येते.
विभाग : ग्रसनीचे तीन विभाग आहेत : (१) नासा-ग्रसनी, (२) मुख-ग्रसनी व (३) स्वरयंत्र ग्रसनी.
(१) नासा-ग्रसनी : नाकाच्या पश्चभागी व मृदुतालूच्या (तोंडातील छताच्या मऊ भागाच्या) वर असलेल्या ग्रसनी भागास नासा-ग्रसनी म्हणतात. हा भाग नेहमी उघडा असतो कारण त्याच्या मृदुतालूशिवाय इतर भित्ती अचर (न हलणाऱ्या) असतात. दोन पश्च नासाछिद्रे याच भागात असतात. प्रत्येक छिद्र २५ मिमी. X १२·५ मिमी. आकाराचे असते. नासापटालाचा (नाकाची पोकळी विभागणाऱ्या उभ्या पडद्याचा) पश्च भाग दोन्हींच्या मधे असतो. नासा-ग्रसनी विभागात काही ठिकाणी लसीकाभ ऊतकाचे (विशिष्ट पांढऱ्या पेशींचा समूह असलेल्या जाळीदार ऊतकाचे) गोळे बनलेले असतात, त्यांना ग्रसनी-गिलायू (टॉन्सिल), नलिका-गिलायू व नासा-गिलायू अशी नावे असून या सर्वाना मिळून व्हाल्डियर यांचे (व्हाल्डियर या शास्त्रज्ञांच्या नावावरून) वलय म्हणतात. हे वलय सूक्ष्मजंतू संक्रामणापासून संरक्षण देण्याचे कार्य करते.
(२) मुख-ग्रसनी : मृदुतालूच्या खालपासून अधिस्वरद्वाराच्या (स्वरयंत्राच्या प्रवेशमार्वरील झाकणासारख्या संरचनेच्या) वरच्या कडेपर्यंतच्या ग्रसनी भागास मुख-ग्रसनी म्हणतात. मुख आणि ग्रसनी यांमध्ये असलेला हा अरुंद भाग (सेतुमार्ग) जिव्हेच्या पश्चभागी असतो. त्याच्या दोन्ही बाजूंस दोन वल्या (घड्या) असतात. त्यांपैकी पुढील वलीस तालू–जिव्हा वली व मागील वलीस तालु–ग्रसनी वली म्हणतात. दोन्ही वल्यांच्या मध्ये जिव्हेच्या कडेजवळ जी त्रिकोणाकृती पोकळी असते तिला गिलायु-गुहा म्हणतात. जिवंत माणसाचा मुख-ग्रसनी भाग व गिलायु-गुहेतील गिलायु सुजलेल्या असल्यात त्याही संपूर्ण दिसतात.
(३) स्वरयंत्र ग्रसनी : अधिस्वरद्वाराच्या वरील कडेपासून मुद्रिका उपास्थीच्या (श्वासनालाच्या वर असलेल्या अंगठीच्या आकाराच्या मजबूत व लवचिक कूर्चेच्या) खालच्या कडेपर्यंतच्या ग्रसनी भागास स्वरयंत्र ग्रसनी म्हणतात. हा भाग स्वरयंत्राच्या पश्चभागी व अवतीभोवती असतो. त्याच्या अग्रभित्तीत वरून खाली अनुक्रमे स्वरयंत्र प्रवेशिका, कुंभ उपास्थींचा (स्वरयंत्रामागे असलेल्या दोन कूर्चाचा) पश्चभाग आणि मुद्रिका उपास्थी असतात. कुंभ-स्वरद्वार वलीच्या पार्श्व बाजूस असलेल्या लहान गुहेसारख्या ग्रसनी भागास पलांडुरूप (कांद्याच्या आकारासारखी) गुहा म्हणतात. या गुहेच्या श्लेष्मकला अस्तराखालून (बुळबुळीत पातळ पटलाखालून) अंतस्थ स्वरयंत्र तंत्रिका (मज्जा) जाते. गुहेत अडकलेला एखादा बाह्यापदार्थ काढताना या तंत्रिकेस इजा न होण्याची काळजी घ्यावी लागते. स्वरयंत्र ग्रसनीच्या पश्चभागी मानेतील तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा हे कशेरुक असतात.
रचना : ग्रसनीची रचना तीन थरांची असते.
(१) बाह्य किंवा स्नायु- थर : रेखांकित (पट्टे असलेल्या) स्नायूंचा हा थर असून ते स्नायू ऐच्छिक असतात.
(२) मध्य किंवा तंतुमय थर : बाहेरील स्नायु–थर व आतील श्लेष्मकला थर या दोहोंमध्ये तंतुमय थर असतो. हा थर करोटीच्या तळाजवळ जाड असतो व त्या ठिकाणी स्नायु-थर अपुरा असतो. तंतुमय थराच्या या भागाला ‘ग्रसनी करोटिस्तल प्रावरणी ’ म्हणतात. त्याचा वरचा भाग करोटीच्या पश्च कपालास्थीला (कानशिलाच्या हाडांना) व शंखास्थीला (मध्य व अंतर्कर्ण ज्यात आहेत असे करोटीच्या तळाचे हाड) जोडलेला असतो. वरून खाली हा थर विरळ होत जातो. मागच्या बाजूस मध्य रेषेत त्याचा जो उभा व जाड भाग असतो तो ‘ग्रसनी संधिरेखा’ म्हणून ओळखला जातो व त्या ठिकाणी ग्रसनीचे समाकर्षणी स्नायू (वरचा, मधला व खालचा असे प्रत्येक बाजूस असणारे व ग्रसनीच्या आकुंचनाच्या वेळी कार्यान्वित होणारे स्नायू) जोडलेले असतात.
(३) अंतःस्तर किंवा श्लेष्मकला थर : ग्रसनीची श्लेष्मकला ही संयोजी (जोडणाऱ्या) ऊतकाचा जाड थर, स्थितिस्थापक ऊतकाची जाळी व उपकला (अस्तरासारखे पातळ पटल) मिळून बनलेली असते. ती मुख, नासा गुहा, कर्ण-ग्रसनी नलिका आणि स्वरयंत्र यांच्या श्लेष्मकलेशी सलग असते. नासा-ग्रसनीतील उपकला स्तंभाकार लोमश (केस असलेल्या) पेशींची बनलेली असते. मुख-ग्रसनी व स्वरयंत्र-ग्रसनीतील उपकला बहुस्तरीय शल्की (खवलेदार) पेंशींची बनलेली असते. ग्रसनीच्या वरच्या भागात व कर्ण-ग्रसनी नलिकेच्या छिद्राजवळ श्लेष्मग्रंथी भरपूर असल्यामुळे श्लेष्मकलेचा नासा-ग्रसनीतील भाग नेहमी ओलसर राहतो.
रक्तपुरवठा : आनन (मुख) रोहिणीच्या आरोही ग्रसनी रोहिणी, आरोही तालू रोहिणी व गिलायू–रोहिणी या शाखा व जिव्हा रोहिणीच्या शाखा ग्रसनीस शुद्ध रक्ताचा पुरवठा करतात. अशुद्ध रक्त ग्रीवा (मानेतील) नीलेतून व आनन नीलेतून वाहून नेले जाते.
तंत्रिका पुरवठा : जिव्हा-ग्रसनी तंत्रिका, प्राणेशा (मेंदूपासून निघणारी दहावी) तंत्रिका आणि अनुकंपी (स्वतंत्रपणे कार्य करणारी) तंत्रिका यांच्या शाखा मिळून बनलेल्या तंत्रिका जालास ‘ग्रसनी तंत्रिका जाल ’ म्हणतात. ग्रसनीतील मुख्य संवेदी तंत्रिका जिव्हा–ग्रसनी तंत्रिका व प्राणेशा तंत्रिका या असतात.
गिळण्याची क्रिया : अन्नपदार्थ गिळण्याच्या क्रियेचे वर्णनाच्या सुलभतेकरिता तीन टप्पे केलेले असले, तरी प्रत्यक्षात ती एक सलग क्रियाच असते. पहिला टप्पा ऐच्छिक असतो व नंतरचे दोन अनैच्छिक असतात. पहिल्या टप्प्यात घास मुखातून ग्रसनीत जातो. दुसऱ्यात ग्रसनीतून ग्रसिकेपर्यंत (ग्रसनीपासून जठरापर्यंतच्या स्नायू व कला यांनी बनलेल्या अन्नमार्गापर्यंत) व तिसऱ्यात ग्रसिकेतून जठरात जातो.
पहिला टप्पा : जिभेच्या शेंडा कठीण तालूवर दाबला जातो. तिचा पृष्ठभाग पुढून मागे दाबत गेल्यामुळे मुखातील घास मुख-ग्रसनी सेतुमार्गातून मागे ढकलला जातो. त्याचवेळी मृदुतालू वर उचलली जाऊन नासा-ग्रसनी भाग बंद होतो व त्यामुळे घास त्या भागात शिरू शकत नाही. त्याच वेळी मुखाचा तळ, कंठास्थी आणि स्वरयंत्र वर उचलली जातात. या टप्प्यात जिव्हेचे कार्य मुख्य असते. जिव्हेची हालचाल करणारे स्नायू या पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने भाग घेतात. तालू–ग्रसनिकांच्या (मृदुतालूतील स्नायूंच्या) आंकुचनामुळे मुख-ग्रसनी सेतूमार्ग बंद होतो व घसा मुखात परत जाऊ शकत नाही.
दुसरा टप्पा : घास ग्रसनीच्या खासच्या भागाकडे नेण्याकरिता स्नायूंचे आकुंचन आणि शैथिल्य मदत करते. घासाच्या खालचा स्नायू शिथिल पडतो, तर वरचा आकुंचन पावतो म्हणून घास खाली ढकलला जातो.
तिसरा टप्पा : घास ग्रसनीच्या अगदी खालच्या भागात येताच ग्रसनीचे तोंड सतत बंद ठेवणारे स्नायू शिथिल पडतात व तो ग्रसिकेत शिरतो. त्यानंतर ग्रसिकेच्या क्रमसंकोचामुळे व गुरूत्वाकर्षणामुळे तो जठरात पोहोचतो. शरीर उभ्या स्थितीत असताना वरील दोन्ही क्रिया मिळून घास जठराकडे नेला जातो. उताणे पडून (उदा., आजारपणात अंथरुणावर पडून) गिळताना फक्त क्रमसंकोचामुळेच घास ढकलला जात असल्यामुळे गिळावयास अधिक वेळ लागतो.
विकार : गिळण्याच्या क्रियेत अडथळा उत्पन्न होणे (कष्ट गिलन) हे अनेक विकारांचे लक्षण असू शकते. यांपैकी काही प्रमुख विकार म्हणजे ग्रसनीशोथ (ग्रसनीची दाहयुक्त सूज), गिलायुशोथ, ग्रसनी कर्करोग, घटसर्प, ग्रसनी पश्च विद्रधी (गळू), ग्रसनी अर्बुदे (पेशींच्या अत्याधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या व शरीरास निरुपयोगी असणाऱ्या गाठी), उन्माद (हिस्टेरिया) इत्यादी. या विकारांपैकी ग्रसनीशी संबंधीत असलेल्या विकारांची माहिती खाली दिली आहे.
(१) ग्रसनीशोथ : याचे तीव्र व चिरकारी (दीर्घकालीन) असे दोन प्रकार आढळतात. तीव्र प्रकार बहुतेक स्फोटक (कांजिण्या, गोवर इ. पुरळ आणणाऱ्या) ज्वरांमध्ये आढळतो. या शोथाला–श्वसनमार्गाच्या वरील शोथाला–श्वसनमार्गाच्या वरील भागातील सूक्ष्मजतूंचे संक्रामण कारणीभूत असते.
चिरकारी प्रकार हा अतिकोरड्या, अतिगरम व अशुद्ध हवेमुळे उद्भवतो. मद्यातिरेक व धूम्रपानामुळे तो टिकून राहतो. गिलायू काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेच्या वेळी मृदुतालूस इजा झाल्यास नासा–ग्रसनी बंद होण्याची क्रिया न झाल्यामुळे नाकातील सूक्ष्मजंतूचे होणारे संक्रामण हे या प्रकारच्या शोथाचे कारण असू शकते. घशाला कोरड पडणे, घसा खवखवणे ही या प्रकारच्या शोथाची लक्षणे असून ती मधुमेह आणि ग्रसनी कर्करोग यांतही आढळतात.
(२) ग्रसनी पश्च विद्रधि : याचे तीव्र आणि चिरकारी असे दोन प्रकार आहेत.
तीव्र प्रकारात पूर्व–कशेरुक (मणक्यापुढील) प्रावरणी (संयोजी ऊतकाचे आवरण) आणि ग्रसनीची पश्चभित्ती यांमध्ये पूसंचय होतो. चिरकारी प्रकारात प्रावरणीच्या मागे पूसंचय होतो. लहान मुलांत तीव्र प्रकार प्रामुख्याने आढळतो. चिरकारी प्रकार मानेतील कशेरुकांच्या क्षय रोगात आढळतो.
(३) ग्रसनी अर्बुदे : यांचे दोन प्रकार आहेत : सौम्य व मारक नासा-ग्रसनीत वाहिनी-तंतुमय अर्बुद होते. ते सौम्य गणले जात असले, तरी हाडावर दाब पडून हाडाचा मोठ्या प्रमाणावर नाश होण्याचा धोका असतो. पुरुषांमध्ये यौवनारंभी वयात हे अर्बुद आढळते. मुख-ग्रसनीतही अशाच प्रकारचे अर्बुद आढळते.
चीन, जपान आणि मलेशिया या देशांत नासा-ग्रसनीत होणाऱ्या मारक अर्बुदांचे प्रमाण गर्भाशयाच्या ग्रीवेच्या (मानेसारख्या भागाच्या) कर्करोगाखालोखाल आढळते.
मुख-ग्रसनीत होणारा कर्करोग व्रणासारखा असून तो पार्श्व किंवा पश्च भित्तीवर उद्भवतो. रोग बराच बळावेपर्यंत वेदनारहित असतो.
स्वरयंत्र-ग्रसनीत होणाऱ्या कर्करोगाचे चार प्रकार असून त्यांचे प्रमाण सर्वसाधारणतः पुढीलप्रमाणे असते : (१) स्वरयंत्र निगडीत २०%, (२) पलांडुरूप गुहेतील ४० %, (३) पार्श्वभित्ती १२% आणि (४) मुद्रिका-उपास्थीचा पश्चभाग २८%.
निदानाकरिता अप्रत्यक्ष वा प्रत्यक्ष स्वरयंत्र दर्शकीय तपासणी, जीवोतक परीक्षा (जिवंत शरीरातील ऊतक काढून त्याची सूक्ष्मदर्शकीय तपासणी) उपयुक्त असतात. बाह्य किरणोत्सर्जन (विशिष्ट पदार्थातून बाहेर पडणाऱ्या कणांचा वा किरणांचा उपचार) आणि शस्त्रक्रिया हे उपाय योजितात.
संदर्भ : 1. Bailey, H. Love M. Charnley, J. Clealand, W. P. A short Practice of Surgery, London, 1962.
2. Hollinshed, W. H. Textbook of Anatomy, New York, 1962.
3. Reading, P. Common Diseases of Ear, Nose, Throat, London,1962.
भालेराव, य. त्र्यं.
“