जनन ग्रंथि : जननकोशिका (युग्मके) ज्या ग्रंथींत तयार होतात त्या ग्रंथीना ‘जनन ग्रंथी ’ म्हणतात.

अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांपैकी खालच्या वर्गातील काही प्राण्यांमध्ये (उदा., हायड्रोझोन) जनन ग्रंथी तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. उच्च वर्गात त्या कायम स्वरूपी असतात. काही अपृष्ठवंशी प्राण्यांत (उदा., ऑलिगोकीट कृमी व जळू) पुरुष आणि स्त्रीजन्य जनन ग्रंथी एकाच प्राणिशरीरात असतात. स्पंजामध्ये स्वतंत्र जनन ग्रंथी नसतात, परंतु त्यांच्या शरीर भित्तीमध्ये ॲमिबोसाइट नावाच्या कोशिकासमूहापासून जनन ग्रंथी बनतात. कंटकचर्मी प्राण्यांमध्ये (एकायनोडर्म उदा., तारामीन) जनन ग्रंथी एका अवयवापासून सागराच्या पाण्यात लोंबकळत असतात.

पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये जनन ग्रंथींची जोडी असते. त्या युग्मक उत्पादनाशिवाय हॉर्मोन (उत्तेजक स्त्राव) उत्पादनाचेही कार्य करतात. सायक्लोस्टोम प्राण्यांमध्ये एकेकच जनन ग्रंथी असते. बहुतेक स्त्रीलिंगी पक्षी, स्त्रीलिंगी सुसरी, काही पुल्लिंगी सरडे आणि काही स्त्रीलिंगी वटवाघळांमध्ये एकच जनन ग्रंथी असते.

मानवांमध्ये पुरुषांतील ⇨वृषण  आणि स्त्रीमधील ⇨अंडकोष  या जनन ग्रंथी आहेत. त्यांची जोडी असते. वृषणांपासून टेस्टोस्टेरोन हे प्रमुख लैंगिक हॉर्मोन व शुक्राणू तयार होतात. अंडाशयापासून इस्ट्राडिऑल, प्रोजेस्टेरोन व रिलॅक्झीन ही हॉर्मोने व अंड  तयार होतात. या ग्रंथीचे वैशिष्ट्य असे की, इतर ग्रंथीप्रमाणे त्यांचे शरीरातील स्थान, रचना आणि कार्य स्त्री-पुरुषात सारखे नसते. या ग्रंथीची कार्ये स्त्री व पुरुषामध्ये भिन्न असली, तरी त्यांची उद्दीष्टे समानच असतात : (१) योग्य अशी स्त्री-व पुं-बीजे (युग्मके) निर्माण करणे, (२) वयात येण्याच्या वेळी आवश्यक अशा लैंगिक अवयवांचा व इंद्रियांचा विकास करणे व (३) गौंण लैंगिक लक्षणे उत्पन्न करणाऱ्या हॉर्मोनांचे उत्पादन करणे.

पहा : अंतःस्त्रावी ग्रंथि हॉर्मोने.

आपटे, ना. रा. भालेराव, य. त्र्यं.