गोविंददास चक्रवर्ति : (सोळावे शतक, उत्तरार्ध). पदकर्ते बंगाली वैष्णव कवी. गोविंददास कविराज यांचे हे समकालीन. काहींच्या मते हे गोविंददास अठराव्या शतकात होऊन गेले. त्यांच्या पदावलीत गोविंददास कविराजांच्या बऱ्याच पदावली मिसळलेल्या आढळतात. गोविंददास चक्रवर्ती यांनी आपली पद्यरचना ब्रजबुलीत न करता मुख्यत्वेकरून बंगालीत केली, हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य. कालिदामंगल हे त्यांचे बृहत् गीतिकाव्य. या काव्याचे (१) वृत्रासुरवध व देवराज्यात देवीमाहात्म्याचा प्रचार, (२) इंद्राचे अहल्याहरण, पापभोग व देवीकृपेने मुक्तता, (३) महिषासुरवध व शुंभनिशुंभ, (४) विक्रमादित्याचे आख्यान आणि (५) विद्यासुंदर असे पाच भाग आहेत.
गोविंददासांच्या काव्यात छंदांची विविधता आणि अधूनमधून रागरागिण्यांची योजना आढळते. काही स्थळी ब्रजबुलीही आढळते.
सेन, सुकुमार (बं.) कमतनूरकर, सरोजिनी (म.)