गौडपादाचार्य : (इसवी सनाचे सातवे शतक सामान्यतः). अद्वैत वेदान्ताचा पाया घालणारे तत्त्वज्ञ. गौडपादाचार्य यांच्या जीवनासंबंधी निश्चित स्वरूपाची माहिती मिळू शकत नाही. आद्यशंकराचार्यांचे गुरू गोविंदभगवत्पाद यांचे गुरू गौडपादाचार्य होते, असे परंपरेने मानले जाते. मांडूक्योपनिषत्कारिकांवरील भाष्याच्या अखेरीस शंकराचार्यांनी गौडपादांचा ‘परमगुरू’ या शब्दाने निर्देश केला आहे. भाष्यातील या अंतर्गत पुराव्यावरून पाहता, गौडपादाचार्य इसवी सनाच्या सातव्या शतकात शंकराचार्यांपूर्वी होऊन गेले असावेत. त्यांच्या नावातील ‘गौड’ या शब्दावरून ते मूलतः गौडदेशीय, किमानपक्षी गौडवंशीय असावेत. त्यांची वसती कुरुक्षेत्र येथे असावी. बद्रिकाश्रमात त्यांच्यावर ईश्वरानुग्रह झाला. अशी आख्यायिका आहे.
गौडपादाचार्यांनी अथर्ववेदीय मांडूक्योपनिषदावर एकूण २१५ कारिका लिहिल्या आहेत. हा कारिकाग्रंथ गौडपादकारिका किंवा आगमशास्त्र या नावाने प्रसिद्ध आहे. या कारिका ‘आगम’, ‘वैतथ्य’, ‘अद्वैत’ आणि ‘अलातशांति’ अशा चार प्रकरणांत विभागल्या आहेत. पहिले २९ कारिकांचे आगम प्रकरण म्हणजे मांडूक्योपनिषदावरील टीका आहे आणि पुढील तीन प्रकरणे ही स्वतंत्र रचना आहे. गौडपादाचार्यांनी आपले प्रतिपादन श्रुती, तर्क आणि अनुभव यांच्या आधारे केले आहे. त्यांच्या मते उपाधिपरत्वे परमात्म्याच्या चार अवस्था होतात. जाग्रदावस्थेत बाह्य विषयांचा अनुभव घेणारा तो ‘विश्व’ होय. स्वप्नाच्या अवस्थेत मनात राहणारा तो ‘तैजस’ होय.सुषुप्ति-अवस्थेत हृदयाकाशात राहणारा ‘प्राज्ञ’ होय. केवल, नित्य, सर्वव्यापी परमात्मा हा ‘तुर्य’ होय. यांपैकी पहिल्या तीन अवस्था ॐकारातील अनुक्रमे अ, उ आणि म् या वर्णांनी द्योतित होतात. मांडूक्योपनिषदात ॐकाराचे स्वरूप वर्णिले आहे. अद्वैत वेदान्तासंबंधी गौडपादाचार्यांचा प्रमुख सिद्धांत म्हणजे अजातिवाद हा होय. त्यांच्या मते सांख्यांचा सत्कार्यवाद आणि न्यायवैशेषिकांचा असत्कार्यवाद वा आरंभवाद हे दोन्हीही असिद्ध आहेत. कार्य हे सत् असेल तर त्याला कारणाची आवश्यकता नाही जे आहे ते उत्पन्न झाले, असे म्हणणे शक्य नाही. कार्य हे असत् असेल तर ते वंध्यापुत्राप्रमाणे उत्पन्नच होणार नाही. या दोन्ही विकल्पांवरून ‘अजाति’ (जे नाही ते उत्पन्न होत नाही, असा सिद्धांत) सिद्ध होते (का. ४·४). गौडपादाचार्यांनी अद्वैताच्या सिद्धांतासाठी बृहदारण्यक, छांदोग्य, ईश, कठ आणि तैत्तिरीय या उपनिषदांतील आणि भगवद्गीतेतील वचने आधार म्हणून घेतली आहेत. गौडपादांनी बौद्धमताचा सूक्ष्म अभ्यास केला आणि अद्वैत सिद्धांत व बौद्धमत यांत फरक आहे, असे दाखवून दिले. अद्वैत सिद्धांताची मूलभूत आणि तर्कशुद्ध मांडणी करणारे पहिले तत्त्वज्ञ गौडपादाचार्य होत. या पायावर पुढे आद्य शंकराचार्यांनी विस्तृत इमारत रचली.
सांख्यकारिकाभाष्य, उत्तरगीतावृत्ति, श्रीविद्यारत्नसूत्र, सुभगोदय, दुर्गासप्तशती आणि नृसिंहोत्तरतापिन्युपनिषद्भाष्य हे ग्रंथ गौडपादाचार्यांनी रचले, असे म्हणतात. त्यांच्या मांडूक्योपनिषत्कारिका पुण्याच्या आनंदाश्रम ह्या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या आहेत (१८९०).
संदर्भ : 1. Karamarkar, R. D. Gaudapadakarika, Poona, 1953.
2. Mahadevan, T. M. P. Gaudapada, A Study in Early Advaita, Madras, 1952.
काशीकर, चिं. ग.