गोस्वामी, हेमचंद्र : (८ जानेवारी १८७२–२ मे १९२८). प्राचीन असमिया साहित्याचे गाढे अभ्यासक, इतिहासकार, संपादक व कवी. जन्म शिवसागर जिल्ह्यातील गौरांग सत्र येथे. सुरुवातीचे शिक्षण नौगाँग येथे. तेथे गुणाभिराम बरुआ, रत्नेश्वर महंत, पद्महास गोस्वामी इ. तत्कालीन प्रसिद्ध साहित्यिकांचा सहवास त्यांना लाभला. त्यामुळे त्यांना साहित्याची गोडी लागली व लेखनाची प्रेरणाही मिळाली. नंतर कलकत्ता येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ते असमिया भाषा व साहित्यसुधार मंडळाचे क्रियाशील सदस्य झाले. ते पदवीधर होऊ शकले नाहीत तथापि अंगच्या गुणांमुळे एक कार्यक्रम उच्च प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी काम केले.
कलकत्ता येथे शिकत असताना त्यांनी ⇨चंद्रकुमार आगरवाला व ⇨लक्ष्मीनाथ बेझबरुआ यांच्या मदतीने असमिया साहित्याला वाहिलेले जोनाकि (१८९०) हे मासिक सुरू केले. जोनाकितून त्यांनी असमिया भाषा-साहित्याच्या इतिहासावर व विकासावर एक दीर्घ लेखमाला लिहिली. आगरवाला, बेझबरुआ आणि गोस्वामी ह्या तिघांच्या लेखनाने असमिया साहित्यात क्रांती घडून आली. इंग्लंडमधील स्वच्छंदतावादी कवींचा व कादंबरीकारांचा ह्या तिघांवर विशेष प्रभाव पडला होता.
हेमचंद्रांनी असमियात पहिल्यांदाच सुनीत, उद्देशिका (ओड) व विलापिका या प्रकारांतील यशस्वी कविता रचल्या. ते असमियातील आद्य सुनीतकार मानले जातात. फुलर झाकि (१९०७) या काव्यसंग्रहातील त्यांच्या कवितांत तारुण्यातील प्रेमभावनेचा व संवेदनशील कविमनाचा मनोज्ञ आविष्कार आढळतो. ही कविता सुबोध व स्वच्छंदतावादी आहे. नंतर मात्र हेमचंद्र इतिहास व पुरावस्तुसंशोधनाकडे वळले. आसाम सरकारने त्यांची या कामासाठी नियुक्ती केल्यावर त्यांनी आसामच्या कानाकोपऱ्यातून शेकडो प्राचीन हस्तलिखिते शोधून काढली आणि त्यांच्या जतनाची योग्य ती व्यवस्थाही केली. त्यांनी अनेक दुर्मिळ हस्तलिखिते उजेडात आणली. हस्तिविद्यार्णव व दरंगराज-वंशावलि (१९१७) यांसारख्यी प्राचीन शोभीत हस्तलिखिते, परणी असम-बुरंजी (१९२२) ही प्राचीन बखर आणि असमियातील सुरुवातीचे कथा-गीता (१९१८) व कथा-भागवत हे गद्यग्रंथ यांचा त्यांत समावेश आहे. अ डिस्क्रिप्टिव्ह कॅटलॉग ऑफ असमीज मॅन्यूस्क्रिप्ट्स (१९३०) हा अत्यंत महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथही त्यांच्याच अविरत परिश्रमाचे फळ होय. हे ग्रंथ त्यांनी संपादून व अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहून प्रसिद्ध केले. मध्ययुगीन आसाममधील अनेक कोरीव लेखांचे त्यांनी वाचन केले. कलकत्ता विद्यापीठाच्या वतीने त्यांनी असमिया साहित्यर चानेकि (सात खंड, १९२३–२९) ह्या चिरस्थायी स्वरूपाच्या ग्रंथाचे संकलन केले. त्यात असमियातील ज्ञात व अज्ञात तसेच प्राचीन आणि अर्वाचीन लेखकांच्या लेखनाचे नमुनेही दिलेले आहेत.
सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)
“