विविध पंथांचे गोसावी-बैरागी, कुंभमेळा, हरद्वार.

गोसावी-बैरागी : भारतात सर्वत्र आढळणारा हिंदू यतींचा एक वर्ग. ‘गोसाई’, ‘गुसाई’, ‘गोस्वामी’ अशाही नावांनी हा वर्ग ओळखला जातो. ही नावे ‘गोस्वामिन्’ ह्या संस्कृत शब्दापासून आली आहेत. गोस्वामिन् शब्दाचे दोन अर्थ होतात : (१) गोधनाचा मालक व (२) इंद्रियांवर ज्याचे स्वामित्व आहे असा म्हणजे जितेंद्रिय. यांतील दुसऱ्या अर्थी गोसावी हा शब्द येथे आला आहे. भारतात गोसाव्यांची संख्या बरीच आहे. विशेषतः मध्य प्रदेश, आसाम, प. बंगाल, महाराष्ट्र, राजस्थान ह्या प्रदेशांत ती अधिक आहे. बैरागी (सं. वैराग) हा शब्द व्यवहारात सर्वसामान्यपणे गोसावी ह्या अर्थी वापरला जातो. वास्तविक बैरागी हा गोसाव्यातील एक पोटभाग आहे.

वैदिक साहित्यात ‘गोस्वामी’ असे उल्लेख आढळतात. मात्र तेथे गोस्वामी म्हणजे ‘पुष्कळ गायींचा धनी’ ह्या अर्थी हा शब्द आलेला आहे. गोसावी हा एक यतींचा  वर्ग आहे तसेच ती एक जात म्हणूनही महाराष्ट्र व मध्य प्रदेश ह्या विभागांत ओळखली जाते. प्राचीन काळी यती व संन्यासी या संज्ञांत आजच्याप्रमाणे आवश्यक संबंध मानला जात नव्हता. काही यती गृहस्थाश्रमीही होते. भरद्वाज, पराशर, व्यास, गौतम, शुक, भृगू, वसिष्ठ इ. नावे गोसाव्यांच्या पूर्वपरंपरेत आढळतात. यांपैकी बहुतेक संन्यासी नसून गृहस्थ होते. दक्षप्रजापती व शंकर हे गृहस्थच होते. दक्षाचे उपनाम पर्वत होते. त्याचे पुत्र तपाच्या वेळी ‘ॐ नमो नारायणाय पुरुषाय महात्मने विशुद्धसत्त्वधीष्णाय महाहंसाय धीमही ’ हा मंत्र जपत. आजही गोसावी समाज नारायणाची पूजा करून याच मंत्राचा जप करतो असे दिसते. महाभारतातील योगिराज दत्तात्रेयही गृहस्थाश्रम आचरणारा होता. यावरून गृहस्थ साधूंची परंपरा फार प्राचीन असावी असे दिसते. महाभारतकाळात विरक्त साधूंमध्येही गृहस्थ व संन्यासी असे दोन वर्ग होते. त्यांतील संन्याशांचे कुटिचक, बहूदक, हंस व परमहंस असे चार भेद होते. रामायणातही गृहस्थी व संन्यासी तपस्व्यांचे उल्लेख आढळतात. त्यांच्यात मुंडी, दंडी व परिव्राजक असे भेद होते. बौद्ध साहित्यात यतींचे जटीलक, मुंडशावक, त्रिदंडी (तेदंडिक) व देवधार्मिक असे भेद सांगितले आहेत. जैन संघातही श्रावक व श्राविका हे घटक गृहस्थ, तर मुनि-आर्यीका किंवा श्रमण-श्रमणी हे घटक गृहत्यागी आहेत.

अलेक्झांडरच्या स्वारीच्या वेळी पंजाबात गोसाव्यांचे एक लहानसे स्वतंत्र राज्यच होते. तसेच तक्षशिलेजवळ काही नग्न साधू राहत होते. मीगॅस्थीनीझनेही भारतीय संन्याशांविषयी माहिती दिली आहे. त्यांना समाजात फार मान होता, असे तो म्हणतो. नग्न, जटाधारी, गृहस्थ यतींची तो माहिती देतो व ते पौरोहित्य, भविष्यकथन व औषधोपचार करतात असे म्हणतो. स्ट्रेबो हा ग्रीक इतिहासकारही भारतातील संन्याशांचे वर्णन करतो आणि त्यांच्या जितेंद्रियत्वाचा गौरव करतो. काही गोसावी  आद्य शंकराचार्यांचे  अनुयायी झाले. त्यांत बहुतांश गृहस्थ होते आणि त्यांचा स्त्रीपुत्रादी परिवार वाढता होता, असे राजतरंगिणीत सांगितले आहे. मठाम्नाय  ह्या ग्रंथात गोसाव्यांच्या तीर्थ, आश्रम, वन, अरण्य, गिरी, पर्वत, सागर, सरस्वती, भारती व पुरी ह्या दहा उपनामांची माहिती दिलेली आहे. ह्या दहा उपनामांवरून पृथ्वीगीर हरिगीर गोस्वामी यांनी  ‘दशनामी’ वा ‘दसनामी’ गोसाव्यांची परंपरा वेदकाळापर्यंत नेऊन पोहोचविली आहे व त्यांची गोत्रप्रवरादी माहितीही दिली आहे. गोसाव्यांतील ‘घरबारी’ वा ‘गहनबारी’ ह्या भेदाचा अर्थ ते ‘यज्ञ करणारा गृहस्थ असा देतात आणि गोसाव्यांना त्या काळी यज्ञ करण्याचा अधिकार होता, असे मत मांडतात. ही दहा उपनावे शंकराचार्यांपूर्वीपासून  रूढ आहेत. वैदिक धर्मप्रसारासाठी गोसाव्यांनी अपार परिश्रम घेतले.

गोसाव्यांत प्रामुख्याने शैव आणि वैष्णव असे दोन भेद आहेत. ⇨शंकरदेवांचे अनुयायी माधवगिरी, ब्रह्मगिरी, गोविंदगिरी आणि कुसुमगिरी ह्या गोसाव्यांनी आसामात ‘महापुरुषिया’ नावाची एक वैष्णव संप्रदाय शाखा स्थापन केली आणि चैतन्याच्या गुरुपरंपरेतील माधवेंद्रपुरी, ईश्वरपुरी ह्या गोसाव्यांनी बंगालमध्ये गौडीय वैष्णव संप्रदाय स्थापिला. ⇨दसनामी  गोसावी हे शैवपंथी असून त्यांत मठधारी व घरबारी असे दोन भेद आहेत. मठधारी गोसाव्यांची बरीच संख्या काशी व हरद्वार येथे आहे. गृहस्थ गोसावी व्यापार, शेती वगैरे व्यवसाय करतात. त्यांतील काही फार सधन आहेत. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये वैष्णव गोसावी संख्येने अधिक आहेत. गुरुपुजा हे वैष्णवपंथीय गोसाव्यांचे वैशिष्ट्य होय.

गोसाव्यांची शूर व क्रूर म्हणूनही ख्याती आहे. मौर्य काळात त्यांची लहानलहान राज्ये होती. काश्मीरच्या राजाच्या पदरीही अनेक गोसावी होते असे राजतरंगिणीत म्हटले आहे. इ.स. ३०० च्या सुमारास पंजाबात व बुंदेलखंडात परिव्राजक ब्राह्मण राजांचे राज्य असल्याचा उल्लेख आढळतो. हे राजे गोसावीच होते. बाप्पा रावळ हा गुहिलवंशीय राजाही शैवयती होता आणि तो हरितमुनी नावाच्या गोसाव्याचा शिष्य होता. गोसावी व राजपूत यांच्यातील गुरुशिष्यसंबंध आजतागायतही आढळून येतो. एकलिंगजीचे पुजारी गोसावीच आहेत. अनेक राजपूत व मराठा राजे-सरदारांच्या सैन्यात गोसाव्यांचा भरणा बराच होता. औरंगजेबाने केलेल्या अन्यायांमुळे गोसावी जिवावर उदार होऊन त्याच्याशी लढले. गोसावी शब्दाने सुरुवात होणारी अनेक गावांची नावेही आढळतात. उदा., गोसाईपूर, गोसाईगंज इत्यादी. या सर्व बाबींवरून क्षात्रवृत्ती असलेल्या गोसाव्यांची एक परंपरा असल्याचे दिसून येते. खेड्यात लहान मुलांना ‘गोसावी आला व तो पकडून नेईल’ अशी पालक भीती घालतात. पूर्वी काही गोसावी मुलांना पळवून नेण्याचे तसेच अन्य क्रूर कर्मे व दुराचार करीत अशीच माहिती मिळते. प्राचीन काळापासून गोसावी मंत्र, तंत्र, औषधी, चमत्कार इ. गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत.


गोसाव्यांत थोड्याफार आचारफरकाने अनेक पंथोपपंथ आहेत. दंडी म्हणजे दंड धारण करणाऱ्या गोसाव्यांचा एक पंथ आहे. रावणवंशी नावाच्या पंथातील लोक हातात व कमरेभोवती केसांची वलये बांधतात. वैरागी नावाचा एक वैष्णव पंथ असून हे लोक गळ्यात तुळशीमाला व कपाळावर गंधाच्या किंवा गेरूच्या दोन उभ्या रेघा देतात. मुळात गोसावी आणि बैरागी परस्परांशी गुण्यागोविंदाने वागत परंतु अकबराच्या (१५४२–१६०५) काळात त्यांच्यात वैर उत्पन्न झाले व पुढे १७६० मध्ये हरद्वार येथील कुंभमेळ्यात, गंगेत प्रथम स्नान  कोणी करावे, या निमित्ताने वाद उत्पन्न झाला. या वादाची परिणती उभय पक्षांतील लढाईत होऊन तीत १८,००० बैरागी मारले गेले असे सांगतात.

संन्यासी व बैरागी ह्या संज्ञा गोसावी-बैरागी ह्या संज्ञांप्रमाणे सर्व सामान्यतः समानार्थी वापरल्या जात असल्या, तरी त्यात अनुक्रमे शैव व वैष्णव पंथांचे अनुयायी असा अर्थ असल्याचे एच्.एच्. विल्सन यांचे मत आहे. इस्लाम धर्मातील फकीर शब्दास असलेला अर्थ हिंदू धर्मातील गोसावी, बैरागी किंवा साधू या शब्दांनी व्यक्त होतो. तसे पाहू जाता गोसावी किंवा बैरागी ह्या संज्ञा काटेकोर नाहीत व त्यांतून निश्चितपणे कुठल्याही एकाच पंथाचा बोध होत नाही. भीक्षाटन व तीर्थाटन करणाऱ्या हिंदी साधूंच्या फार मोठ्या वर्गाचा ह्या संज्ञांतून स्थूलमानाने निर्देश होतो. शैव आणि वैष्णव संप्रदायांतील अनेक पंथोपपंथांचाही गोसावी-बैरागी संज्ञेत अंतर्भाव होईल.

दसनामी गोसाव्यांचे प्रमुख मठ चार व गौण मठ तीन मिळून सात मठ व बावन्न मठ्या आहेत. गोसावी लोक आपल्या मठाचेच नाव गोत्र म्हणून वापरतात. एकाच मठीच्या घराण्यांमध्ये विवाह होत नाही. उत्तर भारतातील विवाह ‘भावरे’ पद्धतीने, तर विदर्भादी भागांतील पुराणोक्त पद्धतीने होतात. गोसाव्यांत चार प्रमुख मठांप्रमाणेच प्रमुख उपसंप्रदायही चारच आहेत. म्हणजे प्रत्येक मठाचा वेगवेगळा उपसंप्रदाय आहे. कीटवार, भोगवार, आनंदवार आणि भूरिवार हे ते उपसंप्रदाय होत. उत्तर भारतीय गोसाव्यांचा आचारधर्म आणि तत्त्वे दसनामधर्म  नावाच्या ग्रंथात सांगितली आहेत. शंकराचार्यप्रणीत शारदा (द्वारका), गोवर्धन (जगन्नाथपुरी), ज्योती (बद्रीनाथ) व शृंगेरी (शृंगेरी-कर्नाटक) ह्या चार मठांचा जो आचारधर्म आहे, त्याप्रमाणे गोसाव्यांचे वर्तन असावे असे ह्या ग्रंथात म्हटले आहे. शंकराचार्यांनी विस्कळित गोसावी समाज संघटित व नियमबद्ध केला. आपल्या शिष्यांतील अधिकारी व्यक्तींची ह्या पीठांवर त्यांनी प्रतिष्ठापना करून अद्वैत मताचा सर्वत्र प्रसार केला. ह्या शिष्यांपासूनच दशनाम (दसनाम) संन्यास प्रसृत झाला असे मानतात. दसनामी गोसावी हे शंकराचार्यांचे कट्टर अनुयायी असले, तरी त्यांनी त्यांचा प्राचीन नारायणीय धर्मही सोडला नाही. शंकराचार्यांनी आपल्या अनुयायांचे निरंजनी, निर्वाणी, अटल, सनातनी, अग्नी, अभाव, व आनंद असे सात आखाडे करून त्यांची सांप्रदायिक संघटना उभारली. प्रत्येक आखाड्याच्या प्रमुखास महंत म्हणतात. हे आखाडे म्हणजे त्यांना धार्मिक आणि सांप्रदायिक शिक्षण देणाऱ्या संस्था वा केंद्रेच होत. हे आखाडे प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत. प्रत्येक आखाड्यात गोसावी भरती करण्याचे नियम कडक असतात. उमेदवार गोसाव्याचे वय साधारणपणे १८ ते ४५ च्या दरम्यान असावे व त्याने ब्रह्मचर्य पाळून तेथे १२ वर्षे काढली पाहिजे, असा दंडक आहे. दसनामी गोसाव्यांचे तत्त्वज्ञान प्रामुख्याने शंकराचार्यांच्या अद्वैत मतास अनुसरून आहे तथापि त्यांच्यातील काही अनुयायी पातंजल योगाचा तसेच तंत्रमार्गाचाही अवलंब करतात.

गोसाव्यांच्या संस्कारांत ‘विरजा होम’ हा शुद्धीकरण संस्कार (वैदिक संस्काराचा अवशेष) महत्त्वाचा आहे. त्रैवर्णिकांतून एखादा जेव्हा गोसावी होतो तेव्हा त्याला शुद्ध करण्यासाठी विरजा होम करतात. शूद्रास गोसावी होता येत नाही. त्यांच्यातील इतर संस्कार पुराणोक्त पद्धतीने होतात. संन्यासी वा गृहस्थ गोसावी मेल्यास शैव-वैष्णव भेदांनुसार त्याच्या डोक्यावर बेलपत्र किंवा तुळशीपत्र ठेऊन बसलेल्या स्थितीत त्याला पुरतात. त्याच्या शेजारी त्याची झोळी, दंड, कमंडलू इ. वस्तूही पुरतात. मृताबद्दल त्यांच्यात शोक करीत नाहीत. श्राद्धाऐवजी त्याची पुण्यतिथी (बरशी) करतात.

बद्रिकेदार, रामेश्वरादी  ठिकाणची यात्रा केलेले गोसावी हातात धातूचे कडे वा शिंपल्याचे वलय घालतात. काही गोसावी नग्नावस्थेत राहतात आणि ‘अलख’ म्हणून भिक्षा मागतात. काही फक्त पाचच घरी भिक्षा मागतात, तर काही नर्मदापरिक्रमा करतात. स्त्रियाही पंथाची दीक्षा घेऊ शकतात. स्त्रियांचे आधी वपन करण्यात येते व त्यांच्या अंगास भस्म फासून त्यांना भगवी वस्त्रे नेसावयास देतात. ब्रह्मचर्य पालन करून त्यांना मठात रहावे लागते.

त्रैवर्णिकांतील कोणाही व्यक्तीस गोसावी म्हणून दीक्षा घेता येत असल्याकारणाने, गोसावी वर्गात अनेक जातींचे लोक आढळतात. गोसाव्यांचा दीक्षाविधीही फार सोपा आहे. दीक्षा घेणाऱ्यास एक दिवस उपोषण करावे लागते. दुसऱ्या दिवशी त्याचे मुंडन करण्यात येते. नंतर त्याला स्नान घालून त्याच्या सर्वांगास भस्म फासण्यात येते व नवीन नाव देण्यात येते. अशा प्रकारे तो उमेदवार गोसावी होतो. एक-दोन वर्षे उमेदवारी केल्यावर त्याची पंथीय आचारविचारांशी ओळख होते. नंतर गुरू त्याच्या कानात ‘ओम् सोहम्’ मंत्र सांगून त्यास पक्का गोसावी म्हणून मान्यता देतो. काही गोसाव्यांचे आचार पुराणोक्त तर काहींचे वेदोक्त आहेत. आजन्म ब्रह्मचर्यपालन, भुकेलेल्यांना अन्नदान, भिक्षेवर निर्वाह व तीर्थाटन हा संन्यासमार्गी गोसाव्यांचा प्रमुख आचार होय. देहदंड किंवा आत्मक्लेश करून घेण्यातही गोसाव्यांची विशेष ख्याती आहे.

औरस संततीने झालेल्या गोसाव्यांना ‘बिंदू’, तर त्रैवर्णिकांतून गोसावी झालेल्यांना ‘नाद’ म्हणतात. दोहोंनाही आखाड्यात भरती होता येते. शिष्य संप्रदाय चालविणाऱ्या गोसाव्यास ‘कंगली’ म्हणतात. चैत्र व आश्विन महिन्यांतील नवरात्र तसेच दसरा, दिवाळी व शिमगा हे त्यांचे प्रमुख सण. त्यांच्या आचारधर्मात मद्य-मांस, गांजा, भांगादी सेवन निषिद्ध मानले आहे. परस्पर भेटीच्या वेळी गोसावी ‘ॐनमो  नारायणाय’ म्हणून अभिवादन करतात.

संदर्भ : 1. Ghurye, G. S. Indian Sadhus, Bombay, 1953.

           2. Wilson, H. H. Religious Sects of the Hindus, Calcutta, 1958.

           ३. गोस्वामी, पृथ्वीगीर हरिगीर, गोसावी व त्यांचा संप्रदाय, यवतमाळ, १९२६. 

           ४. सरकार, जदुनाथ, नागे संन्यासिओं का इतिहास, अलाहाबाद, १९५०. 

सुर्वे, भा. ग.