गोवर : लहान मुलांमधील साथीच्या विशिष्ट सांसर्गिक रोगाला गोवर असे म्हणतात. या रोगाच्या साथी सर्व जगभर दिसून येतात. त्या साधारणपणे हेमंत ऋतूच्या शेवटी अथवा वसंत ऋतूच्या सुरुवातीस येतात. दर दोन ते चार वर्षानी त्यांचे प्रमाण अधिक असते. हा रोग साधारणपणे मुलांचा असला तरी प्रौढ माणसांनाही होऊ शकतो. एकदा हा रोग होऊन गेल्यावर सहसा पुन्हा होत नाही.

रुग्णाच्या शिंकण्या-खोकण्यामुळे नाकातील स्रावाचे तुषार उडून या रोगाचा संसर्ग होतो. हा रोग ब्रायेरिअस मॉर्बिलोरम  या अतिसूक्ष्म विषाणूमुळे (व्हायरसामुळे) होतो. गोवरात उपद्रव म्हणून जो मस्तिष्कशोथ (मेंदूची दाहयुक्त सूज) होतो त्याचे कारण मात्र दुसराच विषाणू असून तो गोवर-विषाणूमुळे उत्प्रेरित होतो (चेतावला जातो) असे मानतात. गोवराच्या सुरुवातीच्या सर्दीच्या अवस्थेत म्हणजे तो त्वचेवर दिसू लागण्यापूर्वीच फार सांसर्गिक असतो. गोवर जसजसा मावळत जातो तसतशी त्याची संसर्गशक्ती कमी होत जाते. गोवराचा परिपाक काल (रोगजंतू शरीरात शिरल्यापासून रोगाची लक्षणे दिसण्यास सुरुवात होईपर्यंतचा काळ) ८ ते १२ दिवसांचा असतो.

लक्षणे : डोळे लाल होऊन त्यांतून आणि नाकातून फार प्रमाणात स्राव होऊ लागतो. घसा खवखवू लागतो. ही लक्षणे पहिले २-४ दिवस दिसतात. पहिल्या दिवशीच ताप येतो. तो २-३ दिवसांत कमी होतो पण गोवर (पुरळ) त्त्वचेवर दिसू लागण्याच्या सुमारास पुन्हा चढतो व सर्वांगावर गोवर दिसेपर्यंत सतत असतो. ताप क्वचित ४०° ते ४१° से.पर्यंत असते. गोवर उगवण्यापूर्वी १-२ दिवस तोंडातील श्लेष्मकलेवर (बुळबुळीत अस्तरावर) ओठांच्या आतल्या बाजूस किंवा दाढांच्या समोर लाल उंचवट्यावर पांढरट टाचणीच्या डोक्याच्या आकाराचे ठिपके दिसतात. हे ठिपके हेन्‍री कॉप्लिक या अमेरिकन बालरोगतज्ञांनी शोधून काढले म्हणून त्यांना कॉप्लिक ठिपके असे म्हणतात. हे ठिपके ९०% रोग्यांत दिसतात. त्यांच्यामुळे गोवर अंगावर दिसण्यापूर्वीही निदान करणे शक्य होते. भारतात मात्र असे ठिपके क्वचितच दिसतात.

तापाची सुरुवात झाल्यापासून तिसऱ्या-चौथ्या दिवशी गोवर उगवू लागतो. प्रथम चेहऱ्यावर, कपाळावर, कानाच्या मागे उगवण होते. नंतर मान, छाती, पोट, हातपाय असा पसरत सर्वांगावर दिसू लागतो. अतीतीव्र प्रकारांत घसा, श्वसनमार्ग, आतडी आणि हातापायांचे तळवे येथेही उगवण होते. सुरुवातीला गोवराची उगवण लहान लाल उंचवटेवजा असून पुढे ती पसरत जाते व एका ठिकाणची उगवण दुसऱ्या जवळच्या उगवणीला मिळून सर्व शरीर गोबरे दिसते. त्वचेला कंड सुटून आग होऊ लागते. चेहरा फुललेला,डोळे फुगलेले व लाल दिसतात. नाकातून सतत स्राव चाललेला असतो. उजेडाकडे पाहवत नाही. घसा खवखवून खोकला येऊ लागतो. १-२ दिवसांत त्वचेवरील गोवर गडद लाल होऊन पुढे हळूहळू मावळू लागतो. दोन ते पाच दिवसांत पूर्णपणे मावळतो. ज्या क्रमाने उगवतो त्याच क्रमाने मावळतो. मावळताना तो श्यामवर्णी होऊन त्वचेचा कोंडा निघू लागतो. क्वचित त्वचेवर गोवर फार कमी प्रमाणात येऊन १-२ दिवसांतही मावळतो.

प्रकार : (१) अतिसौम्य : या प्रकारात सुरुवातीच्या लक्षणांनंतर त्वचेवर गोवर उठत नाही. 

(२) रक्तस्रावी अथवा काळा गोवर : यात श्लेष्मकला व त्वचा या ठिकाणी रक्तस्राव, तीव्र ताप, झटके वगैरे लक्षणे दिसतात.

(३) विषारी : या प्रकारात विषरक्तता (विषाणूमुळे तयार झालेले विषारी पदार्थ रक्तात शोषले गेल्याने निर्माण होणारी स्थिती) झाल्यामुळे तीव्र ताप, कंप, भ्रम वगैरे लक्षणे दिसून मृत्यूही संभवतो.

उपद्रव : रोग्याची प्रतिकारशक्ती गोवरामुळे कमी होत असल्यामुळे उपद्रव होण्याची प्रवृत्ती असते. विशेष म्हणजे श्वसन तंत्रातील (श्वसनसंस्थेतील) सर्व भागांना शोथ आल्यामुळे श्वासनलिका-फुप्फुसशोथ, श्वासनलिकाशोथ, स्वरयंत्रशोथ, फुप्फुसावरणशोथ इ. उपद्रव होतात. मध्यकर्णशोथही पुष्कळ रोग्यांमध्ये होत असल्यामुळे कान फुटतो. मस्तिष्कशोथही तीव्र प्रकारांत आढळतो. ताप सुरू झाल्यापासून आठ-नऊ दिवसांनंतर जर उतरला नाही, तर बहुधा श्वसन तंत्रात काही उपद्रव झाला असल्याचा संभव असतो. हे उपद्रव अतितीव्र असले, तर रोगी दगावण्याचाही संभव असतो. इंग्लंड व अमेरिकेसारख्या प्रगत देशांतून या रोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दर हजारी एक एवढे कमी असले, तरी मागासलेल्या देशांतून ते २०% पेक्षा जास्त आहे. हा रोग बालकांच्या मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. पूर्वीपासून असलेला क्षय अधिक तीव्र होतो. अगदी सौम्य गोवरातही मस्तिष्कशोथ होण्याचा संभव असतो. तंत्रिका तंत्राची (मज्जासंस्थेची) विकृती झाली असता स्नायू ताठ होणे, आकडी व झटके येणे ही लक्षणे दिसतात.

निदान : त्वचेवर उत्स्फोट करणाऱ्या (पुरळ उठणाऱ्या) इतर अनेक रोगांपासून व्यवच्छेदक (वेगळेपणा ओळखणारे) निदान करणे जरूर असते. देवी, कांजिण्या वगैरे सांसर्गिक रोगांत होणारा उत्स्फोट निराळा व निराळ्या दिवशी दिसतो. सल्फोनामाइड, फेनोबार्बिटोन वगैरे औषधांचा वापर होत असताना काही लोकांच्या त्वचेवर उत्स्फोट दिसतो परंतु पूर्ववृत्त लक्षात घेतल्यास घोटाळा होत नाही. नाक व घशाच्या स्रावात असलेला विषाणू रक्त किंवा ऊतक (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींचा समूह) संवर्धकात (कृत्रिम रीतीने वाढविण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या पोषक द्रव्यात) वाढवून ओळखता येतो. पूरकबंध परीक्षेचा [→ विकृतिविज्ञान] रोगनिदानास उपयोग होतो.

खुद्द गोवरामुळे मृत्यू अगदी क्वचितच येतो परंतु तीव्र प्रकारांच्या उपद्रवामुळे मृत्यू संभवतो. प्रतिजैव (अँटिबायॉटिक) व सल्फा औषधे उपलब्ध असल्यामुळे अशा उपद्रवांचे प्रमाण फार कमी झाले आहे.

चिकित्सा : खुद्द गोवराच्या विषाणूंवर उपयुक्त असे औषध अजून उपलब्ध नाही परंतु उपद्रव टाळणे शक्य झाले आहे. सर्वसाधारण शुश्रूषा व लक्षणानुवर्ती चिकित्सा करतात.


प्रतिबंध : गोवर आलेल्या रोग्याशी संपर्क शक्य तो टाळावा. गोवर येऊन गेलेल्या व्यक्तीचा रक्तरस काढून तो टोचल्यास साथीच्या काळापुरती प्रतिकारशक्ती येऊ शकते. तसेच गॅमाग्लोब्युलीन (रोगप्रतिकारशक्तीशी संबंधित असलेले रक्तातील एक प्रकारचे प्रथिन) टोचल्यासही प्रतिबंध होऊ शकतो. या रक्तरसाचा परिणाम चार आठवडे टिकतो. गोवर उगवल्यानंतर पाच दिवसांनी त्याची संक्रामकता नाहीशी होते. तो पावेतो संसर्गित व्यक्तीला इतर लोकांत मिसळू देऊ नये.

गोवर आणि ⇨ वारफोड्या (जर्मन गोवर) हे दोन्ही रोग विशिष्ठ विषाणूंमुळे होतात. या विषाणूंसंबंधी संशोधन झालेले असून त्यांचे शरीराबाहेर संवर्धन करण्यातही यश आले आहे.

परार्जित प्रतिरक्षा (शरीराच्या स्वतःच्या प्रयत्नाशिवाय बाहेरून मिळविलेली रोगप्रतिकारशक्ती) रोग होऊन गेलेल्या रोग्याच्या रक्तातील गॅमाग्लोब्युलीन दर किग्रॅ. वजनास ०·२ मिलि. या प्रमाणात अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) दिल्यास ४-६ आठवडेपर्यंत टिकू शकते. स्वार्जित प्रतिरक्षा (शरीराच्या स्वतःच्या प्रयत्नामुळे तयार होणारी रोगप्रतिकारशक्ती) अलीकडे अधिक वापरतात. त्याकरिता रोगकारकशक्ती कमी झालेल्या विशिष्ट विषाणूंपासून (श्वार्त्स यांनी शोधून काढलेल्या विषाणूंच्या प्रकारापासून) बनविलेली लस त्वचेखाली अंतःक्षेपणाने देतात. अशी प्रतिरक्षा मात्र काही वर्षापर्यंत टिकते.

रानडे, म. आ.

आयुर्वेदीय चिकित्सा : गोवर हा रक्तगत पित्तज्वर होय. गोवर आहे हे निश्चित होताच प्रथम खोबऱ्याचे तेल चार तोळे किंवा तूप गरम करून पिचकारीने गुदद्वारात घालावे. ही पिचकारी दररोज द्यावी. तिक्तघृत असले तर फारच चांगले. ह्या पिचकारीने मुलाला शौचाला होईल आणि विकार कमी होण्याला मदत होईल. कडू पडवळ (पटोल), अनंतमूळ, नागरमोथा, पहाडमूळ व कुटकी ह्यांचा काढा दिवसातून दोन वेळा द्यावा. मलावरोध जास्त असेल तर कुटकी थोडी अधिक घालावी. शौचाला होत असेल तर कुटकी अगदी कमी घालावी. गोवर ठरल्याप्रमाणे बाहेर पडत नसेल, तर गोरोचन मिश्रण एक ते दोन गुंजा दुधसाखरेबरोबर दिवसातून द्यावे म्हणजे गोवर बाहेर पडेल. गोवर बाहेर पडणे अतिशय चांगले. गोवर बाहेर पडला नाही तर तो उपद्रव निर्माण करतो. गोवराची शंका येताच परिपाठादी काढा दोन चमचे समभाग पाण्याबरोबर दिवसातून तीन वेळा द्यावा. बाजारात मिळणारा तयार परिपाठादी काढा उन्हाळ्यात मात्र देऊ नये कारण ते अरिष्ट असते. त्यावेळी त्या काढ्याची औषधे घेऊन त्याचा ताजा काढा करून द्यावा. इतर त्रासदायक चिन्हे असली, तर त्यांना अनुसरून विशेष चिकित्सा करावी.

उपद्रवांची चिकित्सा : श्वासनलिका-फुप्फुसशोथामध्ये ज्येष्ठमध, रिंगणी, डोरली ही औषधे वरील पटोलादी काढ्यात घालून द्यावीत. श्वासनलिका-फुप्फुसशोथ झाल्यानंतर जर कफ खूप असेल, तर अशा वेळेला रेवाचिनी दोन ते तीन गुंजा गरम पाण्याबरोबर देऊन किंवा गेळफळ चार ते पाच गुंजा गरम पाण्याबरोबर देऊन ओकारी करवावी म्हणजे उपद्रव पुढे वाढणार नाही. ताप आणि गोवर कमी होईल. रेवाचिनीने रेचही होण्याचा संभव असतो हे लक्षात ठेवावे. मस्तिष्कशोथ झाल्यास आवळकठी, नागरमोथा, गुळवेल, जटामांसी, शंखपुष्पी, ब्राह्मी ही औषधे वरील पटोलादी काढ्यात घालून तो काढा सुरू ठेवावा. शिवाय अभ्रक, लोह, सुवर्णमाक्षिक, मौक्तिककामदुधा इ. औषधांचे मोरावळ्यातून अवस्थेप्रमाणे चाटण द्यावे. मस्तिष्कशोथ होतो आहे अशी शंका येताच मुलाच्या दोन्ही शंखांवर एक एक जळू लावून रक्त काढून टाकावे. तसेच अणूतेलाचे दोन दोन थेंब दोनही नाकपुड्यांत कोमट करून घालावे. म्हणजे सुरुवात होणारच असेल तर तो होणार नाही व झालेला असेल, तर त्याची वाढ थांबेल. शिवाय लक्षणांप्रमाणे आग होत असेल तर चंदन, अनंतमूळ ह्यांचा व सूज असेल तर दशांगलेपाचा उपयोग करावा.

पटवर्धन, शुभदा अ.