पॅरामाऊंट पिक्चर्स कॉर्पोरेशन : चित्रपटाची निर्मिती, प्रदर्शन व वितरण करणारी प्रसिद्ध अमेरिकन संस्था. स्थापना १९२७ साली. मुळात चित्रपटाचे वितरण करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना झाली होती. त्यानंतर या संस्थेने चित्रपटनिर्मिती व चित्रपटप्रदर्शन या क्षेत्रांतही प्रवेश केला. जगात ६५ टक्क्यांहून अधिक चित्रपटनिर्मिती करणार्‍या ज्या सात मोठ्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, त्यांपैकी पॅरामाऊंट पिक्चर्स कॉर्पोरेशन ही एक होय.

ॲडॉल्फ झुकर हा चित्रपट–व्यवसायातील एक युगप्रवर्तक होय. १०४ वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेल्या या तपस्व्याची चित्रपट-व्यवसायातील कामगिरी बहुमोलाची आहे. त्याची प्रख्यात फेमस प्लेअर्स कंपनी, जेसी लॅस्की याची फीचर प्ले कंपनी, डब्ल्यू. डब्ल्यू. होडकिन्स याची पॅरामाऊंट नावाचीच चित्रपटवितरण संस्था व इतर काही निर्माते यांनी एकत्र येऊन १९१४ साली पॅरामाऊंट पिक्चर्स कॉर्पोरेशनची स्थापना केली. पुढे ब्रिटन व फ्रान्समध्येही या संस्थेच्या शाखा निघाल्या.

ॲडॉल्फ झुकर हा १९१९ च्या सुमारास या संस्थेचा प्रमुख संचालक झाला. झुकरने पॅरामाऊंट पिक्चर्समध्ये कल्पक व बुद्धिमान दिग्दर्शक, अभिनयकुशल कलावंत तसेच निष्णात तंत्रविशारद आणले. एवढेच नव्हे, तर चित्रपट-प्रदर्शनासाठी यूरोपीय देशांत व अमेरिकेत चित्रपटगृहांची एक साखळीच त्याने उभी केली. १९३६ सालापर्यंत झुकर या संस्थेचा सर्वाधिकारी होता. पुढे १७७३ पर्यंत म्हणजे त्याच्या वयाची शताब्दी पूर्ण होईपर्यंत तो या संस्थेचा अध्यक्ष होताच. झुकर म्हणजेच पॅरामाऊंट पिक्चर्स असे एकेकाळी समीकरण होते.  

स्ट्रोहीम, स्टीलर, लूबिच, स्टर्नबर्ग, मामूलिअन यांसारखे दिग्दर्शक व पोला नेग्री, मार्लिनी डीट्रिख व ॲडॉल्फ मेंजू यांसारखे कलावंत कमीअधिक काळ पॅरामाऊंटच्या सेवेत होते. 

पुढे १९३० नंतरच्या काळात पॅरामाऊंट पिक्चर्स कॉर्पोरेशन आर्थिक अडचणीत आली परंतु हलकीफुलकी कौटुंबिक व⇨ सेसिल दमिलचे ख्रिस्ती पुराणकथांवरील भव्य चित्रपट यांमुळे संस्था आर्थिक अडचणीतून तरूण गेली. रूडॉल्फ व्हॅलेंटीनो, ग्लोरिआ स्वॉन्सन, गेअरी कूपर, डब्ल्यू. सी. फील्डझ, बिंग क्रॉझ्बी, बॉब होप, डॉरोथी लामूर, जॉन वेन, बार्बारा स्टॅन्‌विक व माँटगमरी क्लिफ्ट यांसारखे अनेक नामवंत कलाकार या संस्थेशी करारबद्ध होते.⇨ फ्रँक काप्रा, जॉर्ज स्टीव्हेंझ, बिली वाइल्डर, प्रेस्टन स्टर्जेस यांसारख्या अनेक ख्यातनाम दिग्दर्शकांचे संस्थेने वेळोवेळी सहाय्य घेतले.

द शेख (१९२१), द टेन कमांडमेन्टस्‌ (१९२३ व १९५६), द लॉस्ट वीकएंड (१९४५), सनसेट बुलेवार (१९५०), ए प्लेस इन द सन (१९५१), द ग्रेटेस्ट शो ऑन द अर्थ (१९५२) हे त्याकाळी गाजलेले चित्रपट. मार्क्स ब्रदर्सचे विनोदपटही बरेच लोकप्रिय झाले होते. त्यानंतरच्या काळातील बेकेट (१९६४), रोमिओ अँड ज्युलिएट (१९६८), रोझमेरीज बेबी (१९६८) हे उल्लेखनीय चित्रपट होत. १९६६ पासून कंपनीची व्यवस्था ‘गल्फ अँड वेस्टर्न’ या संस्थेमार्फत नियंत्रित केली जाते.

कंपनीला पेंट युवर वॅगन  डार्लिंग लिली (दोन्ही १९६९) या खर्चिक चित्रपटांचा मोठाच आर्थिक फटका बसला परंतु लव्ह स्टोरी (१९७०) व द गॉड फादर (१९७१) या चित्रपटांनी मात्र आर्थिक यश मिळविले. द गॉड फादर या चित्रपटाने तर उत्पन्नाचे सर्व विक्रम मोडले आहेत.

वाटवे, बापू जाधव, रा. ग.