गोल्डस्मिथ, ऑलिव्हर : (१० नोव्हेंबर १७३०–४ एप्रिल १७७४). अँग्लो-आयरिश साहित्यिक. जन्म आयर्लंडमध्ये. डब्लिनच्या ‘ट्रिनिटी कॉलेजा’तून बी.ए. झाला. एडिंबरो व लायडन (हॉलंड) येथील विद्यापीठांतून त्याने वैद्यकीचा अभ्यास केला असावा. पुढे त्याने यूरोपचा पायी प्रवास, केला, असे म्हणतात. त्याप्रीत्यर्थ आलेला खर्च पावरीवर आयरिश गीते वाजवून भागविला, असा समज आहे. यूरोपच्या दौऱ्यावरून लंडनला विपन्नावस्थेत आल्यानंतर (१७५६) अखेरपर्यंत तो तेथेच राहिला. लंडनमधील त्याची आरंभीची वर्षे फार कठीण गेली. उदरनिर्वाहासाठी त्याला अनेकविध उद्योग करावे लागले. डॉक्टर म्हणून हिंदुस्थानात येण्याचा त्याचा विचार होता परंतु तो फसला. पैशासाठी त्याने तऱ्हेतऱ्हेचे फुटकळ लिखाण केले आणि पुढे नाव मिळाल्यावरही भाषांतरे, शास्त्रीय विषयांवरील सुबोध पुस्तकांचे लेखन, काव्यसंग्रहांचे संपादन अशी कामे चालू ठेवली कारण पैशाची सदैव चणचण भासावी असेच त्याचे व्यवहारशून्य वागणे होते पण त्याच्या या पोटार्थी लेखनातही असे काही गुण होते, की त्याची अनेक पुस्तके जवळजवळ शंभर वर्षे इंग्लंडच्या शाळांतून पाठ्यपुस्तके म्हणून चालू होती.
इंक्वायरी इंटू द प्रेझेंट स्टेट ऑफ पोलाइट लर्निंग (१७५९) ह्या तत्कालीन विद्योपासनेसंबंधी त्याने
लिहिलेल्या पुस्तकामुळे त्याच्याकडे जाणत्यांचे लक्ष प्रथम वेधले. तथापि द सिटिझन ऑफ द वर्ल्ड (१७६२) ह्या पत्ररूप निबंधसंग्रहामुळे त्याला विशेष प्रसिद्धी लाभली. जगप्रवासास निघालेला एक (काल्पनिक) चिनी तत्त्वज्ञ इंग्लंडमध्ये आल्यानंतर चीनमधील आपल्या मित्रास पत्रे लिहितो आहे, अशी भूमिका घेऊन इंग्लंडमधील तत्कालीन जीवनांच्या विविध अंगांवर गोल्डस्मिथने मार्मिक भाष्य केले आहे. तो जगाचा नागरिक, कोत्या राष्ट्राभिमानातून मुक्त, म्हणून त्याचे भाष्य अलिप्त वाटते. ह्या पत्रांत वर्णिलेली काही पात्रे इंग्रजी साहित्यात अजरामर झाली आहेत. उदा., खानदानीपणाचा आव आणणारा दरिद्री बो टिब्स. विनोद आणि करुणा ह्यांचे प्रत्ययकारी मिश्रण ह्या पत्रांत आढळते.
द ट्रॅव्हलर (१७६४) ह्या खंडकाव्याने गोल्डस्मिथ कवी म्हणून प्रथम गाजला. हे काव्य त्याच्या यूरोपच्या प्रवासावर आधारलेले आहे. यूरोपमधील विविध देशांतील जीवनवैशिष्ट्यांचे चित्रण करून माणसाचे सुख राजकीय संस्था वगैरे उपाधीवर अवलंबून नसून ते त्याच्या मनावर अवलंबून असते, असा निष्कर्ष त्याने काढला आहे. द डेझर्टेड व्हिलेज (१७७०) हे गोल्डस्मिथचे दुसरे खंडकाव्य अधिकच गाजले. त्यात बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळे इंग्लंडमधील उजाड पडू लागलेल्या खेड्यांचे रेखीव आणि हृदयस्पर्शी चित्र आहे. इंग्लंडमध्ये घडून आलेले हे परिवर्तन कवीला नीटसे उमगलेले नसले, तरी ह्या काव्यातून व्यक्त झालेला त्याचा कनवाळूपणा जातिवंत आहे. त्याच्या स्वतःच्या काही अनुभवांची सावली ह्या काव्यावर आहे. ह्या काव्यातील व्यक्तिचित्रेही नामांकित ठरली आहेत. उदा., त्यातील शाळामास्तर.
गोल्डस्मिथने नाटककार म्हणूनही यश मिळविले. द गुड नेचर्ड मॅन (१७६८) आणि शी स्टूप्स टू काँकर (१७७३) ह्या त्याच्या दोन सुखात्मिका. त्यांपैकी दुसरी जास्त लोकप्रिय आहे. निशिकांतची नवरी ह्या नावाने अनंत काणेकर ह्यांनी तिचे मराठी रूपांतर केले आहे (१९३८). गमतीच्या घटना, जिवंत व्यक्तिचित्रे आणि चुरचुरीत संवाद ही ह्या सुखात्मिकांची वैशिष्ट्ये.
द व्हिकार ऑफ वेकफील्ड (१७६६) ही गोल्डस्मिथची एकमेव कादंबरी. जगातील बहुतेक प्रमुख भाषांत हिचे अनुवाद झाले आहेत. वांईकर भटजी (दुसरी आवृ. १९२५) ह्या नावाने धनुर्धारी ह्यांनी तिला अस्सल मराठी पेहेराव चढविला.
गोल्डस्मिथच्या लेखनातील आशय विशेषतः त्यातील माहितीचा भाग ह्यांत कोठेकोठे उणिवा असल्या, तरी त्याची कुशल मांडणी व प्रसन्न शैली ह्याच नेहमी मनात भरतात. त्याचा विनोद आपुलकीतून फुलतो. उपरोध असला, तरी तो बोचरा नाही. ह्या सर्वांमागे अपार माणुसकी असलेले एक संपन्न आणि थोडेसे विक्षिप्त व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळेच समकालीन लेखक व कलावंत ह्यांनी एरव्हीचे हेवेदावे विसरून ह्या माणसावर प्रेम केले. लंडन येथे तो निवर्तला.
संदर्भ : 1. Balderston, K. C. Ed. Collected Letters of Oliver Goldsmith, Cambridge, 1928.
2. Forster, John, Life and Times of Oliver Goldsmith, 2 vols., London, 1854.
3. Friedman, Arthur, Ed. Collected Works of Oliver Goldsmith, 5 Vols., London, 1966.
4. Prior, James, The Life of Oliver Goldsmith, 2 Vols., London, 1837.
देवधर, वा. चिं.
“