गोमती : गंगेची उत्तर प्रदेश राज्यातील एक उपनदी. लांबी ८०० किमी. जलवाहनक्षेत्र १८,७५० चौ. किमी. पीलीभीतच्या पूर्वेस ३२ किमी. वर उगम पावली, तरी ५६ किमी.वर जोकनाई मिळाल्यावरच ती बारमहा वाहू लागते. ती वळणे घेत घेत अत्यंत मंद वाहते. मुहमदी, सीतापूर, लखनौ, बाराबंकी, सुलतानपूर, जौनपूर यांवरून गेल्यावर गाझीपूर जिल्ह्यातील सैदपूर येथे ती गंगेला मिळते. साई नदी तिच्याशी समांतर ५६० किमी. वाहिल्यावर जौनपूरच्या खाली तिला मिळते. लखनौ येथे गोमतीवर अनेक पूल आहेत. तिच्या पुरांमुळे आजूबाजूच्या प्रदेशाचे फार नुकसान होते. मुहमदीपर्यंत गोमतीवर नावा चालतात. परंतु धान्य, जळण, गवत, दगड यांची थोडीशीच वाहतूक होते. गहू, तांदूळ, ऊस, डाळी, तेलबिया इ. उत्पन्ने गोमतीच्या प्रदेशात होतात.
कुमठेकर, ज. ब.