गोबेल, कार्ल इमानूएल एबरहार्ट फोन : (८ मार्च १८५५–९ ऑक्टोबर १९३२). जर्मन वनस्पतिवैज्ञानिक. वनस्पतीतील आकारविज्ञानविषयक मौलिक संशोधनाबद्दल ते प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म बाडेनमधील बिलिखडाइम येथे झाला. व्हिल्हेल्म होफ्माइस्टर, हाइन्रिख अँताँ द बारी आणि यूलिउस फोन झाक्स यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिक्षण झाले व १८७७ मध्ये त्यांनी वनस्पतिविज्ञानातील डॉक्टरेट पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी अध्यापनकार्य केले व १८९१ मध्ये म्यूनिकमध्ये त्यांना प्राध्यापकाची जागा मिळाली. १९०९–१४ या काळात त्यांनी न्युफ्नबुर्क येथे एक वनस्पतिविज्ञान-संस्था व उद्यान ह्यांची उभारणी केली व तेथेच त्यांनी विविध वनस्पतींचे काळजीपूर्वक निरीक्षण व वस्तुनिष्ठ संशोधन केले तसेच द. अमेरिका, वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इ. देशांतून बराच प्रवास केला. बीजी वनस्पती व अंदुककलशधारी (अचल स्त्रीजनन पेशी धारण करणारे कलशासारखे भाग असणाऱ्या) वनस्पती यांच्या आकारविज्ञान आणि जीवविज्ञान या विषयांच्या संशोधनामध्ये त्यांनी स्वरूप व कार्य यांची सांगड घातली व त्यांचा पुढे होत गेलेल्या संशोधनावर बराच परिणाम झाला. ऑर्गॅनोग्राफी ऑफ प्लँट्स (१८९८–१९०१) या त्यांच्या प्रमाणभूत व सर्वोत्कृष्ट ग्रंथाच्या तीन जर्मन व एक इंग्लिश अशा चार आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या असून शिवाय होफ्माइस्टर यांचे चरित्र, स्केंक व झाक्स यांचे पाठ्यपुस्तक यांकरिता काही प्रकरणे व एक्सपेरिमेंटल मॉर्फॉलॉजी हा ग्रंथ इ. सुप्रसिद्ध लेखनकार्यामुळे त्यांच्या कीर्तीत भर पडली आहे. गुणश्री प्राध्यापक म्हणून १९३१ मध्ये ते सेवानिवृत्त झाले व पुढे एक वर्षाने ते म्यूनिक येथे मृत्यू पावले.
पहा : आकारविज्ञान बारी, हाइन्रिख अँताँ द.
जमदाडे, ज. वि.