गोखरू : (सराटा हिं. छोटा गोखरू, हुसक गु. नहान गोखरू क. नेगळू सं. गोक्षुर, कंटफल इं. कॅल्थ्रप लॅ. ट्रिब्यूलस टेरेस्ट्रिस कुल-झायगोफायलेसी). ही एक जमिनीसरपट रुक्ष जागी वाढणारी वर्षायू किंवा द्विवर्षायू (एक किंवा दोन वर्षे जगणारी) ⇨ओषधी उष्ण कटिबंधात सर्वत्र असून सिंध, श्रीलंका व भारत (सौराष्ट्र, गुजरात, दख्खन, काश्मीर– ३,३०० मी. उंचीपर्यंत) इ. देशांत सामान्यपणे आढळते. फांद्या अनेक, केसाळ व कोवळे भाग लवदार असतात. पाने संयुक्त, संमुख (समोरासमोर), पिच्छकल्प (पिसासारखी) दले ३–६ जोड्या उपपर्णे केसाळ व भाल्यासारखी. फुले एकाकी, कक्षास्थ (पानाच्या बगलेत) किंवा पानासमोर व पिवळी असून ती वर्षभर येतात. सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ झायगोफायलेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे फळ गोलसर, कठीण, पाच कुड्यांचे व या प्रत्येकीस कठीण व तीक्ष्ण काट्यांच्या दोन जोड्या आणि त्यांतील एक काटा दुसऱ्यापेक्षा लहान. प्रत्येक कुडीत अनेक बिया एकमेकींपासून पडद्यांनी अलग राखलेल्या असतात. पाने व फांद्या खाद्य फळांच्या पिठाच्या भाकरी दुष्काळात खाल्ल्याचा उल्लेख आहे. फळे शीतक, मूत्रल (लघवी साफ करणारी), पौष्टिक व वाजीकर (कामोत्तेजक फळांचा फांट (थंड पाण्यात भिजवून काढलेला अर्क) मूत्रल व संधिवायूनाशक असून मुतखडा व मूत्रपिंडाच्या विकारांवर गुणकारी असतो.
चौगले, द. सी.
“