गे-ल्युसॅक, झोझेफ ल्वी : (६ डिसेंबर १७७८—७ मे १८५०). फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ व भौतिकीविज्ञ, त्यांनी वायुरूप पदार्थांसंबंधी महत्त्वाचे संशोधन केले. त्यांचा जन्म सेंट लेनर्ड येथे झाला. त्यांचे शिक्षण एको पॉलिटेक्निक व एको डी पाँटस एट चॉसेस या संस्थांत झाले. ते सॉरबॉन येथे १८०२—३२ पर्यंत भौतिकीचे प्राध्यापक होते. नंतर हार्डीन द प्लँटिस येथे रसायनशास्त्राचे प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली.
त्यांनी केलेले संशोधन मुख्यतः वायूंच्या गुणधर्मांसंबंधीचे आहे. वायुरूप पदार्थ जेव्हा रासायनिक विक्रियांत भाग घेतात तेव्हा त्यांची घनफळे आणि त्यांपासून उत्पन्न झालेल्या पदार्थांची घनफळे यांचे अन्योन्य संबंध दर्शविणारा एक मूलभूत नियम त्यांनी शोधून काढला. तो त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे.
बोरिक अम्लापासून बोरॉन हे मूलद्रव्य त्यांनी वेगळे केले. आयोडीन हे मूलद्रव्य आहे, हे १८०८ साली त्यानी सिद्ध केले. तसेच प्रुसिक अम्लासंबंधी संशोधन करीत असताना त्यांनी सायनोजन (CN) हे मूलक (रासायनिक विक्रियांत स्थिर राहणारा परंतु स्वतंत्र अस्तित्व नसणारा अणुगट) आहे असे दाखविले. प्रुसिक अम्लात हायड्रोजन आहे परंतु ऑक्सिजन नाही, असे त्यांनी, असे त्यांनी सिद्ध केल्याने हायड्रोजन-अम्ल सिद्धांताला महत्त्वाचा आधार मिळाला. त्यांनी एथिल आयोडाइड व क्लोरसायनोजन या संयुगांचा शोध लावला. सल्फ्यूरिक अम्ल (१८१८) व ऑक्झॅलिक अम्ल (१८२९) यांच्या निर्मितीतील सुधारणा, पोटॅश व सोडा यांतील क्षार (अल्कली) मोजण्याची पद्धती, विरंजक (रंग घालविण्याच्या) चूर्णातील उपलब्ध क्लोरिनाचा अंदाज काढण्याची पद्धत इ. अनेक औद्योगिक महत्त्वाचे कार्य गे-ल्युसॅक यांनी आपल्या संशोधनाद्वारे केले. सल्फ्यूरिक अम्ल तयार करण्याच्या कोठी पद्धतीत नायट्रोजनाची ऑक्साइडे वाया जाऊ नयेत म्हणून वापरण्यात येणारा मनोरा गे-ल्युसॅक मनोरा म्हणून ओळखण्यात येतो. त्यांनी केलेल्या कार्यामुळे तांत्रिक सल्लागार म्हणून टांकसाळीत व विविध औद्योगिक उत्पादनांच्या समित्यांवर त्यांच्या नेमणूका झाल्या.
त्यांचे स्वतःचे १४८ लेख रॉयल सोसायटीच्या ‘कॅटलॉग ऑफ सायंटिफिक पेपर्स’ मध्ये नमूद झालेले आहेत. याशिवाय हंबोल्ट, तेनार, वेल्टर आणि लीबिक यांच्याबरोबर अनेक लेख त्यांनी प्रसिद्ध केले. ते पॅरिस येथे मृत्यु पावले.
कानिटकर, बा. मो.