गोंडवनी संघ : भारताच्या भूवैज्ञानिक इतिहासाच्या एका काल विभागाला गोंडवनी कल्प व त्या कल्पात तयार झालेल्या खडकांच्या एकूण गटाला गोंडवनी संघ म्हणतात. मध्य व उत्तर कार्बॉनिफेरस कल्पांच्या (सु. ३३ व ३१ कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या) संधिकालापासून तो क्रिटेशस कल्पाच्या जवळजवळ मध्यापर्यंत (सु. १२ कोटी वर्षांपूर्वीपर्यंत) गोंडवनी कल्प चालू होता. हा कालावधी बराच दीर्घ आहे. त्याला वास्तविक कल्पाऐवजी महाकल्प असे नाव द्यावयास पाहिजे, पण कल्प हे नाव रूढ झालेली आहे.
विंध्य कल्पाच्या अखेरीस पृथ्वीच्या कवचाच्या हालचाली घडून येऊन विंध्य कल्पात साचलेले सागरी गाळांचे थर उचलले गेले व त्यांची जमीन तयार झाली. तेव्हापासून तो आतापर्यंत भारताचे द्वीपकल्प हे बव्हंशी जमिनीच्या स्वरूपातच टिकून राहिलेली आहे. जमिनींची सामान्यतः झीज होते. जमीन असलेल्या प्रदेशात गाळांचे थर साचण्यास अनुकूल अशी परिस्थिती नसते. पण कार्बॉनिफेरस कल्पाच्या मध्याच्या सुमारास (सु. ३३ कोटी वर्षांपूर्वी) भारतीय द्वीपकल्पाच्या प्रदेशात कवचाच्या हालचाली घडून आल्या व त्याच्या अनेक भागांत द्रोणी (खोलगट भाग) निर्माण झाल्या. त्यामुळे ज्यांच्यात गाळांचे थर साचू शकतील अशी क्षेत्रे निर्माण झाली. विंध्य खडकांचे उत्थान झाल्यापासून तो गोंडवनी थर साचण्यास प्रारंभ होईपर्यंतच्या दीर्घ कालावधीतील भूवैज्ञानिक अभिलेख (म्हणजे खडक) भारताच्या द्विपकल्पात नाहीत. विंध्य वा त्याच्या आधीच्या महाकल्पातील खडकांच्या बऱ्याच प्रमाणात झिजलेल्या पृष्ठावर गोंडवनी खडक अत्यंत विसंगत रीतीने वसलेले आढळतात. बहुतेक सर्व गोंडवनी खडक जमिनीवर साचलेले आहेत व त्यांच्यापैकी बहुतेक नदीनाल्यांबरोबर वाहत आलेला गाळ साचून तयार झालेले आहेत.
नर्मदा नदीच्या दक्षिणेस म्हणजे मध्य प्रदेशात असलेल्या या संघातील खडकांचे अध्ययन प्रथम झाले. त्या प्रदेशात पूर्वी एकेकाळी गोंड जमातीचे राज्य होते. त्या जमातीच्या नावावरून या संघास गोंडवनी संघ हे नाव देण्यात आले. परंतु यात संघाचे खडक भारताच्या इतर भागांतही विखुरलेले आढळतात. ते खडक मुख्यतः उत्तरेस नर्मदा व शोण नद्या, दक्षिणेस कृष्णा नदी आणि पूर्वेस गोदावरीच्या खोऱ्यापासून राजमहाल टेकड्यांपर्यंतचा द्वीपकल्पाचा किनाऱ्याचा भाग यांनी सीमांकित झालेल्या त्रिकोणाकृती क्षेत्रात आढळतात. या क्षेत्राच्या बाहेर असणाऱ्या जागी, उदा., कोरोमंडल किनाऱ्यावरील काही जागी आणि पश्चिमेकडील काठेवाडात, कच्छात व राजस्थानात गोंडवनी खडक आढळतात. त्यांची क्षेत्रे लहान असून ते सर्व केवळ उत्तर गोंडवनी कल्पाचे आहेत. गोंडवनी खडकांच्या उत्तम राशी बंगालातील व बिहारातील दामोदर नदीच्या खोऱ्यात, राजमहाल टेकड्यांत, ओरिसात तसेच छत्तीसगड, छोटा नागपूर आणि शोण नदीच्या खोऱ्याचा उत्तर भाग, नर्मदेच्या दक्षिणेस सातपुड्याच्या रांगा, गोदावरीचे खोरे इ. क्षेत्रांत आढळतात. भारताच्या बहिर्द्वीपकल्पीय भागतील काही थोड्या व लहानशा क्षेत्रांत, मुख्यतः पाकिस्तानातील मिठाच्या डोंगरात, काश्मीरात, हझारा टेकड्यांत, सिमल्याजवळ, तसेच गढवालात व पूर्व हिमालयाच्या ज्या तळटेकड्या आहेत त्यांच्यात पूर्व गोंडवनी कल्पाचे खडक आढळतात.
गोंडवनी खडकांचे स्वरूप व निर्मिती : सर्वच नव्हे पण बहुतेक सर्व गोंडवनी खडक नदीनाल्यांबरोबर वाहत आलेला गाळ जमिनीवर, सामान्यातः नद्यांच्या खोऱ्यांत किंवा क्वचित गोड्या पाण्याच्या सरोवरांत साचून तयार झालेले आहेत. ते मुख्यतः वालुकाश्म असून त्यांच्यापैकी काही शेल खडकही आहेत. गोंडवनी खडकांची एकूण जाडी सु. आठ-दहा हजार मी. भरेल. जमिनीवरील खोल द्रोणीत गाळाच्या जाड राशी साचून त्या द्रोणी भरल्या जाव्यात त्याप्रमाणे गोंडवनी खडकांच्या राशी असलेल्या आढळतात. विभंगामुळे (भेगांमुळे) जमीन खचून लांब खंदकासारखे खळगे तयार व्हावे व ते गाळाने भरले जावे त्याप्रमाणे गोंडवनी खडकांच्या राशी सामान्यतः दिसतात. कित्येकांचे मत असे आहे की, गोंडवनी कल्पाच्या प्रारंभी भूकवचाच्या हालचाली घडून येऊन विभंग निर्माण होण्यास व जमिनीचे काही भाग खचून विभंग-द्रोणी तयार होण्यास सुरुवात झाली होती. त्या द्रोण्यांमध्ये गाळांच्या राशी साचू लागल्या. त्यांची जाडी वाढल्यावर त्यांच्या भाराने द्रोण्यांचे तळ खचत गेले. अशा रीतीने गाळ साचत राहिल्यामुळे जमीन असलेल्या प्रदेशात गाळांच्या अशा प्रचंड राशी साचू शकल्या व नंतरच्या काळात क्षरणापासून (झिजण्यापासून) त्यांचा बचाव होऊ शकला. इतर कित्येकांचे असे मत आहे की, नद्यांबरोबर वाहत आलेला गाळ त्यांच्या विस्तीर्ण व सखल खोऱ्यांत आणि क्वचित सरोवरांत साचत राहिला. नंतर विभंग होऊन जमीन खचली व तिच्यावर साचलेल्या गाळाच्या राशी खोल गेल्या. त्यामुळे त्या क्षरणापासून वाचू शकल्या.
जलवायुमानाचे फेरफार : गोंडवनी कल्पात जलवायुमानाचे (दीर्घकालीन सरासरी हवामानाचे) अनेक फेरफार झाले, असे त्या काळातल्या खडकांवरून आणि त्यांच्यात आढळणाऱ्या जीवाश्मांवरून (जीवांच्या अवशेषांवरून) दिसून येते. गोंडवनी कल्पाच्या प्रारंभी भारताच्या द्वीपकल्पाचे जलवायुमान शीत होते व द्वीपकल्पाचे विस्तीर्ण भाग हिम-बर्फांनी झाकले गेले होते. त्या काळातल्या हिम-बर्फांच्या प्रवाहांमुळे वाहतूक होऊन साचविल्या गेलेल्या दगडी चुऱ्यापासून तयार झालेले गोलाश्म संस्तर ओरिसा, मध्य प्रदेश, राजस्थान, सिमला, काश्मीर, मिठाचे डोंगर व हझारा या प्रदेशांत आढळतात. हे गोलाश्म संस्तर म्हणजे गोंडवनी संघातील सर्वांत जुने खडक होत. ते तयार झाले त्या हिमकालानंतर जलवायुमान उबदार व दमट झाले आणि द्वीपकल्पात वनस्पतींची प्रचंड वाढ झाली. त्या काळातल्या दलदली वनांपासून तयार झालेल्या दगडी कोळशांचे विपुल थर गोंडवनी खडकांत सापडतात. त्यानंतर पांचेट मालेचे खडक तयार झाले. तेव्हा व त्यानंतरच्या काही काळात जलवायुमान रुक्ष वाळवंटी झाले होते. त्यानंतरच्या व गोंडवनी कल्पाच्या अखेरच्या कालात जलवायुमान सापेक्षतः दमट व उष्ण होते.
जीवाश्म : गोंडवनी खडकांत जीवाश्म विरळाच आणि प्राण्यांचे जीवाश्म फारच थोड्या खडकांत सापडतात. त्यांच्या मानाने वनस्पतींचे जीवाश्म अधिक प्रमाणात व ते मुख्यतः दामोदर (दामुदा) आणि राजमहाल मालांच्या खडकांत सापडतात.
वर्गीकरण : गोंडवनी संघाच्या खडकांत आढळणाऱ्या वनस्पतींच्या जीवाश्मांची लक्षणे लक्षात घेऊन त्या संघाचे पूर्व व उत्तर असे दोन विभाग करण्यात येतात. पूर्व गोंडवनी खडक तयार झाले त्या काळी ग्लॉसोप्टेरीस वनश्रीच्या वनस्पती द्वीपकल्पात असत. पुढे त्या निर्वंश झाल्या. उत्तर गोंडवनी खडक तयार झाले त्या काळी टायलोफायलम वनश्रीच्या वनस्पती द्वीपकल्पात असत. गोंडवनी संघाचे अनेक विभाग व उपविभाग करण्यात आलेले आहेत. त्यांपैकी मुख्य विभागांची नावे कोष्टक क्र. १ मध्ये अनुक्रमे दिली आहेत व त्यांपैकी प्रत्येक विभागाशी तुल्य अशा आंतरराष्ट्रीय श्रेणीतील विभागांची नावे त्यांच्या समोर दिलेली आहेत.
कोष्टक क्र. १ गोंडवनी संघाचे (व कल्पाचे) विभाग |
||
भारतातील विभाग आंतरराष्ट्रीय विभाग |
||
विभाग |
माला (उपविभाग) |
संघ (व कल्प) |
उत्तर गोंडवनी संघ |
ऊमिया जबलपूर } राजमहाल महादेव किंवा पंचमढी } |
पूर्व क्रिटेशस जुरासिक
ट्रायासिक |
पूर्वगोंडवनी संघ |
पांचेट दामोदर तालचेर |
पर्मियन उत्तर कार्बॉनिफेरस |
तालचेर व दामोदर या मालांचे खडक दामोदर नदीच्या, शोण व महानदी यांच्या आणि गोदावरीच्या खोऱ्यांत तसेच राजमहालात व सातपुड्यात आढळतात. पांचेट मालेचे खडक दामोदर व गोदावरी यांच्या खोऱ्यांत व सातपुड्यात आढळतात. राजमहाल मालेचे खडक राजमहालात, दामोदर नदीच्या तसेच शोण व महानदी यांच्या खोऱ्यांत आणि आंध्र प्रदेश, तमिळनाडू यांच्या पूर्व किनाऱ्यावर आढळतात. जबलपूर मालेचे खडक मुख्यतः सातपुड्यात, शोण व महानदी यांच्या खोऱ्यांत आणि ऊमिया मालेचे खडक कच्छात आढळतात.
खडकांचे प्रकार : पूर्व गोंडवनी संघाचा बराचसा भागा वालुकाश्म, शेल व दगडी कोळसा यांच्या थरांचा बनलेला आहे. उत्तर गोंडवनी संघ मुख्यतः वालुकाश्मांचा बनलेला असून त्याच्यात मधूनमधून मातीचे वा मार्लचे थरही आढळतात. गोंडवनकालीन गाळ साचल्यावर द्वीपकल्पाच्या भूमीवर भूकवचाच्या संपीडक (दाबणाऱ्या) हालचालींचा परिणाम झालेला नसल्यामुळे त्या गाळांचे थर अविक्षोभित (घड्या न पडता, भंग न पावता जसेच्या तसे) राहिलेले आहेत. ते सपाट आडवे किंवा किंचित तिरपे असलेले आढळतात.
बहुसंख्य गोंडवनी खडक जमिनीवर गाळ साचून तयार झालेले आहेत, पण जमिनीलगतच्या उथळ समुद्राच्या वा खाड्यांच्या पाण्यात गाळ साचून तयार झालेले गोंडवनी खडक पूर्व किनाऱ्यालगत असणाऱ्या विशाखापट्टनम् व तंजावर यांच्या मधे असलेल्या पट्टीत आणि पश्चिम किनाऱ्यावरील कच्छात आढळतात. अशा खडकांत सर्वसामान्य गोंडवनी खडकांत आढळतात तशा जीवांचे व सागरी जीवांचे जीवाश्म आढळतात. सागरी जीवाश्मांवरून त्या खडकांचे आणि पर्यायाने जमिनीवर साचलेल्या थरांचे भूवैज्ञानिक वय ठरविण्यास मदत होते. कोरोमंडल किनाऱ्यावर आढळणाऱ्या अशा खडकांपैकी महत्त्वाचे म्हणजे राजमहेंद्रीजवळ आढळणारे खडक होत. त्यांच्यात ट्रायगोनियासारख्या सागरी शिंपांचे व ॲमोनाइटांचे जीवाश्म असणारे थर व त्या थरांत मधूनमधून जमिनीवर वाढणाऱ्या सायकॅड व शंकुमंत (कॉनिफेरेलीझ) या गटांतील वनस्पतींच्या पानांचे जीवाश्म असणारे थर आढळतात. कच्छात आढळणारे अशाच प्रकारचे थर गोंडवनी खडकांपैकी सर्वांत नवे असून त्यांच्यावरून गोंडवनी कल्पाची अखेर केव्हा झाली तो काळ ठरविता येतो, म्हणून ते अत्यंत महत्त्वाचे आहेत [→ कच्छाचा जुरासिक शैलसमूह].
ज्वालामुखी क्रिया : उत्तर गोंडवनी कल्पात आजचे राजमहाल डोंगर असलेल्या प्रदेशात ज्वालामुखी क्रिया घडून आली व बेसाल्टी लाव्हे जमिनीच्या पृष्ठावर ओतले गेले. ज्वालामुखी उद्गिरणे (उद्रेक) सविराम घडून आली. एक उद्गिरण घडून आल्यावर कमीअधिक व कधीकधी दीर्घकाल लोटल्यावर दुसरे उद्गिरण होई. दोन उद्गिरणांच्या मधल्या काळात त्या क्षेत्रात गाळ साचत असे. त्या गाळाचे थर मागाहून बाहेर पडलेल्या लाव्ह्याने झाकले जात. राजमहाल डोंगर म्हणजे अशा तऱ्हेने तयार झालेल्या लाव्ह्यांच्या आणि अंतःस्तरित (त्यांमधील) गाळांच्या थरांची राशीच आहे. बेसाल्टी लाव्ह्यांचे थर सपाट आडवे आहेत. त्यांना राजमहाल ट्रॅप असेही म्हणतात. त्यांच्या थरात मधूनमधून असणाऱ्या गाळांच्या थरांना अंतराट्रॅपी थर म्हणतात. लाव्ह्यांची एकून जाडी जवळजवळ ७०० मी. व अंतराट्रॅपी थरांची सु. ३३ मी. भरते. अंतराट्रॅपी थरांत वनस्पतींचे जीवाश्म विपुल सापडतात.
पूर्व गोंडवन कालीन जीव : तालचेर मालेचा तळ गोलाश्म संस्तराचा बनलेला आहे. त्याच्यात जीवाश्म सापडत नाहीत, पण त्या मालेच्या वरच्या भागातील वालुकाश्मात व शेलात थोडे जीवाश्म सापडतात. ते बहुतेक वनस्पतींचे आहेत. दामोदर मालेत अधिक जीवाश्म आढळतात. त्यांपैकी बरेचसे वनस्पतींचे व काही जीवाश्म उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणारे प्राणी), मासे व क्रस्टेशिया (कवचधारी) या गटांतल्या प्राण्यांचे आहेत. पांचेट मालेच्या काली जलवायुमान वाळवंटी होते. तिच्या खडकांत वनस्पतींचे जीवाश्म थोडेच आढळतात, पण आढळतात ते ग्लॉसोप्टेरीस वनश्रीपैकी असतात. पांचेट खडकांत मासे, उभयचर, सरीसृप (सरपटणारे) आणि क्रस्टेशिया या गटांतल्या प्राण्यांचे जीवाश्मही आढळतात.
पूर्व गोंडवन कालीन वनस्पतींत बीजी नेचे प्रमुख असत. बीजी नेचांपैकी प्रमुख वंश म्हणजे ग्लॉसोप्टेरीस व त्याच्यावरून त्या काळातील एकूण वनस्पतींना ग्लॉसोप्टेरीस वनश्री म्हणतात. त्या काळातील बीजी नेचांचा दुसरा एक वंश म्हणजे गँगॅमोप्टेरीस. ग्लॉसोप्टेरीस व गँगॅमोप्टेरीस ही नावे पानांच्या जीवाश्मांची होत. त्या वंशांच्या अनेक जाती त्या वेळी होत्या. त्यांच्या पानांप्रमाणेच त्यांच्या मूलक्षोडांचेही [जमिनीखालील आडवे खोड → खोड] विपुल जीवाश्म आढळतात. त्यांना व्हर्टेब्रॅरिया म्हणतात. दामोदर मालेच्या खडकांत वृक्षांच्या खोडांचे पुष्कळ जीवाश्म आढळलेले आहेत. त्यांपैकी कित्येक मोठे असून काही खोडांची लांबी सु. २०—३० मी.पर्यंत व व्यास सु. १/२ ते ३/४ मी.पर्यंत भरतो. अशा खोडांपैकी कित्येक खोडे कॉर्डाइटेलीझ गटातील वृक्षांची असण्याचा संभव आहे. एक्विसीटेलीझ, स्फेनोफायलेलीझ, फिलिकेलीझ व कॉर्डाइटेलीझ या गटांतल्या वनस्पतीही पूर्व गोंडवनी कल्पात असत. पांचेट मालेच्या खडकांत सायकॅडोफायटांपैकी टीनिऑप्टेरीस या वंशातील वनस्पतींचे जीवाश्म आढळलेले आहेत.
पूर्व गोंडवनी कल्पातील प्राणी : दामोदर मालेच्या काही खडकांत क्रस्टेशियांपैकी एस्थेरिया यांच्या कवचाचे जीवश्म विपुल व इतर प्राण्यांचे विरळाच आढळतात. गोड्या पाण्यात पाहणाऱ्या माशांच्या खवल्यांचे व दातांचे जीवाश्म क्वचित मिळालेले आहेत. त्याच काळातल्या व सातपुड्यातील बिजोरी येथल्या खडकांत एका आदिम (आद्य) उभयचर प्राण्याच्या सांगाड्याचे अवशेष सापडलेले आहेत. तो प्राणी लॅबिरिंथोडोंट गटातील असून त्याला (त्याच्या वंशाला) गोंडवनसॉरस असे नाव देण्यात आलेले आहे.
पांचेट मालेच्या खडकांत गोड्या पाण्यातील माशांच्या अवशेषांचे व लॅबिरिंथोडोंटांच्या गटातील तीन वंशाच्या प्राण्यांच्या व काही सरीसृपांच्या सांगाड्यांचे जीवश्म मिळालेले आहेत. सरीसृपांपैकी महत्त्वाचे म्हणजे डिसिनोडोंशिया गटातील डिसिनोडॉन व डायनोसॉर गटातील एपिकँपोडॉन हे होत.
नागपुराच्या दक्षिणेस ८० किमी.वर व चंद्रपुराच्या वायव्येस ५६ किमी.वर असलेल्या मांगळी नावाच्या ओसाड खेड्याजवळील खाणीत उभयचरांच्या लॅबिरिंथोडोंट गटातील ब्रॅकिऑप्स लॅटिसेप्स या जातीचे जीवाश्म सापडलेले आहेत.
उत्तर गोंडवनी कल्पातील जीव : उत्तर गोंडवनी कल्पाच्या प्रारंभी पांचेट मालेच्या काळातील रुक्ष वाळवंटी परिस्थिती नाहीशी होऊन जलवायुमान एकंदरीत दमट झाले होते. वनस्पतींची बरीच वाढ झाली होती. या कल्पाच्या खडकांत दगडी कोळशाचे लहानसहान थर क्वचित आढळतात, पण मोठे व औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे साठे सापडत नाहीत. पूर्वीची ग्लॉसोप्टेरीस वनश्री जाऊन सायकॅडांच्या गटातील वनस्पती प्रमुख झाल्या होत्या. त्या वनस्पतींपैकी सर्वांत महत्त्वाची म्हणजे टायलोफायलम ॲक्युटिफोलियम ही जाती होय, म्हणून त्या वनश्रीला टायलोफायलम वनश्री असे म्हणतात. त्या वनश्रीचे उत्कृष्ट व विपुल जीवाश्म राजमहाल डोंगरातील अंतराट्रॅपी खडकांत आढळलेले आहेत. त्या खडकांत आढळणाऱ्या जीवाश्मांपैकी सर्वांत विपुल म्हणजे सायकॅड गटाच्या बेनेटाइटेलीझ नावाच्या एका उपगटातील वनस्पतींचे होत. हा उपगट आता निर्वंश झालेला आहे. बेनेटाइटेलिझाचे राजमहाल खडकांत आढळणारे प्रमुख वंश टायलोफायलम (पाने), बकलँडिया (खोड), विल्यमसोनिया (फुले), टेरोफायलम व टीनिऑप्टेरीस ही होत. नेचे व शंकुमंत यांच्या जीवाश्मांची संख्या बेनेटाइटेलिझाच्या जीवश्मांपेक्षा कमी पण सापेक्षतः बरीच भरते. केटोनिएलीझ, एक्विसीटेलीझ, लायकोपोडिएलीझ इ. गटांतील वनस्पतींचे थोडे जीवाश्मही आढळतात. त्या काळी बीजी नेचे व कॉर्डाइटेलीझ ही नाहीशी झाली होती, एक्विसीटेलीझ गटातील वनस्पतींची संख्या बरीच कमी झाली होती, पण नेचे व शंकुमंत यांची बरीच प्रगती झाली होती. या नंतरच्या काळात शंकुमंतांची प्रगती वेगाने होत गेली व सायकॅडांचे महत्त्व कमी होत गेले. ऊमिया मालेच्या खडकांत टायलोफायलम, टीनिऑप्टेरीस इ. सायकॅडी वनस्पतींचे जीवाश्म आढळतात, पण त्यांच्या मानाने शंकुमंतांच्या जीवाश्मांची संख्या पुष्कळच अधिक भरते. शंकुमंतांपैकी मुख्य म्हणजे एलाटोक्लॅडस, ब्रॅकिफायलम व ॲरॉकॅराइट्स ही होत. नेचांचे थोडे जीवाश्मही आढळतात.
उत्तर गोंडवनी काळातील प्राणी : क्रस्टेशियांपैकी एस्थेरियांचे विपुल जीवाश्म क्वचित आढळतात, पण उच्च गटांतील फारच थोड्या प्राण्यांचे जीवाश्म त्यांच्यात आढळलेले आहेत. व जीवाश्म मासे, लॅबिरिंथोडोंट व सरीसृप यांचे आहेत. उदा., आंध्र प्रदेशातील मालेरी (मार्वेली, तालुका आसिफाबाद) येथील खडकांत माशांच्या सेरॅटोडस या वंशातील तीन जातींचे व एका लॅबिरिंथोडोंटाचे जीवाश्म सापडलेले आहेत. त्याच खडकांत सुसरीसारखा बेलोडॉन व डायनोसॉरांपैकी मेस्सोस्पाँडिलस यांचे आणि आणखी दोन सरीसृप वंशांचे जीवाश्म व काही विष्ठाश्म आढळलेले आहेत. पंचमढी भागातील देन्वा येथील खडकांत लॅबिरिंथोडोंट गटातील मॅस्टोडॉनसॉरस इंडिकस याचा जीवाश्म सापडलेला आहे. ऊमिया मालेच्या थरात लांब मान असणाऱ्या व पाण्यात पोहत राहणाऱ्या सरीसृपांपैकी प्लेसिओसॉरस इंडिकस याचा जीवाश्म सापडलेला आहे.
आर्थिक महत्त्व : दामोदर मालेच्या खडकांत दगडी कोळशाचे प्रचंड साठे आहेत व भारतातील दगडी कोळशाच्या एकूण उत्पादनापैकी सु. ऐंशी टक्के दगडी कोळसा याच साठ्यांपासून मिळविला जातो. केओलीन, अग्निसह (आग सहन करणारी) माती, मृत्तिका उद्योगात (मातीपासून विविध वस्तू बनविण्याच्या उद्योगात) लागणारी निरनिराळ्या प्रकारची माती, बांधकामासाठी लागणारे वालुकाश्म इ. पदार्थ गोंडवनी खडकांपासून मिळविले जातात.
गोंडवनभूमी : भारतातील गोंडवनी खडकांसारखे आणि तसेच जीवाश्म असणारे खडक दक्षिण गोलार्धातील खंडांत (दक्षिण आफ्रिकेत, आग्नेय ऑस्ट्रेलियात व दक्षिण अमेरिकेत) आढळलेले आहेत. त्या सर्वांच्या तळाशी तालचेर गोलाश्म संस्तराशी तुल्य असे गोलाश्म संस्तर आढळतात. ते तयार झाले त्या काळी त्या सर्व प्रदेशांत हिमकाल होता व जलवायुमान शीत होते. त्यानंतर वरील सर्व प्रदेशांचे जलवायुमान दमट व सापेक्षतः उबदार होते व त्यांच्यात ग्लॉसोप्टेरीस वनश्रीची खूप वाढ होऊन कित्येक क्षेत्रांत दगडी कोळशाचे थर तयार झाले. अंटार्क्टिकातही ग्लॉसोप्टेरीस वनश्रीचे जीवाश्म असलेले खडक सापडलेले आहेत. वर उल्लेख केलेल्या आणि इतर अनेक साम्यांवरून असे सूचित होते की, हे खडक तयार झाले त्या काळी भारताचे द्वीपकल्प व दक्षिण गोलार्धातील वरील प्रदेश हे कोणत्या तरी जमिनीने एकमेकांशी सलग जोडले गेले होते. त्या काळी दक्षिण गोलार्धात या सर्वांचे मिळून एक विस्तीर्ण खंड होते व ते भारताच्या द्वीपकल्पाशी एखाद्या सेतूने जोडले गेले होते, असे सुचविण्यात आलेले आहे. त्या कल्पित खंडाला झ्यूस यांनी ⇨गोंडवनभूमी असे नाव दिले.
पहा : खंडविप्लव.
संदर्भ : 1. Krishnan, M. S. Geology of India and Burma, Madras, 1960.
2. Wadia, D. N. Geology of India, New York, 1961.
केळकर, क. वा.
“