गोएथाइट : (बॉग आयर्न ओअर). खनिज. स्फटिक समचतुर्भुजी प्रचिनाकार किंवा चापट वडीसारखे. प्रचिनांवर उभ्या रेषा असतात [→ स्फटिकविज्ञान]. तंतूसारख्या स्फटिकांच्या पुंजक्यांच्या संपुंजित, वृक्काकार (मूत्रपिंडासारख्या), गुच्छाकार, झुंबराकार, पर्णित (पापुद्र्याप्रमाणे), शल्कमय (खवल्यासारख्या) व अंदुकासारख्या (राजगिऱ्यासारख्या कणांच्या) राशीही आढळतात. बॉग आयर्न ओअर सच्छिद्र व सैलसर असते. पाटन : (010) उत्कृष्ट [→ पाटन]. भंजन खडबडीत. कठिनता ५-५·५ वि. गु. ४·३७ (अशुद्ध असल्यास ३·३). दुधी काचेप्रमाणे पारभासी. चमक काहीशी हिऱ्यासारखी, पापुद्र्यांची व तंतूंची रेशमासारखी. रंग पिवळसर ते उदी, तांबूसही. कस उदसर पिवळा ते नारिंगी. रा. सं. Fe2O3.H2O. हे बंद नळीत तापविल्यास पाणी बाहेर पडते. सामान्य दाब-तापमानास लोह खनिजांचे वातावरणक्रियेने ⇨ ऑक्सिडीभवन होऊन गोएथाइट तयार होते. दलदलीमध्ये, सरोवरात व झऱ्यातही पाण्यामार्फत गोएथाइट निक्षेपित होते (साचते). जांभ्यात, लोहयुक्त चुनखडकात किंवा गोसानामध्ये ⇨ लिमोनाइटा बरोबर ते आढळते. ज्याला पूर्वी लिमोनाइट समजत त्यांपैकी पुष्कळ प्रत्यक्षात गोएथाइट असल्याचे क्ष-किरणांमुळे कळून आले. क्यूबा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, फ्रान्स, जर्मनी इ. देशांमध्ये गोएथाइट सापडते. लोहाचे धातुक (कच्ची धातु ) म्हणून ते वापरतात. प्रसिद्ध जर्मन कवी गटे यांच्या नावावरून १८०६ साली लेंट्स यांनी याला गोएथाइट हे नाव दिले.
ठाकूर, अ. ना.