गेस्नर, कोनराट फोन : (२६ मार्च १५१६—१३ डिसेंबर १५६५). जर्मन-स्वीस प्रकृतिवैज्ञानिक. वनस्पतिविज्ञान व प्राणिविज्ञान यांविषयीच्या महत्त्वपूर्ण ग्रंथांकरिता प्रसिद्ध. त्यांचा जन्म झुरिक येथे झाला आणि शिक्षण पॅरिस, बाझेल व माँपेल्ये येथे झाले. या ठिकाणी त्यांनी ग्रीक, लॅटिन, प्राच्य भाषा, वैद्यक, प्रकृतिविज्ञान इ. अनेक विषयांचा अभ्यास केला. १५३७ मध्ये लोझॅन येथे ग्रीक भाषेचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली, पण आपला वैद्यकाचा अभ्यास पुरा करण्याकरिता त्यांनी १५४० मध्ये त्या जागेचा राजीनामा दिला. १५४१ मध्ये त्यांनी बाझेल विद्यापीठाची एम्.डी. पदवी मिळविली आणि झुरिक येथे व्यवसायाला सुरुवात केली. त्याच वर्षी भौतिकीचे अधिव्याख्याते व झुरिक गावाचे भिषम्वर म्हणून त्यांची नेमणूक झाली. गेस्नर हे अनेक विषयांनी माहिती असलेली अष्टपैलू बुद्धिमत्तेचे असल्यामुळे क्यूव्ह्ये या प्रसिद्ध फ्रेंच प्रकृतिवैज्ञानिकांनी त्यांना जर्मन प्लिनी (प्लिनी नावाच्या प्रसिद्ध प्राचीन रोमन विद्वानांच्या नावावरून) असे संबोधले होते. १५६४ मध्ये त्यांना सरदार करण्यात आले.
त्यांच्या समकालीनांना ते वनस्पतिशास्त्रज्ञ म्हणून माहीत होते. त्यांचे वनस्पतिविज्ञानावरील बहुतेक लिखाण त्यांच्या मृत्यूनंतर २०० वर्षांनी न्यूरेंबर्ग येथे प्रसिद्ध झाले, पण Enchiridion historiae plantarum (१५४१) आणि Catalogus plantarum (१५४२) हे दोन ग्रंथ त्यांच्या हयातीतच प्रसिद्ध झाले. त्यांचा Historia animalium हा महत्त्वाचा ग्रंथ आधुनिक प्राणिविज्ञानाचे उगमस्थान मानला जातो. या ग्रंथात त्या काळी माहीत असलेल्या सर्व प्राण्यांची तंतोतंत वर्णने आणि बिनचूक चित्रे त्यांनी दिलेली आहेत. १५६५ मध्ये झुरिक येथे आलेल्या एका रोगाच्या साथीत आपल्या रोग्यांना सोडून जाण्याचे त्यांनी नाकारले व अखेरीस ते त्या साथीला बळी पडले.
जमदाडे, ज. वि.