गेलिक भाषा : इंडो-यूरोपियनच्या केल्टिक गटातील बहुतेक भाषा नष्ट झाल्या. ज्या टिकून राहिल्या, त्यांच्या दोन शाखा अस्तित्वात आहेत : किमरिक (वेल्श) व गेलिक.

गेलिकची जन्मभूमी आयर्लंड ही असून तिचे पाचव्या शतकाच्या सुमाराचे ‘ओगॅमिक’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रूनिक लिपीतील ३५० छोटे कोरीव लेख उपलब्ध आहेत. त्यांतून फारच तुरळक भाषिक माहिती मिळते. आयरिशमधील फुटकळ स्वरूपाचे धार्मिक लेखन व त्यावरील लॅटिन टिप्पणी नवव्या शतकापासून मिळतात.

आजही गेलिक आयर्लंडच्या कोपऱ्यातून, स्कॉटलंडच्या डोंगराळ भागात आणि आइल ऑफ मॅन येथे बोलली जाते. प्राचीन व विकारसमृद्ध अशा केल्टिकचे योग्य दर्शन घडविणारी आयरिश ही एकच भाषा आता अस्तित्वात आहे. टिप्पण्यांची भाषा प्राचीन, त्यानंतरची बाराव्या शतकापासूनची मध्य व सतराव्या शतकापासूनची अर्वाचीन भाषा म्हटली जाते. व्यवहारात मात्र ‘गेलिक’ हे नाव स्कॉटलंडच्या भाषेलाच देण्यात येते. 

गेलिक अक्षरमालेत फक्त १८ अक्षरे आहेत पाच स्वरदर्शक व तेरा व्यंजनदर्शक : a, e, i, o, u (स्वर) आणि b, c, d, f, g, h, l, m, n, p, r, s, t (व्यंजने).

नामात पुल्लिंग व स्त्रीलिंग एकवचन व अनेकवचन हे भेद आहेत. विभक्त्या चार आहेत : प्रथमा, चतुर्थी, षष्ठी व संबोधन. अनेकवचनात लिंगभेद दिसून येत नाही.

सर्वनामे ए. व. मी, तू, ए- इ :  अ. व. सिन, सिव्ह, इआद. 

विशेषणांना विभक्ती व वचन यांना धरून विकार होतो. लिंगविकार शब्दारंभी महाप्राण जोडून दाखवला जातो :   मोर ‘मोठा’, म्होर ‘मोठी’, मोरा ‘मोठे, मोठ्या’. तुलनादर्शक विशेषणाचे रूप स्त्रीलिंगी षष्ठीच्या एकवचनासारखे असते. अपवाद बरेच आहेत.

विशेषणाला ‘गु’ हा उपसर्ग लावून क्रियाविशेषण बनते. 

क्रियापदात प्रयोग, अर्थ, काळ, वचन व पुरुष हे भिन्न आहेत.

संदर्भ :  1. Macbain, A. Gaelic Reader, Inverness, 1920. 

             2. Meillet, A. Introduction a l’e’ tude comparative des langues indoeuropeennes, 1948. 

कालेलकर, ना. गो.