गुल्म : (ट्यूमर). पोटातील गाठीला गुल्म म्हणतात. गुल्मात वायुगोळा, स्त्रियांत होणारे रक्तगुल्म (रक्तार्बुद), प्लीहावृद्धी (पानथरीची वाढ) व आंत्रांत्रनिवेशासारखी तीव्र गाठ ह्यांचा समावेश होतो. गुल्माची कारणे, रोगलक्षणे व चिकित्सा कारणानुवर्ती आहेत. त्याकरिता अर्बुदविज्ञान, आंत्रांत्रनिवेश, व प्लीहा या नोंदी पहाव्यात. 

आपटे, ना. रा.

आयुर्वेदीय वर्णन : कारणे : जो मनुष्य ज्वर, ओकारी, अतिसार इत्यादींनी तसेच वमन, विरेचन, आस्थापन (औषधांची बस्ती), रक्तसृती इ. कर्मांनी अशक्त व कृश झाला असता रुक्ष, लघू, शीतादि वातूळ अन्न खातो, जो भूक लागली असता अन्नाच्या ऐवजी थंड पाणी पितो, जो जेवणानंतर चालणे, पोहोणे इ. शरीराला ताण देणारी संक्षुब्ध करणारी कर्मे करतो, जो होत नसताना मुद्दाम वांती करवितो व मलमूत्रादींचे आलेले वेग मुद्दाम धारण करतो आणि पंचकर्मांची स्नेहन, स्वेदन इ. पूर्वकर्मे न करताना वमन विरेचनादी शोधन कर्मे जो करतो, शरीर शुद्ध झाल्यानंतर लागलीच जड, विदाही, अभिष्यंदी पदार्थ खातो, अशा त्या अशक्त मनुष्याच्या अशक्त झालेल्या आमाशय, ग्रहणी, बस्ती, हृदय, फुप्फुसे इ. अवयवांच्यामध्ये वरील आहाराने दुष्ट झालेले वातप्रधान दोष दुष्ट होऊन वरील कारणांनी अशक्त झालेल्या अवयवाच्या भागात जाऊन स्थिर ठेवतात व तेथे शक्यरूप होतात. त्यामुळे शूल उत्पन्न होतो. त्या अशक्त अवयवांचे व त्यांच्या अशक्त झालेल्या भागांचे पोषण न होता तेथेही वातूळ द्रव्यांनी वात, विदाही द्रव्यांनी पित्त व अभिष्यंदी द्रव्यांनी झालेला कफ संचित होतो. हे अवयव सतत कर्मकर असल्यामुळे ह्या दोषांनाही ते बाहेर घालविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते अधिक कृश, आकारांनी पातळ, रुक्ष झाल्यामुळे कठीण, खरखरीत होतात. त्यामुळे त्याचा आकारही वाढतो. जुन्या रबरी फुग्याचा आकार वाढतो तसा तो आकार वरूनही स्पर्शाला लागतो. त्याच्यावर केव्हा केव्हा रुक्ष, काळसर, अरुण अशा वर्णांच्या शिरांचे जाळेही निर्माण झालेले असते. त्याला गुल्म म्हणतात. ज्या एका दोषाचे किंवा अधिक दोषांचे किंवा दुष्ट रक्ताचे तेथे वास्तव्य व शल्यत्व आधिक्याने असेल त्या तऱ्हेने त्या दोषाचे त्याला नाव दिले जाते. आहार, पान, मल, रस, रक्त ह्यांचे वहन त्या त्या अवयवातून स्वाभाविक रीतीने होत नाही, आवरण होते. 

वरीलप्रमाणे आंत्राचा, बस्तीचा, हृदयाचा, रक्तवाहिनीचा, श्वासवाहिन्यांचा भाग ढिला, ताणलेला, वर उचलून आलेला असा राहतो. त्यामुळे तो तिथे वरूनही स्पर्शाला समजतो. उदरामध्ये व छातीच्या फासळ्यांच्या मधल्या भागातही असा भाग हाताला लागतो. ह्यालाच गुल्म असे म्हणतात. त्यातून नैसर्गिक रीतीने ऊर्ध्ववहन, अधोवहन जे असेल ते होत नाही, अडते.

चिकित्सा : गुल्माच्या कारणांचा विचार केल्यास तो शरीराला क्षीण करणाऱ्या कारणांनी प्रामुख्याने होत असतो. म्हणून ह्यात मुख्य दोष वात असतो. हा कमी करण्याकरिता व क्षीणता नाहीशी करण्याकरिता तेल व तूप अशा स्निग्ध द्रव्यांचाच अर्थात, औषधाने सिद्ध द्रव्यांचाच उपयोग त्या त्या गुल्माच्या स्थानाला अनुसरून करावा लागतो. गुल्म जर नाभीच्या वरच्या भागात म्हणजे आमाशय, फुप्फुस, गल ह्या भागांत असेल, तर स्नेह पिण्याला देणे हितकर होते. जर नाभीच्या खालच्या भागात म्हणजे मोठे आतडे, पक्वाशय, मलाशय, बस्ती, योनी ह्या भागांत असेल, तर बस्ती देणे चांगले आणि नाभीमध्ये (ग्रहणीमध्ये) असेल, तर स्नेहाचे बस्ती आणि पान उपयुक्त होईल.

(१) वातज गुल्माची अवस्थानुरूप चिकित्सा  : ज्यामध्ये मळाच्या गाठी असून शौचाला व वात सरण्याला अवरोध होतो, पोट फुगलेले असते व तीव्र वेदना असतात तसेच जो रुक्ष आणि शीत अशा कारणांनी झालेला असतो त्याला वातरोग चिकित्सेत सांगितलेली तेले द्यावीत. ही तेले आहारामध्ये पिण्याला, अभ्यंगाला आणि बस्तीला वापरावीत. नंतर स्निग्ध झालेल्या रोग्याला शेक द्यावा. ह्यामुळे स्त्रोतसे मऊ होऊन वाढलेला वात कमी होतो. अवरोध नाहीसा होऊन मल व वात ह्यांचे अनुलोमन होते. पोट फुगणे व वेदना नाहीशा होतात. 

वातिक गुल्मामध्ये मल आणि वात ह्यांचा अवरोध असेल व अग्नी चांगला असेल, भूक लागत असेल तर पौष्टिक असे अन्नपान द्यावे. अर्थात ते स्निग्ध आणि उष्ण द्यावे. वातज गुल्मांवर पुनःपुन्हा हे उपचार स्थानाला अनुसरून केले पाहिजेत. मात्र कफ आणि पित्त यांचा प्रकोप होणार नाही इकडे लक्ष दिले पाहिजे. ह्याकरिता नियंत्रण असणे जरूर आहे. म्हणजे प्रमाणाने हे उपचार केले पाहिजेत.

कोणत्याही दोषाचा गुल्म असला, तरी बस्तिकर्म हे सर्वांत श्रेष्ठ आहे. बस्तिकर्माने गुल्मामधला मुख्य दोष जो वात तो जिंकला जातो. हिंग्वादी, हपुषादि, दशमूलादि, त्र्यूषणादि, लशूणादि, षट्पल ही सिद्ध तुपे द्यावीत. 

वातगुल्मामध्ये भूक लागत नसेल, अरुची असेल, तोंडाला पाणी सुटत असेल, जडपणा असेल व तंद्रा असेल तर कफ दोष वाढलेला आहे असे समजून हलकेसे वमन देऊन कफ काढून टाकावा.

वरील चिकित्सा करूनही शूल, पोट फुगणे आणि मलमूत्राविरोध असेल, तर गुल्माचे स्थान स्निग्ध झाले आहे की नाही हे पाहून ज्या औषधांची तुपे तयार करावयास सांगितली आहेत त्यांचेच काढे, गोळ्या व चूर्णे करून यांपैकी योग्य त्यांचा उपयोग करावा. गुल्म झालेला अवयव जर स्निग्ध नसेल, तर वरील औषधांनी सिद्ध केलेली तुपेच वापरावीत. चूर्णे इ. वापरू नयेत. ती चूर्णे बोर, डाळिंब, ऊन पाणी, ताक, मद्य, आंबट कांजी किंवा दह्यावरची निवळी ह्यांच्याबरोबर सकाळी किंवा जेवणाच्या अगोदर द्यावीत. कफवाताचा संबंध असताना ह्या चूर्णास महाळुंगाच्या रसाच्या भावना देऊन त्यांच्या गोळ्या करून त्या द्याव्यात. तसेच वैश्वानर चूर्ण, शार्दूल चूर्ण, त्रिकटूदि चूर्ण इ. चूर्णे निरनिराळ्या अवस्थांत द्यावीत.

वातगुल्माबरोबर श्वास, कास, हृद्रोग इ. विकार असतील, तर त्या त्या प्रमाणे योग उपयोगात आणावेत. उदा., वातज गुल्माबरोबर वात, हृद्रोग, अर्श, योनिशूल, मलावरोध हे विकार असतील तर सुंठ, गूळ, काळे तीळ ही एक, दोन आणि चार ह्या प्रमाणात घेऊन कोमट दुधाबरोबर द्यावीत. 

वातगुल्मात कफाचे बल असेल, तर मद्याच्या निवळीबरोबर आणि पित्ताचे बल असेल, तर दुधाबरोबर एरंडेल प्यावे व पित्त अतिशय वाढून दाह होत असेल, तर सस्नेह अनुलोमन करणारे असे विरेचन द्यावे. हे करूनही तेवढ्याने दाह कमी झाला नाही तर रक्तसृती करावी. नलिनी घृत द्यावे. वातगुल्मामध्ये पोट फुगलेले असेल, गृध्रसी, विषमज्वर, हृद्रोग, विद्रधी, शोष असेल तर लसूणसिद्ध दूध द्यावे. शूल आणि अवरोध असेल, तर चित्रकादि काढा हिंग, सैंधव व बिडलोण घालून द्यावा. दाह आणि वेदना असतील, तर पुष्करादि काढा द्यावा. अशा रीतीने वातगुल्मात निरनिराळ्या अवस्थांप्रमाणे ग्रंथोक्त उपचार करावेत. 

वातगुल्मी मनुष्याचा आहार : कोंबडा, मोर, तित्तिर, करकोचा व रानचिमणी यांचे मांस साळी, मद्य व तूप यांचा आहारात उपयोग करावा. उष्ण, द्रव व स्निग्ध पदार्थांचे मितभोजन वातगुल्म झालेल्या रोग्यास द्यावे. ते हितावह आहे व पिण्याकरिता वारुणीची निवळ व धण्याचे उकळलेले पाणी उत्तम आहे.


(२) पित्तज गुल्माची अवस्थानुरूप चिकित्सा : स्निग्ध व उष्ण ह्या कारणांनी होणाऱ्या पित्तगुल्मात द्राक्षादिचूर्ण मधाबरोबर रेचनाकरिता द्यावे. रुक्ष व उष्ण कारणांनी झालेल्या पित्तगुल्मात तिक्त घृत, वासाघृत, तृणपंचमूळ सिद्ध तूप, जीवनीय गणांतील औषधांनी सिद्ध तूप किंवा दूध द्यावे. अतिशय तीव्र अवस्था असेल, तर विरेचन गणांतील द्रव्यांनी सिद्ध केलेल्या तुपाने किंवा दुधाने विरेचन द्यावे. आमलकी घृत, तैल्वक घृत द्यावीत. मनुका, भुईकोहळा, जेष्ठमध, चंदन, पद्मकाष्ठ यांचा कल्क तांदुळाच्या धुवणाबरोबर व मधाबरोबर द्यावा. त्रायमाणाचा अष्टमांश काढा दुधाबरोबर द्यावा. दाह होत असेल, तर शीतवीर्य औषधांनी सिद्ध केलेल्या तुपाने अभ्यंग करावा. तसेच त्या औषधांचा कल्क करून त्यात तूप घालून त्यांचा लेप करावा. कमळाची ओली पाने वर ठेवावी व थाळीमध्ये पाणी घेऊन जेथे दाह होत असेल तेथे थाळी धरावी व त्यात नवे नवे पाणी घालीत जावे. गुल्माच्या पूर्वरूपात विदाह झाला असून पुढे शूल आणि अग्निमांद्य असल्यास अनेक वेळा रक्तस्त्राव करावा. पित्तगुल्मावर विशेषतः रक्त काढावे. रक्त काढल्याने पित्तगुल्म पिकत नाही. तसेच वेदनाही कमी होतात. इतके करूनही पित्तगुल्म पिकू लागला, तर पित्त विद्रधीची चिकित्सा करावी. 

पित्तगुल्मी मनुष्याचा आहार : गाईच्या व शेळीच्या दुधाबरोबर साळीचा भात, पडवळाची भाजी, जांगल मांस, तूप, आवळा, फालसा, द्राक्ष, खजूर, डाळिंब व खडीसाखर हे पदार्थ खाण्यास द्यावे. पिण्यास चिकणामूळ घालून सिद्ध केलेले पाणी द्यावे.

(३) कफज गुल्माची अवस्थानुरूप चिकित्सा : कफज गुल्मी मनुष्याला प्रथम वमन देऊन कफ दोष काढून टाकावा व वमन देण्याला अयोग्य असेल, तर लंघन (उपवास) द्यावे. लंघनानंतर कडू, उष्ण व तिखट अशा द्रव्यांनी सिद्ध केलेले मूग, कुळीथ इत्यादींचे कढण क्रमाने द्यावे व अग्नी वाढवावा. क्षार, हिंग व अम्लवेतस घालून हिंग्वादी चूर्ण द्यावे.

खोल किंवा वर उचलून आलेला, बधिर, कठीण स्थिर असा गुल्म असेल आणि मलवातादि संचययुक्त असा गुल्म शोधन चिकित्सेने नाहीसा करावा. शोधनानंतर वरीलप्रमाणे क्षार आणि तिखट द्रव्यांनी युक्त असे तूप पाजावे. दशमूल, घृत, सुंठ, मिरी, पिंपळी, जवखार, सैंधव, हिंग, बिडलोण, डाळिंब हे घालून द्यावे. भल्लातक घृत द्यावे.

कोणत्याही गुल्मात प्रथम स्नेहस्वेद हे उपचार केलेच पाहिजेत. नंतर दुसरे योग्य ते उपचार केले तर गुल्म बरा होतो. पण स्नेहस्वेद न करता रुक्षण करून त्या क्रिया केल्या, तर गुल्म बरा होत नाही.

गुल्माची शस्त्रक्रिया : गुल्माची शस्त्रक्रिया करण्याच्या अगोदर शास्त्रोक्त रीतीने शरीर स्निग्ध करून घाम काढावा. घाम काढल्यावर गुल्माचा भाग शिथिल होतो. शिथिल झालेल्या गुल्मावर भोक पाडलेली (तुंबडीसारखी) घटिका लावावी. नंतर तिच्यातून हवा तोंडाने ओढून घ्यावी किंवा घटिकेमध्ये गुल्माच्या भागावर आगपेटीचे वरचे झाकण ठेवून त्यावर कापूर ठेवावा. तो पेटवावा व भोक नसलेली घटिका ठेवावी. म्हणजे आतला ज्वलनशील वायू जळून हवेचा आकार कमी होतो आणि त्यामुळे गुल्म त्या घटिकेमध्ये वर ओढला जातो. हा ओढला गेलेला गुल्माचा भाग पकडावा आणि वरची घटिका काढून टाकावी आणि तो गुल्म शस्त्राने योग्य प्रमाणामध्ये कापावा. नंतर त्याच्या दोन्ही कडा शिवून तो भाग आत दाबावा. नंतर नीट स्वच्छ पुसून काढावा. त्याला मध व तूप लावावे. नंतर वरची त्वचा शिवावी, तिलाही मध व तूप लावावे आणि योग्य धूप देऊन कापूस वगैरे ठेवून तो भाग व्यवस्थित अवयवाप्रमाणे कापडाने झाकून बंध बांधावा. पोटात जर आंत्राला तो गुल्म असेल किंवा हृदयाजवळ असेल, तर आंत्राच्या स्वाभाविक भागाला व हृदयाला शस्त्र लावू नये. जेथे शस्त्रक्रिया करण्याची जरूर नाही अशा कफज गुल्मावर तीळ, एरंड, अळशीचे बी व मोहऱ्या वाटून यांचा लेप करून त्यावर लोखंडाचे भांडे किंचित तापवून त्याने (स्वेद करावा) शेकावे.

या चिकित्सेने कफगुल्माचे स्थान बदलेले असेल, तर विरेचनाने व दशमुळांच्या सस्नेह काढ्याच्या बस्तीने त्याच्या दोषांचे शोधन करावे. मिश्रक स्नेह, नलिनी घृत ह्यांचा विरेचनाकरिता उपयोग करावा. गुल्म कठीण, जड, मोठ्या परिसराचा खोल, मांसल भागात असलेला असा असेल तर क्षार, अरिष्ट व डाग देणे या उपायांनी तो नाहीसा करावा. अर्श (मूळव्याध), मुतखडा व ग्रहणी ह्यांच्या चिकित्सेत सांगितलेल्या क्षारांचा उपयोग करावा. देवदार्व्यादि क्षारही द्यावा. क्षार हा आपल्या क्षारत्वाने मांसरस, दूध व तूप यांचा आहार करणाऱ्या मनुष्याच्या स्निग्ध व मधुर कफास छेदून, भेदून त्याला झरवून मलमार्गाने बाहेर काढतो. अग्नी मंद असेल, रुची नसेल तर स्नेहयुक्त अन्न खाण्याला द्यावे. सात्म्य असलेले मद्य द्यावे. तसेच आसवे, अरिष्टे द्यावीत. त्या योगाने स्त्रोतसांची शुद्धी होते.

कफगुल्मी मनुष्याचा आहार : शाली व षष्टी जातीचे जुने तांदूळ, कुळीथ, जांगल प्राण्याचे मांस, करंज, चित्रक, ऐरण, ओवा, वायवर्ण्याचे अंकूर, शेवग्याची कोवळी मुळे, कोवळा व वाढलेला मुळा, महाळुंग, हिंग, अम्लवेतस, क्षार, डाळिंब, सुंठ, मिरी, पिंपळी, तूप, तेल ही द्रव्ये आहारात असावीत आणि कांजी, दह्यावरची निवळ, ओवा व बिडलोण यांचे चूर्ण घातलेले ताक, लघुपंचमूळ घालून उकळलेले पाणी व जुने द्राक्षासव किंवा द्राक्षारिष्ट हे पदार्थ पिण्यात असावेत. मद्यामध्ये पिंपळी, पिंपळमूळ, चित्रक, जिरे व सैंधव यांचे चूर्ण व मद्याचा घनभाग घालून मद्य प्यायला द्यावे. गुल्म लवकर नाहीसा होतो.

सामान्य उपचार : सारांश वमन, विरेचन, लंघन, घाम काढणे, तुपाचे पान, बस्ती, क्षार, आसव, अरिष्ट आणि पथ्यभोजन ह्यांनी गुल्म नाहीसा होतो. पण बद्धमूल झालेला कफज गुल्म आतापर्यंत सांगितलेल्या उपायांनी जर नाहीसा होत नसेल, तर रक्तसृती करून रसरक्तामधले गुल्माचे पोषक घटक (दोष) काढून टाकून बाणाचे टोक इत्यादींनी डाग द्यावा. डाग देताना नाभी, बस्ती, आंत्र, हृदय रोमराजी सोडून डाग द्यावा. तो अतिशय खोल देऊ नये.

गुल्मास डाग देण्याची रीती : गुल्मावर शेवटपर्यंत कापड घालून झाकावा. नंतर बाण, लोहाचा तुकडा किंवा टेंभुर्णी ह्यांची काडी जाळून लाल असताना डाग द्यावा. जळाल्याची आग शीतोपचारांनी कमी करावी. अग्निजन्य व्रणासारखी चिकित्सा करावी.


रक्तगुल्म : रक्तगुल्म स्त्रियांनाच होतो. स्त्रिला रक्तगुल्म झाला असल्यास नऊ महिने पूर्ण झाल्यावर स्नेहन, स्वेदन करून एरंडेल किंवा विरेचक द्रव्यांनी सिद्ध केलेली तुपे देऊन विरेचन द्यावे. नंतर तिळाचा काढा, सुंठ, मिरी, पिंपळी व भारंगमूळ यांचे चूर्ण तूप आणि गूळ घालून द्यावे. म्हणजे रक्तगुल्मातील रक्त वाहून जाईल व गुल्म कमी होईल. वेदना असतील तर भारंग्यादि चूर्ण द्यावे. गुल्म घट्ट असेल, तर तो शिथिल करण्याकरिता पळसाचा क्षार, तिळाचे तेल व तूप हे समभाग घेऊन सिद्ध करून पिण्यास द्यावे. गुल्म शिथिल होतो. एवढ्याने जर गुल्म फुटला नाही, तर योनि-विरेचक द्यावे. नंतर मांसाला क्षार अथवा त्रिधारी निवडुंगाचा चीक लावून ते योनीत ठेवावे किंवा डुक्कर व मासा यांच्या पित्तात कापसाचा बोळा भिजवून किंवा कडू मासे यांना क्षाराचे पाणी व निवडुंगाचा चीक ह्यांची भावना देऊन ते योनीत ठेवावे. रक्तस्त्राव जोराचा असेल, तर निळ्या कमळाचा क्षार किंवा तसेच रक्तपित्तनाशक इतर क्षार मध तुपाबरोबर चाटवावा. स्त्राव नीट होत नसेल तर लसूण, तीक्ष्ण मद्य व मासे द्यावे आणि दूध, गोमूत्र व क्षार घालून दशमुळांच्या काढ्याचा उत्तर बस्ती द्यावा. इतके करूनही जर रक्तस्त्राव होत नसेल तर गुल्म फोडावा. रक्तस्त्राव होत असल्यास तिच्या अंगास तेल व तूप एकत्र करून लावावे. ते रक्त तसेच वाहू द्यावे, थांबवू नये. आम असेल तर लंघन देऊन पेयादिकांनी अग्नी वाढवून दोषांना अनुसरून काळाचा विचार करून चिकित्सा करावी. तिला खाण्यास मांसरसाशी भात द्यावा व पिण्यास नवीन मद्य द्यावे. रक्त फार वहात असेल, तर रक्तपित्तनाशक चिकित्सा करावी. वेदना जास्त असेल तर वातनाशक चिकित्सा करावी.

सिद्धौषधी व्याधीची चिकित्सा : सिद्धौषधी व्याधीच्या जास्तीत जास्त प्रकारावर उपयुक्त व्हावीत अशा दृष्टीने ती बनवली जातात आणि दोषस्थान, दोषांची स्थिती इत्यादींना अनुसरून निरनिराळ्या अनुपानाबरोबर तेच औषध त्या त्या दोषांच्या काळामध्ये द्यावयाचे असते. तसेच ज्या रोगाच्या दृष्टीने ते औषध तयार केले जाते त्याच्या संप्राप्तीला जुळणारी असे संप्राप्ती स्थान, व्याधी दोष ह्यांच्या दृष्टीने सारख्या असणाऱ्या अनेक रोगांवर ते औषध वरीलप्रमाणेच निरनिराळ्या अनुपानांमध्ये, त्या त्या व्याधीच्या विपरीत अशा अनुपानामध्ये दिले असता चालते म्हणून सिद्धौषधी अनेक रोगांवर निरनिराळ्या दोषांवर निरनिराळ्या अनुपानाने देता येतात. अशा रीतीने खालील औषधांचा विचार करावयाचा आहे. त्यांचे विशेष खाली दिले आहेत.

गुल्मकुठार : यामध्ये अभ्रक, लोह, ताम्र ही भस्मे असल्याने हे औषध कोणत्याही गुल्मावर निर्धोक देण्यासारखे आहे. ह्यात असलेल्या भस्मांपैकी कोणते ना कोणते भस्म गुल्माच्या स्थानावर बल्य असे कार्य करणारे आहे. त्यामुळे सर्व गुल्मांत विशेषतः गुल्मविकाराने अशक्त झालेल्या रोग्याला इतर कोणत्याही औषधाबरोबर हे औषध जरूर एकदा तरी द्यावे.

गुल्मनाशन रस : जो गुल्म कफवातात्मक आहे, नाभी किंवा नाभीच्या खाली आहे, ज्या गुल्मात अपानाचे अनुलोमन होत नाही, आनाह व आध्मान आहे आणि अग्निमांद्य प्रामुख्याने आहे अशा गुल्मात हा रस द्यावा. अग्निमांद्य असेल तेव्हा गाईच्या तुपातून जेवणामध्ये द्यावा, आनाह व आध्मान असेल तर जेवणाच्या आधी द्यावा.

अग्निकुमार : हा शोधन करणारा योग आहे. रोगी अशक्त नसेल, आनाह, मलावरोध व वाताचा विबंध असेल आणि दोष पुष्कळ असतील पण अग्मिमांद्य नसेल, तर हा योग रेचक म्हणून वापरावा.

वडवानल : हा सर्व सामान्य योग आहे. ह्याच्यात सुवर्णमाक्षिकासारखे रक्तक्षयनाशक रसायन द्रव्य आहे. हे हृदय, नाभी, बस्ती अशा तीनही भागांमध्ये असेल त्या गुल्मावर औषध द्यावे.

शंखवटी : आमाशय संबद्ध अम्लपित्त दुष्टी असलेल्या अशा गुल्मावर विशेष चालेल.

गुल्मवज्रिणी वटिका : शूल असलेल्या गुल्मात विशेष उपयोगी.

गुल्मशार्दूल रस : दोष अधिक असणाऱ्या बलवान व्यक्तिला हा योग मलमार्गाने दोष बाहेर काढून टाकण्याला रेचक म्हणून चांगलाच उपयुक्त आहे.

सूतशेखर : सूतशेखर हा दोषनाशनाच्या कार्यापेक्षा त्याची संप्राप्तीच विघटन (नाहीशी) करतो. अम्लपित्त असल्यास व आमाशय, हृदय आणि फुप्फुस ह्या प्रदेशांत असलेल्या गुल्मावर तो जास्त काम करतो. सुवर्ण व ताम्र असल्याने तो उत्तम विषनाशक आहे आणि बल्य आहे.

प्रवाळ पंचामृत : अस्थिसार मनुष्याला अम्लद्रव्याच्या अतिरेकाने झालेल्या गुल्मात, तसेच अस्थिअसार व्यक्तीला कोणत्याही कारणाने तो उत्पन्न झालेल्या गुल्मात हा उपयुक्त होतो. तसेच आमाशय, हृदय, फुप्फुस ह्या प्रदेशांत असलेल्या गुल्मात हा अधिक उपयोगी होतो. हे उत्कृष्ट औषध आहे. सर्व गुल्मांवर हा अनुपान भेदाने उपयोगी पडेल. 

लोकनाथ रस : हा प्रवाळ पंचामृतापेक्षा अतिशय बलवान योग आहे. कारण ह्याच्यात अष्ट संस्कारित बुभुक्षित पारा आहे. हा वातज गुल्मात तुपातून, पित्तगुल्मात लोण्यातून व कफज गुल्मात मधातून द्यावा. 

पटवर्धन, शुभदा अ.