गुला महाराज : (? १८९८–१९ जुलै १९३८). भिल्ल समाजातील एक सत्पुरुष. पश्चिम खानदेशात तळोद्याजवळ मोरवड गावी त्यांचा जन्म झाला. पूर्वापार चालत आलेले मजुरीचे व गुरे राखण्याचे काम ते करू लागले. जातीने भिल्ल असूनही स्नान, पूजादी झाल्याशिवाय ते अन्नग्रहण करीत नसत. त्यांच्या धार्मिक वृत्तीमुळे लोक त्यांना ‘गुला महाराज’ म्हणू लागले तथापि ते स्वतःस ‘गुलाम भगवान’ (भगवंताचा गुलाम) असेच म्हणवून घेत. त्यांची शिकवण साधी असून मुख्यतः भिल्ल समाजाला उद्देशूनच होती. स्वच्छ रहावे, खरे बोलावे, देवाची नित्य पूजा करावी, मद्य-मांस निषिद्ध समजावे असा उपदेश ते करीत. सर्वांभूती परमेश्वर आहे, ह्या श्रद्धेने ते वागत व बोलत. सर्वांभूती परमेश्वर आहे, ह्यास ते ‘आप’ संज्ञा वापरीत. त्यांच्या ह्या ‘आप’ तत्त्वज्ञानास अनुसरणाऱ्यांचे एक ‘आप मंडळ’ तयार झाले. गुला महाराज निरक्षर होते तथापि एका फळीवर त्यांनी काही गूढार्थक मजकूर लिहवून घेतला व तो आपल्या तत्त्वज्ञानाचे प्रतीक मानून त्याची दर सोमवारी पूजा व आरती सुरू केली. त्यांच्या मृत्यूनंतरही ही प्रथा चालू राहिली. शेकडो भिल्ल स्त्रीपुरुष ह्या आरतीस जमतात. अलीकडे आरतीचे विशेष महत्त्व उरले नसले, तरी गुला महाराजांच्या प्रतिमेची पूजा करणारे व त्यांच्या उपदेशानुसार आचरण ठेवणारे अनेक भिल्ल आहेत.
संदर्भ : ठकार, शं. वि. आप श्री गुला महाराज चरित्र, पुणे, १९३६.
फरांडे, वि. दा.