आ. १. गुरामी (ऑस्फ्रोनेमस गोरामी)

गुरामी : गोड्या आणि मचूळ पाण्यात राहणारा हा मासा ॲनॅबँटिडी मत्स्यकुलातला असून याच्या प्रारूपिक (मूळ नमुन्याच्या) जातीचे शास्त्रीय नाव ऑस्फ्रोनेमस गोरामी  असे आहे. ॲनॅबँटिडी कुलातील इतर वंशांच्या माशांनाही गुरामी हे नाव सर्वसाधारणपणे दिले जाते. हा मासा मूळचा इंडोनेशिया आणि चीनमधील असावा असा समज आहे. उष्ण कटिबंधातील देशांत या माशांचे पल्वल-संवर्धन (टाक्यात करण्यात येणारी जोपासना आणि वाढ) चांगले होत असल्यामुळे त्यांची पैदास पुष्कळ देशांत होऊ लागली आहे. भारतात १८६५–६६ मध्ये तो प्रथम मद्रास येथे आणला गेला आणि तेथून निलगिरी, महाराष्ट्र, बंगाल इ. ठिकाणी त्याचा प्रसार झाला आहे. हा एक उत्कृष्ट खाद्य मत्स्य आहे.

शरीर लांबट व दोन्ही बाजूंनी बरेच दबलेले असून त्याची लांबी २५–६० सेंमी. असते अंगावर खवले असून ते मागील बाजूस मोठे होत गेलेले असतात. डोके सापेक्षतेने लहान खालचा जबडा पुढे आलेला असतो. अधर पक्ष (हालचालीस वा तोल सांभाळण्यास उपयोगी पडणारी त्वचेची स्नायुमय घडी, पर) वाढून तंतूसारखा झालेला असतो डोळे मोठे व बटबटीत असतात प्रौढ माशांचा रंग उदीसर किंवा मळकट तांबूस असून बाजू फिक्कट रंगाच्या असतात. वरची बाजू गडद रंगाची व खालची फिक्कट पिवळी असते. शरीरावर विशेषतः डोक्यावर, लहानमोठे काळे ठिपके विखुरलेले असतात पर करडे किंवा तांबूस करडे. वयाने लहान असणाऱ्या माशांच्या अंगावर चार-पाच उभे काळसर पट्टे असतात. हा मासा मुख्यत्वेकरून शाकाहारी आहे.

गुरामीच्या क्लोम-कक्षात (जिच्यात श्वसनेंद्रिये असतात त्या जागेत) क्लोमांच्या वर एका खळग्यात श्वसनाकरिता एक विशेष इंद्रिय असते याला गहनांग (चक्रव्यूहासारखे इंद्रिय) म्हणतात. याच्या योगाने हा मासा प्रत्यक्ष हवेतून ऑक्सिजन घेऊ शकतो. यामुळे उथळ, साठलेले पाणी असणाऱ्या किंवा पाणवनस्पतींची दाटी असलेल्या जागी हा मासा राहू शकतो.

या माशांचे प्रजोत्पादन सबंध वर्षभर चालू असते. नर तोंडात हवा घेऊन तिचे बुडबुडे पाण्याच्या

आ. २. गुरामीचे गहनांग : (१) गहनांग, (२) क्लोम चाप.

पृष्ठभागावरील एखाद्या जागेकडे सोडतो. या बुडबुड्यांवर एक प्रकारचा चिकट पदार्थ असल्यामुळे ते एकमेकांना चिकटून राहतात. एके ठिकाणी चिकटलेल्या अशा अनेक बुडबुड्यांचे घरटे बनलेले असते. मादी या घरट्यात अंडी घालते. निषेचित (फलन झालेल्या) अंड्यांचा रंग लिंबासारखा पिवळा अथवा नारिंगी असतो. अंडी सामान्यतः ३०–३६ तासांनी किंवा केव्हा केव्हा दहाव्या दिवशी फुटतात. बाहेर पडलेली पिल्ले ५·३ मिमी. लांब असतात. नर आणि मादी तीन आठवडे पिल्लांची काळजी घेतात. यानंतर ती घरटे सोडून स्वतंत्रपणे राहू लागतात.       

यार्दी, ह. व्यं.