गुप्त, सियारामशरण : (४ सप्टेंबर १८९५ – २९ मार्च १९६३). हिंदीतील एक चतुरस्त्र लेखक. जन्म चिरगाव (जि. झांशी) येथे. राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्तांचे हे धाकटे बंधू. महात्मा गांधीच्या वैचारिक प्रभावाला अनुकूल असे मूलतः सात्त्विक, मानवी सहानुभूतीने व करुणेने भरलेले व्यक्तिमत्त्व लाभल्यामुळे त्यांच्या साहित्यात गांधीवादी तत्त्वज्ञान आणि त्यांचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व यांचा स्वाभाविक व सुंदर संगम आढळतो. सियारमशरणांनी विपुल काव्यलेखन केले आहे परंतु निबंधकार म्हणून त्यांनी जी साहित्यसेवा केली आहे, ती चिरंतन महत्त्वाची मानली जाते. यशस्वी कादंबरीकार म्हणूनही त्यांचा लौकीक आहे. त्यांचे काव्यलेखन मात्र फारसे वैशिष्ट्यपूर्ण नाही.

झूठ–सच (१९३९) हा त्यांच्या अठ्ठावीस निबंधांचा संग्रह आहे. अंतर्मुख चिंतनशील व्यक्तिमत्त्व सात्त्विक, मृदू स्वभाव आपल्यातील अपूर्णतेच्या, दोषांच्या जाणिवेने सतत विनम्र होत गेलेले मन उपेक्षितांच्या व दलितांच्या कळवळ्याने सांद्र झालेली वृत्ती आणि अन्यायाच्या, असत्याच्या, अमानुषतेच्या विरुद्ध सतत धगधगत राहणारी अस्मिता यांचा शब्दाशब्दांतून होणारा साक्षात्कार यांमुळे सियारामशरणांचे हे निबंध हिंदी साहित्यात निश्चितपणे चिरंतन मोलाचे ठरावेत.

 सियारामशरणांच्या गोद (१९३२), अंतिम आकांक्षा (१९३४), नारी (१९३७) या तीन कादंबऱ्या त्यांतील सात्त्विक व जिव्हाळ्याच्या वातावरणामुळे वाचनीय झाल्या आहेत. ग्रामीण जीवनातील कौटुंबिक स्नेहबंध हा त्यांच्या कादंबऱ्यांचा प्रमुख विषय आहे. पूर्णपणे भारतीय मन व भारतीय संस्कृती त्यांच्या कादंबऱ्यांत प्रतिबिंबित झाली आहे. परंपरा आणि बंडखोरी, भोग आणि त्याग, प्रेम आणि निष्ठा यांच्या अकृत्रिम समन्वयामुळे त्यांच्या कादंबऱ्यांत विलक्षण समतोलपणा आला आहे. कथानक व व्यक्तिचित्रे सरळ आणि एकपदरी असली, तरी सर्व कादंबऱ्यांतून वाहत असलेला अपार करुणेचा, स्निग्ध मानवतेचा उदात्त स्रोत रसिकांना आगळा आनंद देतो.

त्यांनी विपुल काव्यलेखन केले. महात्मा गांधींसंबंधी लिहिलेल्या एकवीस भावकवितांचा संग्रह बापू (१९३८) हा त्यांच्या कीर्तीचा प्रमुख आधारस्तंभ ठरावा. उन्मुक्त (१९४१) ही युद्धासंबंधी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना लिहिलेली काव्यात्मक रूपककथा त्यांची परिपक्व रचना मानली जाते. महाभारत, रामायण  या ग्रंथांचा सियारामशरणांच्या साहित्यावर प्रभाव दिसतो. नकुल (१९४९) हे खंडकाव्य याची साक्ष देते. मौर्यविजय (१९१५) हे खंडकाव्य भारताच्या वीरतापूर्ण भूतकाळाचे चित्रण करणारे असले, तरी कवीचे पहिलेवहिले खंडकाव्य म्हणूनच त्याचे महत्त्व आहे. त्यांचे दूर्वादल (१९१७), अनाथ (१९१८), आर्द्रा (१९२८), विषाद (१९३३), दैनिकी (१९४३), नोआखाली (१९४७), जयहिंद (१९४९) इ. अनेक काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. भोवतालच्या हिंसात्मक, पाशवी व अन्यायपूर्ण वातावरणाने किंवा घटनांनी अस्वस्थ झालेल्या मनाचे प्रतिबिंब त्यांत पडलेले दिसत असले, तरीही गांधीवादी व्यक्तिमत्त्वाला साजेसा आशेचा, विश्वासाचा व निष्ठेचा सूर त्यांच्या सर्व लेखनात ध्वनित होत राहतो. आठ कथांचा मानुषी (१९३४) हा संग्रह तसेच पुण्यपर्व (१९३२) हे नाटकही त्यांनी लिहिले आहे. चिरगाव येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : नगेंद्र, संपा. सियारामशरण गुप्त, दिल्ली, १९६५.

बांदिवडेकर, चंद्रकांत