गुडइयर, चार्ल्‌स : (२९ डिसेंबर १८००– १ जुलै १८६०). अमेरिकन संशोधक, टिकाऊ रबर तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या व्हल्कनीकरण प्रक्रियेच्या (रबरावर गंधकाच्या वा गंधकाच्या संयुगांच्या करण्यात येणाऱ्या प्रक्रियेच्या) शोधाकरिता विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म न्यू हेवन येथे झाला. त्यांचे वडील कृषियंत्राचे संशोधक होते, तसेच अमेरिकेतील हार्डवेअर उत्पादनाचे आद्यप्रवर्तक होते. १८२१–३० ह्या काळात ते वडिलांच्या धंद्यात भागीदार होते. 

कच्च्या रबरापासून बनविलेली वस्तू उच्च तापमानास मऊ होते व नीच तापमानास कडक होऊन निरुपयोगी ठरते, असा त्याकाळी अनुभव होता. हा दोष घालवून रबरी वस्तू टिकाऊ बनविण्यास काय उपाय करावा हे शोधण्यासाठी त्यांनी दहा वर्षे खर्चिली. ॲक्वा फॉर्टिस (नायट्रिक अम्ल) वापरल्याने हा प्रश्न सुटतो असे प्रथम वाटले, म्हणून १८३६ साली त्यांनी ह्या पद्धतीने टपाल-पिशव्या तयार करण्याचे अमेरिकन सरकारकडून कंत्राट घेतले. पण रबराच्या अस्थिरपणामुळे पिशव्या निरुपयोगी झाल्या व त्यांना या व्यवहारात तोटा झाला. नाथॅनिएल हेवर्ड यांच्याबरोबर त्यांनी १८३७ मध्ये गंधकमिश्रित रबरावर प्रयोग केले. अशा रबराचा उपयोग करण्याचे हक्क त्यांनी हेवर्ड यांच्याकडून घेतले. १८३९ मध्ये गुडइयर हे निरनिराळे प्रयोग करीत असताना चुकून गंधकमिश्रित रबर स्टोव्हवर पडले व तापले. ते नंतर तपासून पाहिल्यावर ते टिकाऊ झालेले असल्याचे आढळले व व्हल्कनीकरण प्रक्रियेचा शोध लागला. १८४४ मध्ये त्यांना या शोधाचे पेटंट मिळाले. निरनिराळ्या देशांत त्यांनी व्हल्कनीकरणाची ६० पेटंटे घेतली. पेटंटाच्या हक्कभंगाबद्दल त्यांना वारंवार कोर्टात जावे लागले. त्यात ते यशस्वी झाले. इंग्लंडमध्ये त्याच सुमारास हॅनकॉक यांनी व्हल्कनीकरणाची प्रक्रिया स्वतंत्रपणे शोधून काढली होती म्हणून इंग्लंडमधील पेटंट त्यांना मिळू शकले नाही. त्यांच्या प्रक्रियेनुसार तयार केलेल्या वस्तूंच्या लंडन येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनास (१८५१) ते हजर राहिले. इंग्लंडमध्ये कारखाना काढण्यात ते अयशस्वी झाले. मात्र फ्रान्समध्ये त्यांनी कारखाना काढला. पण तो अयशस्वी झाला. कर्जामुळे त्यांना १८५५ मध्ये पॅरिस येथे अटक करण्यात आली व तुरुंगवासाची शिक्षा झाली. 

व्हल्कनीकरणाच्या शोधाबद्दल त्यांचा लंडन येथे १८५१ मध्ये व पॅरिस येथे १८५५ मध्ये सन्मान करण्यात आला. १८६० मध्ये ते न्यूयॉर्कला परत आले. त्यांनी आपले संशोधन गम इलॅस्टीक अँड इट्स व्हरायटीज (१८५३–५५) या दोन खंडांच्या पुस्तकात लिहिले आहे. ते न्यूयॉर्क येथे मरण पावले.   

कुलकर्णी, सतीश वि.