गुज्जर : ही भारतातील एक महत्त्वाची जमात व जात असून ती पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात व राजस्थान या भागांत आढळते. गुज्जर हिंदू आणि मुसलमान असे दोन्ही धर्मांचे असून जाट, राजपूत व आदिवासी यांच्याशी त्यांचे रक्तसंबंध व सांस्कृतिक संबंध आढळतात. हिमाचल प्रदेशात गुज्जर ही आदिवासी जमात दर्शविली आहे. त्या प्रदेशात १९६१ च्या शिरगणतीप्रमाणे त्यांची संख्या १६,८८७ होती.
सहाव्या शतकात मध्य आशियातील हूण, गुज्जर व इतर लोक यांनी भारतावर आक्रमण केले. पहिल्याच आक्रमणात ते ग्वाल्हेरपर्यंत पोहोचले पण त्यांना कनौज-नरेशाने रोखले. त्यामुळे यांपैकी बरेचसे लोक राजस्थानात व पंजाबात स्थायिक झाले. त्यांतील बरेचसे लोक सातव्या शतकात उत्तरेकडे तेथील रहिवाशांत मिसळून गेले. सातव्या शतकाच्या मध्यावर प्रतिहारांनी उचल घेतली. त्यानंतर परमार, चौहान हेही शस्त्रसज्ज झाले आणि ७५० च्या सुमारास गुज्जरांची राज्याकांक्षा प्रगट झाली. ८४० च्या सुमारास गुज्जरांचे राज्य प्रस्थापित झाले आणि त्यांनी कनौज ही आपली राजधानी केली.
गुज्जर आपण मथुरेच्या श्रीकृष्णाचे वंशज आहोत असेही म्हणतात. अहीरही तसेच म्हणतात. काही अहीरांची कुळे गुज्जरांपासून निघालेली आहेत, यात संशय नाही. कारण अहीरांत नंदबंसी गोत्र आहे. गुज्जर हे मूळचे चरवाह (पॅस्टोरल) होते. अद्यापही म्हैस मेली, की शोकविधी होतो. त्या वेळी बायका त्या म्हशीसाठी घरचेच माणूस मरावे, तसा शोक करतात.
गुज्जरांची भाषा गुजरी ऊर्फ गोजरी आहे. जयपूरच्या राजस्थानीशी तिचे बरेच साम्य आहे. गुजरी भाषा हिमाचलातील गुज्जर लोकच फक्त बोलतात. इतर ठिकाणचे गुज्जर त्या त्या ठिकाणची बोली बोलतात. पंजाबमधील कांगरा खोऱ्यातील व हिमाचल प्रदेशातील गुज्जर मैदानी गुज्जरांपेक्षा पुष्कळ वेगळे आहेत. डोंगरातील गुज्जर सर्वस्वी पशुपालक आहेत. गुज्जर हे देखणे व सुस्वभावी आहेत. ते शेती जवळजवळ करीतच नाहीत. ते म्हशी पाळतात. तेच त्यांचे धन. दूध, तूप विकून ते आपली गुजराण करतात. त्यांच्या बायका दही, दूध व तूप घेऊन रोज बाजारात विकायला जातात. उन्हाळ्यात गुज्जर लोक म्हशींना घेऊन डोंगरात वरच्या बाजूला जातात.
उत्तर प्रदेशातील गुज्जर शेती व गुरचारण करणारी जमात म्हणून ओळखले जातात. त्यांची वस्ती या प्रदेशाच्या पश्चिम भागात अधिक आहे. गो-चारणावरून त्यांचे नाव गुज्जर पडले असे इथले लोक म्हणतात त्यांनी गुरांना गाजरे खायला घातली, म्हणून त्यांचे नाव गुज्जर पडले, असाही एक प्रवाद आहे परंतु या दोन्ही लोकव्युत्पत्त्या खऱ्या नाहीत. गुर्जर या शब्दावरूनच त्यांचे नाव पडले, असे विल्यम क्रुकसारख्या काही तज्ञांचे म्हणणे आहे. गुज्जरांचा मूळ प्रदेश पंजाबच आहे.
उत्तर प्रदेशातील गुज्जरांत सोयरीक पक्की करताना मुलीकडचा न्हावी मध्यस्थ म्हणून काम करतो व वराच्या उपरण्याला गाठ मारतो. लग्न हिंदूंप्रमाणेच सप्तपदी ऊर्फ भंवरी होऊन पूर्ण होते. बाळंतीण दहा दिवस सुतक पाळते. पहिल्या खेपेसच मुलगा झाल्यास स्त्रिया बाळंतिणीच्या खोलीत गाणी म्हणतात व पुरोहित दुर्वांची जुडी मुलाच्या पित्याला देऊन त्याचे अभिनंदन करतो. बाळंतिणीची बाज बाहेर आणतात. त्याला बाहर निकलना, असे म्हणतात. गुज्जर मृतांना अग्नी देतात. ते श्राद्धही करतात. एवढेच नव्हे, तर श्राद्धकर्मासाठी गयेला जाण्याची प्रथाही त्यांच्यात आहे.
गुज्जर हे मुख्यतः शैव अगर शाक्त आहेत. ते शीतला भवानीला मानतात. इतर दैवतांत चामर देवाला ते मानतात. पण गुज्जर जमातीचे देव प्यारेजी व बाबा सभाराम हे आहेत. प्यारेजीचे मंदिर रंदेवा येथे आहे. रंदेवा हे दापू गुज्जरांचे मूळ गाव आहे आणि ते सहारनपूर जिल्ह्यात आहे.
मुसलमान गुज्जर बहरइच येथील गाझी मियाच्या दर्ग्याला प्रार्थनेसाठी जातात. अलाउद्दीन शहीद, मदार शाहा इ. अवलियांच्या थडग्यांना ते भजतात. ते होळी आणि नागपंचमी हे सणही पाळतात. सरवरैया व सनाढ ब्राह्मणांकरवी ते पितृकार्य करतात.
मध्य प्रदेशात गुज्जरांची मुख्य वस्ती होशंगाबाद आणि निमाड जिल्ह्यांत आढळते. नर्मदेच्या खोऱ्यात हे लोक आढळतात. बहुधा इथे ते ग्वाल्हेराहून आले असावेत. उत्तरेकडचे गुज्जर भटके असून ते ओसाडीतून हिंडतात.
मध्य प्रदेशातील गुज्जर भटके नसून स्थायिक आहेत. ते उत्तम शेती करतात. होशंगाबाद जिल्ह्यात त्यांच्या लेखा, मुंडले व जादम अशा तीन शाखा आहेत. लेखा हे पागोटे डोकीवर ठेवून जेवतात व मुंडले हे पागोटे काढून जेवतात. मुंडल्यांना रेवे म्हणजे रेवा काठचे असेही नाव आहे. निमाडात जे गुज्जर राहतात, त्यांना बडगुजर असे नाव आहे. हे कापसातल्या बिया वेचण्याचे काम करतात, म्हणून त्यांना लुधारे असेही नाव आहे. यांच्यातली सर्वांत कनिष्ठ उपजात ही केकरे अगर कणवे यांची आहे. केकरे म्हणजे खेकडे. होशंगाबादमधल्या सोहागपूर तहशिलात लिलोरहिया गुज्जर राहतात. ते अशी कथा सांगतात, की त्यांचे पूर्वज गुरे पाळीत असताना ब्रह्मदेवाने काही गुराख्यांना व वासरांना पळवून नेले. त्या वेळी कृष्णाने नवे गोप तयार केले. त्यांचे नाव लिलोरहिया. हे गोप त्याने आपल्या ललाटीच्या घामापासून तयार केले, म्हणून त्यांना लिलोरहिया असे नाव पडले. मग ब्रह्मदेवाने पूर्वीचे गोप परत आणून दिले, ते मुरली वाजवीत, म्हणून त्यांना मुरलिया असे नाव पडले. मुरलियांपैकी बडगुजर ही सर्वांत श्रेष्ठ जात आहे.
गुज्जरांच्या लग्नात चार नांगर चौक करण्यासाठी जोडून ठेवतात. हा चौक मांडवात असतो. चौकाच्या मध्ये पाण्याचा कलश असतो.
यांच्या जातीत स्त्रिया कमी आहेत, त्यामुळे एका भावाची बायको धाकट्याचीही पुष्कळदा बायको होते. ते कुलदेवतेची पूजा करतात.
मुंडले गुज्जर अमावास्या व अष्टमी या दिवशी जमीन नांगरीत नाहीत. अष्टमी ही श्रीकृष्णाची जन्मतिथी आहे.
महाराष्ट्रात गुज्जर ही अहीर, लाड, धेड, चारण, कुंभार, तेली, सोनी व सुतार यांची उपशाखा आहे असे आढळते. या जातीचा संबंध किती जातींशी आहे, हे यावरून स्पष्ट होते.
संदर्भ : 1. Crooke, W. Tribes and Castes of North Western Provinces and Oudh, Calcutta, 1896.
2. Enthoven, R. E. Tribes and Castes of Bombay, 3 Vols., Bombay, 1920–1922.
3. Russel, R. V. Hiralal , Tribes and Castes of Central Provinces of India, 4 Vols., London, 1916.
मुटाटकर, रामचंद्र