गुंडप्पा, देवनहळ्ळी वेंकटरामनैया : (१८ जाने. १८८९—७ ऑक्टो. १९७५). प्रसिद्ध कन्नड कवी व विचारवंत. ‘डी. व्ही. जी.’ या टोपणनावाने ते प्रसिद्ध आहेत. जन्म कोलार जिल्ह्यातील मुळबागल येथे. म्हैसूर व कोलार येथे त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाले तथापि खाजगी रीत्या त्यांनी राज्यशास्त्र,

डी. व्ही. गुंडप्पाअर्थशास्त्र तसेच संस्कृत, इंग्रजी इ. भाषासाहित्यांचा अभ्यास केला. हनगल विरूपाक्ष स्वामी या महान पंडिताच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मसूत्रभाष्याचे त्यांनी अध्ययन केले. वेद, पुराणे, स्मृती इत्यादींचा, तसेच रामायण  आणि महाभारत  या महाकाव्यांचा त्यांचा व्यासंग सखोल होता.

बंगलोरला आल्यानंतर १९१३ साली कर्नाटक  नावाचे स्वतःचे इंग्रजी अर्धसाप्ताहिक त्यांनी सुरू केले. सर एम्. विश्वेश्वरय्या म्हैसूर संस्थानचे दिवाण असताना (१९१२—१७) त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील सुधारणांचे भाष्यकार व मार्गदर्शक म्हणून डी. व्ही. जी. प्रकाशात आले. या काळात भारतातील संस्थानांच्या समस्यांवर त्यांनी बरेच इंग्रजी लेखन केले असून ते पुस्तकरूपाने प्रसिद्धही झाले. माँटेग्यू-चेम्सफर्ड कमिटी (१९१८), बटलर कमिटी (१९२८), स्टॅफर्ड क्रिप्स मिशन (१९४२) यांना सादर केलेल्या निवेदनांमुळे डी. व्ही. जीं ना संविधान-तज्ञ व समाजधुरीण म्हणून मान्यता मिळाली. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विचारसरणीचा व व्ही. एस्. श्रीनिवास शास्त्री यांच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर बराच प्रभाव पडला. सार्वजनिक क्षेत्रात अनेक महत्त्वाच्या संस्थांचे सभासद व पदाधिकारी म्हणून त्यांनी विधायक कार्य केले. म्हैसूर राज्य वृत्तपत्रकार संघाचे अध्यक्ष (१९३२—३४), कर्नाटक साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष (१९३३—३७), मुडिगेरे (कूर्ग) येथे भरलेल्या कन्नड साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९३२) इ. बहुमानाची पदेही त्यांनी भूषविली. १९४५ साली बंगलोरमध्ये ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अफेअर्स’ ही संस्था त्यांनी स्थापन केली. त्यांच्या साहित्यक्षेत्रातील कामगिरीमुळे म्हैसूर विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट देऊन त्यांचा गौरव केला (१९६१). श्रीमद्‍भगवद्‍गीता तात्पर्य (१९६६) या त्यांच्या ग्रंथास साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले (१९६७).

वसंतकुसुमांजली  हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह १९२२ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर प्रसिद्ध झालेले निवेदना (१९२४), उमरन ओसगे (१९३०), मंकुतिम्मन कग्ग (१९४३), श्रीरामपरीक्षणम् (१९४५), अंतःपुरगीते (१९५०), शृंगारमंगलम् (१९७०), श्रीकृष्णपरीक्षणम् (१९७१) हे त्यांचे उल्लेखनीय काव्यसंग्रह होत. अंतःपुरगीतेमध्ये बेलूर येथील केशव मंदिरातील प्रत्येक रमणीशिल्पावरील कवने आहेत, तर मंकुतिम्मन  कग्गमध्ये विविध विषयांवरील त्यांचे आध्यात्मिक चिंतन आले आहे. विद्यारण्य विजय (१९१७), तिलोत्तमे (१९२१) ही त्यांची प्रमुख नाटके असून विद्यारण्यांवर त्यांचे काही संशोधनात्मक निबंधही प्रसिद्ध झाले आहेत. यांशिवाय जीवन सौंदर्य मत्तु साहित्य (१९३२), संस्कृति (१९५०), साहित्य शक्ति (१९५०) हे वैचारिक ग्रंथ गोपाळ कृष्ण गोखले (१९१५) हे चरित्र ज्ञापक चित्रशाले (१६६९—७२) मालेतील विविध व्यक्तिचित्रांचे पाच संग्रह वृत्तपत्रिके (१९२८) राज्यशास्त्र (१९५१) इ. ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत.

सात्त्विक व प्रसन्न शैली, प्राचीन परंपरेशी निष्ठा ठेवूनही अंगीकारलेला आधुनिक दृष्टिकोण, आध्यात्मिक बैठक आणि सामाजिक मूल्यांविषयीची कळकळ ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत. बंगलोर येथे त्यांचे निधन झाले.

वर्टी, आनंद