गुजराती भाषा : गुजराती ही भारताच्या पश्चिम किनाऱ्याला लागून असलेल्या गुजरात राज्याची भाषा आहे. १९७१ च्या खानेसुमारीप्रमाणे ह्या राज्याची लोकसंख्या २,६६,८७,१८६ असून त्यांपैकी गुजराती भाषिकांची संख्या सु. नव्वद टक्के असावी. गुजराती लोक व्यापार करण्यात प्रसिद्ध असल्याने गुजरातच्या बाहेरही अनेक राज्यांत ही भाषा बोलणारे लोक आहेत. त्यांची संख्या वीस लाखांवर आहे. त्यांपैकी दहा लाखांवर लोक महाराष्ट्रात आहेत. व्यापाराच्या निमित्ताने भारताबाहेरही — विशेषतः आफ्रिकेत — ही भाषा बोलणारे लोक स्थायिक झालेले आहेत. इराणातून येऊन प्रथम गुजरातेत व नंतर इतर राज्यांत राहिलेल्या पारशी लोकांची भाषाही गुजरातीच आहे.
गुजराती भाषेचे प्राचीन नमुने बाराव्या शतकापासून सापडतात. मराठी, बंगाली यांसारख्या ज्या थोड्या इंडो-आर्यन भाषांचे इ.स. १५०० पूर्वीचे नमुने उपलब्ध आहेत, त्यांत गुजरातीची गणना होते. ह्या भाषेचा पहिला प्रसिद्ध कवी ⇨नरसी मेहता पंधराव्या शतकात होऊन गेला.
गुजराती ही इंडो-आर्यन भाषाकुटुंबातील एक भाषा आहे. गुजरातीला सर्वात जवळची भाषा मारवाडी ही होय. प्राचीन पश्चिमी राजस्थानी ही गुजराती व मारवाडी ह्या दोन्ही भाषांची जननी समजली जाते. सु. सोळाव्या शतकात ह्या दोन भाषा एकमेकींपासून निराळ्या होऊन स्वतंत्रपणे वाढू लागल्या. प्राचीन राजस्थानीच्या पूर्वकाळीचे गुजरातीचे मूळ शोधू गेल्यास, ते शौरसेनी अपभ्रंशाच्या पश्चिमेकडील एखाद्या स्वरूपात असल्याचे मानावे लागेल. सहाव्या शतकात गुर्जर लोक उत्तरेकडून येऊनच गुजरातेत स्थिर झाले, असे मानले जाते. त्यांच्या भाषेचाही (दार्दिक समूहातील?) पश्चिम शौरसेनी अपभ्रंशापासून विकास पावणाऱ्या गुजरातीच्या जडणघडणीवर परिणाम झाला असावा. गुजरातीच्या ह्या पूर्वीच्या स्थितीची निश्चित कल्पना करणे कठीण आहे. गुजरातेत सापडलेला सर्वांत प्राचीन भाषिक पुरावा म्हणजे गिरनार येथील अशोकाचे शिलालेख. परंतु ह्या शिलालेखांत आढळणारी भाषिक वैशिष्ट्ये गुजरातीपेक्षा निराळी असल्यामुळे, गुजरातीची पूर्वपीठिका ह्या शिलालेखांपर्यंत नेता येत नाही.
सामान्यपणे गुजरातीच्या काठियावाडी, उत्तर गुजराती, चरोतरी (मध्य विभाग) व सुरती (दक्षिण विभाग) अशा चार ठळक बोली मानल्या जातात. बडोदे-अहमदाबादच्या सुशिक्षितांची बोली ही प्रमाण गुजराती समजली जाते. गुजरातमधील पारशी व बोहरी लोक बोलतात त्याही दोन बोलभाषा होऊ शकतील. कित्येक शतकांपूर्वी तमिळनाडूमध्ये जाऊन राहिलेल्या विणकरांची ‘सौराष्ट्र’ नावाची बोलीही गुजरातीची एक स्वतंत्र बोली मानावी लागेल. गुजरातेत आदिवासींची संख्या मोठी आहे. त्यांची बोली ‘भिली’ या नावाने ओळखली जाते. ह्या लोकांनी स्वतःची मूळ भाषा टाकून गुजरातीचा स्वीकार केला असल्यामुळे ‘भिली’ हीपण गुजरातीचीच बोली मानावी लागेल. ती बोलणाऱ्याची संख्या सु. पावणेतीन लाख आहे. हे आदिवासी मुख्यत्वेकरून साबरकांठा व बनासकांठा जिल्ह्यांत आहेत तसेच बडोदे व सुरत जिल्ह्यांतही ते आढळतात. भिलीचेदेखील गरासिया, चोधरी, घोडिया इ. पोटभेद आहेत.
गुजराती हा भाषावाचक शब्द ‘गुजरात’ ह्या देशवाचक शब्दापासून आला आहे, हे उघड आहे. महाराष्ट्रात ‘गुजराथ’ व ‘गुजराथी’ असा उच्चार रूढ आहे. तो मराठीतील ‘ठ’ शी असलेल्या उच्चारसादृश्यामुळे असावा, असे नरसिंहराव दिवेटिया यांचे मत आहे.
ध्वनिविचार : गुजरातीची ध्वनिव्यवस्था पुढीलप्रमाणे आहे :
स्वर : अ, आ, इ, उ, ए, ॲ, ओ, ऑ.
व्यंजने : स्फोटक :
मृदुतालव्य : क, ख, ग, घ.
मूर्धन्य: ट, ठ, ड, ढ.
दंत्य: त, थ, द, ध.
ओष्ठ्य : प,फ, ब, भ.
अर्धस्फोटक : तालव्य : च, छ, ज, झ.
अनुनासिक : ङ, ण, न, म.
अर्धस्वर : य, व.
द्रव : कंपक – र पार्श्विक – ल, ळ.
घर्षक: श, स, ह.
खुलासा : ऱ्हस्व इ व ऱ्हस्व उ मराठीप्रमाणे स्थानपरत्वे दीर्घही असू शकतात (उदा., वीस-विसमो, फूल-फुलोनो इत्यादी).
गुजराती ‘ॲ’ किंवा ‘ऑ’ हे स्वर मराठीप्रमाणे इंग्रजीतून घेतलेल्या शब्दांपुरते (उदा., हॅट, बॅट, हॉल, बॉल इत्यादी) मर्यादित नसून, पूर्वावस्थेतील ‘अइ’ व ‘अउ’ या स्वरांच्या संयोगातूनही मिळतात (उदा., प्रविश > पविस > पइस > पॅस चतुर्थ > चउत्थ > चॉथो इत्यादी). ‘ॲ’ किंवा ‘ऑ’ यांच्यासाठी लेखनात स्वतंत्र चिन्हे नाहीत.
मराठीतील ‘अ’ च्या अनुच्चारित्वाचे नियम गुजरातीलाही लागू पडतात. गुजरातीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्यात ‘ह’ नंतर येणारा स्वर अर्धघोषित असतो.
गुजरातीतील व्यंजनेही मराठीसारखीच आहेत. फक्त ‘च, छ, ज, झ’ हे अर्धस्फोटक तालव्यच आढळतात. मराठीप्रमाणे दंत्य अर्धस्फोटक त्या भाषेत नाहीत. गुजरातीत ‘ण’ आणि ‘ळ’ हे दोन मूर्धन्य वर्ण आहेत. त्यांची उपपत्ती ऐताहासिक दृष्ट्या मराठीसारखीच आहे (उदा., खन् > खण फल > फळ षोडश > सोळ). संस्कृत दंत्य वर्णाच्या जागी काही शब्दांत थोडे अपवाद सोडल्यास मराठी -गुजरातीत सारखेच मूर्धन्य वर्ण आढळतात (पत् > पड दंश् > डस मानुष > माणूस परंतु मृत्तिका > गुज. माटी, म.माती). संस्कृतात जिथे अनुनासिक नाही, अशा काही शब्दांत गुजरातीत अनुनासिक आढळते. (उदा., वक्र > वांकुं पक्ष > पांख उच्च > ऊंचु).
रूपविचार :नाम : गुजरातीत नामांना तीन लिंगे आणि दोन वचने असतात. बहुतेक सर्व नामांचे एकवचनी आणि अनेकवचनी प्रथमेचे रूप आणि सामान्यरूप सारखेच असते. एकंदरीत मराठीच्या मानाने गुजरातीत नामांच्या रूपांची गुंतागुंत कमी आहे. खाली एक पुल्लिंगी शब्द (एकवचनी प्रथमेचे व सामान्यरूप ‘भिन्न’ असलेला) आणि एक स्त्रीलिंगी शब्द (प्रथमेचे व सामान्यरूप ‘सारखे’ असलेला) उदाहरण म्हणून दिला आहे.
पुल्लिंगी : घोडो ( म. घोडा) |
स्त्रीलिंग : भेंस ( म. म्हैस) |
||
ए. व. |
अ. व. |
ए. व. |
अ. व. |
घोडो घोडा-ने घोडा-ए घोडा-माटे घोडा-थी घोडा-नुं घोडा-मां |
घोडा घोडा-ओ घोडाओ-ने घोडाओ-ए घोडाओ-माटे घोडाओ-थी घोडाओ-नुं घोडाओ-मां |
भेंस भेंस-ने भेंसे (< भेंस-ए) भेंस-माटे |
भेंसो भेंसो-ने भेंस-ए भेंसो-माटे इत्यादी. |
वरील उदाहरणावरून गुजरातीत पुल्लिंगी बहुवचनी दोन रूपे असून दुसऱ्या रूपात बहुवचनी रूपाला आणखी एक ‘ओ’ प्रत्यय लावण्यात आल्याचे लक्षात येईल. हे गुजरातीचे एक वैशिष्ट्य आहे.
सर्वनाम : पुरुषवाचक सर्वनामांची व्यवस्था खालीलप्रमाणे आहे:
ए. व. |
अ. व. |
|
प्र. पु. द्वि. पु. तृ. पु. |
हुं तूं ए (ते) |
अमे तमे एओ (तेओ) |
प्रथम पुरुषी सर्वनामाच्या इतर रूपांत ‘म’ कारादी अंगाला संबंधसूचक प्रत्यय लावून ‘मने’, ‘में’, ‘माराथी’, ‘मारुं’, ‘मारामां’ अशी पदे बनतात. द्वितीय पुरुषी आदरार्थी ‘आप’ चा उपयोग होतो. ‘आपणे’ ह्या सर्वनामाने प्रथम पुरुष व द्वितीय पुरुष यांचा एकत्रित बोध होतो.
संख्यावाचक : संख्यावाचक शब्दांत एकपासून दहापर्यंतचे शब्द मराठीशी बरेच जुळणारे आहेत. ‘त्रण’ – तीन आणि ‘दस’ – दहा ह्यांत थोडा फरक आहे, तर ‘बे’ – दोन आणि ‘छ’ – सहा ह्यांत बराच फरक आहे. मराठीतही ‘ब’चा उपयोग बारा, बावीस वगैरे शब्दांत आणि ‘छ’ चा उपयोग छत्तीस, छप्पन्न ह्या दोन शब्दांत आढळतो. क्रमवाचक विशेषणासाठी ‘पहेलो’, ‘बीजो’, ‘त्रीजो’, ‘चॉथो’ असे पहिले क्रमाने चार शब्द असून, सहाव्यासाठी ‘छठ्ठो’ शब्द आहे. इतर विशेषणांसाठी ‘मो’ ह्या प्रत्ययाचा उपयोग करण्यात येतो (उदा., पांचमो, सातमो इत्यादी).
क्रियापद : क्रियापदांची वर्तमानकाळी रूपे खालीलप्रमाणे होतात:
ए. व. |
अ. व. |
खाउं छुं खाय छे खाय छे |
खाइए छीए खाओ छो खाय छे |
गुजरातीतील क्रियापदांच्या वर्तमानकाळवाचक रूपांत कर्त्याच्या लिंगाप्रमाणे बदल होत नाही. नकारवाचक रूपे एकवचनी पु. ‘खातो-नथी’, स्त्री ‘खातीनथी’ आणि अनेकवचनी पु.स्त्री. खातानथी अशी होतात.
भूतकाळवाचक रूपे मराठीप्रमाणेच गुजरातीतही संस्कृत-प्राकृत अवस्थेतील भूतकाळवाचक धातुसाधित विशेषणापासून आली असल्यामुळे, धातू अकर्मक असल्यास ती कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे आणि सकर्मक असल्यास कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलतात. उदा., छोकरो हस्यो, छोकरी हसी, छोकरूं हस्युं (मुलगा हसला, मुलगी हसली, मूल हसले) छोकराए कागळ फाड्यो, छोकराए रोटली खाधी, छोकराए काम कर्यु (मुलाने कागद फाडला, मुलाने पोळी खाल्ली, मुलाने काम केले), अनेकवचनी उदाहरणे : छोकराओ हस्या, छोकरीओ हसी, छोकराए कागळ फाड्या, छोकराए रोटीलीओ खाधी. स्त्रीलिंगी एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच आहेत. नपुंसकलिंगी रूपे अनेकवचनी पुल्लिंगी रूपांसारखीच असतात.
भविष्यकाळाच्या रूपात ‘श’ हे व्यंजन सर्व प्रत्ययांत येते. ही रूपे कर्त्याच्या लिंगाप्रमाणे बदलत नाहीत. तृतीयपुरुषी एकवचन व अनेकवचन यांतही फरक नाही जसे :
ए. व. |
अ. व. |
जईश जईश जशे |
जशुं जशो जशे |
संयुक्त क्रियापदांचा उपयोग मराठीप्रमाणेच गुजरातीतही होतो. काही ठिकाणी हे प्रयोग सारखेच आहेत. (उदा., ‘करी नाख’—करून टाक ‘लखी ले’—लिहून घे), तर काही ठिकाणी त्यांत फरक आहे (‘खाई जा’—खाऊन टाक ‘करवा मांड’—करायला लाग).
मराठीप्रमाणेच गुजरातीतील बरेचसे शब्द (सु. साठ टक्के) तत्सम किंवा तद्भव आहेत. ह्या भाषेवरही अरबी- फार्सीची आणि अलीकडे इंग्रजीची बरीच छाप पडली आहे.
भाषिक कालगणना पद्धतीचे सूत्र लावले असता, गुजराती व मराठी भाषिक लोक सु. १४२० वर्षांपूर्वी (इ.स. नंतर सु. ५५० वर्षांनी) एकमेकांपासून विभक्त झाले असावेत, असे अनुमान करता येते. मूलभूत १०० शब्दांच्या संग्रहातील ६५ शब्द या दोन भाषांत समान असल्याचे आढळते.
गुजराती (महाजनी) लिपी मराठीहून निराळी असली, तरी फारशी भिन्न नाही. ह्या लिपीचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्यात शिरोरेषा नसते.
गुजराती भाषेचा नमुना :
ધં ધે વળગું તે પહેલા મારો વિચાર હિંદુસ્તાનનો નાનકડો પ્રવાસ ત્રીજા વર્ગમાં કરી, ત્રીજા વર્ગના મુસાફરોનો પરિચય કરવાનો આને તેમના દુઃખો જાણી લેવાનો હતો. ગોખલે આગળ મેં આ વિચાર મૂક્યો. તેમણે પ્રથમ તો તે હસી કાઢ્યો, પણ જયારે મેં મારી આશાઓનું વર્ણન કર્યું, ત્યારે તેમણે ખુશીથી મારી યોજનાને સંમતિ આપી.
देवनागरी लिप्यंतर : धंधे वळगुं ते पहेलां मारो विचार हिंदुस्थाननो नानकडो प्रवास त्रीजा वर्गमां करी, त्रीजा वर्गना मुसाफरोनो परिचय करवानो अने तेमनां दुःखो जाणी लेवानो हतो. गोखले आगळ में आ विचार मूक्यो. तेमणे प्रथम तो ते हसी काढयो. पण ज्यारे में मारीआशाओनुं वर्णन कर्ऱ्युं, त्यारे तेमणे खुशीथी मारी योजनाने संमति आपी.
मराठी भाषांतर : कार्याला लागण्यापूर्वी माझा विचार हिंदुस्थानचा छोटासा प्रवास तिसऱ्या वर्गाने करून, तिसऱ्या वर्गाच्या उतारूंचा परिचय करून घेण्याचा आणि त्यांची दुःखे जाणून घेण्याचा होता. गोखल्यांच्या समोर मी हा विचार मांडला. पहिल्यांदा तर त्यांनी ते थट्टेवारी नेले. पण जेव्हा मी माझ्या आशांचे वर्णन केले, तेव्हा त्यांनी आनंदाने माझ्या योजनेला संमती दिली (गांधीजींच्या आत्मकथेवरून).
संदर्भ : 1. Bloch, Jules Trans. Master, Alfred, Indo-Aryan, Paris, 1965.
2. Cardona, George, A Gujarati Reference Grammar, Philadelphia, 1965.
3. Dave, T. N. A Study of Gujarati Language in the 16th Century, London, 1935.
4. Grierson, G. A. Linguistic Survey of India, Vo., IX, Part I, Delhi, 1968.
5. Mehta, B. B. Mehta, B. N. The Modern Gujarati-English Dictionary, Baroda, 1925.
६. धर्माधिकारी, स. ज. गुजराती भाषा — प्रवेश, मुंबई, १९६९.
७. धर्माधिकारी, स. ज. गुजराती — मराठी शब्दकोश, मुंबई, १९६७.
मेहेंदळे, म. अ.
“