गिर्यारोहण : पर्वतावर चढण्याचे शास्त्र किंवा कला. एक साहसी, कठीण व अत्यंत कार्यक्षमतेचा खेळ म्हणून आज त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अखिल भारतीय क्रीडा मंडळानेही त्यास एक क्रीडाप्रकार म्हणून रीतसर मान्यता दिली आहे.
गिर्यारोहणात दहा—पंधरा मीटर उंचीची टेकडी चढण्यापासून ते मौंट एव्हरेस्टसारखे उंच शिखर चढण्यापर्यंतचे सर्व प्रकार येतात. त्यासाठी विशेष प्रशिक्षणाची, कुशलतेची व योग्य त्या साधनसामग्रीची आवश्यकता असते. या गोष्टींच्या अभावी गिर्यारोहण घातक ठरण्याचा संभव असतो.
गिर्यारोहणाची प्रेरणा : निसर्गावर विजय मिळविण्याची व जे अजिंक्य दिसते ते जिंकण्याची मानवाची नैसर्गिक इच्छा, त्याची साहसी वृत्ती, अज्ञात क्षेत्राचे संशोधन करण्याची त्याची जिज्ञासा या गिर्यारोहणाच्या प्रेरक शक्ती आहेत. गिर्यारोहणात घडणारे निसर्गाचे उदात्त दर्शन व व्यावहारिक रुक्ष जीवनातून होणारी सुटका यांमुळेही लोकांना गिर्यारोहणाचे आकर्षण वाटते.
जितके शिखर उंच व चढण्यास कठीण, तितके मानवाचे प्रयत्न अधिक व उत्साहही दांडगा दिसून येतो. माणसाच्या विजिगीषू महत्त्वाकांक्षेला आव्हान देणारा एक क्रीडाप्रकार म्हणून गिर्यारोहण दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. गिर्यारोहणाच्या खेळात स्वतःच्याच सामर्थ्यावर, सहनशीलतेवर व निर्णयबुद्धीवर अवलंबून राहावे लागते. निसर्गच गिर्यारोहकाला कार्यक्षेत्र देतो व प्रतिस्पर्धी म्हणून विरोधही करतो. एकूण मानवजात विरूद्ध निसर्ग असा हा अद्वितीय व चित्तथरारक खेळ आहे. या खेळातील धोकेच मानवाला या खेळाकडे अधिकाधिक प्रवृत्त करीत आले आहेत. मनोरंजनाबरोबर त्याला आपले सर्व सामर्थ्य पणास लावण्याची जिद्द पुरी करता येते; इतकेच नव्हे, तर उंच पर्वतक्षेत्रात शास्त्रीय संशोधन व अभ्यास करणे त्यास शक्य होते आणि लष्कराला देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने पर्वताच्या युद्धशास्त्रात निपुणही करता येते.
खडकारोहण : गिर्यारोहणाचे दोन प्रकार आहेत : (१) खडकारोहण (रॉक क्लाइंबिंग) व (२) हिमारोहण (आइस क्लाइंबिंग). उच्च शिखरावर अगदी वरच्या चढणीत साधारणतः खडकारोहण करण्याचा प्रसंग गिर्यारोहकावर येतो. उभ्या चढणीचे टप्पे किंवा कडे, सुळके, एक हात किंवा पाय यांनाच आधार घेता येईल अशा लहान भेगा, संपूर्ण शरीर सामावून घेणारी खडकातील विदरे (चिमनीज), आरोहकाचे हातपाय एकाच वेळी दोन्ही डगरींना स्पर्श करू न शकणाऱ्या घळ्या यांसारख्या कठीण गोष्टींवर चढून जाणे खडकारोहणात येते. हे प्रकार कोठल्याही खडकारोहणात संभवतात. खडकारोहण करताना साधारणतः एका तीस-चाळीस मीटर लांबीच्या दोरखंडाला पथकातील लोकांना विशिष्ट अंतर सोडून बांधण्यात येते. पर्वतविवरांच्या आरोहणाकरिता पाठ-चवडातंत्राचा अवलंब करतात. या पद्धतीत आरोहक आपली पाठ खडकाला टेकवून हातांच्या व चवड्याच्या रेट्याने स्वतःस वर ढकलत नेतो. शिखरावरून खाली उतरताना गोफण दोरीत अडकविलेल्या दोरखंडाचा उपयोग करण्यात येतो. चढण्यास अशक्य समजल्या जाणाऱ्या आल्प्सच्या ग्रेयन शिखरावर प्रथमच ए. एफ. ममेरी १८८८ साली चढून गेला आणि त्याने खडकारोहणाच्या प्रकाराकडे लोकांचे लक्ष वेधले. यूरोप खंडातील व अमेरिकेतील पुष्कळशा केंद्रांतील आरोहकांना खास साधनसामग्रीची व विशिष्ट तंत्रज्ञानाची जेथे गरज जाणवते अशा वैशिष्ट्यपूर्ण खडकारोहणाबद्दल बरीच आवड दिसून येते; परंतु काहीजण याच कारणांमुळे गिर्यारोहणाच्या प्राथमिक साधेपणावर परिणाम होतो, म्हणून त्यास विरोध करताना दिसतात.
बर्फारोहण व हिमारोहण : हिमारोहणात हिमनदीवरील प्रवास, बर्फाच्छादित व म्हणून अत्यंत घसरडी अशी उभी चढण किंवा उतरण किंवा हिमकडा यांवरील आरोहण यांचा अंतर्भाव होतो. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अंमलात आणाव्या लागतात. कारण हिम भुसभुशीत असते, तर बर्फ कठीण असते. हिम-आंधळेपणा टाळण्याकरिता आरोहकांनी कोठल्याही परिस्थितीत गडद रंगाचा चष्मा घालणे आवश्यक असते. हिमकुऱ्हाडीचा उपयोगही करावा लागतो. हिमदरीचा शोध घेण्याकरिता व त्यावरचा हिमपूल किती भरीव आहे याची चाचणी करण्याकरिता हिमकुऱ्हाडीचा उपयोग गिर्यारोहक करतात. घसरंडवजा बर्फाच्या चढणीवर किंवा कठीण बर्फावर कुशल गिर्यारोहक या हिमकुऱ्हाडीचा उपयोग चढण्यास योग्य पायऱ्या खोदण्याकरिता करतो. असे करताना त्याला स्वतःचा तोल सांभाळता यावयास पाहिजे. कठीण हिमावर वा बर्फावर लोखंडी पत्र्याचा तळवा असलेल्या बुटाचा उपयोग चांगला होऊ शकतो. प्रसंगी हिमखुंट्यांचा किंवा हिमस्क्रूंचाही उपयोग करण्यात येतो. खडकारोहणापेक्षा हिमारोहणास अधिक कुशलता व अनुभव लागतो. परिस्थितीचा नीट अंदाज बांधून निर्णय घेण्याच्या नेत्याच्या क्षमतेवर हिमारोहण पथकाची यशस्विता व सुरक्षितता अवलंबून असते.
हिवाळ्यामध्ये बर्फाने आच्छादलेले पर्वत चढणे सुलभ असते; पण खडकारोहण करणे मात्र या काळात सापेक्षतेने कठीण जाते. हिवाळ्यात असे पर्वत चढण्याची सुरुवात १९२० पासून झाली.
गिर्यारोहणातील संभाव्य अडचणी : गिर्यारोहण सहजसाध्य नाही. कोणत्या वेळी कसा प्रसंग येईल, हे आधी सांगता येत नाही. यश मिळविण्याकरिता गिर्यारोहकांना अनेक धोक्यांना व अडचणींना तोंड द्यावे लागते. हे धोके किंवा अडचणी तीन प्रकारच्या असू शकतात : (१) निसरडे उतार किंवा छातीवरचे जीवघेणे चढ यांसारख्या कारणांमुळे आरोहकांचा तोल जाण्याची किंवा घसरून पडण्याची शक्यता. (२) खडक, हिम किंवा बर्फ आरोहकावर कोसळण्याची शक्यता. (३) हवामानाची अनिश्चितता. कधी बोचरी थंडी, तर कधी झंझावती वारे, तर कधी हिमतुषारवृष्टी यांमुळे पर्वत चढणे तर कठीण होतेच; पण प्रसंगी गिर्यारोहकाच्या जीवावरही बेतण्याची शक्यता असते. पहिल्या दोन प्रकारच्या अडचणींवर गिर्यारोहक आपल्या सावधानतेने व हिकमतीने मात करू शकतो. तिसऱ्याकरिता मात्र अनुभवाची आणि अचूक निर्णयशक्तीची गरज असते. हवामानाचा अंदाज घेणे, योग्य वेळी आगेकूच करणे किंवा माघार घेणे यांसारख्या गोष्टी गिर्यारोहकाला अनुभवानेच समजू शकतात. आतापर्यंत झालेल्या अपघातांत शारीरिक कमजोरीपेक्षा चुकीच्या निर्णयामुळे झालेले अपघात अधिक आहेत.
गिर्यारोहण करताना होकायंत्राचा उपयोग करून मार्ग काढणे वा हवामानाचा अंदाज घेणे, नकाशाचा अभ्यास करणे, हिमाच्छादित खड्डे शोधणे यासंबंधी गिर्यारोहकांना चांगल्या प्रकारची माहिती असणे आवश्यक असते.
साधनसामग्री : ज्या पहाडावर चढावयाचे असेल, त्या पहाडाचे स्वरूप कसे आहे यावर साधनसामग्री काय व कशी असावी हे साधारणतः ठरते; परंतु काही वस्तू गिर्यारोहणाच्या दृष्टीने कमीअधिक प्रमाणात अपरिहार्यच असतात. उदा., उनी व गरम अंडरवेअर, वातरोधक झब्बा, गरम शिरोवेष्टन, खिळ्यांचे बूट, जाडजूड पायमोजे, बर्फाळ प्रदेशात घालावयाचे चष्मे, होकायंत्र, नकाशा, जलरोधी आगपेटी, ज्वालक, बालवीर चाकू, हिमकुऱ्हाड, दोरी, बर्फावरून चालण्याची काठी, घडीचा दिवा किंवा तात्कालिक प्रकाश इत्यादी. काही वस्तू प्रसंगोपात्त आवश्यक असतात. त्यांत हातोडा, तंबू, झोपण्याच्या खोळी, स्वयंपाक-साहित्य, विलो-काठ्या, अप्रवाही वायुभारमापक यंत्र, प्राणवायूच्या टाक्या यांचा अंतर्भाव होतो.
गिर्यारोहणाकरिता आवश्यक असणाऱ्या साधनसामग्रीत डोंगरी लष्करी पथकांच्या प्रशिक्षणामुळे व दुसऱ्या महायुद्धाच्या काळात झालेल्या संशोधनामुळे पुष्कळच सुधारणा झाल्या आहेत. उबदार, पण वजनाने हलके असलेले कपडे, घडीचे स्टोव्ह, हलक्या प्राणवायु-कुप्या, मुखवटे, हलके बूट, हलका रेडिओ, चलत् दूरध्वनी इ. सुधारलेल्या वस्तू आता उपलब्ध होऊ शकतात. धोकादायक बर्फ पाडण्याकरिता आता एका प्रकारच्या बंदुकीचाही उपयोग करण्यात येतो.
गिर्यारोहणाचे तंत्र : गिर्यारोहणाचे साहस यशस्वी करण्याकरिता या विशिष्ट तंत्राचा अवलंब करावा लागतो. या तंत्रात मार्गाच्या निवडीला प्रथम स्थान आहे. गिर्यारोहकाने स्वतःच्या कुवतीप्रमाणे व साधनसामग्रीच्या उपलब्धतेनुसार मार्गाची निवड करणे आवश्यक असते. सरळ कड्यावर चढून जाण्यास कुशलता व चपळाई लागते, तर हिमाच्छादित प्रदेशातील प्रगती हिमवर्षावाला तोंड देण्यासाठी केलेल्या उपाययोजनेवर व काटकपणावर अवलंबून असते. रस्ते नसलेल्या व ठिकाणी किंवा निबिड अरण्यात गिर्यारोहकाला आपल्याजवळ असलेल्या नकाशाच्या व होकायंत्राच्या साह्याने मार्ग काढावा लागतो. त्याकरिता त्यास या साधनांचा वापर करण्याचे ज्ञान असावे लागते.
मार्गाची निवड झाल्यानंतर गिर्यारोहकांनी शिखरारोहण करण्याकरिता सूर्योदयापूर्वी जास्तीत जास्त लवकर निघावे; कारण त्यावेळी हवा चांगली असते. साधारणतः बर्फाळ क्षेत्रात किंवा धोक्याच्या ठिकाणी सु. ६ ते ९ मी. अंतराने पथकातील सर्व व्यक्तींना बांधून घ्यावे लागते. अनुभवी गिर्यारोहक सर्वांत पुढे व अननुभवी कमजोर गिर्यारोहकास मध्यभागी ठेवण्यात येते. खाली उतरताना सर्वांत मजबूत माणसाला मागे ठेवण्यात येते. कोणत्याही व्यक्तीला धाप लागू नये म्हणून चढण्याची गती मंद ठेवावी लागते. त्याचबरोबर सूर्यास्तापूर्वी आपल्या ठरलेल्या मुक्कामी परत येण्याचे भानही ठेवावे लागते. एव्हरेस्टसारखी उंच शिखरे टप्प्याटप्यांवर तळ देऊन रात्रीचा आराम करून चढण्यात येतात. अशा वेळी प्रथमोपचाराचे साहित्य, अन्न, तंबू इ. वस्तूंचा मुबलक साठा असणे आवश्यक असते. कठीण चढण चढण्याकरिता आवश्यक त्या पायऱ्या हिमकुदळीने खोदण्याचे ज्ञान गिर्यारोहकाला असणे आवश्यक असते. बर्फाची बदलती परिस्थिती, हिमपाताचा धोका, शैलपात, बर्फाळ क्षेत्रातील झाकलेली दरी वा भेग, अदृश्य हिममुख, बदलते हवामान इ. गोष्टी लक्षात घेऊन आपल्या तंत्रात बदल करण्याची दृष्टी गिर्यारोहकास हवी. बर्फावरचे किंवा खडकावरचे प्रत्येक पाऊल सुरक्षित व पक्के असल्याबद्दल प्रत्येकाने काळजी घ्यावी लागते. आपल्या चढण्यामुळे एखादा दगड किंवा बर्फाचा तुकडा दुसऱ्यावर पडू नये, याचीही काळजी घेणे आवश्यक असते.
पर्वताची उतरण पार करणे कठीण असते; कारण खाली काय आहे हे गिर्यारोहकाला दिसू शकत नाही. पुष्कळदा पुढे आलेल्या खडकाभोवती दोरखंड बांधून उतरण्याकरिता त्याचा उपयोग केला जातो. उतरताना अधिक काळजी घ्यावी लागते; कारण त्या वेळी अतिशय थकवा आलेला असतो आणि गिर्यारोहक गाफील राहण्याची शक्यता असते. गंभीर स्वरूपाचे अपघात उतरतानाच झालेले आहेत, हे याबाबतीत लक्षात ठेवण्यासारखे आहे.
हवामान कसे राहील, हे समजण्यासाठी वेधशाळेतून प्रसिद्ध होणाऱ्या हवामान अंदाजाचा सध्या उपयोग करून घेण्यात येतो. आल्प्ससारख्या पर्वतातील बहुतेक दऱ्याखोऱ्यांचे नकाशे तयार करण्याकडे असलेली आधुनिक प्रवृत्ती गिर्यारोहकांना उपकारक आहे. आल्प्समध्ये गिर्यारोहकांच्या निवाऱ्याकरिता जागोजागी झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. या गोष्टींचे अनुकरण इतरत्र लवकरच होण्याची शक्यता आहे. तेथे निष्णात वाटाडे मिळू शकतात. भारतातही शेर्पांचा उपयोग वाटाडे म्हणून करून घेण्यात येतो. पूर्वी पर्वताच्या पायथ्याशी पायी जावे लागत असल्यामुळे कष्ट पडत व वेळही पुष्कळ लागे. पण आता तारेवरून घसरणाऱ्या गाडीची सोय झाल्यामुळे गिर्यारोहकाचा वेळ व त्रास वाचला आहे.
जागतिक आढावा : मोठमोठ्या पर्वतांवर देवादिकांचे व भुताखेतांचे वास्तव्य असल्याच्या समजुतीमुळे जुन्या काळी यूरोपात आधुनिक अर्थाने मोठ्या पर्वतावर चढून जाण्याचा प्रयत्न झाला नसावा. हौसेखातर पूर्वी गिर्यारोहण होत नसे, जे काही गिर्यारोहन झाले, ते विशिष्ट उद्दिष्ट प्राप्त करण्याकरिता. रोमन काळात असे गिर्यारोहण झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अकराव्या शतकात रोश मेलन या शिखरावर चढण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. तेराव्या शतकात राजपुत्र तिसरा पीटर यास यूरोपातील कॅनिगो पर्वत चढण्यात यश मिळाले. १३५८ साली बी. अस्टी नावाच्या इसमाने रोश मेलन शिखरावर यशस्वी चाल केली. १४९२ मध्ये बारा माणसांचे एक पथक मौंट एग्वीवर चढून गेले. सोळाव्या शतकात गेस्नर व सिम्लर हे उल्लेखनीय गिर्यारोहक यूरोप खंडात होऊन गेले. सतराव्या शतकात मात्र या क्षेत्रात काही उल्लेखनीय घडल्याचे दिसत नाही. अठराव्या शतकात गिर्यारोहणासंबंधी अनेक ग्रंथ लिहिले गेले. त्यामुळे गिर्यारोहणास प्रोत्साहन मिळाले. १७८६ साली मायकेल पॅकर्डने बॅल्मटच्या मदतीने आल्सचे माँट ब्लांक शिखर गाठण्यात यश मिळविले. जिनीव्हा येथील एक शास्त्रज्ञ दे सोस्यूर हा १७८७ साली याच शिखरावर चढून गेला. त्याने आधुनिक तंत्र आणि पद्धतीचा वापर करण्यास सुरुवात केली. त्यानंतर १८७० पर्यंत ग्रोस ग्लॉकनर, ऑर्टलर, युंगफाऊ फ्रू, फिन्स्टर आरहॉर्न, व्हेटर हॉर्न, माँटे रोझा, विसार्न, मॅटरहॉर्न इ. यूरोपातील बहुतेक शिखरांवर मानव चढून गेला. योहान रूडॉल्फ मेयर, हायरॉनिमस मायर, सर आल्फ्रेड विल्स, जॉन टिन्डेल, जोसेफ बॅनन, डब्ल्यू. ए. बी. कोलीज, एडवर्ड व्हिंपर, जॉन बाल, सी. टी. डेन्ट, जे डी. फॉर्बस, ई. एस्. केनेडी, सी. ए. मॅथ्यूज, ए. डब्ल्यू. मुर, लेस्ली स्टीव्हेन इ. महत्त्वाचे गिर्यारोहक यूरोपात होऊन गेले. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी स्त्रियांनीही या क्षेत्रात प्रवेश केला व लवकरच त्यांनी त्यात संस्मरणीय प्रगती केली. याच काळात गिर्यारोहणासंबंधी विपुल वाङ्मय निर्माण झाले.
आल्प्सची सर्व शिखरे चढल्यानंतर गिर्यारोहकांचे लक्ष इतर ठिकाणी वळले. १८८९ साली आफ्रिकेतील सर्वांत उच्च शिखर किलिमांजारो, १८९७ साली दक्षिण अमेरिकेतील सर्वांत उंच शिखर आकाकागुआ, १९१३ साली उत्तर अमेरिकेतील बर्फाने आच्छादिलेले मौंट मॅकिन्ले, १९२४ साली कॅनडातील सर्वांत उंच शिखर मौंट लॉगान, १९२८ साली पामीर शिखर (पूर्वीचे मौंट काऊफमन, सु. ७,१३० मी.), १९५३ साली हिमालयाचे जगातील सर्वोच्च शिखर मौंट एव्हरेस्ट (सु. ८,८४८ मी.), १९५४ साली के-टू शिखर, १९५५ मध्ये माकालू व कांचनजंघा शिखरे, १९५६ साली नेपाळमधील मानास्लू शिखर व काराकोरम मुझताघ आता ही शिखरे मानवाने पादाक्रांत केली. या सर्व मोहिमांत ब्रिटिश, इटालियन, फ्रेंच, अमेरिकन, न्यूझीलंड, ऑस्ट्रियन, स्वीस, जपानी इ. भिन्न राष्ट्रीयत्वाच्या लोकांनी भाग घेतला. कित्येक गिर्यारोहकांना आपले प्राणार्पण करावे लागले. गिर्यारोहणातील आजच्या यशाचा पाया त्यांनी आपल्या बलिदानाने मजबूत केला आहे. १९६० पर्यंत जगातील १३ उच्च शिखरे मानव चढून गेला. छोट्या-मोठ्या शिखरांची तर गणतीच नाही. १९६२ साली पुमारी, १९६८ साली कैलास, १९७० साली माकूल, १९७१ साली धवलगिरी (धौलागिरी) इ. शिखरे चढण्यात आली. १९५३ साली ब्रिटन, १९५६ साली स्वित्झर्लंड व १९६३ साली अमेरिका या देशांनी जगातील सर्वांत उंच शिखर मौंट एव्हरेस्ट चढून जाण्यात यश मिळविले. १९६५ साली भारताने व १९७० साली जपानने हा मान मिळविला. ५ मे १९७२ रोजी गिडो मोनझिनो याच्या नेतृत्वाखाली एका इटालियन तुकडीलाही हे शिखर चढून जाण्यात यश मिळाले. या साहसाकडे मानव एवढा आकर्षित झाला आहे, की प्रत्येक वर्षी नवीन उत्साहाने छोटीमोठी कठीण शिखरे किंवा जिंकलेल्या शिखरांवर नवीन कठीण मार्गाने चढून जाणे हे त्याचे नित्याचे, मनोरंजनाचे व हौसेचे कार्य झाले आहे. १९७२ साली जपानी पथकाला नवीन मार्गाने धवलगिरी चढून जाण्यास अपयश आले, तरी मानवाच्या चिकाटीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. तेनसिंग शेरपा व एडमंड पी. हिलरी, श्मिड, मार्मेट, जेम्स व्हिटेकर, तेरी परसोरा यांनी मौंट एव्हरेस्टसारख्या जगातील सर्वांत उंच शिखरावर प्रथम चढून यापूर्वीच चिकाटीचे उदाहरण घालून दिले आहे. त्यांची नावे गिर्यारोहणाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहेत. त्याचप्रमाणे आब्रूत्सी ड्यूक, श्री. व श्रीमती हंटर, हॉवर्ड पाम्र, हडसन स्टक, ओबेअर, विली मेरकल, पॉल बौअर, श्री. व श्रीमती ग्यूंटर, जेम्स व्हिटेकर, मॉरिस हेरझोक, कर्नल हंट, एल्. मॅलरी, अँड्रूू अर्व्हिन, अलबेर्ट इगलर, फ्रिट्झ लुशिंगर, अर्नेस्ट राइस, माक्स आयसलीन, नॉर्मन डाय-हेन फर्थ, हेर्मान बुहल, आशील कॉपानोनी, लेनोलेसेडेली, शेरपा पासंग, चार्ल्स एव्हान्झ, जॉर्ज बंड, जो ब्राउन, नॉर्मन हार्डी, टॉनी स्ट्रीथर, जॉन हारटॉक, गायडो मग्नोन, नोएल, ई. ओडेल, एच्. डब्ल्यू. टिलमन यांनीही आपल्या गिर्यारोहणातील कार्याने तितकीच उज्ज्वल कीर्ती मिळविली आहे.
१९७५ साली तर जुंको टाबी या जपानी महिलेने १६ मे रोजी दुपारी १२.३० वाजता एव्हरेस्ट शिखर चढून या क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी संपविली. एव्हरेस्टवर चढणारी पहिली महिला म्हणून ही घटना महत्त्वाची व उत्साहवर्धक मानण्यात येते. मार्गदर्शक शेरपा आंग त्सेरिंग हा तिच्याबरोबर होता. दोघेही २८ मिनिटे शिखरावर होती. या तुकडीत पंधरा महिला गिर्यारोहक होत्या व नेतृत्व श्रीमती ऐको हिसोना या जपानी महिलेकडे होते.
याच सुमारास धवलगिरी – ४ हे कोणी न चढलेले शिखर चढून जाण्याचा बहुमान आणखी एका जपानी तुकडीस मिळाला; पण परत येताना एस्. काबाजू व ई. हसूडा बर्फाच्या खोल दरीत पडून बेपत्ता झाले.
जुंको टाबीच्या एव्हरेस्ट आरोहणाच्या ११ दिवसांनंतर ३७ वर्षांची एक चिनी महिला श्रीमती फांथोग आठ पुरुष साथीदारांसह एव्हरेस्टवर उत्तरेकडील कठीण बाजूने चढली. या पथकाने तेथे पुष्कळसे शास्त्रीय प्रयोगही केले. याच मार्गाने २५ मे १९६० रोजी वाँग चू व चू इन हो हे एव्हरेस्ट शिखर चढले होते. पण चीनचा हा दावा १९७५ साली म्हणजे १५ वर्षांनी नेपाळी अधिकाऱ्यांनी मान्य केला. या क्षेत्रात उशिरा पदार्पण करणाऱ्या भारतीय गिर्यारोहकांचे कार्यही तितकेच उल्लेखनीय आहे.
भारतीय गिर्यारोहणाचा विकास : भारताच्या उत्तर सरहद्दीवर असलेला हिमालय हा जगातील सर्व पर्वतांपेक्षा मोठा पर्वत आहे. जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट हे त्याचे भूषण आहे. याखेरीज त्यात अठ्ठावीस हजार ते चोवीस हजार फूट उंचीची जवळजवळ १६० शिखरे आहेत. त्यामुळे हिमालय हे जगातील गिर्यारोहकांचे आकर्षण बनले आहे. इतकेच नव्हे, तर गिर्यारोहकांच्या दृष्टीने त्यास महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
अगदी पुराणकाळापासून हिमालयाला भारतीय जनता पवित्र मानीत आली आहे. बद्रीनाथ सारखी पवित्र स्थानेही तेथे आहेत. भाविक लोक व यात्रेकरू त्याच्या दर्शनाकरिता अडीअडचणी सहन करून अनेक शतकांपासून जात आले आहेत. तिबेटशी व्यापारी संबंध ठेवण्याकरिता व्यापारी लोकांना पर्वतारोहण करावे लागे; पण एखादे शिखर हौसेखातर चढण्याची कल्पना मात्र नवीनच होती. इतर देशांतील पथके ज्यावेळी हिमालयाची शिखरे चढण्याचे प्रयत्न करू लागली, त्यावेळी भारतीयांचे तिकडे लक्ष वेधले. प्रथम त्यांनी भारवाहकांचे काम केले. भारवाहकाच्या दृष्टीने शेरपा व भुतिया हे लोक अत्यंत दमदार म्हणून गणले जातात. २९ मे १९५३ च्या सकाळी साडेदहा वाजता सर्वोच्च शिखर मौंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम पाऊल ठेवणारा तेनसिंग नोर्के हा पहिला शेरपा. इतर भारवाहकांनीही गिर्यारोहणाच्या इतिहासात शौर्याची व इमानीपणाची कृत्ये केली आहेत. पाश्चिमात्य गिर्यारोहकांबरोबर मेजर नंदू जयाल, डॉ. दत्त, केकी बुनशा इ. लोकांनी मोहिमेत भाग घेतला आहे. १९५२ साली सोहनसिंग यांनी पंचशूली शिखरावर चढून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १९५३ च्या तेनसिंगच्या एव्हरेस्ट विजयाने भारत सरकारनेही गिर्यारोहकांकरिता शिक्षणाची सोय करून या कार्याला प्रोत्साहन दिले.
१९५३ च्या वसंत ऋतूत निकोरे यांच्या नेतृत्वाखाली पंचशूली शिखरावरील मोहीम भारताच्या दृष्टीने पहिली यशस्वी मोहीम म्हणता येईल. याच साली भारतीय गिर्यारोहकांनी अभिगामिन (सु. ७,३५५ मी.) या शिखरावर चढून जाण्यात यश मिळविले. १९५५ साली मेजर नंदू जयाल यांनी कामेट शिखर (सु. ७,७५६ मी.) सर केले. १९५८ साली केकी बुनशा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चौ ओयू (सु. ८,१५३ मी.) शिखरावर जाण्यात यश मिळविले. या मोहिमेत मेजर नंदू जयाल यांना मृत्यू आला. १९५८ साली मृगथुनी शिखर (सु. ६,८५५ मी.), १९५९ साली नंदाकोट (सु. ६,८६१ मी.), चौखंबा (सु. ७,१३८ मी.), बंदर पूंछ शिखर (सु. ६,३१५ मी.), १९६० साली नंदा घंटी (सु. ६,३०९ मी.), १९६१ साली अन्नपूर्णा-४ (सु. ७,५७७ मी.), नीळकंठ (सु. ६,५९६ मी.), मैकटोळी (सु. ६,८०३ मी.), देविस्थान (सु. ६,७०६ मी.) ही शिखरे भारतीयांनी काबीज केली. ब्रिगेडियर ग्यानसिंह यांनी १९६० साली एव्हरेस्टवर चढून जाण्याचा प्रयत्न केला; पण शिखर सु. २१३ मी. राहिले असताना त्यांना माघार घ्यावी लागली. या मोहिमेत भारतात तयार केलेली साधनसामग्री वापरण्यात आली होती, हे महत्त्वाचे आहे. १९६३ साली कॅप्टन कोहलींच्या नेतृत्वाखाली एका पथकाने मौंट एव्हरेस्ट शिखर चढून जाण्यात यश मिळविले. इतकेच नव्हे, तर या पथकाने आपले नऊ लोक शिखरावर पाठवून एक विक्रम प्रस्थापित केला. गोंबू आणि आंगकामे यांचे या मोहिमेत नाव झाले. जगातील सर्वोच्च शिखर चढून जाणाऱ्यांत आंगकामे हा सर्वांत तरुण आहे, हे या मोहिमेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. १९६४ साली कॅप्टन नरेंद्रकुमार यांच्या नेतृत्वाखाली नंदादेवी हे शिखर भारतीयांनी पुन्हा एकदा काबीज केले. फ्लाइट लेफ्टनंट ए. के. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली एक पथक पंचशूली पर्वतश्रेणीच्या तीन शिखरांवर चढून जाण्यात याच साली यशस्वी झाले. कोणीही चढून न गेलेल्या देव टिब्बा या शिखरावर जाण्यात पंजाबमधील मनाली संस्थेतील बालिकांनी अभिमानास्पद यश मिळविले. फ्लाइट लेफ्टनंट वेणू गोपाळ यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण प्रबोधिनी युवकांच्या पथकाने मुल्किला-५ हे कठीण शिखर १ जुलै १९७० रोजी जिंकले. याच साली जे. एस्. नेगी यांच्या नेतृत्वाखाली भारत-तिबेट सरहद्द पोलिसांच्या मोहिमेस काक भूषण या एका नव्या शिखरावर चढून जाण्यात यश मिळाले. याच भारत-तिबेट सरहद्द पथकाने १९७१ साली राजरंबा व १९७२ साली हिमालयातील गणेश पर्वताजवळचे एक नवीन शिखर सर केले. १९७१ साली फेबसोर किंवा पापसुरा शिखर, ताता कुकी शिखर, देव टिब्बा, त्रिशूल इ. शिखरे चढून जाण्यात भारतीय गिर्यारोहक यशस्वी झाले. १९७२ साली महंमद आश्रफ यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीर मौंटेनिअरिंग अँड हायकिंग क्लबतर्फे संघटित केलेल्या एका पथकाने एक तुलीन नावाचे नवीन शिखर (४,८१० मी.) जिंकले. याच साली एका महिला पथकाने केदारनाथ शिखराजवळील केदार डोम हे शिखर सर केले. १९७२ साली १४ ऑक्टोबरला पुथा हनचुली, १३ व १९ ऑक्टोबरला दोन अनामिक शिखरे व ३ नोव्हेंबरला फ्रे पीन शिखर चढून जाण्यात भारतीय गिर्यारोहकांना यश मिळाले.
महिला : १९५९ साली तेनसिंग नोर्केची सतरा वर्षाची मुलगी नीमा चौ ओसूच्या शिखराच्या मोहिमेवर गेली होती. ती ६, ८३९.१७ मी. उंचीवर पोहोचली. त्या वेळचे भारताचे पंतप्रधान नेहरू यांनी तिचे अभिनंदन केले. त्यांच्या प्रेरणेनेच १९६१ साली दार्जिलिंग येथील हिमाचल गिर्यारोहण संस्थेने प्रथमच स्त्रियांना गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. १९६७ सालापासून नेहरू पर्वतारोहण संस्थेत स्त्रियांना शिकविण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. गुजरातमधील अबू येथेही महिलांना गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देण्यात येते. परिणामतः भारतीय महिला गिर्यारोहणात यशस्वी रीत्या भाग घेऊ लागल्या आहेत; इतकेच नव्हे, तर त्या नेतृत्व करण्यासही समर्थ झाल्या आहेत. कोकतांग व गंगोत्री शिखरांचे नेतृत्व पुष्पा आठवले व नंदिनी पटेल यांनी केले होते. आता तर भारतीय महिला परदेशीय महिलांचेही नेतृत्व करू लागल्या आहेत. १९६३ साली मैत्री शिखर, १९६४ साली मृगथुनी शिखर, १९६६ साली कोकतांग व गंगोत्री, १९६७ साली रोवती शिखर, १९६८ साली कैलास, १९७० साली त्रिशूल, १९७१ साली देव टिब्बा इ. विविध शिखरांवर यशस्वी मोहीम करून भारतीय महिलांनी गिर्यारोहणाच्या इतिहासात उज्ज्वल कामगिरी केली आहे.
महाराष्ट्र : महाराष्ट्रात गिर्यारोहणाचे प्रयत्न नागपूरचा अपवाद सोडला, तर बव्हंशी मुंबईपुरतेच मर्यादित आहेत. मुंबईतील गिर्यारोहण शौकिनांनी आपल्या कार्याचा आरंभ १९५४ पासून केला; पण प्रत्यक्ष गिर्यारोहणाचा कार्यक्रम मात्र त्यांनी १९६४-६५ साली हाती घेतला. मुंबई विश्वविद्यालय गिर्यारोहण सोसायटी, गिरिविहार आणि क्लाइंबर्स क्लब या गिर्यारोहणाच्या दृष्टीने उल्लेखनीय संस्था आहेत. १९६६ साली गिरिविहाराने हिमालयातील हनुमान शिखरावर महाराष्ट्रातर्फे पहिला विजय नोंदविला. १९६७ साली पुण्याच्या भारत आउटवर्ड बाउंड पायोनिअर्स या संस्थेच्या गिर्यारोहकांनी सुदर्शन पर्वत मालेतील सु. ६,१३६ मी. उंचीचे एक शिखर चढून जाण्यात यश मिळविले. या गिर्यारोहण संस्थांतर्फे प्रशिक्षण सत्रे चालविण्यात येतात. प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यावर कमीत कमी खर्चाचा बोजा पडावा, म्हणून त्या सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्या प्रोत्साहनामुळे राष्ट्रसेवा दल, गिरिविहार, हॉलिडे हायकर्स, शिवराय मंडळ इ. संस्थाही या दृष्टीने कार्य करीत आहेत.
प्राध्यापक रमेश देसाईंच्या नेतृत्वाखालील एका मुंबईच्या गिर्यारोहक तुकडीने हिमालयातील बेथार टोली हे शिखर ४ जून १९७० रोजी जिंकले. याच वर्षी मुंबईच्या डॉ. कु. मीना अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या महिला तुकडीने त्रिशूल चढून जाण्यात यश मिळविले. १९७१ साली बी.डब्ल्यू. वागळे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील गिर्यारोहण क्लबच्या चार सदस्यांनी कालिंदी शिखर ३ जूनला काबीज केले. १९७२ साली डॉ. जी. आर्. पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या पुण्याच्या पथकातील श्री. मिनू मेहता (फर्ग्युसन कॉलेजचा विद्यार्थी, वय १६ वर्षे) याने भागीरथी-४ हे नवीन शिखर चढून जाण्यात यश मिळविले. १९७५ साली हिमालयातील जोगीन-३ हे सु. ६११५ मी. उंचीचे शिखर, सहा दिवस हिमवर्षावाला व अनेक आपत्तींना तोंड देत, महाराष्ट्रीय महिलांनी काबीज केले. या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. कुमुद सोराब व लडाखमधील शेरपा च्वांग टोन्डुप या दोघांना शिखरावर चढण्याचा मान मिळाला. या तुकडीत कु. पद्मा मेहता, ठाण्याच्या विजया गद्रे, मुंबईच्या ललिता पाटील, नंदिनी नित्यानंद इ. महाराष्ट्रीय महिला होत्या. भारतातील इतर प्रांतांप्रमाणे महाराष्ट्रातही गिर्यारोहण लोकप्रिय होत असून दिवसेंदिवस अधिकाधिक लोक या साहसात भाग घेत आहेत.
गिर्यारोहण क्लब व शिक्षणसंस्था : गिर्यारोहण लोकप्रिय करण्याकरिता १८५७ साली इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम येथे अल्पाइन क्लब नावाचा गिर्यारोहण क्लब स्थापन करण्यात आला. त्याचे अध्यक्ष जॉन बाल होते. पुढील पन्नास वर्षांत १६० गिर्यारोहण क्लब स्थापन झाले. या संस्थांच्या तर्फे गिर्यारोहणास उपयुक्त तंबू पुरविले जात. इतर मार्गांनीही गिर्यारोहणास प्रोत्साहन देण्यात येत असे. आल्प्समध्ये तीन किंवा चार सत्रे राहणारा व त्या पर्वताबद्दल अधिक माहिती देणारा अल्पाइन क्लबचा सभासद होऊ शकत असे. हळूहळू अमेरिका, न्यूझीलंड, आफ्रिका, जपान, भारत इ. देशांत असे क्लब स्थापन झाले.
श्री. तेनसिंग नोर्के यांच्या एव्हरेस्टवरील अभूतपूर्व विजयामुळे भारताचे त्यावेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व बंगालचे त्यावेळचे मुख्यमंत्री बी. सी. रॉय हे प्रभावित झाले. त्यांच्या प्रेरणेने नाेव्हेंबर १९५४ मध्ये दार्जिलिंग येथे हिमालय गिर्यारोहण संस्थेची स्थापना झाली. या संस्थेस सुरुवातीपासून तेनसिंग हे गिर्यारोहण विद्येच्या प्रशिक्षणाचे दिग्दर्शक म्हणून लाभले. संस्थेचे पहिले प्रमुख मेजर एन्. डी. जयाल यांच्या चो ओयू मोहिमेत झालेल्या मृत्यूनंतर ब्रिगेडियर ग्यानसिंग यांच्याकडे प्रमुखपद आले. या संस्थेतर्फे भारतीय नवसंशोधकांकरिता एक जंतुरक्षक उद्यान चालविण्यात येते. प्राणवायूच्या कमतरतेमुळे मनुष्यप्राण्यावर काय परिणाम होतो. याचे संशोधन करण्याकरिता एक शरीररचनान्वेषण शाळा काढण्यात आली आहे. संशोधनास आवश्यक अशी सुसज्ज प्रयोगशाळाही येथे आहे. १९६२ साली या संस्थेतर्फे शरीरशास्त्रज्ञ, वैद्य व गिर्यारोहक यांचे एक आंतरराष्ट्रीय संमेलन बोलविण्यात आले होते. त्यात इंग्लंड, जपान, अमेरिका, जर्मनी, रशिया, फ्रान्स इ. देशांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. गिर्यारोहणास प्रोत्साहन मिळावे म्हणून १९६३ साली, १९५३ आणि तत्पूर्वीच्या गिर्यारोहणाचा चित्रपट या संस्थेतर्फे दाखविण्यात आला. हिमालय गिर्यारोहण संस्थेतर्फे गिर्यारोहणाकरिता शिबिरे चालविण्यात येतात. त्याचबरोबर इतर गिर्यारोहक मंडळांना आवश्यकतेनुसार शिक्षकही पुरविण्यात येतात. स्त्रियांसाठीही संस्थेतर्फे प्रशिक्षण शिबिर घेण्यात येते.
१९६१ साली पंजाब सरकारने मनाली येथे गिर्यारोहण शाळा सुरू केली. १९६५ साली उत्तर प्रदेश सरकारने उत्तर काशी येथे नेहरू पर्वतारोहण शाळा स्थापन केली. नागपुरातही एक हिमालय मंडळ स्थापन झाले आहे. भारत सरकारने राज्य सरकारांनी गिर्यारोहणाला प्रोत्साहन द्यावे म्हणून प्रयत्न केले. परिणामतः आज जवळजवळ सर्व राज्यांतून अशा संस्था आहेत. या संस्थांतर्फे गिर्यारोहणाचे प्रशिक्षण तर देण्यात येतेच, पण गिर्यारोहण मोहिमेची व्यवस्थाही करण्यात येते. हिमालयावर चढण्यासाठी वर्षाकाठी साधारणतः आता दहा-पंधरा मोहिमा निघू लागल्या आहेत. दर वर्षी साधारणतः ५०० तरुण गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेत असतात. छोट्यामोठ्या स्थानिक संस्थांतून डोंगरकडा चढण्याचे प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न दिवसेंदिवस वाढत आहेत.
१९६२ साली चीनने भारतावर केलेल्या आक्रमणापासून गिर्यारोहण भारताकरिता केवळ मनोरंजन न राहता, देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने ती एक गरज ठरली आहे.
संदर्भ : 1. Gyan Singh, Lure of Everest, New Delhi, 1961. 2. Hunt, John, The Ascent of Everest, London, 1953. 3. Kohli, M. S. Nine Atop Everest, New Delhi, 1969. 4. Styles, Showell, Men and Mountaineering, London, 1968. 5. Styles, Showell, Modern Mountaineering, London, 1964. 6. Styles, Showell, On Top of the World, London, 1967. 7. Verghese, B. G. Himalayan Endeavour, London, 1962.
८. पाटणकर, प्रभाकर , हिमालयाशी झुंज, नासिक, १९४८. ९. रॉय, श्रीकांत, पर्वताची हाक, मुंबई, १९६२.
खोडवे, अच्युत