गिरसप्पा : कर्नाटक राज्यातील शरावतीच्या काठचे तिच्या मुखापासून सु. २९ किमी.वरील गाव. येथून वरच्या बाजूस सु. १९ किमी.वर शरावतीवरील जगप्रसिद्ध गिरसप्पा धबधबा आहे. धबधब्याच्या जागी नदीचे पात्र सु. ७० मी. रुंद आहे. धबधब्याची उंची २५३ मी. असून तो राजा, रोअरर, रॉकेट व लेडी या चार धारांनी खाली पडतो. पूर्वी गिरसप्पाच्याच बाजूने धबधब्याकडे यावे लागे. आता तालगुप्पा किंवा सागर या लोहमार्गस्थानकांकडून सडकेने येता येते. धबधब्यापासून सु. २·५ किमी. वर जोग गाव आहे. यावरून त्याला ‘जोग धबधबा’ असेही नाव पडले आहे. तेथे शरावतीवर बांध घालून जलाशय तयार केला आहे व तेथून नळांनी पाणी खालच्या दरीतील वीजघरात नेऊन त्यावर १,२०,००० किवॉ. क्षमतेची महात्मा गांधी जलविद्युत् योजना उभारलेली आहे. या योजनेमुळे धबधब्याची शोभा कमी होणार नाही याची काळजी घेतात कारण धबधबा पाहण्यास देशीपरदेशी प्रवासी सतत येतात. त्यांच्यासाठी तिथे विश्रामगृहांचीही सोय केलेली आहे.
कुमठेकर, ज. ब.