गिब्ज, जोसिआ विलर्ड : (११ फेब्रुवारी १८३९—२८ एप्रिल १९०३). अमेरिकन गणितीय भौतिकीविज्ञ. सदिश विश्लेषण (दिशा व महत्ता हे दोन्ही असणाऱ्या राशींचे विश्लेषण), ⇨ प्रावस्था नियम आणि सांख्यिकीय यामिकी [→ सांख्यिकीय भौतिकी] यांसंबंधी महत्त्वाचे कार्य. त्यांचा जन्म न्यू हेवन, कनेक्टिकट येथे झाला. १८५८ मध्ये येल विद्यापीठातून पदवीधर झाल्यानंतर त्यांनी पॅरिस (१८६६-६७), बर्लिन (१८६७) व हायड्लबर्ग (१८६८) येथे अध्ययन केले. १८७१ साली येल विद्यापीठात गणितीय भौतिकीच्यी प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली आणि तेथेच त्यांनी अखेरपर्यंत काम केले.

गिब्ज यांनी १८७३ मध्ये ⇨ ऊष्मागतिकीसंबंधी (उष्णता व यांत्रिक आणि इतर रूपांतील ऊर्जा यांतील संबंधांचे गणितीय विवरण करणाऱ्या शास्त्रासंबंधी) दोन गणितीय लेख प्रसिद्ध केले. त्यानंतर विषमांगी पदार्थांच्या समतोलत्वासंबंधीच्या त्यांच्या विख्यात निबंधात (१८७६—७८) त्यांनी ऊष्मागतिकीतील पहिल्या व दुसऱ्या नियमांचा विषमांगी पदार्थांकरिता उपयोग केला आणि त्याद्वारे भौतिकीय रसायनशास्त्राचा पाया घातला. याच निबंधात त्यांनी आपला प्रसिद्ध ‘प्रावस्था नियम’ दिलेला आहे. त्यांनी सदिश विश्लेषणाचा गणितीय भौतिकीमध्ये उपयोग करण्याच्या दृष्टीने विकास केला व स्फटिकविज्ञानात तसेच ग्रह व धूमकेतू यांच्या कक्षा ठरविण्यासाठी त्याचा उपयोग केला. गिब्ज यांच्या या कार्याच्या आधारावर त्यांचे विद्यार्थी ई. बी. विल्सन यांनी व्हेक्टर ॲनॅलिसीस  हा ग्रंथ १९०१ साली प्रसिद्ध केला. प्रकाशाचा विद्युत् चुंबकीय सिद्धांत प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी अमेरिकन जर्नल ऑफ सायन्सेसमध्ये काही निबंध लिहून बहुमोल मदत केली. १९०२ मध्ये त्यांनी ‘सांख्यिकीय यामिकीची प्राथमिक तत्त्वे’ हा महत्त्वाचा निबंध प्रसिद्ध केला. त्यांचे सर्व निबंध १९२८ साली एकत्रितपणे प्रसिद्ध करण्यात आले.

अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे व लंडनच्या रॉयल सोसायटीचे ते सदस्य होते रॉयल सोसायटीतर्फे १९०१ मध्ये त्यांना कॉप्ली पदकाचा बहुमान देण्यात आला. ते न्यू हेवन येथे मृत्यु पावले.

भदे, व. ग.